You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रेल्वे स्टेशन ते मुंबईचा स्टुडिओ आणि पुन्हा एकाकी; रानू मंडल आता नक्की कुठे आहेत?
- Author, रुपसा सेनगुप्ता
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
"2019 मध्ये जेव्हा मी व्हायरल झाले, तेव्हा माझ्या घरी लोकांची खूप गर्दी असायची. मीडियावाले, कार्यक्रमांचे आमंत्रण देणारे आणि फक्त मला भेटायला येणारे अनेक लोक असायचे. आता पाच-सहा वर्षांनंतर जेव्हा लोक मला भेटतात आणि ओळखतात तेव्हा ते मला गाणं गाण्याची विनंती करतात."
या त्याच रानू मंडल आहेत, ज्यांचा एक व्हिडिओ 2019 मध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांना गाण्यांच्या अनेक ऑफर्स मिळू लागल्या. पण हळूहळू त्या चर्चेतून बाहेर गेल्या.
रानू मंडल आता कुठे आहेत आणि कशा आहेत? हे जाणून घेण्यासाठी 'बीबीसी'ची टीम त्यांच्या घरी पोहोचली.
पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील राणाघाट येथे राहणाऱ्या रानू मंडल यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांची गाणी ऐकत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या केवळ ही गाणी ऐकायच्या नाहीत तर स्वतः देखील गाणी मनापासून गुणगुणायच्या.
गाण्याच्या याच आवडीने रानू मंडल यांना इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवून दिली आणि या प्रवासाची सुरुवात झाली ती राणाघाट रेल्वे स्टेशनपासून. गोष्ट 2019 मधली आहे.
एक दिवस स्टेशनवर त्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे गाणे गात होत्या. त्याच वेळी एका स्थानिक तरुणाने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. लोकांनी रानू यांच्या आवाजाचे भरभरून कौतुक केले.
त्या रातोरात प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर एकामागून एक स्टेज शो आणि कार्यक्रमांच्या ऑफर्स त्यांना येऊ लागल्या.
मुंबईतील एका रिअॅलिटी शोमध्ये रानू मंडल यांना आमंत्रित करण्यात आले होते. तिथे संगीतकार हिमेश रेशमिया यांना त्यांचे गाणे खूप आवडले आणि त्यांनी रानू यांना आपल्या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. तेव्हा सगळीकडे रानू मंडल यांच्याच नावाची चर्चा होती.
मात्र, हे यश फार काळ टिकू शकले नाही आणि आज त्या दोन खोल्यांच्या एका छोट्याशा घरात आपलं आयुष्य एकट्याच घालवत आहेत.
शेजारी करतात देखभाल
रानू मंडल यांच्या घराबाहेर एकेकाळी मीडियाची मोठी गर्दी असायची. त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि मोठ्या कार्यक्रमांचे आमंत्रण देण्यासाठी चाहत्यांची तिथे नेहमीच रीघ लागायची. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
स्थानिक लोकांनी सांगितले की, आता त्यांची प्रकृतीही वारंवार खालावलेली असते आणि त्यांची आर्थिक स्थितीही बेताचीच आहे. सध्या आसपासचे लोकच त्यांची काळजी आणि देखरेख करतात.
स्थानिक रहिवासी संतु साहा म्हणतात, "जेव्हा व्हीडिओ व्हायरल झाला, तेव्हा मीडियावाल्यांची इथे रांग लागलेली असायची. लोक खूप दुरून त्यांना भेटायला यायचे. पण आता त्यांची काळजी घेणारं कुणीच उरलं नाही. आपली माणसंही सोबत नाहीत. त्यामुळे त्या खूप एकट्या पडल्या आहेत."
ते पुढे सांगतात, "त्यांच्या घराची अवस्थाही खूप वाईट होती. आता कुठे एका ओळखीच्या माणसाने घराची डागडुजी करून दिलीय. त्यांच्या जेवणाखाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सगळं काही आता दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून आहे."
राणाघाट स्टेशनजवळील एका दुकानदाराने सांगितले की, आजकाल युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांना शोधत येथे येतात. आम्ही सकाळी साधारण 10:30 च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचलो. तेव्हा त्या आपल्याच विश्वात हरवलेल्या होत्या.
जेव्हा आम्ही त्यांना जुन्या दिवसांबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, "मला तो प्रत्येक क्षण आजही आठवतो. ते गाणे मी आजही गाते. जर तुम्हाला ऐकायचे असेल तर मी नक्कीच गाऊन दाखवेन."
त्यानंतर त्या आनंदाने गाऊ लागल्या, "एक प्यार का नगमा है..."
त्या जुन्या दिवसांच्या आठवणीत हरवून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, "2019 हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगले होते. व्हीडिओ व्हायरल झाल्यावर माझं आयुष्यच बदलून गेलं. मी बंगालमध्ये अनेक कार्यक्रम केले. गाणी गायली आणि त्यानंतर मी मुंबईला गेले." त्या पुढे सांगतात की, त्यांनी संगीताचे कोणतेही रीतसर शिक्षण घेतलेले नाही. रेडिओवर गाणी ऐकूनच त्या गायला शिकल्या.
"मी कधीही कोणाकडून गाणे शिकले नाही. रेडिओवर गाणी ऐकूनच मी शिकले. माझ्या मावसांकडे एक रेडिओ होता. मावशी दुपारी तो लावून ठेवायची. मला झोप नसायची. म्हणून मी गाणी आणि नाटकं ऐकायचे."
गाणं लागलं की मी ते कान देऊन ऐकायचे. असं हळूहळू शिकल्यावर मलाही वाटलं की मी गाऊ शकते पण तेव्हा धीर देणारं कुणी नव्हतं."
रानू मंडल यांना लहानपणापासूनच हिंदी सिनेमा आणि गाण्यांची प्रचंड ओढ होती. आशा भोसले यांच्या जाण्याने त्या भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, "हो, बातमी पाहिली मी टीव्हीवर. खूप वाईट वाटलं. मी त्यांची गाणी ऐकायचे. त्यांचा आवाज खूप गोड होता. त्या काळातले रफी, मुकेश, किशोर कुमार… मी या सगळ्यांची गाणी ऐकूनच मोठी झाले."
रानू मंडल यांनी सांगितले की, "मला कधी शाळेत पाठवलेच नाही. मी माझ्या लहान भावाचा सांभाळ करायचे. त्याची पुस्तके पाहून मलाही वाटायचं की मी शिकावं. मी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करायचे." त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचे लग्न खूप लवकर झाले होते "माझे लग्न खूप लवकर झाले.मला दोन मुलेही होती. माझे पती मुंबईत स्वयंपाकी (कुक) म्हणून काम करायचे."
लहानपणापासूनच नशिबी संघर्ष
आपल्या दोन मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट करावे लागले. त्या सांगतात, "मी चालत जाऊन बेकरीचे सामान विकायचे. रिक्षासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे. मी किती मेहनत केली आहे हे फक्त देवालाच ठाऊक आहे." त्या म्हणतात की, अशा कठीण काळातही केवळ संगीतानेच त्यांना हिंमत दिली.
रानू सांगतात, "काम करताना असो किंवा रात्री घरी परतल्यावर मी नेहमी गाणी गुणगुणायची."
रानू यांचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षाचं होतं. मुंबई सोडून त्या जेव्हा बंगालमध्ये परतल्या तेव्हा त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप वाईट होती आणि हातात पैसेही नव्हते.
"मी चर्चमध्ये जायचे आणि देवाशी भांडायचे. तू माझ्या नशिबात हे असंच का लिहिलंयस? असं म्हणून मी देवाकडे खूप तक्रारी करायचे. कधी रडायचे, तर कधी रागावायचे."
त्या पुढे सांगतात, "मी माझ्या कुटुंबाशिवाय कधी कशाचाच विचार केला नाही. खरं तर मी गाणी गायची ती केवळ माझं दुःख विसरण्यासाठी."
स्टेशनवर गाणं गाण्याची गोष्ट
रानू यांच्या म्हणण्यानुसार, हे सगळं साधारण 2014-15 च्या आसपास सुरू झालं. त्या रोज राणाघाट स्टेशनवर चक्कर मारायच्या. रानू म्हणतात, "मी तिथे गेल्यावर ओळखीचे लोक मला गाणं म्हणायला सांगायचे. माझं गाणं ऐकल्यावर कुणी बिस्किटाचा पुडा द्यायचं. तर कुणी 10-20 रुपये हातावर ठेवायचे. असंच करता करता तिथे माझी ओळख वाढली.
2019 मध्ये एका मुलाने त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर टाकला आणि तो बघता बघता व्हायरल झाला. लोक रानू मंडल यांना शोधू लागले. त्या दिवसाची आठवण सांगताना रानू म्हणतात, "मी नेहमीप्रमाणे घरातली कामं करत होते. तेव्हाच कुणीतरी धावत आलं आणि मला सांगितलं की माझा व्हीडिओ इंटरनेटवर गाजतोय."
त्या म्हणाल्या, "व्हायरल होणे म्हणजे काय आणि मी व्हायरल झाले आहे याबद्दल मला काहीच माहिती नव्हती." त्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची मोठी चर्चा झाली. त्यांना अनेक कार्यक्रमांची आणि उद्घाटनांची आमंत्रणं मिळू लागली. त्यांनी बांग्ला भाषेत गाणी देखील गायली. मग मुंबईतल्या एका मोठ्या शोसाठी त्यांना बोलावण्यात आलं आणि तिथे त्यांची भेट हिमेश रेशमिया यांच्याशी झाली.
रानू मंडल सांगतात, "जेव्हा मला कळले की मी मुंबईला जाणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. मी जेव्हा स्टुडिओत गेले तेव्हा रेशमिया जी मेकअप करत होते. मी मनातून थोडी घाबरले होते आणि विचार करत होते की मी इथे कोणालाच ओळखत नाही त्यामुळे मी गाणार नाही."
स्टेजवर जेव्हा माझं नाव जाहीर झालं तेव्हा मी तिथे गेले. मी तेच जुनं गाणं गायलं कारण मीच ती व्हायरल झालेली रानू आहे का याबद्दल हिमेशजींना खात्री नव्हती. माझं गाणं ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. मग त्यांनी मला स्टेजवरच एक गाणं शिकवलं आणि मी ते म्हणून दाखवलं."
पुढे त्यांनी हिमेश रेशमिया यांच्यासोबत एक गाणं रेकॉर्ड केलं. 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या सिनेमात त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स होते. रानू मंडल आजही त्या क्षणांच्या आठवणीत रमून जातात.
कुटुंबासोबत न राहण्याचे दुःख
या प्रसिद्धीनंतर रानू मंडल गाण्यांपेक्षा वादांमुळेच जास्त चर्चेत राहिल्या. लोकांशी उद्धटपणे वागल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. ज्या व्यक्तीच्या व्हिडिओमुळे त्या व्हायरल झाल्या होत्या त्यांच्यावरही रानू यांनी नंतर आरोप केले. यासोबतच त्यांच्या कौटुंबिक वादांचीही जोरदार चर्चा झाली. हळूहळू त्या केवळ इंटरनेटच्या सर्चमधूनचए नाही तर लोकांच्या आठवणीतून पुसल्या जाऊ लागल्या.
स्वतःचा ताबा सुटल्याच्या वादावर त्या म्हणतात, "मी माझ्या कुटुंबाला भेटू शकत नव्हते मनात खूप वेदना होत्या. तरीही मी सर्वांसमोर आनंदी असल्याचे दाखवत असे."
रानू मंडल यांचे घरचे लोक त्यांच्यासोबत नसतात. मग त्या आज कशा आहेत? त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, "काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घराची अवस्था खूपच खराब होती तिथे राहणंही कठीण होतं. स्वतःचं घर साफ करणं किंवा स्वतःची काळजी घेणं रानूजींना जमण्यासारखं नव्हतं."
आजकाल मिठू सरकार नावाच्या महिला त्यांची काळजी घेतात. त्या सांगतात, "रानूजी इथे एकट्याच असतात. चर्चमधल्या एका दादांनी मला त्यांची देखभाल करायला सांगितलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्या खूप आजारी पडल्या होत्या. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत असते. गेल्या काही वर्षांत त्यांची आर्थिक परिस्थिती तर बिघडलीच पण मानसिक स्थितीही ढासळली आहे."
एकेकाळी चर्चेत असणाऱ्या रानू मंडल आता ग्लॅमरपासून दूर नक्की कशा आहेत? यावर त्या सांगतात, "अजूनही काही लोक मला भेटायला येतात. कधी गर्दी असते तर कधी कोणीच नसतं."
तुमच्याकडे आता कामाच्या ऑफर्स नाहीत याची खंत वाटते का? असं विचारल्यावर रानू म्हणाल्या, "आधी मी याबद्दल खूप विचार करायचे पण आता सोडून दिलंय."
पण घरापासून दूर असण्याची सल त्यांच्या मनात आजही कायम आहे. त्या डोळ्यांत पाणी आणून म्हणतात, "माझी मुलं माझ्यापासून दुरावली त्याचं दुःख काळजात आजही कायम आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)