'काम ठप्प अन् सिलिंडरही तिप्पट महागले'; सुरतच्या उधना स्टेशनवर गोंधळ होण्याचं कारण काय?

    • Author, अजित गढवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावर रविवारी (19 एप्रिल) हजारो स्थलांतरित कामगारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. हे सगळे कामगार रेल्वेनं आपापल्या गावी परतण्यासाठी जमले होते. गर्दीमुळं परिस्थिती एवढी बिघडली की पोलिसांना 'सौम्य' लाठीचार्जही करावा लागला.

या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात उधना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झालेली दिसत असून मोठा अपघात थोडक्यात टळल्याचंही पाहायला मिळत आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाच्या परिणामामुळं सुरतमधील अनेक उद्योगांची परिस्थिती सध्या गंभीर आहे. तसंच कामगारांना एलपीजी सिलिंडर अधिक दरानं खरेदी करावे लागत आहे, असं काही प्रवाशांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितले.

या संपूर्ण परिस्थितीमुळं हजारो मजूर आर्थिक अडचणीत सापडल्यानं ते सुरत सोडून त्यांच्या गावी परत जात असल्याचं चित्र आहे.

या घटनेनंतर रेल्वे व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचं कारण म्हणजे, दरवर्षी सणासुदीच्या काळात उधना स्टेशनवर प्रचंड गर्दी असते आणि प्रवाशांना तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागते.

उधना रेल्वे स्टेशनवर काय घडले?

रविवारी सकाळी हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकावर बिहारला जाणाऱ्या विशेष ट्रेनची वाट पाहत होते. त्यावेळी अचानक गोंधळ उडाला.

प्रचंड उकाडा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही जण बेशुद्ध पडल्याचं सांगण्यात येतंय. यात महिलांचा समावेश असल्याचंही म्हटलं गेलं. याठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा नसल्याच्या तक्रारीही होत्या.

एकीकडे शाळांना सुट्ट्या आणि दुसरीकडं काही ठिकाणी काम कमी झाल्यानं कामगारांना कुटुंबासह गावी परत जाण्याचा मार्ग अवलंबावा लागत आहे.

मुकेश कुमार नावाचा एक कामगार म्हणाला, "मी सुरतच्या एका कापड कंपनीत काम करत होतो. पण आता काम मिळणं बंद झालं आणि त्यात गॅस सिलिंडर तिप्पट दरानं मिळत आहे. त्यामुळं मी बिहारला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे."

हाती काम नसताना सुरतमध्ये राहण्यापेक्षा गावी जाऊन काम करणं चांगलं आहे, असंही त्यानं म्हटलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, याठिकाणी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणण्यात आली. काही लोकांनी बॅरिकेड ओलांडून ट्रेनच्या दिशेने धाव घेतल्यानं पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचं सांगण्यात आलं.

सुरत रेल्वे पोलीस निरीक्षक जे.बी. मिठापारा म्हणाले, "रविवारी अंदाजे 20 ते 22 हजार प्रवासी गावी जाण्यासाठी या स्थानकावरून रेल्वेत बसले. तरीही सुमारे 5 ते 7 हजार लोक शिल्लक राहिले."

"काही अतिरिक्त विशेष रेल्वे चालवूनही ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. तरी 5 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली."

स्थलांतरित कामगारांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप

हिरे आणि वस्त्रोद्योगांसाठी ओळखलं जाणारं सुरत शहर स्थलांतरित कामगारांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं.

एका अंदाजानुसार, याठिकाणी 42 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगार राहतात. शहराच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 58 टक्के आहे.

सुरतमधील बिहार विकास परिषदेचे अध्यक्ष धर्मेश सिंह यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं, "ही अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. आम्ही रेल्वे मंत्रालयाला अनेक वेळा पत्रं लिहिली आहेत. सध्या विशेष गाड्यांची व्यवस्था आहे, पण आम्हाला नियमित गाड्या हव्यात. या लोकांना मजुरच समजलं जातं."

शॉर्ट व्हीडिओ पाहा

रेल्वे मंत्रालय ज्या गतीनं वंदे भारतसारख्या प्रीमियम गाड्यांची संख्या वाढवत आहे, त्या गतीनं सामान्य तिकीट असलेल्या गाड्यांमधील सुविधा वाढवल्या जात नसल्याचंही सांगितलं जात आहे.

एका अहवालानुसार, रेल्वेने 2030 पर्यंत 800 वंदे भारत गाड्या चालवण्याची आणि 2047 पर्यंत ही संख्या 4 हजार 500 पर्यंत नेण्याची योजना आखली आहे.

या संदर्भात, माजी रेल्वे राज्यमंत्री नारन रथवा यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं, "रेल्वेने सुट्ट्या, छठ पूजा, होळी इत्यादी सणांसाठी स्वतंत्र योजना आखून गर्दी लक्षात घेऊन अधिक गाड्या चालवायला हव्यात. पुरेशा संख्येने विशेष गाड्या नसतील तर अशी परिस्थिती निर्माण होते."

"सध्या रेल्वे प्रीमियम गाड्यांवर लक्ष केंद्रित करत आहे, त्याला काही हरकत नाही. पण 75 टक्क्यांहून अधिक लोक सामान्य गाड्यांमधून प्रवास करणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे," असंही ते म्हणाले.

धर्मेश सिंग सांगतात की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांसाठी विशेष गाड्यांची सोय केली जाते. पण त्या 8 ते 10 तास उशिरा पोहोचतात. कामगारांचा अपमान केला जातो आणि स्वच्छतेसह आणि इतर सुविधाही अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असतात.

"उत्तर प्रदेश-बिहारसाठी दररोज 5 ते 6 नियमित गाड्या चालवल्या पाहिजेत. पण प्रत्यक्षात फक्त एक किंवा दोन नियमित गाड्या धावतात. सुरत, नवसारी आणि बारडोलीमध्ये 7 लाख बिहारी आणि उत्तर प्रदेशातील सुमारे 10 लाख लोक राहतात. या 2 राज्यांमध्ये 17 लाख लोक राहत असताना, त्यांच्यासाठी रेल्वेनं सुविधा वाढवल्या पाहिजे," असंही ते म्हणाले.

गर्दीवर नियंत्रण ठेवणे किती अवघड आहे?

बीबीसीनं रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन याबद्दल पश्चिम रेल्वेचे (वडोदरा) पोलीस अधीक्षक अभय सोनी यांच्याशी संवाद साधला.

त्यावेळी "उधना स्टेशन हे दक्षिण गुजरातचे वाहतुकीचे प्रमुख केंद्र असल्यामुळे येथून अधिक स्थलांतरित प्रवासी ट्रेनमध्ये चढतात. यामुळे वलसाड, वापी, अंकलेश्वर आणि भरूच येथील उद्योगांमध्ये काम करणारे उत्तर भारतातील लोकसुद्धा ट्रेन पकडण्यासाठी उधना स्टेशनवर येतात," असं त्यांनी सांगितलं.

"वर्षानुवर्षे आम्ही प्रवाशांची रांग लावून त्यांना ट्रेनमध्ये चढवण्याची पद्धत अवलंबली आहे. दिवाळी, होळी, छठ पूजा इत्यादी सणांच्या वेळीही अशीच व्यवस्था केली जाते," असं त्यांनी सांगितलं.

रविवारच्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले, "या ट्रेननंतर दुसरी ट्रेन नाही अशी अफवा कोणीतरी पसरवल्यामुळं काही प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याची घाई करत होते."

"लोक विशेष गाड्यांमध्ये सामान्य तिकिटावर प्रवास करतात. त्यामुळं किती प्रवासी येतील याचा अंदाज लावणं हे एक आव्हान आहे", असंही ते म्हणाले.

तर पश्चिम रेल्वेचे एसपी अभय सोनी यांनी या प्रणालीमध्ये काही सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं.

"उधना स्टेशनवर प्रवाशांसाठी थांबण्याची जागा वाढवण्याची आणि योग्य बॅरिकेडिंग करण्याची योजना आहे. ती 2-3 महिन्यांत पूर्ण केली जाईल," असं ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)