उन्हाळ्यात अन्न खराब झालंय कसं ओळखाल? फूड पॉयझनिंग होऊ नये म्हणून काय कराल? वाचा

  • वाचन वेळ: 6 मिनिटे

उन्हाळ्यात स्वयंपाकघरात केलेली एक छोटीशी चूकही आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते.

शिजवलेलं अन्न काही काळ बाहेर ठेवलं, चिरलेली फळं तशीच राहिली किंवा उरलेलं अन्न योग्य वेळी फ्रिजमध्ये ठेवलं नाही, तर अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. अनेकदा अन्न दिसायला आणि वासाला ठीक वाटत असल्यामुळे आपण ते निःसंकोचपणे खातो. मात्र शरीराला अपाय करणारे धोकादायक जंतू अन्नात कोणतीही स्पष्ट चिन्हं न दाखवता वाढू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.

अमेरिकेच्या अन्न-सुरक्षा विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अन्नपदार्थांच्या सुरक्षेत "2 तासांचा नियम" महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच शिजवलेलं अन्न खोलीच्या तापमानात दोन तासांपेक्षा जास्त ठेवणं टाळायला हवं.

अत्यंत उष्ण हवामानात ही वेळ एका तासापर्यंत कमी होऊ शकते. भात, बिर्याणी, आमटी, भाजी, मांसाहारी पदार्थ, दूध, दही, तसेच चिरलेली फळं हे पदार्थ उन्हाळ्यात लवकर खराब होऊ शकतात.

चुकीच्या पद्धतीनं पदार्थ साठवणं, स्वच्छतेचा अभाव आणि खाण्यास अयोग्य झालेले पदार्थ पुन्हा गरम करण्याच्या सवयी यामुळे अनेक कुटुंबांमध्ये उन्हाळ्यात अन्नातून होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. मग उन्हाळ्यात अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? याची माहिती येथे घेऊ.

फूड पॉयझनिंग होण्याची कारणं काय असतात?

उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासाचं मुख्य कारण बहुतेक वेळा अन्न खराब होणं हे असतं. म्हणजेच अन्न तयार करताना किंवा साठवताना झालेली चूक.

दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव, कच्चं आणि शिजवलेलं अन्न एकाच चाकू‑बोर्डवर कापणं, अन्न बराच वेळ फ्रिजबाहेर ठेवणं किंवा उरलेलं अन्न नीट गरम न करणं, या सर्व गोष्टी अन्नातून होणाऱ्या विषबाधेचा धोका वाढवतात.

विशेषतः भात आणि भात असलेल्या पदार्थांमध्ये काही जंतू 'रुम टेंम्परेचर'च्या वेगाने वाढतात आणि हे जंतू उष्णतेनेही नष्ट न होणारी विषारी द्रव्यं तयार करू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.

त्यामुळेच शिजवलेलं अन्न शक्यतो 1-2 तासांत फ्रिजमध्ये ठेवावं, सपाट डब्यांत साठवावं आणि खाण्यापूर्वी ते पूर्णपणे तापेपर्यंत गरम करावं. फक्त वास किंवा चव पाहून अन्न सुरक्षित आहे असा अंदाज बांधू नये.

डोंबिवली येथे आहार आणि पोषणतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या धन्वी मैशेरी सांगतात, "उन्हाळ्यात शिजवलेला भात (Bacillus cereus या जंतूंचा धोका असल्यामुळे), मांस, कोंबडी, मासे, बिर्याणी आणि मिश्र पदार्थ तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चिरलेली फळं विशेषतः कलिंगड, खरबूज, पपई, आमटी, रस्सा, भाजी,ओलसर व प्रथिनांनी समृद्ध पदार्थ लवकर खराब होतात."

त्या सांगतात, "उन्हाळ्यात अन्नसेवनासाठी 2 तासांचा नियम पाळला पाहिजे. मात्र 32 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात हा अवधी एक तासापर्यंत खाली येऊ शकतो. 5 अंश ते 60 अंश या तापमान पट्ट्यात जंतू फार वेगानं वाढतात. त्यामुळे उन्हाळ्यात शिजवलेलं अन्न बराच वेळ बाहेर ठेवल्यास ते दिसायला आणि वासाला ठीक वाटलं तरी खाण्यासाठी धोकादायक ठरू शकतं."

बाहेर ठेवलेल्या पदार्थात कोणते जीवाणू फूड पॉयझनिंगसाठी कारणीभूत ठरू शकतात हे माहिती असणं आवश्यक आहे.

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे डायरेक्टर ऑफ इंटर्नल मेडिसिन असणारे डॉ. अमित सराफ यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "साल्मोनेला, ई. कोलाई, स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि कॅम्पिलोबॅक्टर हे प्रमुख जीवाणू फूड पॉयझनिंगला कारणीभूत असतात.

"याशिवाय अन्न गरम केल्यावर नष्ट होणार नाहीत अशी विषारी द्रव्यं काही जीवाणू तयार करतात. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो," असं डॉ. सराफ सांगतात.

धोक्याची लक्षणं कोणती?

पोटात हलकी कळ येणं किंवा एकदाच शौचाला पातळ होत असेल तर अनेकजण त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाहीत. मात्र ही लक्षणं अन्नविषबाधेची सुरुवात असू शकतात, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

जर उलट्या वारंवार होत असतील, तर काहीतरी बिघडलं असल्याचा तो स्पष्ट इशारा असतो. 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणं ही साधी गोष्ट नसून संसर्ग वाढत असल्याचं लक्षण असू शकतं.

मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील मुख्य आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम सांगतात,

"शौचामध्ये रक्त दिसणं हा आजार गंभीर पातळीवर पोहोचल्याचा संकेत मानला जातो. उभं राहिल्यावर चक्कर येणं म्हणजे शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता वाढत चालली आहे, असं समजायला हवं. अन्न पुन्हा गरम केल्यावर ते पूर्णतः सुरक्षित होतं, ही एक मोठी गैरसमजूत आहे. काही जंतू अन्नात आधीच विषघटक तयार करतात, जे उकळल्यानंतरही नष्ट होत नाहीत. त्यामुळे बराच वेळ बाहेर ठेवलेलं अन्न पुन्हा गरम करून खाणं धोकादायक ठरू शकतं."

लहान मुलं आणि वृद्धांची काळजी कशी घ्यायची?

लहान मुलांची प्रतिकारशक्ती अजून पूर्ण विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांचं शरीर फार कमी वेळात डिहायड्रेट होऊ शकतं. वृद्ध व्यक्तींच्या पोटात जंतुंविरुद्ध नैसर्गिक संरक्षणाचं काम करणाऱ्या आम्लाचं प्रमाण कमी झालेलं असतं.

तसेच अनेक वृद्धांना आधीपासून इतर आजार असल्यानं धोका आणखी वाढतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध, गर्भवती यांच्याबाबतीत लक्षणं तीव्र वाटत असली तर वेळ न घालवता रुग्णालयात गेलं पाहिजे.

फूड पॉयझनिंगची शंका आल्यास काय करावं?

फूड पॉयझनिंगची शंका आली तर सर्वप्रथम शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS), पुरेसे द्रवपदार्थ आणि हलका आहार घ्यावा. विश्रांती घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून औषधे घेणे टाळावे.

डॉ. अमित सराफ सांगतात, "याची लक्षणं एक दिवसापेक्षा जास्त टिकल्यास, सतत उलट्या होत असल्यास, पाणी किंवा द्रवपदार्थ पोटात राहात नसल्यास, जास्त ताप असल्यास, गोंधळल्यासारखे वाटल्यास किंवा डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास विशेषतः मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये अशी लक्षमं असल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घ्यावी"

अन्न खराब झालंय कसं ओळखाल?

बहुतांशवेळा पदार्थ खराब झाला असल्यास त्याला आंबट किंवा विचित्र वास येतो. ते चिकट होतात. दह्यासारख्या पॅक पदार्थात वायू तयार होऊन ती पाकिटं फुगतात. काही पदार्थांवर पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाची बुरशी दिसते. पदार्थांचे रंगही बदलतात.

मात्र काही धोकादायक जंतू अन्न दिसायला आणि वासाला ठीक असतानाही त्यात वाढलेले असू शकतात. म्हणूनच साठवण पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे.

धन्वी मैशेरी सांगतात, " फ्रिजमध्ये ठेवल्याने जंतूंची वाढ हळू होते, पण आधीच दूषित झालेले अन्न सुरक्षित होत नाही, तसेच सर्व जंतू किंवा विषारी द्रव्ये नष्ट होत नाहीत. अन्न आधी चुकीच्या पद्धतीने हाताळले असेल, तर फ्रिजमध्ये ठेवल्यावरही धोका कायम राहू शकतो."

धन्वी सांगतात, "चिरलेली फळं बाहेर ठेवली असली तर आदर्शतः 2 तासांपेक्षाी जास्त ठेवू नयेत आणि खूप उष्ण हवामानात 1 तासाच्या आत संपवली पाहिजेत. एकदा फळं चिरली की त्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याचा धोका आणि पोषक घटकांचा ऱ्हास व्हायला लागतो. म्हणून चिरलेली फळे फ्रिजमध्ये ठेवावीत आणि लवकर खाल्ली पाहिजेत. आजकाल काही ठिकाणी कलिंगड जास्त काळ टिकावे यासाठी त्यात रंग व रसायने टोचली जातात. अशा कलिंगडाच्या सेवनामुळे पोटदुखी, जुलाब तसेच गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

घरात अन्न हाताळताना होणाऱ्या सामान्य चुका

  • शिजवलेले अन्न जास्त वेळ बाहेर ठेवणे
  • नीट पुन्हा गरम न करणे
  • मोठ्या भांड्यात अन्न तासन्तास गरम ठेवणे
  • फळे कापून उघडी ठेवणे
  • कच्चे व शिजवलेले अन्न कापण्यासाठी एकाच चाकूचा/बोर्डाचा वापर
  • हातांची स्वच्छता न राखणे
  • उरलेले अन्न वारंवार गरम करणे
  • फक्त वास किंवा चव पाहून अन्न सुरक्षित समजणे.

उन्हाळ्यात अन्नविषबाधा टाळण्यासाठी सोप्या टिप्स

उन्हाळ्यात अन्न शक्यतो ताजंच शिजवावं. 1-2 तासांचा नियम नेहमी लक्षात ठेवावा. अन्न थोड्यावेळातच फ्रिजमध्ये ठेवावं. फारवेळ बाहेर ठेवून फ्रिजमध्ये ठेवू नका. चिरलेली फळं नंतर खायची असतील तर ती फ्रिजमध्ये ठेवा.

अन्नपदार्थ हाताळण्याआधी भांडी आणि हात नीट धुवा. शिळे पदार्थ खाणं टाळा, रस्त्यावरील उघडे पदार्थ खाऊ नका. उरलेलं अन्न खायचं असेल तर ते नीट गरम करा. स्वयंपाकघर नीट स्वच्छ ठेवा. अन्न खराब झालंय अशी शंका आली असेल तर ते न खाणं चांगलं.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)