You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय खलाशी दीक्षित सोलंकीच्या पार्थिवाचे अवशेष 35 दिवसानंतर अखेर मुंबईत दाखल, कुटुंबीयांनी काय म्हटलं?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 8 मिनिटे
भारतीय खलाशी दीक्षित सोलंकी याच्या मृत्यूनंतर 35 दिवसांनी त्याच्या पार्थिवाचे अवशेष अखेर मुंबईत दाखल झाले आहे.
5 एप्रिलच्या मध्यरात्री सोलंकी यांच्या कुटुंबीयांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर पार्थिव पोहोचेल असा संदेश शिपिंग मंत्रालय, वी शिप्स इंडिया प्रा. लि., तसेच दुबईस्थित भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास यांच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार पार्थिवाचे अवशेष मुंबईत दाखल झाले आहे.
दरम्यान, सोलंकी कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात मुलाचे पार्थिव लवकर मिळावे यासाठी याचिका दाखल केल्यानंतरच ही प्रक्रिया वेगाने पार पडल्याचेही समजते.
कुटुंबीयांच्या वतीने वकील सतीश तळेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना पार्थिवाचे अवशेष मुंबईत दाखल झाल्याला दुजोरा दिला. मात्र, या प्रक्रियेसाठी विलंब झाल्याने व काही प्रश्न कुटुंबाला पडले असल्याने हे अवशेष दीक्षित सोलंकी यांचेच असल्याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणीची मागणी कुटुंबीयांनी केली असून, ती चाचणी झाल्याशिवाय अवशेष ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबीयांनी भूमिका मांडली असल्याचे वकिलांनी सांगितले.
डीएनए चाचणीसाठी न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असल्याचे प्रशासनाच्या वतीने कुटुंबीयांना सांगण्यात आले आहे. सध्या पार्थिव अवशेष प्रशासनाच्याच ताब्यात आहे.
सोलंकी यांच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज 6 एप्रिलला सुनावणी बोर्डावर लिस्टेड असून सुनावणी पार पडणे अपेक्षित आहे. त्या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलंकीच्या मृतदेहासाठी कुटुंबीयांनी हायकोर्टात दाखल केली होती याचिका
दीक्षित सोलंकीच्या वडिलांनी मुलाच्या पार्थिवासाठी आता थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. ओमानच्या किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दीक्षितचा मृत्यू झाला होता.
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धादरम्यान 4 मार्च रोजी ओमानजवळ एमटी एमकेडी व्योम या तेलवाहू जहाजावर ड्रोन आदळलं होतं. या हल्ल्यात बोटीवर खलाशी असलेले 25 वर्षीय दिक्षित सोलंकी ठार झाले होते.
या घटनेला महिना उलटूनही मुलाचं पार्थिव अद्याप ताब्यात न मिळाल्यानं दीक्षितचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली यांनी आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेतून सोलंकी कुटुंबीयांनी न्यायालयाकडे मुख्यतः त्यांच्या मृत मुलाचे पार्थिव शक्य तितक्या लवकर भारतात परत आणून (repatriate करून) त्यांच्या ताब्यात द्यावे,अशी मागणी केली आहे.
अहवाल, इन्स्पेक्शन रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट (जे UAE अधिकाऱ्यांना सादर केले आहेत) तसेच जहाजाशी संबंधित फोटो पुरावे अशी संबंधित सर्व तपास कागदपत्रं याचिकाकर्त्यांना देण्याचे निर्देश प्रतिवादींना द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच, दीक्षित सोलंकीचं पार्थिव भारतात आणेपर्यंत ते सुरक्षित आणि योग्य स्थितीत जतन (preserve) करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, न्यायालयाने योग्य वाटतील ते इतर दिलासे (reliefs) देखील देण्यात यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी 6 एप्रिल रोजी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणं अपेक्षित आहे.
दिक्षित सोलंकी यांच्या मृत्यूला एक महिना उलटून गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत काय घडलं, जाणून घ्या -
मुंबईतील दीक्षित सोलंकीचे वडील काय म्हणाले होते?
दीक्षित सोलंकीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर त्याच्या वडिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
दीक्षित यांचा मृत्यू नेमका कसा झाला, तिथे नेमकं काय घडलं, याची माहितीसुद्धा ना कंपनी ना प्रशासनाकडून त्यांना मिळाली होती.
यामुळं सोलंकी कुटुंबाने कंपनी आणि शोध मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले होते.
"आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? सरकार देणार, कंपनी देणार की दूतावास देणार, आम्हाला आतापर्यंत काहीच स्पष्ट माहिती नाही. ज्या गोष्टी रेस्क्यूसाठी करायला हव्या होत्या. त्या केल्या नाहीत," असा आरोप दीक्षितचे वडील अमृतलाल सोलंकी यांनी केला होता.
"पार्थिवाची प्रतीक्षा आहे. बारा दिवस उलटूनही पार्थिव मिळाले नाही. नक्की काय घडलं हे कळालं नाही त्यामुळे सगळ्या प्रक्रिया रखडलेल्या आहेत. प्रतीक्षा करून डोकेदुखी वाढली आहे, मी आता जिवंतपणे मेलो आहे," असंही त्यांनी म्हटलं होतं.
ओमानची राजधानी मस्कतमधल्या भारतीय दूतावासाने या घटनेसंदर्भात शोक व्यक्त करत म्हटलं होतं की, "त्या जहाजावरील भारतीय नागरिकांचं सुरक्षित आणि लवकर घरी परतणं सुनिश्चित करण्यासाठी दूतावास ओमानमधील स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहे."
सेलर युनियन ऑफ इंडिया अध्यक्ष आर. पी. विठ्ठील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते की, "झालेली घटना दुर्दैवी आहे. मात्र शिपिंग कंपनीने या घटने संदर्भात तत्काळ कुटुंबीयांना योग्य माहिती देत समन्वय साधला पाहिजे. मात्र या घटनेत समन्वयाचा अभाव आहे, आणि योग्य माहिती कुटुंबापर्यंत कंपनीने पोहोचवलेली नाही. घटना घडल्यानंतर तात्काळ पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासाठी हालचाली कंपनीने केल्या पाहिजेत. तसेच नियमानुसार मदत देखील कुटुंबाला मिळाली पाहिजे."
या प्रकरणी बीबीसी मराठीने V. शिप्स कंपनीलाही संपर्क साधला होता. या कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं होतं की "V. शिप्स आशियाचे प्रतिनिधी मृत क्रू सदस्याच्या कुटुंबासोबत असून, त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करत असून, त्यांच्याशी नियमित संपर्कात आहेत."
बचावलेल्या इतर सर्व क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परत पाठवण्यात आलं असून, जहाजालाही दुरुस्तीसाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचं टोइंग ऑपरेशन सुरू आहे, असंही V.शिप कंपनीने बीबीसीला सांगितलं होतं.
मात्र बारा दिवस उलटूनही दीक्षित यांचं पार्थिव न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबानेच आता हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी विविध संघटनांद्वारेही कंपनीला आणि सरकारला मदतीसाठी आवाहन केलं होतं.
दीक्षित सोलंकी हे मूळचे दीवचे होते, पण त्यांचे कुटुंब सध्या मुंबईत कांदिवली येथे राहते.
दीक्षित यांच्या वडिलांनी गुरुवारी ( 5 मार्च) बीबीसीला सांगितलं होतं की, दीक्षित हे खनिज तेल वाहून नेणाऱ्या एमकेडी व्योम नावाच्या तेल टँकरवर ऑइलर खलाशी म्हणून काम करत होते.
एक मार्च रोजी सकाळी एमकेडी व्योम ओमानच्या आखातातून जात असताना त्यावर हल्ला झाला आणि त्याला आग लागली. या घटनेत दीक्षित यांचा मृत्यू झाला.
मात्र, घटनेला पाच दिवस उलटूनही दीक्षित यांचे पार्थिव भारतात परत आणण्यात आलेले नाही. केंद्र व राज्य सरकार आणि संबंधित कंपनीने अजूनपर्यंत कुटुंबाशी संपर्क केलेला नाही, असे सांगत सोलंकी कुटुंबीयांनी आणि सेलर्स युनियनने सांगत नाराजी व्यक्त केली होती.
1 मार्च रोजी दीक्षितच्या जहाजाचे काय झाले?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लंडनमध्ये मुख्यालय असलेली व्ही. शिप्स नावाची कंपनी एमकेडी व्योम टँकरचे व्यवस्थापन करते.
रॉयटर्सने व्ही. शिप्सच्या एका अपघाताचा हवाला देत 1 मार्च रोजी वृत्त दिले की, ओमानमधील मस्कतच्या किनाऱ्याजवळ असताना जहाजावर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या एका भारतीय क्रू सदस्याचा म्हणजेच एका खलाशीचा मृत्यू झाला.
"1 मार्च रोजी जहाज मस्कतच्या किनाऱ्याजवळ असताना त्यावर एका संशयित मिसाइल आदळले, ज्यामुळे स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. घटनेच्या वेळी इंजिन रूममध्ये असलेल्या एका क्रू मेंबरचे निधन झाल्याची आम्ही अत्यंत दुःखाने सांगत आहोत," असे व्ही. शिप्सने आपल्या निवेदनात म्हटल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेनी सांगितले.
दीक्षित सोलंकी सहा वर्षांपासून ऑईलर म्हणून कार्यरत
दीक्षित अमृतलाल सोलंकी हे 32 वर्षांचा तरुण होते.
1994 ला दीव येथे त्यांचा जन्म झाला होता. मूळचे ते दीव येथील रहिवासी होते. मात्र गेल्या सात वर्षांपासून ते मुंबईतील महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे वास्तव्यास होते.
घरी त्यांच्या पश्चात वडील अमृतलाल आणि एक 28 वर्षीय बहीण असे त्यांचे कुटुंब आहे. बहीण दुबई येथे कामानिमित्त असते. चार महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते.
दीक्षित यांचे बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण दीव व मुंबई येथे झाले होते. त्यानंतर जीपी रेटिंग आणि एसटीसीडब्ल्यू कोर्स म्हणजेच अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते.
गेल्या सहा वर्षांपासून ते विविध कंपन्यांमध्ये ऑईलर खलाशी म्हणून काम करत होते, अशी माहिती वडिलांनी दिली.
वडील देखील फिटर म्हणून या क्षेत्रात गेले 20 वर्षे कार्यरत होते.
वडिलांनी काम केलेल्या कंपनीतच सध्या दीक्षित गेल्या चार महिन्यांपासून कॉन्ट्रॅक्टवर कार्यरत होते. 10 डिसेंबर रोजी ते ड्युटीवर कार्यरत झाले होते, तर 10 सप्टेंबर 2026 रोजी ते पुन्हा भारतात परतणार होते.
पार्थिव व सविस्तर रिपोर्ट देण्याची वडिलांची मागणी
दीक्षितचे वडील अमृतलाल बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, "आम्हाला या घटनेबाबत कंपनीच्या काही लोकांनी घरी येऊन एक तारखेला सांगितलं, आम्हाला याचा धक्का बसला आहे. लहानपणापासून दीक्षितच्या खूप आठवणी आहेत."
अमृतलाल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मोठ्या लाडात आम्ही त्याला वाढवलं आणि आमचं आयुष्य खूप चांगलं सुरू होतं. या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. चार महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते. आता त्याच्या निधनाने आम्ही पोरके झालो आहोत. आम्हाला कोणत्याही स्वरूपात मुलाचे पार्थिव हवे आहे. शेवटचे दर्शन करून सर्व प्रक्रिया आम्हाला करायची आहे."
पुढे अमृतलाल यांनी म्हटलं होतं की, "घटना घडून पाच दिवस झाले. संबंधित कंपनी आणि त्याच्यासोबत असलेल्या खलाशींशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही. खोटी माहिती दिली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने देखील कोणतीही विचारपूस केलेली नाही. आमची मागणी आहे की पार्थिव आम्हाला लवकर द्यावे आणि घटना कशी घडली व मृत्यू कसा झाला याबाबत सविस्तर रिपोर्ट द्यावा."
कुटुंबाने दीक्षितचा चेहरा शेवटचा कधी पाहिला होता?
दीव येथे राहणाऱ्या दीक्षित यांच्या काकी शर्मिलाभाईन यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितले की, दीक्षित गेल्या चार महिन्यांपासून सतत ड्युटीवर होते.
शर्मिलाभाईन म्हणाल्या, "आईचे निधन झाल्यावर दीक्षित घरी आला. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर आणि त्याची सुट्टी संपल्यानंतर तो पुन्हा कामावर गेला."
"त्यानंतर तो जवळजवळ चार महिने घरी आला नाही. आता तो मोठा झाला आहे. आम्ही त्याचे लग्न करण्याचा विचार करत होतो. पण निसर्गाने वेगळाच निर्णय घेतला असावा."
काकूंनी पुढे सांगितले की, दहा दिवसांपूर्वी आमच्याशी त्यांनी केलेले फोन संभाषण हे शेवटचे संभाषण ठरले.
दीक्षितने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्याच्या वडिलांच्या आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवून सुमारे सहा वर्षांपूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी स्वीकारली.
या घटनेबद्दल भारत सरकारने काय म्हटले होते?
ओमानची राजधानी मस्कतमधील भारतीय दूतावासानेही ओमान येथे झालेल्या घटनेत एका भारतीय खलाशीच्या मृत्यूची पुष्टी केली, परंतु दीक्षितचे नाव घेतले नाही.
"एमकेडी व्योम येथील एका भारतीय नागरिकाच्या दुःखद मृत्यूबद्दल भारतीय दूतावास शोक व्यक्त करतो," असे भारतीय दूतावासाने 2 मार्च रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
"त्या जहाजावरील आमच्या नागरिकांचे सुरक्षित आणि लवकर घरी परतणे सुनिश्चित करण्यासाठी दूतावास ओमानमधील स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहे."
मात्र दीक्षित यांचे पार्थिव गुरुवार, 5 मार्च रोजी संध्याकाळपर्यंत कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले नाही, त्यामुळे वडिलांनी नाराजी व्यक्त केली.
"हा आमच्यासाठी खूप वेदनादायक काळ आहे. कारण दीक्षितला आमच्याकडे कधी सोपवले जाईल याबद्दल आम्हाला कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. आम्ही सतत कंपनी आणि युनियनमार्फत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधत आहोत. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला प्रतीक्षा आहे मुलाच्या पार्थिवाची," असे वडील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
व्ही. शिप्स कंपनीने काय प्रतिक्रिया दिली होती?
1 मार्च 2026 ला ओमानच्या मस्कत किनाऱ्याजवळ संशयास्पद प्रक्षेपणामुळे एमकेडी व्योम (आयएमओ 9284386) या मार्शल आयलंड-ध्वजांकित उत्पादन टँकरला धडक बसून स्फोट झाला आणि आग लागली.
या जहाजाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या व्ही.शिप्स एशिया या कंपनीने घटनेबद्दल माहिती दिली आहे.
सर्व क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले असून ते आता आपल्या कुटुंबीयांसोबत आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या क्रू सदस्याच्या कुटुंबाला कंपनीकडून पूर्ण पाठिंबा दिला जात असून त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला जात आहे.
सध्या जहाज सुरक्षित आणि स्थिर स्थितीत जहाजाला सुरक्षित आश्रयस्थानात नेण्यासाठी टोइंग ऑपरेशन सुरू असून तेथे त्याची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती केली जाईल, असंही व्ही.शिप्स एशियाने म्हटलं आहे.
हजारो नाविक आखाती देशांमध्ये सध्या अडकलेले
हजारो नाविक आखाती देशांमध्ये सध्या अडकलेले आहेत. त्यांना परत भारतात आणण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी प्रतिक्रिया सेलर युनियनने दिली आहे.
सेलर युनियन ऑफ इंडिया अध्यक्ष आर. पी. विठ्ठील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "झालेली घटना दुर्दैवी आहे. मात्र शिपिंग कंपनीने या घटने संदर्भात तत्काळ कुटुंबीयांना योग्य माहिती देत समन्वय साधला पाहिजे. मात्र या घटनेत समन्वयाचा अभाव आहे आणि योग्य माहिती कुटुंबापर्यंत कंपनीने पोहोचवलेली नाही. घटना घडल्यानंतर तात्काळ पार्थिव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासाठी हालचाली कंपनीने केल्या पाहिजेत. तसेच नियमानुसार मदत देखील कुटुंबाला मिळाली पाहिजे."
पुढे विठ्ठील म्हणाले की, आमची सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारकडे विनंती आहे की, जे हजारो सिफर्स आखाती देशांमध्ये सध्या अडकलेले आहेत त्यांना परत भारतात आणण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आमच्या माहितीनुसार साधारण 1500 बोटी या आखाती देशांमध्ये अडकलेल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय नागरिक आहेत. त्यांना योग्य अन्न आणि मदत मिळत आहे की नाही, हे देखील केंद्र सरकारने आणि संबंधित प्रशासनाने पाहावे, अशी आमची विनंती आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.