'पावणेदहा लाख रुपयांचा खर्च आणि साडेसात लाखांचं कर्ज'; भाड्यानं शेती करणारे मदतीपासून वंचित - ग्राऊंड रिपोर्ट

मंगेश पांडव हे भाड्याने शेती घेऊन कसत आहेत.
फोटो कॅप्शन, मंगेश पांडव हे भाड्याने शेती घेऊन कसत आहेत.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"शेतीला पूर्ण खर्च साडेनऊ ते पावणेदहा लाख रुपये आला. साडेसात लाखांचं पूर्ण कर्ज घेतलं. आता उत्पन्न अर्धंही होणार नाही अशी परिस्थिती आहे. कर्जाचे पैसे कसे फेडायचे? घराचा प्रपंच कसा चालवायचा? पोरं नागपूरला शिकतात. त्यांचा खर्च कसा करायचा? सगळा विचार आलाय."

शेताच्या बांधावर बसून मंगेश पांडव आपली व्यथा मांडत होते. मंगेश यांनी शेतमजुरी करता करता आपल्यालाही शेतकऱ्यासारखी जमीन कसता येईल आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळालं तर आपल्याला मजुरीसाठी भटकायला लागणार नाही, असं स्वप्न पाहिलं.

त्यासाठी त्यांनी कर्ज काढून तब्बल 20 एकर शेती 17 हजार रुपये एकरप्रमाणे 3 लाख 40 हजार रुपयांना भाड्यानं केली. पण, यावर्षी त्यांच्या स्वप्नांची माती झाली. कारण, दुष्काळानं पिकांची अवस्था वाईट आहे.

शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसलाच. त्यांना सरकारकडून काही ना काही मदत मिळेल. पण, मंगेश यांच्यासारखे एकही एकर शेती नसणारे आणि भाड्यानं शेती करणाऱ्या लोकांनाही या दुष्काळाचा फटका बसलाय.

त्यांना अशी कुठलीही मदत सरकारकडून मिळत नाही.

मंगेश यांच्यासारख्या शेतकऱ्यांचं काय होणार? त्यांची अवस्था कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील साठगाव या गावात.

शेती करायला मायक्रोफायनान्स, बचत गटातून कर्ज काढलं

मंगेश यांचं काहीच शिक्षण झालं नाही. ते दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचे. राहायला घर नसल्यानं त्यांनी दोन वर्षांपूर्वी घराचं बांधकाम काढलं. पण, पैसे नसल्यानं ते देखील अर्धवट आहे. मजुरीच्या पैशानं घराचं बांधकाम पूर्ण होणार नाही. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यासारखी शेती करायची आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर घराचं बांधकाम पूर्ण करायचं ठरवलं.

मंगेश सांगतात, "मी शेतकऱ्याकडे नोकरी करत होतो. मला वाटलं ही शेती मालकाला परवडू शकते. मालक व्याजानं पैसा आणून शेती करत आहे. मी तर स्वतः मेहनती माणूस आहे. मेहनत केली तर चार पैसे मला पण मिळू शकतात. याची नोकरी करण्यापेक्षा आपण सकाळी उठून आपल्या घरी फवारणी केली तर आपल्याला तेवढं उत्पन्न भेटू शकतं. त्यामुळे एवढी शेती करण्याचे प्रयत्न केले."

पण, शेती करायला घरात पैसा नव्हताच. तसेच घरात एकही एकर शेती नसल्यानं त्यांना बँकांकडून सुद्धा कर्ज मिळणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी खासगी कर्जाचा पर्याय निवडला.

"माझ्याकडे दोन लाख रुपये होते. त्यामधून काही शेतीचं भाडं दिलं. मग तीन मायक्रोफानान्सकडून कर्ज काढलं. त्यानंतर बचत गटांमधून 3 लाख 40 हजार रुपये कर्ज काढलं. दलालाकडून दीड लाख रुपये आणले आणि शेतीला पैसा लावला" असं मंगेश सांगतात.

कर्ज फेडायचं कसं?

20 एकर शेतीपैकी एका एकरात भातपीक आहे, तर उर्वरीत शेतात कापूस लावला. भातपीकाची अवस्था वाईट आहे. पिकाची उंची वाढली नाही, काही ठिकाणी लोंब्या आल्या पण त्यात तांदूळ दिसत नाही. कापणीचा खर्च परवडणारा नसल्यानं त्यांनी भातपीक जनावरांच्या चाऱ्यासाठी असंच सोडून दिलं.

कापसाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कापसाची उंची चांगली वाढली. पण, त्याला पाहिजे त्या प्रमाणात बोंडे नाही. काही ठिकाणी फुल-पाती पावसाअभावी गळून पडली, तर कापसाची झाडं सुद्धा सुकायला लागली आहे. चार एकरात पाण्याची सोय आहे. पण, तिथल्या कापसावर रोग आलाय. त्यामुळे तिथेही उत्पन्न होईल की नाही याची शंका त्यांना आहे.

20 एकरासाठी खर्च लागला त्यापेक्षा अर्धही उत्पन्न होणार नाही. तर मग कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न पांडव उपस्थित करतात.

नुकसान भरपाई मिळत नाही, मग जगायचं कसं?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सरकारकडून इतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर झाली ती पांडव यांना मिळणार नाही. कारण, त्यांनी शेती भाड्यानं घेतली आहे. त्यांनी त्याचा कागदोपत्री भाडेकरार सुद्धा केला नाही. त्या शेतीसाठी त्यांनी कर्ज काढून पैसा लावला, पिकांसाठी मेहनत घेतली. पण, प्रत्यक्ष नुकसान भरपाईचे पैसे सातबारा नावावर असणाऱ्या शेतकऱ्याला मिळाले आहेत.

पण, हे नुकसान भरपाईचे पैसे आम्हाला मिळावे अशी मागणी ते करतात.

ते म्हणतात, "नुकसानभरपाईचे जे पैसे आहेत ते आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे. फक्त सातबारा त्यांच्या (मूळ मालकाच्या) नावानं आहे. बाकी आम्ही सगळा खर्च करतो. सगळं रोटावेटर फिरवणं, फवारणी करणं, पीक घेणं सगळा टोटल खर्च आम्ही करतो."

महाराष्ट्रात ज्याच्या नावावर सातबारा आहे, त्यालाच शेतकरी म्हणून सरकारी नोंदींमध्ये ओळख मिळते. त्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झाल्यास सरकारी मदतही प्रामुख्याने जमीनमालकाच्या नावावर दिली जाते.

मात्र प्रत्यक्ष शेती करणारा भाडेकरू किंवा वाटेकरी शेतकरी असेल, तर जमीन त्याच्या नावावर नसल्यामुळे त्याला नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी येतात.

भाड्यानं शेती करणाऱ्या लोकांनाही या दुष्काळाचा फटका बसलाय.
फोटो कॅप्शन, भाड्यानं शेती करणाऱ्या लोकांनाही या दुष्काळाचा फटका बसलाय.

पांडव यांच्यासारखे अनेक लोक आहेत जे भाड्यानं जमीन घेऊन शेती करतात. तसेच काही अल्पभूधारक शेतकरी सुद्धा घरच्या शेतीला सोबत म्हणून दुसऱ्याची शेती भाड्यानं घेऊन करतात.

यात असंही आढळून आलं आहे की नुकसानभरपाई ही मूळ मालकालाचा मिळते. कारण सातबाऱ्यावर त्यांचेच नाव असते. पण, भाड्यानं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी भाडेकरार करणं महत्त्वाचा आहे. तेव्हाच त्यांना अशा नुकसान भरपाईचा लाभ मिळू शकतो.

भाड्यानं शेती करणाऱ्यांसाठी नियम, पण अंमलबजावणी नाही

राज्याच्या महसूल विभागानं मे 2026 मध्ये एक पत्रक काढून भाड्यानं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाडेकरार करणे बंधनकारक असल्याचा नियम काढला होता. कूळ कायद्याचा या नियमांवर कुठलाही परिणाम होणार नाही असं सुद्धा या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच प्रत्येक तहसीलदारांनी या नियमाची अंमलबजावणी करावी असे आदेश सुद्धा देण्यात आले होते.

पण, सरकारी पातळीवर त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही हे जमिनीवरील चित्र आहे.

"अंमलबजावणी तर झाली नाहीच. पण, अशा भाड्यानं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं नुकसान भरपाईची तरतूदच केली नव्हती," असं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून सांगण्यात आलं.

ते म्हणाले, "या हंगामात अशा भाडेपट्टाधारकांसाठी कुठलीही मदतीची तरतूद केलेली नाही. पण, येणाऱ्या हंगामात त्यांना मदत कशी देता येईल यासाठी तरतूद केली जाईल. पण, यासाठी त्यांच्याकडे भाडेपट्ट्याचे अधिकृत कागदपत्रं असणं महत्त्वाचं आहे. भाडेपट्टा असेल तर नुकसानग्रस्त लोकांना मदत करणं सोप्पं जाईल."

सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालेल्या लोकांनी आता जगायचं कसं असा प्रश्न आहे. त्यासाठी शेतकरी नेते विजय जावंधिया भाड्यानं शेती देणाऱ्या शेतकऱ्यांनीच दया दाखवावी असं आवाहन करतात.

ते म्हणतात, "सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या शेतकऱ्यानं आपली जमीन ठेक्यानं दिली आणि त्यांना सरकारकडून मदत मिळतेय ती सगळी मदत त्यांनी त्या ठेकेदाराला ट्रान्सफर करावी. सरकारनं यात काय करायला पाहिजे तर जमिनी ठेक्यानं घेणाऱ्या लोकांना मदत दिली पाहिजे. सर्व्हे करता ना तुम्ही आणि सांगता की सर्व्हे झाल्यावर आम्ही मदत करतो मग सर्व्हे करताना पटवाऱ्याला ही माहिती मिळू शकते ना जमीन या या माणसानं ठेक्यानं केलेली आहे. मग त्या ठेकेदाराच्या खात्यात पैसे जमा करावे.

कोणी अल्पभूधारक शेतकरी सुद्धा आपल्या शेती भाड्यानं देतात. मग त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं आणखी वेगळ्या उपाययोजना करायला पाहिजे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)