वैभव सूर्यवंशी : 'इतके सिक्सर तर हाताने देखील फेकता येणार नाहीत'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून तोंडभरून कौतुक

फोटो स्रोत, Getty Images
आशिया कप रायजिंग स्टार्स सामन्यात युएईविरुद्ध वैभव सूर्यवंशीने केलेल्या स्फोटक खेळीची जगभरात चर्चा होत असून, विशेषतः पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
मंगळवारी पाकिस्तान 'ए' संघाने नेपाळला 96 धावांनी पराभूत केले. पण पाकिस्तानमध्ये, या विजयापेक्षाही भारताच्या युएईविरुद्धच्या विजयाची जास्त चर्चा होत आहे.
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावावर लिस्ट ए मध्ये सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम आहे.
त्यानं युएईविरुद्ध अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावलं आणि यामध्ये 28 षटकार व सात चौकारांचा समावेश होता.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, "वैभव सूर्यवंशीनं 28 चेंडूंमध्ये शतक झळकावून लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा नवा विक्रम रचला आहे. त्यानं जेक फ्रेझर-मॅकगर्कचा 29 चेंडूंमध्ये शतक करण्याचा आधीचा विक्रम मागे टाकला आहे."
"तो चांगला खेळला. हा 'ए' दर्जाचा संघ आहे. टी-20 मधील त्याची क्षमता विलक्षण आहे. तसेच, त्याचे पॉवर हिटिंग उत्कृष्ट होतं. तो खूप चांगला खेळला," असंही सौरव गांगुली म्हणाले.
पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे की, 'व्हीडिओ गेम्समध्येही इतके षटकार मारता येत नाहीत' किंवा 'संपूर्ण संघसुद्धा इतके षटकार मारू शकत नाही.'
'संपूर्ण संघाला मारता येणार नाहीत एवढे षटकार'
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली म्हणाले की, 'युएईविरुद्ध तर सामनाच होऊ शकला नाही.'
आपल्या यूट्यूब चॅनलवर भाष्य करताना ते म्हणाले की , "यूएईनं 249 धावांचं चांगलं टार्गेट दिलं होतं आणि दुसऱ्या डावात खेळपट्टी खराब होईल असं वाटत होतं. पण, मैदानावरचं दृश्य वेगळंच होतं. संपूर्ण संघाला जेवढे षटकार मारता येत नाहीत, तेवढे वैभवने मारले."
बासित अली म्हणाले की, "त्यानं प्रत्येक षटकामध्ये एकतर तीन षटकार आणि दोन चौकार किंवा तीन चौकार आणि दोन षटकार मारले. लिस्ट ए चे सर्व विक्रम बबलूने (वैभव) आपल्या नावावर केले."
"वैभवने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच दिवसात इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त षटकार मारले. मला वाटतं त्यानं धावत जाऊन फक्त आठ धावा केल्या, तर बाउंड्रीजच्या जोरावर सुमारे 196 धावा केल्या."
"ज्या मैदानावर सामना खेळला जात होता, ते काही छोटं मैदान नव्हतं. पण मागील दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळे दबावही होता. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत येण्यापूर्वीच त्यांनी आपला फॉर्म दाखवून दिला आहे."
'एक्सेप्शनल टॅलेंट'
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद वसीम म्हणाला की, 'वैभव सूर्यवंशीचा विक्रम दुसरा कुणीही मोडू शकत नाही, कदाचित तो स्वतःच तो मोडू शकेल.'
माजी क्रिकेटपटू तनवीर अहमद म्हणाले की, "तो जे खेळत आहे ती एक विलक्षण प्रतिभा आहे. 15 वर्षांच्या मुलासाठी हे खरोखरच आश्चर्यकारक आहे."

फोटो स्रोत, Getty Images
तनवीर अहमद यांनी सूर्यवंशीच्या वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण त्याचबरोबर असंही म्हटलं की, त्याला आपल्या कमकुवत बाजू सांभाळण्यासाठी अजून अधिक काम करण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, "ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करत होता, त्याला त्याच्या पसंतीनुसार चेंडू मिळत होते आणि तो त्यावर फटकेबाजी करत होता. कदाचित त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला त्या पद्धतीनं खेळवलं जात नाही. कारण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे षटकार मारणं तितकं सोपं नसतं."
"कदाचित म्हणूनच त्याला संघासोबत राहण्यासाठी, दौरे करत राहण्यासाठी आणि शिकण्यासाठी वेळ दिला जात आहे. ज्या बाबींमध्ये तो कमकुवत आहे, जसं की कव्हर्स बनवताना, त्यानं त्यावर अधिक काम केलं पाहिजे. हा एक मार्ग आहे."
पाकिस्तान क्रिकेटवर टीका करताना तनवीर अहमद म्हणाले की, "जर वैभव पाकिस्तानमध्ये असता, तर त्याचा टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघात समावेश झाला असता आणि त्याला कर्णधारही बनवण्यात आलं असतं."
'एवढे षटकार तर हातानेही फेकले जाऊ शकत नाहीत'
End of podcast promotion
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलनं एका यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की, वयाच्या 25-30 व्या वर्षी जी कामगिरी करता येते आणि क्रिकेट व त्यातून जी प्रसिद्धी मिळते, ती वैभवने वयाच्या 15 व्या वर्षीच मिळवली.
तो म्हणाला की, "संघ कोणताही असो, रिझल्ट दिसला पाहिजे. कुणी एक चेंडू जरी सीमारेषेच्या दिशेनं टाकला, तरी तेवढ्या धावा होणार नाहीत. मी 52 चेंडू टाकले तरी 28 षटकार कधीच होणार नाहीत. त्यानं ते बॅटनं करून दाखवलं."
वैभव सूर्यवंशीच्या खेळाची तुलना आता पाकिस्तानमधील त्यांच्या स्वतःच्या संघाशीही केली जाऊ लागली आहे.
त्याच संभाषणात कामरान अकमल म्हणाला की, "वैभवची परिपक्वता आणि क्रिकेटमधील त्याचा दृष्टिकोन पाहता, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळत आहे. त्याला 15 वर्षांच्या वयोगटातून बाहेर काढण्यात आलं आहे."
"त्याच्या वयाचा विचार करणं आता थांबवायला हवं. आपल्या व्यवस्थेत, त्याच्यासारख्या खेळाडूला 'अंडर-15' गटाच्या पुढे जाऊच द्यायला नको होतं. त्यांची मानसिकता तर बघा. त्याच्याकडून कोणत्या प्रकारचा क्रिकेट खेळवलं जात आहे? आपण कदाचित तळापासून सुरुवात करण्याऐवजी वरच्या स्तरावरून गोष्टी हाताळत आहोत. साहजिकच, याचा परिणाम त्याच्या खेळाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर, त्याच्या कामगिरीवर आणि एकूणच त्याच्या खेळण्यावर होणारच."
पाकिस्तानमध्ये नवीन खेळाडूंना पुढे का आणलं जात नाही, असा प्रश्न कामराननं विचारला.
पाकिस्तानी क्रीडा विश्लेषक मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर वैभवच्या खेळीबद्दल बोलताना सांगितलं की, युएईच्या ड्रेसिंग रूमला नक्कीच विचारलं गेलं असेल, "तिथं किती माणसं होती?" त्यावर त्यांनी उत्तर दिलं असेल, 'तो एकटाच होता.'"
मोहम्मद मोहसिन म्हणाले की, "ख्रिस गेल स्वतःला एक अद्वितीय खेळाडू मानतो. तो (वैभव) स्वतःचेच विक्रम मोडून क्रिकेट खेळत आहे. ज्या दिवशी त्याची बॅट फॉर्मात असते, त्या दिवशी बोलण्यासारखं दुसरं काहीच उरत नाही."
किती विक्रम मोडले?

फोटो स्रोत, Reuters
सर्वात जलद अर्धशतक: 21 जून रोजी श्रीलंका 'ए' संघाविरुद्ध 11 चेंडूंमध्ये. यापूर्वी हा विक्रम के. विरारत्ने यांच्या नावावर होता, ज्यांनी 1 नोव्हेंबर 2005 रोजी 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
सर्वात जलद शतक: 24 नोव्हेंबर रोजी 28 चेंडूंमध्ये.
यापूर्वी हा विक्रम जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या नावावर होता, ज्यानं 8 ऑक्टोबर 2023 रोजी 29 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं.
सर्वात जलद 150: 24 नोव्हेंबर रोजी 40 चेंडूंमध्ये.
यापूर्वी हा विक्रम स्वतः वैभव सूर्यवंशीच्या नावावर होता, ज्यानं 24 डिसेंबर 2025 रोजी 59 चेंडूंमध्ये 159 धावा केल्या होत्या.
सर्वात जलद द्विशतक: आज 52 चेंडूंमध्ये.
यापूर्वी हा विक्रम चॅड बोव्सच्या नावावर होता. त्यानं 22 ऑक्टोबर 2024 रोजी 103 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावलं होतं.
लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून सूर्यवंशीच्या नावावर विक्रम आहे. इतकंच नव्हे, तर तो टी-20 क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करणारा सर्वात तरुण खेळाडूदेखील आहे.



























