शेख हसीना यांनी बांगलादेशात जायला 16 डिसेंबरचाच दिवस का निवडला? 'घरवापसी' की शक्तिप्रदर्शन?

फोटो स्रोत, Reuters
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 16 डिसेंबर रोजी मायदेशी परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. ऑगस्ट 2024 मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यापासून त्या भारतात राहत आहेत.
या दिवशी बांगलादेशमध्ये विजय दिवस साजरा केला जातो. 1971 मध्ये याच दिवशी पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला होता.
असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी (24 नोव्हेंबर) मायदेशी परतण्याची तारीख जाहीर करताना हसीना यांनी सध्याचे पंतप्रधान तारिक रहमान यांना त्यांच्या परतीसाठी राष्ट्रीय विमानसेवेची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
हसीना यांचे प्रवक्ते सय्यद मोजम्मेल अली यांनी एका निवेदनात म्हटलं, "5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसीना यांना बांगलादेशच्या विमानाने भारतात आणण्यात आलं होतं. आता दिल्लीहून ढाक्याला परतण्यासाठी विमानाची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे."
हसीना यांचे सहकारी अबू ओबैदा अरिन यांनी एपीला सांगितलं, "बांगलादेशात परतण्यासाठी त्यांनी 16 डिसेंबर म्हणजेच विजय दिवसाची निवड केली, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे."
हसीना मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये पुन्हा शांतता आणि स्थिरता निर्माण होईल. तसेच देशाची प्रगती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
5 ऑगस्ट 2024 रोजी हसीना भारतात आल्या होत्या. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना आपली 15 वर्षांची सत्ता सोडावी लागली होती. या आंदोलनात शेकडो आंदोलक मारले गेले होते.
हसीना देशाबाहेर असताना त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, त्यांनी हा निकाल मान्य केलेला नाही. बांगलादेशात परतल्यानंतर या प्रकरणात आपली बाजू मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र, बांगलादेश सरकारची भूमिका यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी म्हटलं आहे की, हसीना यांना बांगलादेशात परत आणायचं झाल्यास बेड्या घालून आणि कडक बंदोबस्तात आणलं जाईल. हसीना या सामान्य प्रवासी नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Reuters
अशावेळी प्रश्न पडतो की, बांगलादेशात पोहोचताच आपल्याला अटक होऊ शकते आणि मृत्युदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, हे माहीत असूनही शेख हसीना मायदेशी परतण्यास का इच्छुक आहेत?
त्यांना खरंच न्यायालयीन खटल्यांना सामोरं जायचं आहे की मायदेशी परतण्याची घोषणा करून आपल्या अवामी लीग पक्षाला पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय करायचं आहे?
शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्यावरून भारत आणि बांगलादेश यांच्यात चर्चेतून काही मार्ग निघू शकतो का?
शेख हसीना यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
1. शेख हसीना यांच्या परतण्यामागे कोणती राजकीय रणनीती?
हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेकडे केवळ त्यांची वैयक्तिक इच्छा म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. यामागे अवामी लीग पक्षाचं राजकीय अस्तित्व टिकवणं आणि पक्षावरील आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्नही असू शकतो.
ढाका येथील सेंटर फॉर गव्हर्नन्स स्टडीजचे अध्यक्ष झिल्लुर रहमान यांनी अल जझीराला सांगितलं की, बांगलादेशमध्ये परतल्यास आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं, याची हसीना यांना पूर्णपणे जाणीव आहे.
परंतु, पासपोर्ट मिळवणं आणि मायदेशी परतण्याबाबत बोलणं यामागे अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय राहावेत, हा त्यांचा उद्देश आहे.

फोटो स्रोत, Reuters
End of podcast promotion
रहमान यांच्या मते, हसीना या कोणत्याही परिस्थितीत पक्षाचं नेतृत्व दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यास तयार नाहीत. हाच मुद्दा हसीना आणि अवामी लीग या दोघांसाठी अडचणीचा ठरू शकतो. पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्याला नवीन नेतृत्वाचा शोध घ्यावा लागू शकतो.
दुसरीकडे, बांगलादेश एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधन संचालक फैज सोभान यांनी अल जजिराला सांगितलं की, मायदेशी परतण्याच्या घोषणेमुळे हसीना राजकीयदृष्ट्या चर्चेत राहतात. त्याचबरोबर, देशातील आपल्या समर्थकांची मनःस्थिती, कल जाणून घेण्याची त्यांना संधीही मिळते.
सोभान यांच्या मते, हसीना प्रत्यक्षात मायदेशी परतण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण असं केल्यास त्यांना मृत्युदंडाला सामोरं जावं लागू शकतं किंवा उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावं लागू शकतं.
अल जजिराशी बोलताना अमेरिकेचे माजी मुत्सद्दी जॉन डॅनिलोविच यांनीही हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेमागे आपल्या समर्थकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं.
त्यांच्या मते, डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याची घोषणा करून बांगलादेशातील कमी होत चाललेलं आपलं राजकीय महत्त्व पुन्हा चर्चेत आणण्याचा हसीना यांचा प्रयत्न आहे.
शेख हसीना यांनी मायदेशी परतण्यासाठी निवडलेली तारीखही राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेश मुक्तिसंग्राम संपला होता.
हा दिवस बांगलादेशच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे. हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
अशा प्रकारे, विजय दिनी मायदेशी परतण्याची घोषणा करून हसीना आपल्या राजकीय वारशाची आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या कुटुंबाच्या योगदानाची आठवण करून देत आहेत.
2. अवामी लीगच्या हालचाली आणि हिंसाचार का वाढत आहेत?
बांगलादेशमध्ये अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होत असल्याने तणाव वाढत आहे. अशा वेळी हसीना यांनी मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे.
बीबीसी बांगलाच्या वृत्तानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होऊन आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
विशेषतः गोपालगंजसह अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सरकारनेही अनेक उपाययोजनाही केल्या आहेत.
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अवामी लीगच्या राजकीय हालचालींवर बंदी आहे. अशा परिस्थितीही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करत असल्याने सरकारसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.
हसीना यांच्यासाठी नवीन पासपोर्ट आणि ओळखपत्राची मागणी केल्यानंतर बांगलादेशातील हिंसाचार वाढला आहे. गोपालगंजमध्ये त्यांच्या समर्थकांनी केलेली आंदोलनं हिंसक झाली. या घटनांमध्ये काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
या घडामोडींमुळे सरकारची चिंता केवळ हसीना यांच्या मायदेशी परतण्यापुरती मर्यादित नाही. त्यांच्या परतण्याच्या घोषणेमुळे अवामी लीगचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी सरकारला भीती आहे.
याच कारणामुळे सरकारने डिसेंबरच्या आसपास सीमेवरील सुरक्षा आणि देखरेख वाढवण्याबाबत भाष्य केलं आहे.
3. बांगलादेश सरकारने सीमेवर बीजीबीला सतर्क का केलं?
बीबीसी बांगलाच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या पंतप्रधानांचे माहिती आणि प्रसारण सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान यांनी सांगितलं की, सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी बॉर्डर गार्ड बांगलादेशला (बीजीबी) सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जाहेद उर रहमान यांच्या म्हणण्यानुसार, अवामी लीगचे हजारो नेते आणि कार्यकर्ते परदेशात आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
डिसेंबरच्या जवळपास गुन्हे दाखल असलेली एखादी व्यक्ती देशात येण्याचा प्रयत्न केल्यास तिला अटक करून कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे. कारण सरकार हसीना यांच्या परतण्याकडे केवळ एका व्यक्तीच्या मायदेशी परतण्याच्या दृष्टीने पाहत नाही. देशाबाहेर असलेले अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्तेही परतू शकतात, अशी सरकारला चिंता आहे.
परंतु, सरकारच्या या भीतीचा अर्थ मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होण्याची शक्यता आहे, असा होत नाही. ही केवळ सरकारने केलेली सुरक्षा व्यवस्था आहे.
4. सरकार इतकी कडक भूमिका का घेत आहे?
शेख हसीना यांच्या परतण्याबाबत बांगलादेश सरकारमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या विधानांवरून सरकारची भूमिका समजून घेण्यास मदत होते.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी 24 नोव्हेंबरला परदेशी राजनैतिक प्रतिनिधींना माहिती दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "शेख हसीना यांना कडक सुरक्षेत आणि बेड्या घालूनच बांगलादेशमध्ये आणलं जाऊ शकतं."
त्यांनी सांगितलं की, एखाद्या आरोपीला सामान्य प्रवाशाप्रमाणे देशात येण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
त्यांनी अवामी लीगवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केला. त्यांच्या मते, बांगलादेशातील दहशतवादाचा संबंध अवामी लीगशी आहे.

फोटो स्रोत, Mustafa Hatipoglu/Anadolu via Getty Images
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे मुख्य सरकारी वकील मोहम्मद अमीनुल इस्लाम यांनी शेख हसीना यांना आणण्यासाठी विमान पाठवण्याच्या मागणीला 'अभूतपूर्व' मागणी म्हटलं आहे.
बीबीसी बांगलाच्या वृत्तानुसार, त्यांनी म्हटलं की, एखाद्या फरार दोषीला मायदेशी आणण्यासाठी दुसऱ्या देशाकडे विमान मागण्याची घटना जगात अत्यंत दुर्मीळ आहे.
अवामी लीगला दहशतवादी संघटना घोषित करावं की नाही, याची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या चौकशीत पक्ष दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं सिद्ध झालं, तर सरकार किंवा न्यायाधिकरण त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतं, असंही ते म्हणाले.
याचा अर्थ, शेख हसीना यांच्या परतण्यासोबतच अवामी लीगच्या संघटनेचं भवितव्य आणि तिच्या कायदेशीर स्थितीचाही प्रश्न समोर आला आहे.
5. भारताची भूमिका काय आहे?
शेख हसीना यांच्या परतण्याबाबत भारताची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. ऑगस्ट 2024 पासून त्या भारतात राहत आहेत. बांगलादेश सरकारने यापूर्वीच त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात 2013 मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. याच करारानुसार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवण्याची मागणी सरकार करत आहे.
मात्र, दोन्ही देशांमध्ये असा करार असला, तरी भारताला शेख हसीना यांना बांगलादेशला सोपवावं लागेलच, असं नाही.

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
या करारात काही परिस्थितींमध्ये प्रत्यार्पणास नकार देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये राजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. परंतु, काही गंभीर गुन्ह्यांना या नियमातून सूट देण्यात आलेली नाही.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल 2026 मध्ये म्हटलं होतं की, बांगलादेशने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीची तपासणी सुरू आहे. तसेच, बांगलादेशच्या नवीन सरकारसोबत सकारात्मक चर्चा करण्याची भारताची इच्छा आहे.
परंतु, 'ढाका ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश सरकारचे माहिती आणि प्रसारण सल्लागार जाहेद उर रहमान यांनी 24 नोव्हेंबरला एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
त्यांनी सांगितलं की, शेख हसीना यांच्या परतण्याबाबत बांगलादेश सरकारची चर्चा शेख हसीना यांच्याशी नव्हे, तर भारताशी सुरू आहे. त्या बांगलादेशात कशा परततील, याबाबतही भारताशी चर्चा केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्या मते, शेख हसीना यांना बांगलादेशात परतायचं असेल आणि बांगलादेश सरकारही त्यांना परत बोलावू इच्छित असेल, तर भारताने त्यांना बांगलादेशच्या सोपवण्याबाबत संकोच करू नये.
या वक्तव्यामुळे परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी केलेल्या बेड्या घालून आणण्याच्या वक्तव्यापेक्षा सरकारची वेगळी भूमिका दिसून येते. शेख हसीना यांच्याशी थेट चर्चा करण्याऐवजी त्यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेबाबत भारताशी चर्चा करण्याची बांगलादेश सरकारची इच्छा असल्याचे दिसून येते.
6. पासपोर्ट रद्द झाल्यावर हसीना बांगलादेशात कशा परतणार?
शेख हसीना यांच्या परतण्याच्या मार्गात पासपोर्टची एक मोठी व्यावहारिक अडचण आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना भारतात आल्यानंतर काही महिन्यांनी बांगलादेश सरकारने त्यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द केला होता.
शेख हसीना यांनी आता नवीन पासपोर्टसाठी आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी अर्ज केला आहे. ही कागदपत्रं देण्याची मागणी त्यांनी बांगलादेश सरकारकडे केली आहे.
त्यांच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की, ज्याप्रमाणे बांगलादेशच्या विमानातून शेख हसीना यांना भारतात आणलं होतं, त्याच पद्धतीने आता त्यांना परत नेण्याची व्यवस्थाही बांगलादेश सरकारने केली पाहिजे.
परंतु बांगलादेश सरकारने ही मागणी फेटाळली आहे.
7. बांगलादेशात परतल्यास हसीना यांना मृत्युदंड होईल का?
नोव्हेंबर 2025 मध्ये बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
हा खटला 2024 मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी संबंधित होता. संयुक्त राष्ट्रांने दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान सुमारे 1400 लोक मारले गेले होते.

फोटो स्रोत, Fatima Tuj Johora/SOPA Images/LightRocket via Getty Images
शेख हसीना यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत हा खटला चालवण्यात आला आणि आपली बाजू मांडण्याची योग्य संधी मिळाली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
आता प्रश्न असा आहे की, जर त्या बांगलादेशात परतल्या तर त्यांना या निकालाविरोधात अपील करण्याची संधी मिळेल का?
असोसिएटेड प्रेसच्या 24 नोव्हेंबरच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांना निकालाविरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांच्या फाशीला रोखण्यासाठी आता सर्वसाधारण कायदेशीर मार्ग उरलेला नाही, असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. परंतु, राष्ट्रपतींना त्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे.
त्यामुळे शेख हसीना बांगलादेशमध्ये परतल्यास सर्वात आधी त्यांच्या अटकेची आणि शिक्षेची अंमलबजावणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. परंतु, बांगलादेशात पोहोचताच त्यांना फाशी दिली जाईल, असं म्हणणं चुकीचं ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























