वैभव सूर्यवंशीला टी-20 च्या आंतरराष्ट्रीय संघात कायमचं स्थान कधी मिळणार?

फोटो स्रोत, PA Media
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी न्यूज हिंदी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
टीनएजर मुलांमध्ये व्हीडिओ गेम्सची मोठी क्रेझ असते. पण 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी असा टीनएजर आहे, जो सध्या व्यावसायिक क्रिकेटलाच जणू व्हीडिओ गेममध्ये बदलत आहे.
24 नोव्हेंबर रोजी दोहामध्ये झालेल्या एका सामन्यात त्याने असंच काहीसं करून दाखवलं.
वैभवने लिस्ट-ए क्रिकेटमधील एकाच डावात सर्वात वेगवान 100 धावा (28 चेंडू), सर्वात वेगवान 150 धावा (40 चेंडू) आणि सर्वात वेगवान 200 धावा (52 चेंडू) करण्याचा विक्रम केला.
त्याच्या या खेळीत एकूण 28 षटकार होते. होय, तब्बल 28 षटकार! म्हणजेच 204 धावांच्या या खेळीत त्याने 168 धावा केवळ षटकारांच्या जोरावर वसूल केल्या.
वैभवच्या या ताज्या तुफानी खेळीमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला आहे की, भारतीय टी-20 क्रिकेट संघात सलामीवीर म्हणून हा मुलगा आपलं स्थान कायमचं कधी पक्कं करणार? आणि टी-20 व्यतिरिक्त त्याला वनडे क्रिकेटमध्येही आजमावून पाहायला हवं का?
आकडेवारी काय सांगते?
सर्वप्रथम आकडेवारीवरच एक नजर टाकूया.
आतापर्यंत खेळलेल्या 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वैभवने 29.50 च्या सरासरीने आणि 185.53 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च खेळी 81 धावांची आहे.
त्याला आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध तीन, झिम्बाब्वेविरुद्ध तीन, न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एका सामन्यात संधी मिळाली आहे.
दुसरीकडे, आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 23 डावांमध्ये त्याने 1028 धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी 44.69 आणि स्ट्राइक रेट 228.95 राहिला आहे.

फोटो स्रोत, Reuters
यापैकी सात सामने त्याने 2025 च्या हंगामात, तर 16 सामने 2026 च्या आयपीएलमध्ये खेळले.
आयपीएल 2026 मध्येच त्याने ख्रिस गेलचा एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही मोडला.
गेलने 2012 च्या हंगामात 59 षटकार ठोकले होते, तर राजस्थान रॉयल्सच्या या टीनएज सनसनाटी खेळाडूने 2026 मध्ये तब्बल 72 षटकार ठोकले.
ही बातमीही वाचा :वैभव सूर्यवंशी : 'इतके सिक्सर तर हाताने देखील फेकता येणार नाहीत'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून तोंडभरून कौतुक
षटकारांचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे, कारण वैभव सूर्यवंशीच्या खेळण्याच्या शैलीबाबत त्याचा आक्रमकपणा आणि षटकार मारण्याच्या क्षमतेची वारंवार चर्चा होते.
काही तज्ज्ञांचं मत आहे की, वैभव सूर्यवंशीला भारताच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात कायमचं स्थान मिळायला हवं आणि सलामीवीर म्हणून त्याच्या स्थानाशी काही काळ तरी छेडछाड केली जाऊ नये.
'स्पर्धा तगडी आहे'
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि तज्ज्ञ अयाझ मेमन यांना विचारण्यात आलं की, अशा शानदार खेळी केल्यानंतरही वैभवला संघात स्थान देऊन दीर्घकाळ का आजमावलं जात नाही? यावर त्यांनी म्हटलं की हा प्रश्न अगदी रास्त आहे.
नुकतीच भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली. त्यापैकी दोन सामन्यांत वैभव सूर्यवंशीला संघात खेळण्याची संधी देण्यात आली.
यापैकी एका सामन्यात त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 19 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या.

फोटो स्रोत, Reuters
मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यर यांना वैभवला संधी देण्याबाबत विचारण्यात आलं होतं. ते म्हणाले होते, "त्याच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूने ड्रेसिंग रूमच्या वातावरणात आनंदी राहणं महत्त्वाचं आहे."
अय्यर यांच्या म्हणण्यानुसार, "तो खूपच लहान आहे आणि येत्या काळात त्याला अनेक संधी मिळतील. तो थेट संघात येऊन स्थान मिळवू शकत नाही, कारण आमचे सलामीवीरही सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत."
पण ही रणनीती योग्य आहे का?
अयाझ मेमन यांनी बीबीसीला सांगितलं, "बहुतेक लोकांचं म्हणणं आहे की वैभव सूर्यवंशी हा 'चाइल्ड प्रॉडिजी' आहे किंवा एका पिढीत एखादाच होणारा खेळाडू आहे. अशा खेळाडूला योग्य वेळी आणि सातत्याने संधी मिळाली नाही, तर त्याचे तोटेही होऊ शकतात. सचिन तेंडुलकरलाही खूप कमी वयात संधी देण्यात आली होती. त्यांना एकदा संधी दिल्यानंतर सातत्याने खेळवलं गेलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, ते आपल्या सर्वांसमोर आहे."
1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सचिन तेंडुलकरने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्याचं वय 16 वर्षं होतं.
जागतिक विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानच्या हसन रझाने अवघ्या 14 वर्षं 233 दिवसांच्या वयात झिम्बाब्वेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता.

फोटो स्रोत, Action Images/Reuters
End of podcast promotion
सामान्यतः इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये काउंटी आणि स्टेट संघांकडून खेळणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी वयात पदार्पण करून आपलं स्थान निर्माण करणाऱ्या आशियाई खेळाडूंची यादी मोठी आहे.
मंगळवारी यूएईविरुद्ध खेळलेल्या वैभवच्या खेळीबाबत अयाझ मेमन म्हणाले, "वैभवची कालची खेळी ही एक विलक्षण खेळी होती. जणू तो निवड समितीला काहीतरी संदेश देत होता. असा खेळाडू क्वचितच पाहायला मिळतो. चांगलं खेळूनही संघात कायमचं स्थान मिळण्याची आशा दिसत नसेल, तर त्याचा खेळाडूच्या मानसिक कणखरतेवरही परिणाम होऊ शकतो."
ते म्हणाले, "कोणताही खेळाडू असा विचार करू शकतो की, चांगलं खेळूनही संघात नीट स्थान मिळत नाहीये, तर आता आणखी काय करायचं? दहा सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर संघाबाहेर करणं समजू शकतं. पण एक-दोन सामने खेळवणं आणि त्यानंतर पुन्हा बाहेर करणं योग्य नाही. वैभवला दीर्घकाळ संधी देण्याची गरज आहे."
पण कर्णधार अय्यर यांनी सलामीच्या जोडीबाबत मांडलेल्या मुद्द्याचं काय?
यावर मेमन म्हणाले, "अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत, हे खरं आहे. पण वैभवसाठी संघात जागा कशी निर्माण करता येईल, याचे मार्ग तुम्हाला शोधावे लागतील. कधी त्याला खेळवायचं आणि कधी बाहेर बसवायचं, असं करता येणार नाही."
बीबीसीने वैभवबाबत प्रसिद्ध क्रीडा तज्ज्ञ आणि लेखिका मीनाक्षी राव यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, या खेळाडूबाबत संतुलित दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे.
मीनाक्षी यांच्या म्हणण्यानुसार, "वैभवबाबत सगळीकडे खूप चर्चा आणि उत्सुकता आहे. तो इतर ठिकाणी चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याची मोठी चर्चा होते. पण भारतीय संघाकडून खेळताना एखाद्या दिवशी तो अपयशी ठरला, तर लगेच तो खराब खेळत असल्याचं म्हटलं जातं. हे योग्य नाही. तो प्रत्येक सामन्यात धावा करेल, अशी अपेक्षा करणं निरर्थक आहे. पण त्याला सातत्याने संधी द्यायला हव्यात."
मीनाक्षी यांच्या मते, वैभवची आक्रमक फलंदाजी ही त्याची यूएसपी आहे आणि त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. मात्र त्याच वेळी आंतरराष्ट्रीय खेळपट्ट्या आणि आंतरराष्ट्रीय गोलंदाजांसमोर त्याची परीक्षा होणंही गरजेचं आहे.
यासोबतच वैभवला काही टी-20 सामन्यांमध्ये सातत्याने 30-40 धावांच्या खेळी करून आपल्या सातत्याचा अंदाजही द्यावा लागेल.
त्या म्हणाल्या, "वैभवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टी आणि गोलंदाज यांना समजून घेण्याची गरज आहे. कारण येत्या काळात गोलंदाजही त्याच्या खेळाचा अभ्यास करतील. अशा परिस्थितीत त्याला त्यावर उत्तरं शोधावी लागतील. तांत्रिकदृष्ट्या आपला खेळ अधिक भक्कम करावा लागेल. ड्रेसिंग रूममध्ये राहूनही तो खूप काही शिकू शकतो."

फोटो स्रोत, Reuters
मीनाक्षी यांचं मत आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी वैभवला काही वनडे सामन्यांमध्येही खेळवलं पाहिजे. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्याने दीर्घ फॉरमॅटचं क्रिकेटही खेळायला हवं.
त्या म्हणाल्या, "त्याचं वय कमी आहे, त्यामुळे संघात स्थान पक्कं करण्यासाठी त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे, हे खरं आहे. पण तो सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या खेळात जो आक्रमकपणा दिसतो, तो त्याला कायम ठेवावा लागेल. प्रतिभेची अजिबात कमतरता नाही. मात्र त्यासोबत सातत्य, परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची क्षमता, सामन्याची समज आणि तांत्रिक कौशल्य यांची गरज असेल. आणि या सगळ्या गोष्टी त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळूनच मिळतील."
मीनाक्षी यांच्या म्हणण्यानुसार, "तो 15 वर्षांच्या ऐवजी 16 वर्षांचा असताना संघातील कायमस्वरूपी खेळाडू बनला, तरी त्यात काही अडचण नाही. कारण त्याच्याकडे वेळ आहे. पण त्याला निवडक दौऱ्यांमध्ये नक्कीच खेळवलं पाहिजे. कारण जगभरातील गोलंदाजांनी त्याच्या खेळाचा अभ्यास सुरू केला असेल. आता त्यालाही आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा खेळ समजून घेणं शिकावं लागेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























