'आम्ही कात्रजचे राजे आहोत, असं म्हणत पळून गेले'; जखमी अवस्थेत मंदार किवळेनं पोलिसांना काय सांगितलं?

पुण्यातील शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 परिसरात ही घटना घडली.
फोटो कॅप्शन, पुण्यातील शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 परिसरात ही घटना घडली.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

(महत्त्वाचे : या बातमीतील तपशील वाचकाला अस्वस्थ करू शकता.)

खून खटल्यातील आरोपीवर भरदिवसा न्यायालयाच्या परिसरात गोळी झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न काल (25 नोव्हेंबर) पुण्यात घडला.

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 परिसरात ही घटना घडली.

या हल्ल्यामध्ये आधीच्या एका खून प्रकरणातील आरोपी असलेला मंदार किवळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून तो गंभीररीत्या जखमी आहे.

त्याच्यावर गोळीबार तसेच त्यानंतर कोयत्याने वार करणारे त्याच्यावर गोळीबार तसेच त्यानंतर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपींना कोर्टासमोर उपस्थित केलं असता कोर्टाने 5 जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, एक आरोपी अल्पवयीन असून त्याला रिमांड होमला पाठवण्यात आलं आहे.

पोलीस सह-आयुक्त संजय भास्कर दरडे
फोटो कॅप्शन, पोलीस सह-आयुक्त संजय भास्कर दरडे

या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, "जे कुणी या प्रकरणामध्ये होते त्यांना अटक करण्यात आली आहे. यामागचं नेमकं कारण चौकशीनंतर समोर येईल."

पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, "ही घटना समोर आल्यानंतर, ही सर्व मुलं कुठून आली होती? त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांच्यावर याआधी गुन्हे होते का? याबाबत मी माहिती मागवली आहे. या प्रकरणाला आम्ही गांभीर्याने घेतलं आहे. पुण्यात किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात असा एक पॅटर्न पाहायला मिळतो की स्वत:ची दहशत पसरवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामधून स्वत:ला एक मोठा गुंड म्हणून घेण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसतात. परंतु, अशांवरती कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, कुठलीही दयामाया न दाखवता सगळ्या गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश सर्व युनिट प्रमुखांना देण्यात आले आहेत."

नक्की काय घडलं?

पोलीस सह-आयुक्त संजय भास्कर दरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हा मागील वर्षी आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या खुनातील आरोपी आहे. तो तुरूंगातून सुटलेला आरोपी असून कोर्टातील कामासाठी तो इथे आला होता.

आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पाच जणांची नावे असून चार जणांचा उल्लेख अनोळखी म्हणून करण्यात आलाय.

आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फोटो कॅप्शन, आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

36 वर्षीय मंदार मारूती किवळे याने जखमी अवस्थेत ससून हॉस्पिटलमध्ये पोलिसांना जबाब दिला आहे.

एफआयआरमध्ये त्यानं म्हटलंय की, "मी शुभम चव्हाणच्या मर्डर केसमध्ये आरोपी असल्याने आणि या केसची न्यायालयात तारीख असल्याने मी शिवाजीनगर कोर्टात आलो होतो. दुपारी अंदाजे साडेबारा वाजता मी रिक्षात बसण्यासाठी गेट क्रमांक 4 मधून बाहेर जात असताना ओमकार उर्फ बाब्या संतोष पवार आणि प्रथमेश महादेव येनपुरे व त्यांच्यासोबत चार अनोळखी इसमांनी माझ्यावर हल्ला केला."

"तूच शुभम चव्हाणला मारलं आहेस ना, असं म्हणत त्यांनी माझ्या दिशेनं गोळी झाडली. मी पळत असताना जवळच असलेल्या पंक्चरच्या दुकानाजवळ पडलो. तेव्हा आरोपींनी माझ्यावर कोयत्याने वार केले."

"आरोपींनी पळून जाताना 'शुभम दादा आम्ही तुझ्या खुनाचा बदला घेतला आहे. आम्ही कात्रजचे राजे आहोत,' असं म्हणत ते पळून गेले," असंही मंदार किवळेनं जबाबात सांगितलं आहे.

जखमी मंदार किवळेबाबत डॉक्टर काय म्हणाले?

ससून रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मंदार किवळेच्या उजव्या आणि डाव्या हाताला गंभीर जखमा आहेत. त्याच्या डोक्याला मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहे. त्याचा खूप रक्तस्राव झाला असून हा रक्तस्राव किती झाला आहे, हे पाहून यावरून उपचार ठरेल. त्याच्या उजव्या हाताला आणि पाठीला गोळी चाटून गेली आहे."

तो सध्या क्रिटिकल कंडिशनमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ससून रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव
फोटो कॅप्शन, ससून रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत बोलताना म्हटलं होतं की, "ज्यांच्यावर संशय आहे की हे लोक हल्ल्यामागे असतील त्यांना घटनेनंतर दीड तासात ताब्यात घेण्यात आलं. तर हल्ल्यात जे सहभागी आरोपी होते त्यांना दौंड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. वेगवेगळी पथकं स्थापण करण्यात आली आहेत."

लवकरच सगळ्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई कठोर पद्धतीने करण्यात येईल असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं होतं. तसंच, पोलिसांनी आत्तापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

अमितेश कुमार टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते की, "या घटनेचा तपास आम्ही सर्व दृष्टीनं करत आहोत. कोर्टाची सुरक्षा आम्ही वाढवत आहोत. हल्लेखोर दोन आहेत अशी आमची खात्री पटली आहे. इतर चार जण हे या कटात सहभागी होते, असं समजतं आहे."

'दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही'

या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, "विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे."

लवकरच सगळ्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई कठोर पद्धतीने करण्यात येईल असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
फोटो कॅप्शन, लवकरच सगळ्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई कठोर पद्धतीने करण्यात येईल असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय की, "पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही."

"पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर भर दिला जाईल. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)