पोलीस ठाण्यात महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, तीन पोलीस कर्मचारी अटकेत; 12 जण निलंबित

फोटो स्रोत, Sartaj Alam
- Author, मोहम्मद सरताज आलम
- Role, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वायरलेस ऑपरेटर आहे. त्याच्यासह या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांनी या कारवाईबद्दल बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणी एकूण 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
त्यांनी पुढं म्हटलं की, "कर्तव्य बजावताना गंभीर निष्काळजीपणा, दिरंगाई आणि शिस्तभंग केल्याच्या आरोपाखाली 12 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे."
पतीसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर मदत मागण्यासाठी संबंधित महिला गम्हरिया पोलीस ठाण्यात आली होती. तिला ज्या खोलीत थांबविण्यात आलं होतं, त्याच खोलीत पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला.
या आरोपाबाबत पोलीस अधीक्षकांनी म्हटलं, "या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे. ते सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल."
वैद्यकीय अहवालातून बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, "वैद्यकीय तपासणी झाली आहे, मात्र अहवाल आलेला नाही. सध्या अहवालाची प्रतीक्षा आहे."
झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "सरायकेलामधील गम्हरिया पोलीस ठाण्याच्या आवारात एका महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची घटना अत्यंत लज्जास्पद आणि चिंताजनक आहे."
त्यांनी पुढे म्हटलं, "जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा नेमकी कोणाकडून करायची?"
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
पोलिसांनी याप्रकरणी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यानुसार, 31 ऑक्टोबरला पीडितेने एक लेखी तक्रार दाखल केला. त्यात तिने नमूद केले की, दिनांक 29 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता तिचा तिच्या पतीसोबत वाद झाला होता. तिला भीती वाटली की, तिचा पती त्या रात्री तिच्यावर हल्ला करेल आणि ती भीतीने घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती शेजारच्या घरी गेली आणि तेथील एका महिलेला सांगितले की तिचा पती तिच्यावर हल्ला करेल. तिने त्या महिलेला पोलीस स्टेशनला फोन करण्याची विनंती केली.
यानंतर पोलिसांचे पीसीआर वाहन आले आणि ती अंदाजे मध्यरात्री 12 वाजता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलीस स्टेशनवर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने तिला शेजारच्या खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले. ती त्यावेळी तिथे विश्रांती घेत होती. याच दरम्यान, पोलीस ठाण्यातील कर्मचारी वायरलेस ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2)(अ)/68 अन्वये, गुन्हा क्र. 86/26 एफआयआर नोंदवण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सराईकेला-खरसावनच्या पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, सराईकेलाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (एसआय) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि एएसआयला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे.
"पोलीस ठाणे या संपूर्ण घटनेत आपले कर्तव्य बजावताना आवश्यक ती दक्षता आणि जबाबदारी दाखवण्यात अयशस्वी ठरले. पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आलेले अपयश हा एक गंभीर निष्काळजीपणा आहे. या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा डागाळली असून सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांच्या विश्वासार्हतेवर विपरीत परिणाम झाला आहे. कर्तव्यात घोर निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या आरोपाखाली, संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्याला सामान्य निर्वाह भत्त्यावर निलंबित करण्यात आले आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















