भारताला हरवल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची क्रिकेट चाहत्यांनी उडवली खिल्ली

फोटो स्रोत, Getty Images
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, अंगावर काटा आणणारा थरार आणि दोन्ही बाजूंची कट्टर स्पर्धा डोळ्यांसमोर येते. पण या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली नुकतीच झालेली लढत एका भलत्याच वातावरणात रंगली.
हा सामना 'हाँगकाँग सिक्सेस 2026' या स्पर्धेत खेळवला गेला. ही आयसीसीच्या मुख्य स्पर्धांऐवजी प्रत्येकी 6 खेळाडूंच्या संघांमध्ये खेळवली जाणारी एक विशेष स्पर्धा आहे.
मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. पण नेहमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये जी चुरस पाहायला मिळते त्या तुलनेत या सामन्याचा माहोल आणि निकाल पूर्णपणे वेगळा होता.
पाकिस्तानने सामना जिंकताच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून टीमचं कौतुक केलं.
शरीफ यांनी 'एक्स'वर लिहिले, "हाँगकाँग सिक्सेस 2026 च्या पहिल्याच सामन्यात भारतावर 4 गडी राखून मिळवलेल्या शानदार विजयाबद्दल आमच्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! क्रिकेटचा हा एक उत्कृष्ट सामना होता."
याशिवाय त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि त्यांच्या टीमचंही कौतुक केलं. खेळाडूंची तयारी करून घेतल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी बोर्डाचे आभार मानले.
पण पंतप्रधानांनी या विजयाचं असं उघडपणे सेलिब्रेशन करणं सगळ्यांच्या पचनी पडलं नाही. हा फक्त 'हाँगकाँग सिक्सेस'चा सामना होता, काही वर्ल्ड कप नाही! याची जाणीव त्यांना करून देण्याची संधी क्रिकेट चाहत्यांनी अजिबात सोडली नाही.
शाहबाज शरीफ यांच्या पोस्टवर क्रिकेट फॅन्सनी उडवली खिल्ली!
यातली सर्वांत मजेशीर प्रतिक्रिया होती माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या पॅरोडी अकाउंटची. या अकाउंटवरून पाकिस्तानला चक्क "हाँगकाँग सिक्सेसचा वर्ल्ड कप" जिंकल्याबद्दल जोरदार टोमणा मारत शुभेच्छा देण्यात आल्या.
या पॅरोडी अकाउंटने लिहिले, "भारताविरुद्ध हाँगकाँग सिक्सेस वर्ल्ड कप सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन! आता थेट विजयी मिरवणूक काढायला हरकत नाही."
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनाही शरीफ यांची ही पोस्ट पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी चक्क अवाक होऊन विचारलं, "खरंच??"
स्वतःची ओळख अफगाणी नागरिक म्हणून सांगणाऱ्या अजमल जादरान नावाच्या एका युझरने 'एक्स'वर लिहिले, "एक वेळ अशी येईल जेव्हा हे नाणेफेक (टॉस) जिंकल्यावरही ट्वीट करतील. देशाची खरी सूत्रे जेव्हा इतर लोकांच्या हातात असतात तेव्हा पंतप्रधानांकडे केवळ नाणेफेक आणि अशा किरकोळ सामन्यांवर ट्वीट करण्यापलीकडे काहीच काम उरत नाही."
माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी टोला लगावत लिहिलं, "'आम्ही भारताला हरवलं' हे सांगण्याची एवढी घाई झाली होती की, सत्य (फॅक्ट-चेक) काय आहे ते तपासायचीही कोणी तसदी घेतली नाही. पाकिस्तानने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये यूएईकडून पराभव पत्करला होता."
"यावरूनच पाकिस्तान कोणत्या दर्जाचे क्रिकेट खेळत आहे याचा अंदाज येतो. थेट त्या देशाच्या पंतप्रधानांना हाँगकाँग सिक्सेसच्या सामन्यावर ट्वीट करावे लागत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
त्याच वेळी, खुद्द पाकिस्तानच्या एका क्रिकेट चाहत्यानेही शरीफ यांच्या या अभिनंदनावर खोचक टिप्पणी केली.
'लाहोरी गाई' नावाच्या एका युझरने लिहिले, "कृपया आम्हाला आणखी लाजवणे थांबवा." पुढे त्या युझरने नमूद केले, "गेल्या 5 वर्षांतील आयसीसीच्या प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे आणि आपण मात्र 'हाँगकाँग सिक्सेस'च्या अशा विजयाचा जल्लोष साजरा करत आहात, ज्याला कसलेही महत्त्व नाही."
खरं तर, पुरुषांच्या दोन्ही मोठ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा रेकॉर्ड अक्षरशः दबदबा निर्माण करणारा राहिला आहे. वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात झालेल्या सर्व 8 च्या 8 सामन्यांत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. तर टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारताकडे 8-1 अशी मजबूत आघाडी असून पाकिस्तानला या स्पर्धेत फक्त एकदाच (2021 मध्ये) विजय मिळवता आला होता.
क्रीडा पत्रकार गौरव कालरा यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्राला मागे टाकत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले होते त्यावेळी उमटलेल्या प्रतिक्रियांसोबत कालरा यांनी या प्रसंगाची तुलना केली.

फोटो स्रोत, Getty Images
कालरा यांनी लिहिलं, "फारच मोठी गोष्ट. अर्शदने नीरजला पराभूत करून ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले होते तितकीच मोठी. कदाचित त्याहूनही मोठी. कधीकधी वाटते की, आपण सगळे एखाद्या आभासी विश्वात जगत आहोत."
आणखी एक पत्रकार भरत रामराज यांनी पंतप्रधानांकडून या विजयाचा जल्लोष साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले, "एका देशाचे पंतप्रधान चक्क हाँगकाँग सिक्सेसबद्दल बोलत आहेत!"
क्रीडा विश्लेषक आणि डेटावर काम करणारे पत्रकार अझीम सिद्दीकी यांनी मत मांडले, "पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना कोणीतरी सांगायला हवे की 'हाँगकाँग सुपर सिक्सेस' ही काही फार गंभीर किंवा महत्त्वाची स्पर्धा नाही. कृपया संघाचे अशा प्रकारे अभिनंदन करणे थांबवावे."
चेन्नई सुपर किंग्सचा चाहता असलेल्या 'श्रीनी मामा' नावाच्या युझरने उपरोधाने विचारले, "हे कसले आले आहे अभिनंदन!"
अखेरीस, एका चाहत्याने मिश्कीलपणे यावर खुलासा केला की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही पोस्ट कोणतेही बनावट (पॅरोडी) अकाउंट नसून मूळ खात्यावरूनच आली आहे. त्याने लिहिले, "नाही, हे कोणतेही पॅरोडी अकाउंट नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















