विगमुळेच सिया नाराज होती? केतन अग्रवालच्या वडिलांचा मोठा खुलासा, ट्रेकबद्दलही दिली माहिती

केतनचे वडील, केतन आणि सिया

फोटो स्रोत, PTI

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे.

केतनची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आता केतनच्या वडिलांनी माध्यमांमध्ये आलेल्या काही दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

दुसरीकडे, सियाच्या वकिलांनी तपासात सहकार्य करत असल्याचं म्हटलं आहे, तर पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके काम करत असल्याची माहिती दिली आहे.

'विगबाबत आधीच सांगितलं होतं', केतनच्या वडिलांचा दावा

माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांमध्ये सिया गोयलला केतन विग घालत असल्यामुळे तो आवडत नव्हता, असा दावा करण्यात आला होता.

यावर प्रतिक्रिया देताना केतनचे वडील म्हणाले, "केतन विग वापरतो हे आम्ही सिया गोयलच्या कुटुंबाला आधीच स्पष्ट केलं होतं."

ते पुढे म्हणाले, "विग आवडत नाही हे व्यक्तीला मारण्याचं कारण असू शकत नाही. तसंच विग आवडत नव्हता तर नकार द्यायचा होता. माझ्या माहितीनुसार, ट्रेकला जाण्याची इच्छा सियाचीच होती."

केतनचे वडील विशाल अग्रवाल

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, केतनचे वडील विशाल अग्रवाल

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी सांगितलं होतं की, केतन आणि सियाचं लग्न ठरलं होतं. 18 जून रोजी दोघे लोहगड किल्ल्यावर गेले होते.

त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत सुरुवातीला अपघाताचा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतनची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

केतनचे वडील विशाल अग्रवाल पुढे म्हणाले, " या प्रकरणातील आरोपींना किमान मृत्यूदंड तरी मिळायला हवा, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

"या प्रकरणाची जलदगतीने चौकशी केली जाईल." असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. तसेच, या प्रकरणात एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली आहे."

पुण्यात आयोजित करण्यात आणलेल्या 'सारथी'च्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्रवाल कुटुंबीयांची भेट घेतल्याची माहिती भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे.

फडणवीसांचा फोन, कुटुंबाची विनंती… केतन अग्रवाल केस आता उज्ज्वल निकमांकडे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबद्दल माहिती देताना उज्ज्वल निकम म्हणाले, "या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. आज दुपारी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितले की अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांची भेट घेतली होती आणि या प्रकरणात मला विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की हे महाराष्ट्रासमोरचे एक आव्हान आहे आणि त्यांनीही मला या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची विनंती केली. मी होकार दिला. सध्या पोलिसांची चौकशी सुरू आहे; आरोपपत्र दाखल झाल्यावरच आपण चौकशीची स्थिती उघड करू शकू. ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे, कारण मी महाराष्ट्र राज्यात अशा अनेक प्रकरणे हाताळली आहेत आणि पुढेही हाताळत आहे. मुख्यमंत्र्यांनी नेहमीच आपल्याकडून अत्यंत समर्पणाने काम करण्याची गरज अधोरेखित केली आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य टिकलेच पाहिजे, आणि त्या भावनेतून मी मुख्यमंत्र्यांना सांगितले, 'हो, मी नक्की या प्रकरणाकडे लक्ष देईन"

'सिया तपासात पूर्ण सहकार्य करत आहे'

सिया गोयलची बाजू मांडणारे वकील आशुतोष श्रीवास्तव म्हणाले, "मी आधी सांगितल्याप्रमाणे, याचा तपास सुरू आहे आणि पोलीस योग्य आणि योग्य पद्धतीने तपास करत आहेत."

"आमची अशिल सिया बाबत सांगायचं झालं तर, ती तपास यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे, जेणेकरून पोलीस योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतील आणि पूर्ण स्पष्टतेसह सविस्तर चार्जशीट दाखल करू शकतील. यामुळे न्यायालयालाही सुनावणी प्रभावीपणे पार पाडण्यास आणि शेवटी अंतिम निकाल देण्यास मदत होईल."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

यापूर्वी सिया गोयल यांच्या वकील राजश्री सकट यांनी सांगितलं होतं की, पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याला विरोध करून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून 29 जून रोजी पुन्हा न्यायालयात सविस्तर बाजू मांडली जाईल.

तपासासाठी अनेक पथके; सियाच्या भावाची चौकशी

पुणे ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक गजानन टोंपे म्हणाले, "आतापर्यंत तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत आणि ती या प्रकरणाच्या विविध पैलूंवर काम करत आहेत. आम्ही काही तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत आणि काही साक्षीदारांचीही चौकशी केली आहे. या सर्वांच्या आधारावर सध्या तपास सुरू आहे. मोठ्या संख्येने लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आज सियाच्या भावाचीही चौकशी करण्यात येत आहे आणि इतर काही नातेवाईकांचीही चौकशी सुरू आहे."

पुणे ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक गजानन टोंपे

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, पुणे ग्रामीणचे पोलीस उप-अधीक्षक गजानन टोंपे

या प्रकरणात यापूर्वी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी सांगितलं होतं की, तांत्रिक पुरावे, घटनास्थळाची परिस्थिती आणि आरोपींच्या हालचालींची पडताळणी केल्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

हत्या की अपघात? तपासात समोर आलेली माहिती

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सिया गोयलने पोलिसांना, "किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडला," असं सांगितलं होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

मात्र, नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक पुरावे आणि पुढील तपासाच्या आधारे पोलिसांना संशय आला. त्यानंतर दोन विशेष पथके नेमण्यात आली.

विगमुळेच सिया नाराज होती? केतनच्या वडिलांचा मोठा खुलासा, ट्रेकबद्दलही दावा

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक तपासात चेतन चौधरी घटनेच्या दिवशी लोहगड परिसरात उपस्थित असल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणाची हत्या म्हणून नोंद करण्यात आली आणि सिया गोयल व चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.