मुंबईत रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांवरून 'मराठी विरुद्ध जैन' वाद का निर्माण झालाय?

फोटो स्रोत, Getty Images
देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे एक कॉस्मोपॉलीटन शहर आहे. मुंबईत असेही काही रहिवासी भाग आहेत, ज्याला 'मिनी इंडिया' असंही म्हटलं जातं. पण गेल्या काही दिवसांत अनेकदा काही मुद्यांवरून दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसतात.
'मराठी विरुद्ध अमराठी' हे भाषिक अस्मितेचं राजकारण मुंबई आणि मुंबईकरांना नवीन नाही. किंबहुना, शिवसेना या प्रादेशिक पक्षाचा जन्मच मराठी अस्मितेच्या मुद्यावर झाला.
यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नंतर शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर, दुसरी शिवसेना असे राजकीय पक्ष या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना दिसतात.
परंतु, मुंबईत आता विषय हा केवळ भाषिक अस्मितेपर्यंत राहिला नसून अगदी सार्वजनिक नियम, कायदा सुव्यवस्था, नियम आणि आदेशांचं पालन आणि अगदी स्थानिकांनी कोणता आहार करावा इथपर्यंत सुद्धा पोहोचल्याचं दिसतं.
'मासांहार विरुद्ध शाकाहार', 'शाकाहारी लोकांनाच घरं देणार', 'चिकन-मटणाची दुकाने बंद करा' असेही वाद गेल्या काही वर्षात मुंबईत होताना दिसले.
काही महिन्यांपूर्वीच कबूतरखान्यांवरून वाद झाला होता. आता मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर आखण्यात आलेल्या पांढऱ्या रंगांच्या पट्ट्यांवरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील एका सोसायटीमध्ये पायवाट असलेल्या जागांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवल्यावरून वाद उफाळून आला. एका स्थानिकाने यावर आक्षेप घेतला आणि याबाबत समाज माध्यमावर पोस्ट केलं.
जैन समाजात धर्मगुरू किंवा जैन मुनी यांच्याकरता या पांढऱ्या पट्ट्या रंगवल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणावर तोडगा निघाल्याचंही नंतर स्पष्ट करण्यात आलं.
हा वाद संपत नाही तोपर्यंत दादर, लालबाग आणि गिरगाव या भागातही रस्त्यांवर, फूटपाथवर काही मीटर अंतरापर्यंत अशाच पांढऱ्या पट्ट्या रंगवल्या जात असल्याचं समोर आलं.
यात दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या भागाचा आढावा घेत यावर तीव्र आक्षेप नोंदवला. तसंच, स्थानिकांनीही याला विरोध दर्शवला.

कोणत्याही परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी असं विद्रुपीकरण अयोग्य असल्याची भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली. तर माध्यमांनी तिथे उपस्थित असलेल्या जैन मुनी यांना प्रश्न विचारल्यावर वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला.
दादर येथील स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "पांढऱ्या पट्ट्या का लावायच्या? मग सर्व धर्माचे लोक आपआपले रंग मारतील. या चुकीच्या गोष्टी आहेत या थांबवल्या पाहिजेत."
"आज पांढऱ्या पट्ट्यांवर आलेत. मग उद्या दुसरं काही होईल. सतत काही ना काही गोष्टी होतात. नियम असताना हे कसं होतात. आम्ही यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो."
यानंतर गिरगावमध्ये चौपाटी आणि मांगलवाडी या भागांतही पांढऱ्या पट्ट्या आढळ्याचे व्हीडिओ समोर आले. या प्रकरणी 'आम्ही गिरगावकर' या संघटनेने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
महानगरपालिकेचं पोलिसांना पत्र
या प्रकरणात दादर आणि परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून दादर, शिवाजी पार्क आणि माहीम पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलं आहे.
या पत्रानुसार, "जी-उत्तर विभागात काही रस्त्यांवर अज्ञात नागरिकांमार्फत पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले आहेत. याबाबत नागरिकांकडून मौखिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पट्ट्या मारण्याबाबत विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसंच याबाबत विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यातही येत नाही."
"याबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करावी. तसंच या विभागात पोलिसांची गस्त वाढवावी."
आक्षेप काय आहेत?
दादरमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या भागाचा आढावा घेतला होता. स्थानिकांनी या पांढऱ्या पट्ट्यांना विरोध दर्शवला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "दादरमध्ये सहिष्णु भागात पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना आमचं आवाहान आहे की तुम्ही हे मुंब्र्यात करून दाखवा, असे सल्ले आणि आव्हानं देणं मुनींना शोभत नाही. धर्माच्या नावावर काय करायचं आणि काय नाही? करायचं याचं ज्ञान त्यांना नाही. प्रत्येकाचा धर्म हा त्यांच्या चार भिंतीत असला पाहीजे रस्त्यावर नाही."
"माझ्या घरासमोर मला मच्छीमार्केट नको, कारण मी मासे खात नाही, हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. पर्यूषणच्या काळात तुम्ही मासे आणि चिकन खाऊ नका हे सांगणं किंवा जबरदस्ती करणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. ही आमची सोसायटी आहे इथे मराठी माणसाला जागा नाही कारण ते मांसाहारी आहेत हा सांस्कृतीक दहशतवाद झाला. याला आम्ही खतपाणी घालू देणार नाही."
"आम्हाला वाटतं म्हणून कबुतरांना खायला घालणार, सांस्कृतिक दहशतवाद हा पांढऱ्या पट्ट्यांपुरता मर्यादित नाही तर तो आचरणाशी संबंधित आहे. जैन धर्मातल्या शिकलेल्या लोकांना आवाहन आहे की, कोणती अनिष्ट परंपरा असेल तर ती बदलण्यामागे काहीही चूक नाही. तुम्ही ज्या देशात, शहरात राहता तिथली व्यवस्था, कायदा, नीयमांचं पालन करणं सर्वांचं कर्तव्य आहे," असं देशपांडे सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Sandeep Deshpande
ते पुढे सांगतात, "मुळात कायदा असं सांगतो की रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे. यात विद्रुपीकरण केलं तर त्याचा दंड 20 हजारापर्यंत लावला पाहिजे. हा दंड महानगरपालिकेने लावला पाहिजे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा असं पत्र महानगरपालिकेने दिलं पाहिजे. रस्ता विद्रुपीकरण करायचा कोणालाही अधिकार नाही. नियमानुसार कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही."
तर गिरगाव संघटनेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला समजलं तेव्हा आम्ही घटनास्थळी पोहचलो. आम्ही दोन ठिकाणी याविरोधात आंदोलन केलं आहे. यापूर्वी असं कधीही होत नव्हतं."
"मराठी लोकांच्या चाळी रिडेव्हलपमेंट करून मग हेच लोक त्यांना घरं नाकारतात. काही इमारतीत मांसाहाराला विरोध केला जातो. त्यामुळं मराठी आणि जैन लोकांमध्ये तेढ निर्माण होते. एवढ्या वर्षांपासून मुंबई किंवा गिरगावात पांढऱ्या पट्ट्या आल्या नाहीत. मग आत्ता हे सगळं का केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली म्हणून हे वाढलंय का?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जैन समाजाची भूमिका काय आहे?
या संदर्भात जैन मुनी नीलेशचंद्र यांनी म्हटलं आहे की, "संदीप देशपांडे जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे."
"भेंडी बाजार, मुंब्रा आणि पायधुनीला कधी जाणार?" असा उलट प्रश्न नीलेशचंद्र यांनी त्यांना विचारला आहे.
"जैन समाज घाबरणारा नाही. झुकणारा नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. लोकांना तोडणाऱ्या राजकारण्यांचा महाराष्ट्र नाही," असंही प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी याबाबत समाजाची सविस्तर भूमिका मांडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "जैन समाजाने पांढऱ्या पट्ट्या लावल्या म्हणून वाद सुरू करण्यात आला आहे. पांढऱ्या पट्ट्यांनी कोणाला नुकसान आहे? याला राजकीय वळण दिलं जात आहे. ज्या पक्षाने कायम दोन समाजात भांडणं लावायची कामं केली त्याचे विद्वान जैन समाजाबाबत काहीही बोलत आहेत."
"पांढरा रंग शांतीचं प्रतिक आहे. जैन समाज कायम शांतीप्रिय राहिला आहे. जैन समाजाच्या संदेशाचं वहन साधू-साध्वी करतात. ते अनवाणी पायाने भ्रमण करतात. तापमान वाढत असल्याने त्यांना त्रास होतो. त्यांनी पांढरे पट्टे मारा असं सांगितलेलं नाही. पण 40 डिग्री तापमानात भिक्षा घेण्यासाठी येतात तर त्यांना चालताना सुविधा व्हावी, असं श्रावकांना वाटतं."
"चातुर्मासाच्या काळात छोटे छोटे किडे-कीटक असतात तर त्यांना पांढरी पट्टी दिसावी त्यामुळं दिलासा मिळावा, किडे-कीटक मरू नये म्हणून ते केलं जात आहे. जैन समाज शांततेत राहत आहे. परंतु जैन समाजाच्या बाबतीत काहीही असं बोलणं हा जैन समाजाचा अपमान आहे. हा राजकारण करण्याचा विषय नाही. आमचे साधू त्यागी आहेत."
ते पुढे असंही म्हणाले, "मुंबईत असं काही करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही लवकरच महापौरांची भेट घेऊन महानगरपालिकेची परवानगी घेऊ किंवा त्यांना असे पांढरे पट्टे मारण्यासाठी सांगू. परंतु आमच्या भावना दुखावण्याचं काम केलं जाऊ नये."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, 'पहिल्यांदा तर मला असं वाटतं की, कोणीही कुठल्याही समजाला एकमेकांसमोर उभं करणं हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही."
"एखाद्याच्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे आणि इतर समाजांनी पण त्याचा आदर केला पाहीजे. समाजाचा आदर देखील ज्यांची परंपरा आहे त्यांनी केला पाहिजे. आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणं गरजेचं आहे. यात राजकारण ओतणं याचा कधीच फायदा होत नाही. त्याने मतं देखील मतं मिळत नाही."
या सगळ्या प्रकाराला 'सांस्कृतिक दहशदवाद' म्हणून संबोधलं जात आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, "अनेकवेळा चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. अशा सगळ्याच गोष्टींना मुख्यमंत्री म्हणून मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं मला वाटत नाही."
कबुतरखाने बंद करण्यावरून वाद
मुंबईत एकूण 51 कबुतरखाने आहेत. कबुतरखाने तत्काळ बंद करण्याचे निर्देश गेल्यावर्षी मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिले होते. यानंतर कारवाई सुद्धा सुरू झाली. यानंतर 2 ऑगस्ट 2025 रोजी महानगरपालिकेने दादर येथील कबुतरखाना बंद केला.
यासाठी संपूर्ण कबुतरखान्याला ताडपत्रीने झाकण्यात आलं. यावेळी स्थानिकांनी आक्षेप घेतल्याची दृश्य देखील समोर आली. तसंच दक्षिण मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून 3 ऑगस्ट रोजी विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. यात जैनमुनी सुद्धा सहभागी झाले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती, "आतापर्यंत पूर्ण समाज झोपलेला आहे. मुंबई महानगरपालिकेचा निर्णय चुकीचा आहे. हा आमच्या धर्माच्या विरोधात आहे. आम्ही कबुतरांसाठी परमात्म्याकडे प्रार्थना करत आहोत."
महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्यादृष्टीने कबुतरखाने बंद करण्यात येत होते. परंतु या मुद्यावरूनही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध जैन समाज असा वाद पाहायला मिळाला होता. या वर्षी पुन्हा पांढऱ्या पट्ट्यांच्या निमित्ताने मराठी विरुद्ध जैन हा वाद दिसत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























