पुरुष मृतदेहावर वादग्रस्त वक्तव्य, सेजल पवारवर कारवाई करताना केईएम प्रशासनाने मांडली 'ही' भूमिका

फोटो स्रोत, Video Grab/FACEBOOK/Pranit More Official/BBC
स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोमध्ये पुरुष मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या डॉ. सेजल पवारविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
केईएमच्या डीन कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या प्रकरणी केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रशासनाने सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच तिच्या वसतिगृह आणि कॉलेज परिसरातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
या प्रकरणी 5 सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून ते 7 दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सेजल पवारच्या सुरक्षेचा विचार करून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. सेजल पवारने माफी मागितली आहे. एका व्हीडिओच्या माध्यमातून 'मी खूप चुकीचं वक्तव्य केलं', असं तिने म्हटलं आहे.
दुसरीकडे, प्रणित मोरे यानेही सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे.
"माझी चूक झाली, त्यामुळं मला माफ करून एक संधी द्या," असं प्रणित मोरेनं म्हटलं.
रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्धपत्रकात काय म्हटलं?
सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि के.ई.एम. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचं रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून म्हटलं आहे.
तक्रारी प्राप्त होताच संस्थेने प्राथमिक चौकशी प्रक्रिया सुरू केली. संबंधित विद्यार्थिनीची बाजू ऐकून घेण्यात आली, तिचे स्पष्टीकरण आणि माफीनामा नोंदवून घेण्यात आला. तसेच संबंधित व्हीडिओ आणि अन्य साहित्याचे परीक्षण करण्यात आले.
प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष, प्रकरणाचे गांभीर्य, मृत व्यक्ती व देहदान करणाऱ्यांच्या सन्मानाचे संरक्षण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असलेल्या व्यावसायिक मूल्यांचा विचार करून संस्थेने सेजल पवारविरुद्ध शिस्तभंग आणि प्रशासकीय कारवाई केली आहे.
त्यानुसार, 13 जून 2026 पासून पुढील 15 दिवसांसाठी सेजल पवार हिला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. सविस्तर चौकशी पूर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सेजल पवार हिला आज (13 जून) सकाळी 10.30 वाजता तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच चौकशी समितीने बोलावल्यास प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, @ians_india
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ प्राध्यापक, बाह्य सदस्य आणि संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. ही समिती संपूर्ण घटनाक्रम, त्याचा परिणाम, सोशल मीडियावरील प्रसार आणि संबंधित नोंदींचा अभ्यास करून पुढील कारवाईसंदर्भात शिफारसी सादर करणार आहे.
रुग्ण, मृत व्यक्ती, देहदान करणारे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आदर बाळगणे हे वैद्यकीय शिक्षणाचे मूलभूत मूल्य असल्याचे संस्थेने पुन्हा स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची हाताळणी अत्यंत संवेदनशीलपणे, गांभीर्याने आणि न्याय्य पद्धतीने केली जाईल, असंही प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं.
सविस्तर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संस्थेच्या नियमांनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
सध्या चौकशी प्रक्रिया सुरू असल्याने या टप्प्यावर कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये, असं आवाहनही संस्थेनं केलं आहे.
डॉ. सेजल पवारने व्हीडिओ जारी करत मागितली माफी
पुरुष मृतदेहांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर डॉ. सेजल पवारने माफी मागितली आहे. एका व्हीडिओच्या माध्यमातून 'मी खूप चुकीचं वक्तव्य केलं' असं तिने म्हटलं आहे.
व्हीडिओत सेजल पवार म्हणाली, "मी सर्वांची मनापासून माफी मागते. माझ्याकडून खूप चुकीचं वक्तव्य झालं. त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. मी असं काही तरी बोलेन, असा विचारही मी कधी केला नव्हता."
आपण केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अशी कबुली देत त्याबद्दल तिने खेदही व्यक्त केला.

सध्या व्हायरल होत असलेली ही क्लिप 2 महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आली होती. सेजल पवार म्हणाली, "2 महिन्यांपूर्वीची ही क्लिप इतका मोठा वाद निर्माण करेल, याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी माझ्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. ही माझी चूक होती, याची मला जाणीव आहे."
"चुकीच्या वक्तव्यांवर सोशल मीडियावरील लोकांनी टीका करणे योग्यच आहे. भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांशी आपलं नाव जोडले जाऊ नये, याची काळजी घेईन," असेही तिने म्हटलं.
"माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते," असंही तिने नमूद केलं.
"त्या संवादादरम्यान मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मृतदेहांचा नेहमी आदर केला आहे. मात्र, मी केलेलं एक विशिष्ट वक्तव्य चुकीचं होतं आणि ते बोलायला नको होतं. भविष्यात सार्वजनिक ठिकाणी बोलताना अधिक काळजी घेईन," असंही तिनं स्पष्ट केलं.
प्रणितनंही मागितली जाहीर माफी
प्रणित मोरेनंही सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे.
"कार्यक्रमात तो मुलगा ज्या पद्धतीनं वक्तव्यं करत होता आणि सगळे हसत होते आणि मीही त्यात वाहावत गेलो आणि हसत होतो, पण ही माझी फार मोठी चूक होती.
मी त्यावेळी त्याला थांबवू शकलो असतो किंवा मला ठाम भूमिका घेता आली असती, पण मी ते केलं नाही.

फोटो स्रोत, Video Grab/FACEBOOK/Pranit More Official
मी त्याला उलट बोलायची संधी दिली. ज्यांना यामुळं त्रास झाला त्या सर्वांची मी माफी मागतो. कायदेशीर कारवाईत मी सहकार्य करत आहे," असं प्रणितनं माफी मागताना म्हटलं.
"सगळ्यांनी मला प्लीज संधी द्या आणि मला माफ करा, मी एक चांगला व्यक्ती बनून दाखवेन. मी अजूनही खूप काही शिकत आहे, मी नक्कीच स्वतःमध्ये बदल घडवेन ", असं प्रणितनं माफी मागताना व्हीडिओमध्ये म्हटलं.
नेमकं प्रकरण काय?
या वादाची सुरुवात प्रणित मोरेच्या कार्यक्रमादरम्यान हिमांशू जांगडाने सांगितलेल्या एका प्रसंगामुळे झाली. त्याने एका मुलीसोबतच्या डेटचा अनुभव सांगितला होता.
त्याने चिकन बिर्याणीच्या एका प्लेटवर 370 रुपये खर्च केल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर त्याची वसुली किंवा बिर्याणीवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात तिच्याकडून 'सेक्शुअल फेव्हर'ची अपेक्षा केली होती, असे जांगडा यानं सांगितलं होतं.
याचं अतिशय सविस्तर वर्णन त्यानं केलं होतं आणि त्यावर प्रणित मोरेसह उपस्थितांमध्ये हशा पिकलेला पाहायला मिळालं.
यानंतर डॉ. सेजल पवारने वैद्यकीय शिक्षणादरम्यान मृतदेहांशी संबंधित काही अनुभव सांगितल्याचे व्हीडिओही व्हायरल झाले होते. त्यानंतर हा वाद आणखी वाढला होता.

फोटो स्रोत, VIDEO GRAB/Pranit More Official/Facebook
सेजल पवारने पुरुष मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमात झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या.
या प्रकरणानंतर हिमांशू जांगडाला त्याच्या कंपनीने कामावरून काढून टाकलं. दुसरीकडे डॉ. सेजल पवारने केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश केईएम हॉस्पिटलने दिले.
सायबर सेलने दाखल केला गुन्हा
प्रणित मोरेसह, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (11 जून) महाराष्ट्र सायबर सेलने हा गुन्हा दाखल केला.
राष्ट्रीय महिला आयोगाने देखील स्वतःहून (सु-मोटो) या प्रकरणाची दखल घेत प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडाला समन्स बजावले.
प्रणित मोरेच्या एका कार्यक्रमाशी संबंधित काही व्हीडिओ आणि क्लिप्स यूट्यूब, इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आले होते. याच प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे, केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रशासनाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कार्यक्रमात सेजल पवारने केलेल्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले.
तसेच, सेजल पवार हिला मेडिकल कॉलेज प्रशासनाने 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवरही पाठवले.
चौकशी समिती सध्या या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत असून तिचा अहवाल मिळाल्यानंतर संस्थेकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























