गोकुळ निवडणूक: मंत्री, खासदार, आमदार एकवटले; तरी सतेज पाटलांनी कसा मिळवला विजय

फोटो स्रोत, Satej Patil
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलचा पराभव झाला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलने विजय मिळवला आहे.
गोकुळच्या 25 संचालकपदांसाठी झालेल्या या निवडणुकीत समविचारी पॅनेलच्या 13 उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला मतदान झालं. 2 मतदारांचा अपवाद वगळता जवळपास सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सोमवारी (19 ऑक्टोबर) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र, दुपारनंतर चित्र बदलू लागलं आणि समविचारी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.
या निवडणुकीत महायुतीच्या 'राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी' आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' यांच्यात प्रमुख लढत झाली. दोन्ही पॅनेलचे मिळून 50 उमेदवार रिंगणात होते.
महायुती सरकारमधील मंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
निकालानंतर राजकीय स्तरातून सतेज पाटील यांचे कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट म्हटले, "अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बहुप्रतिष्ठित 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीत माझे सहकारी, राज्याचे माजी मंत्री सतेज पाटील यांच्या कणखर नेतृत्वाखाली 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने मिळवलेला विजय ऐतिहासिक आणि दणदणीत आहे. या शानदार विजयाबद्दल सतेज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन."
कशी झाली 2026 ची गोकुळ निवडणूक?
याआधीच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, 2026च्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाची महायुती होती.
तर महायुतीविरोधात माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी पॅनेलने निवडणूक लढवली.
महायुतीकडे सत्तेची ताकद आणि अनेक राजकीय नेत्यांचं पाठबळ होतं.
मात्र, सतेज पाटील यांनी केलेला प्रचार, त्यांचे राजकीय डावपेच आणि मतदारांना केलेली भावनिक साद यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली.
सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनेलचे विजयी उमेदवार
- अभिजित प्रभाकर तायशेटे
- शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर
- किसन बापूसाहेब चौगले
- बाबासाहेब श्रीपती चौगले
- राहुल बजरंग देसाई
- विद्याधर बाबुराव गुरबे
- बाबासाहेब विष्णू देवकर
- विश्वजीत दिनकरराव जाधव
- अंजना केदारी रेडेकर
- भाग्यश्री धीरज डोंगळे
- शशिकांत शामराव खोत
- राजू बाबा आवळे
- बयाजी शेळके
महायुतीच्या पॅनेलचे विजयी उमेदवार
- राहुल पांडुरंग पाटील
- चेतन अरुण नरके
- अजित शशिकांत नरके
- अंबरीषसिंह संजय घाटगे
- विरेंद्र संजय मंडलिक
- मदन बाबुराव देसाई
- राजेश नरसिंगराव पाटील
- रणजितसिंह दिलीपराव पाटील
- रणजितसिंह कृष्णराव पाटील
- अजित पांडुरंग पाटील
- कर्णसिह गायकवाड
- अमर पाटील कोडोली
या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांचाही पराभव झाला आहे.
दिग्गजांचा पराभव
या निवडणुकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांचा पराभव झाला. ओबीसी गटातून नाविद मुश्रीफ निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र समविचारी आघाडीच्या शशिकांत खोत यांचा 69 मतांनी विजय झाला.
गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांचा देखील पराभव झाला आहे. शौमिका महाडिक यांनी फेर मतमोजणीचा अर्ज दाखल केला. त्यानुसार फेर मतमोजणी पार पडली. मात्र यामध्ये देखील शौमिका महाडिक यांचा पराभव झाला.
महायुती प्रणित राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार व गोकुळ दूध महासंघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि महायुतीचे उमेदवार युवराज पाटील यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीचा अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.
फेर मतमोजणीचा अर्ज केल्याने, निकाल लागण्यास 3 तास उशीर झाला.
गोकुळ आणि अमूलचा मुद्दा
5 हजार 414 मतदार संख्या असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने प्रचार करण्यात आला. यानिमित्ताने आरोप प्रत्यारोपाने निवडणूक गाजली.
या निवडणुकीत गोकुळ दूध संघाच्या स्वायत्ततेचा मुद्दा चर्चेत राहिला.
सतेज पाटील यांनी गोकुळच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती.
गुजरातमधील अमूल दूध संघाच्या माध्यमातून गोकुळचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला होता.
गोकुळ दूध संघ कोल्हापुरात असल्याने त्याचे सर्व निर्णयही कोल्हापुरातूनच घेतले गेले पाहिजेत. मात्र, या दूध संघाचे निर्णय मुंबईतून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी प्रचारादरम्यान केला होता.
"गोकुळला गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल मल्टिस्टेट सहकारी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य हस्तक्षेपापासून वाचवायचं असेल, तर समविचारी पॅनेलला निवडून द्या," असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं.
कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही अमूलच्या माध्यमातून स्थानिक दूध संघांचं अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला होता. या राज्यांमध्ये अशा प्रयत्नांना विरोध झाल्याचं सांगत, कोल्हापुरातही स्थानिक दूध संघाची स्वायत्तता टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
स्थानिक माध्यमांशी बोलतानाही त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांमुळे गोकुळचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असा आरोप केला होता.
दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांकडून मतदारांना देवीची शपथ, अंगारा, भंडारा देऊन शपथ देण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसे काही व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या शपथ नव्हत्या तर 'आणाभाका' घेण्यात आल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.
गोकुळ कोल्हापूरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची स्थापना 16 मार्च 1963 रोजी झाली.
कोल्हापूरच्या राजकारणात सहकारी संस्थांना दीर्घकाळापासून महत्त्वाचं स्थान आहे. साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांबरोबरच स्थानिक नेतृत्वाची जाळीही तयार झाली.
या संस्थांवर नियंत्रण असणं म्हणजे केवळ आर्थिक व्यवहारांवर प्रभाव असणं नव्हे. त्यातून ग्रामीण भागातील मतदारांशी संपर्क, कार्यकर्त्यांचं जाळं, स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि राजकीय प्रभाव वाढवण्याची संधीही मिळते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























