हिमनदी एका झटक्यात कोसळली आणि नेपाळमध्ये पूर आला? शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

हिमनदी एका झटक्यात कोसळली आणि पूर आला? शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, टेसा वोंग
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हिमनदीचा भाग कोसळल्यामुळे नेपाळ-तिबेटमध्ये भीषण पूर आला असावा, असं प्राथमिक तपासात दिसून आलंय, यामुळे हिमालयातील वेगानं वितळणाऱ्या बर्फाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे, असं शास्त्रज्ञांनी बीबीसीला सांगितलं.

प्राथमिक माहितीनुसार, हा पूर भूकंपामुळे झाला असावा, अशी अनेकांची समजूत झाली होती. भूकंपामुळे भूस्खलन झालं आणि त्यानंतर पूर आला, असं मानलं जात होतं.

मात्र, त्यानंतर अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने स्पष्ट केलंय की, ही आपत्ती हिमनदी कोसळल्यामुळे आली.

म्हणजेच, एखादी हिमनदी किंवा तिचा काही भाग अचानक तुटून कोसळल्यामुळे हे झालं असावं.

कोसळलेल्या हिमनदीचा भाग दरीच्या तळाशी आदळल्याचा परिणाम इतका प्रबळ होता की, तो USGS च्या आकडेवारीत आणि या घटनेचं विश्लेषण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते 5.2 तीव्रतेचा भूकंपीय धक्का म्हणून नोंदवला गेला.

डंडी विद्यापीठातील हिमनदी तज्ज्ञ डॉ. सायमन कुक यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या टीमला लांगतांग लिरुंग शिखराजवळील नेपाळमधील एका हिमनदीचा खालचा भाग कोसळल्याचं आढळलं आहे. हे ठिकाण पूरग्रस्त भागापासून अंदाजे 15 किमी (9 मैल) पश्चिमेस आहे.

त्यांच्या अंदाजानुसार, हिमनदी उत्तर-पश्चिम दिशेला कोसळली आणि त्यानंतर प्रवाहाच्या दिशेने पश्चिमेकडे सरकली.

इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) या आंतरसरकारी वैज्ञानिक संस्थेच्या विश्लेषणानुसार, "अतिशय उंचीच्या भागातून बर्फ आणि खडकांचा हिमस्खलनसदृश प्रवाह (ice-rock avalanche) सुरू झाला असावा."

यामुळे "मोठ्या प्रमाणात बर्फ आणि खडकांचा ढिगारा" भोटेकोशी नदीची उपनदी असलेल्या लेंडेखोला नदीत पडला आणि त्यानंतर नदीत अचानक मोठी लाट निर्माण झाली. या प्रवाहात पाणी, गाळ आणि मोठमोठे दगडही खाली वाहत गेले.

या केंद्राच्या मते, खालील भागातील नद्यांमधील पाण्याची पातळी अवघ्या 30 मिनिटांत सात ते नऊ मीटरनं वाढली आणि अनेक जलनिरीक्षण केंद्रे वाहून गेली किंवा त्यांचं नुकसान झालं.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील पृथ्वीविज्ञानाचे प्राध्यापक माईक सर्ल यांनी सांगितलं की, भूस्खलनापासून पूर येईपर्यंतची ही संपूर्ण प्रक्रिया काही तास किंवा अगदी काही दिवसही चालली असू शकते.

"ढिगाऱ्याच्या प्रचंड लाटेवरून असे दिसतंय की सुरुवातीला भूस्खलन झालं असावं; पाणी साचलं, नदी अडवली गेली आणि नंतर एकाचवेळी आलेल्या प्रचंड पुरामुळे तो अडथळा फुटला," असे त्यांनी बीबीसीला सांगितलं.

हिमशिखर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या भागाची भौगोलिक रचनाही पुराला अधिक तीव्र करणारी ठरली असावी. सर्ल यांनी सांगितलं की, लांगतांग लिरुंग हे उंच हिमालयाच्या शिखररांगेवर वसलेलं असून पर्वताच्या दोन्ही बाजूंना "अत्यंत तीव्र उतारांच्या दऱ्या" आहेत, त्यामुळे पाणी अधिक वेगानं खाली वाहून गेलं असावं.

सर्ल यांच्या मते, लांगतांग लिरुंगसह संपूर्ण हिमालय दीर्घकालीन टेक्टॉनिक (भूविवर्तनिकिय हालचाली म्हणजे म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे तिच्या कवचात (Crust) होणाऱ्या हालचाली. या हालचालींमुळे पृथ्वीच्या पाठीवर पर्वत, पठारे, खचदऱ्या आणि नद्यांची खोरी तयार होतात.) हालचालींमुळे हळूहळू उंचावत आहे. एका भूस्तरीय प्लेटनं (भूतबक) दुसऱ्या प्लेटला वर ढकलल्यामुळे ही प्रक्रिया चालू आहे. " हे गाडीखाली जॅक लावून ती वर उचलण्यासारखं आहे."

(टेक्टॉनिक प्लेट म्हणजे भूपट्ट किंवा भूतबक. पृथ्वीचं बाह्य कवच (भू-कवच आणि प्रावरणाचा वरचा कठीण भाग) या मोठ्या आणि लहान तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे आणि हे तुकडे पृथ्वीच्या वितळलेल्या शिलारसावर (Asthenosphere) तरंगत सतत संथ गतीने हालचाल करत असतात, त्यांना 'भूतबक' किंवा 'भूपट्ट' म्हणतात.)

"पर्वत जसजसा वर उंचावत जातो, तसतशी हिमनदी अधिकाधिक तीव्र उभी (steep) होत जाते आणि तिचे काही भाग कोसळणं अपरिहार्य ठरतं."

साधारणतः असे लहान भाग कोसळतात. ते तात्पुरते नद्या अडवतात आणि नंतर सहज वाहून जातात, असं त्यांनी सांगितले. पण या आपत्तीत संपूर्ण हिमनदीच "एकाच वेळी" कोसळल्याचं दिसतं, हे "अत्यंत असामान्य" असल्याचं सर्ल म्हणाले. "असे पूर नेहमी घडतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाही."

बुधवारी (26 ऑगस्ट) घडलेल्या या घटनेमागे "दोन वेगळ्या प्रक्रिया" असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. "एक म्हणजे हिमालयाचे टेक्टॉनिक उंचावणं आणि दुसरी म्हणजे हवामान बदलामुळे तापमान वाढून हिमनद्या वितळणं."

"या सर्व प्रक्रिया एकत्र येऊन आपण आता नियमितपणे पाहत असलेल्या अशा विनाशकारी आपत्ती घडवत आहेत."

हिमनदीचा भाग

फोटो स्रोत, Reuters

हवामान बदलामुळे हिमालयातील बर्फ आणि शतकानुशतकं गोठलेली जमीन म्हणजेच परमाफ्रॉस्ट वितळत असल्याचा इशारा शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून देत आहेत.

यंदा ICIMOD ने प्रसिद्ध केलेल्या एका विश्लेषणात असे आढळले की हिंदूकुश-हिमालयातील हिमनद्यांतून 2000 नंतरच्या काळाच्या तुलनेत आता दुप्पट वेगानं बर्फ वितळतोय. यामुळे पुरासारखा धोका अधिक वाढतो.

डॉ. कुक यांनी सांगतात, अलीकडच्या काळात भारत, स्वित्झर्लंड आणि इटलीमध्येही हिमनदी कोसळल्यामुळे पूर आणि भूस्खलनाच्या अशाच घटना घडल्या आहेत.

2021 मध्ये उत्तर भारतातील चमोली येथे हिमालयातील एका मोठ्या हिमनदीचा भाग कोसळला होता. त्यामुळे ढिगारा आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह खालील भागात गेला आणि 200 जणांचा मृत्यू झाला. नंतर शास्त्रज्ञांनी या धडकेची ताकद 15 अणुबाँबच्या स्फोटाइतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला.

नेपाळ

फोटो स्रोत, Getty Images

नेपाळमध्येही याच प्रदेशात गेल्या वर्षी तिबेटमधील एका हिमनदी तलाव फुटल्यामुळे पूर आला होता.

ICIMOD चे तज्ज्ञ मोहम्मद फारूक आझम यांनी सांगितलं, पृथ्वीवरील गोठलेल्या भागांमध्ये, म्हणजेच क्रायोस्फिअरमध्ये निर्माण होणाऱ्या धोक्यांची वाढती वारंवारता "आधीपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसू लागली आहे. बदलांचा वेग अत्यंत जलद आहे."

एखादी विशिष्ट घटना थेट हवामान बदलामुळेच घडली, असं निश्चितपणे सांगणं कठीण असतं. मात्र, " नमुन्यादाखल अशा घटनांकडे पाहिलं तर हवामान बदलाचा परिणाम असू शकतो, असं नक्कीच वाटतं," असे डॉ. कुक म्हणाले.

"कारण तर्क अगदी स्पष्ट आहे. तापमान वाढणाऱ्या जगात हिमनद्या आकुंचन पावतात, मोठ्या प्रमाणात बर्फ वितळतो. पर्वतांच्या उतारांना अंशतः धरून ठेवणारा परमाफ़्रॉस्ट उबदार होत आहे, वितळत आहे आणि कमकुवत होत आहे."

"त्यामुळे भूस्खलन, ढिगाऱ्यांचे प्रवाह, हिमनद्यांच्या वितळलेल्या पाण्यामुळे निर्माण होणारे पूर, हिमनदी तलाव फुटणे, हिमनद्या कोसळणे अशा घटना अधिक वाढतील. कारण हवामान बदलामुळे हे उंच पर्वतीय प्रदेश मूलतः अस्थिर बनत आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)