इस्रायल आणि तुर्कीयेमध्ये संघर्षाची शक्यता? दोघांमध्ये कुणाची लष्करी ताकद जास्त?

इस्रायल आणि तुर्किये

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

इस्रायलची स्थापना 14 मे 1948 रोजी झाली. त्यानंतर एका वर्षाच्या आत, म्हणजे 28 मार्च 1949 रोजी तुर्कीयेने इस्रायलला मान्यता दिली होती.

तुर्कीये हा इस्रायलला स्वतंत्र किंवा सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला मुस्लिमबहुल देश होता. पण जवळपास 8 दशकानंतर आता दोन्ही देशांमधील परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये मागील वर्षी 12 दिवस युद्ध झालं होतं. या युद्धामुळे मध्य-पूर्वेतील शक्तीचं संतुलन मोठ्या प्रमाणात बदललं होतं.

इस्रायल अधिक आक्रमक देश म्हणून पुढे आला, तर इराणला अनेक पातळ्यांवर मोठं नुकसान सहन करावं लागलं. अमेरिका इराणसोबत दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात अडकणं टाळताना दिसत आहे. पण इस्रायलमध्ये अशी चर्चा सुरू आहे की इराण कमकुवत झाल्याने त्याची जागा आता तुर्कीये घेऊ शकतो.

18 ऑगस्टला सीरियाच्या अबू अल-दुहूर हवाई तळावर इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर इस्रायल आणि तुर्कीयेने एकमेकांना थेट इशारे दिले. त्यामुळे आता एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की, सीरियामध्ये तुर्की आणि इस्रायल संघर्षाच्या जवळ पोहोचले आहेत का?

सीरियामधील तुर्कीये आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष हा संरचनात्मक मानला जातो. कारण दोन्ही देशांना सीरियाबाबत अगदी वेगवेगळं चित्र पाहायचं आहे.

सीरियात दोन्ही देश आमनेसामने का आले?

मर्सिन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे सहयोगी प्राध्यापक बुग्रा सारी 'मिडल ईस्ट मॉनिटर'मध्ये लिहितात, "तुर्कीयेला एकसंध सीरिया हवा आहे. सीरियाने स्वतःच्या सीमांवर नियंत्रण ठेवावं, तिथले सशस्त्र गट सरकारच्या व्यवस्थेत सामील व्हावेत, इस्लामिक स्टेट आणि पीकेकेकडून असलेले धोके कमी व्हावेत आणि सीरियातून गेलेले निर्वासित पुन्हा मायदेशी परतून शकावेत, अशी तुर्कीयेची इच्छा आहे."

"सीरिया विभागला गेला तर त्याचा सर्वात मोठा फटका तुर्कीयेला बसेल, कारण सीरियासोबत तुर्कीयेची जवळपास 900 किलोमीटर लांब सीमा आहे."

प्रा बुग्रा म्हणतात, "इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने कमकुवत आणि मर्यादित लष्करी ताकद असलेला सीरिया अधिक चांगला वाटतो. सीरियाकडे मजबूत हवाई सुरक्षा किंवा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा नसावा, गोलान टेकड्यांजवळ इस्रायलला धोका निर्माण करणारी कोणतीही शक्ती नसावी आणि गरज पडल्यास इस्रायलला सीरियात लष्करी कारवाई करण्याचं स्वातंत्र्य असावं, असं त्यांना वाटतं."

सीरियात अल-शाराच्या विजयानंतर तुर्कीयेचा प्रभाव वाढला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरियात अल-शाराच्या विजयानंतर तुर्कीयेचा प्रभाव वाढला आहे.

बशर अल-असद यांच्या राजवटीत सीरियामध्ये इराणचा मोठा प्रभाव होता. पण, अल-शारा सत्तेत आल्यानंतर तुर्कीयेचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे आता सीरियात इस्रायलचा मुख्य सामना इराणऐवजी तुर्कीयेशी होताना दिसत आहे.

इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी सोमवारी (24 ऑगस्ट) इस्रायली रेडिओ 103 एफएमला सांगितलं की, जर इराण कमकुवत झाला तर निर्माण झालेली पोकळी दुसरा कोणीतरी भरून काढेल.

योआव गॅलंट म्हणाले, "मध्य-पूर्वेत इराणची ताकद कमी झाली तर त्याची जागा घेण्यासाठी तुर्कीये हा सर्वात मोठा दावेदार आहे. तुर्कीये हा शक्तिशाली देश असून त्याला मोठी साम्राज्यवादी परंपरा आहे. तो आशिया आणि युरोपच्या मध्ये असल्याने त्याचं महत्त्वही मोठं आहे."

"अमेरिकेनंतर नाटोमध्ये तुर्कीयेचं सैन्य सर्वात मोठं आहे. तुर्कीयेचा संरक्षण उद्योग मजबूत आहे, तिथले लोक मेहनती आहेत आणि हा देश युरोपमधील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे. त्यामुळे तुर्कीये ही मोठी ताकद असून तो आधीपासूनच अनेक क्षेत्रांत आपला प्रभाव आणि विस्तार वाढवत आहे."

भूराजकीय मुद्द्यांसोबतच वैचारिक संघर्ष

ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशन या थिंक टँकच्या वरिष्ठ फेलो एस्ली अयदिन्तासबस यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये ब्रिटिश वृत्तपत्र 'फायनान्शियल टाइम्स'मध्ये लिहिलं होतं, "तुर्कीये आणि इस्रायलमधील संघर्ष वैचारिक आणि भूराजकीय अशा दोन्ही स्वरुपाचा आहे. एर्दोगान यांच्या सरकारने सुन्नी इस्लामी लोकानुनय आणि तुर्कीयेचा राष्ट्रवाद यांची सांगड घातली आहे."

"दुसरीकडे, इस्रायलमधील उजव्या विचारसरणीच्या आघाडीचीही देशाच्या भवितव्याबाबत तितकीच कठोर भूमिका आहे. लेबनॉन आणि गाझासोबतच सीरियामध्येही इस्रायल आपलं लष्करी वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्कीये आणि इस्रायलच्या विचारसरणी एकमेकांच्या विरोधात असल्याने दोन्ही देशांमध्ये तडजोड होण्याची शक्यता फारच कमी आहे."

एस्ली यांनी लिहिलं होतं की, सीरिया हे सध्या तुर्कीये आणि इस्रायलमधील संघर्षाचं सर्वात मोठं आणि तातडीचं केंद्र आहे. 2024 च्या अखेरीस असद यांची सत्ता गेल्यानंतर दोन्ही देश सीरियाची पुढची व्यवस्था आपल्या हितानुसार ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

19 सप्टेंबर 2023 रोजी तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली होती. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वार्षिक बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आपापसांत चर्चा केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 19 सप्टेंबर 2023 रोजी तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली होती. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वार्षिक बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आपापसांत चर्चा केली होती.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"तुर्कीयेने सीरियातील आपला प्रभाव वाढवला असून सत्तेत आलेल्या आपल्या समर्थकांना पाठिंबा दिला आहे. अंकाराला (तुर्कीये) आपल्या भूमिकेला अनुकूल असलेलं स्थिर आणि मजबूत केंद्र सरकार सीरियात हवं आहे."

"उत्तर सीरियातील मोठ्या भूभागावर तुर्कीयेचा आधीपासून प्रभाव आहे आणि आता संपूर्ण सीरियात आपला आर्थिक आणि लष्करी प्रभाव वाढवण्याचा त्याचा प्रयत्न आहे."

"दुसरीकडे, इस्रायलने सीरियातील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. तसेच कुर्द आणि द्रूज समुदायांना अधिक स्वायत्तता मिळावी, याला इस्रायलने पाठिंबा दिला आहे. सीरियाचे नवे सत्ताधारी पूर्वी जिहादी गटांशी जोडले गेले होते, त्यामुळे इस्रायल त्यांच्याकडे संशयाने पाहतो."

"अनेक दशकांपासून अमेरिकेचे धोरणकर्ते तुर्कीये आणि इस्रायलला मध्य-पूर्वेतील स्थैर्यासाठी महत्त्वाचे, परंतु काहीसे कठीण, भागीदार मानत आले आहेत."

"आता हे दोन्ही देश एकमेकांवर थेट दबाव टाकत आहेत. इराण कमकुवत झाल्यानंतर अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांसमोर एक नवं आव्हान उभं राहू शकतं. मध्य-पूर्वेतील पुढचं मोठं संकट अमेरिकेच्या दोन महत्त्वाच्या भागीदारांमधील, म्हणजेच तुर्कीये आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षातून निर्माण होऊ शकते."

इस्रायल तुर्कीयेला हरवू शकेल का?

इस्रायल इराणशी जसा लष्करी सामना करू शकला, तसा तुर्कीयेशीही करू शकतो का?

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पश्चिम आशिया अभ्यास केंद्राचे प्राध्यापक अश्विनी महापात्रा म्हणतात, "इराणच्या तुलनेत तुर्कीयेशी लढणं इस्रायलसाठी पूर्णपणे वेगळं आव्हान असेल. दोन्ही देश मध्य-पूर्वेतील महत्त्वाच्या शक्ती (मिडल पॉवर) आहेत."

"इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेची मदत मिळाली होती. परंतु, तुर्कीये हा नाटोचा सदस्य देश आहे. नाटोच्या नियमांनुसार, एका सदस्य देशावर हल्ला झाला तर तो संपूर्ण नाटोवर हल्ला मानला जाऊ शकतो. त्यामुळे इस्रायल-तुर्कीये संघर्षात ही सर्वात मोठी अडचण आणि गुंतागुंत आहे."

हे छायाचित्र इस्रायलमधील तेल अवीवजवळच्या महामार्गाच्या कडेला लावलेल्या लिकुड पक्षाच्या निवडणूक प्रचाराचं आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रचाराचा भाग असलेल्या या होर्डिंगवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोज्तबा खामेनेई, न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी, तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान आणि हिजबुल्लाहचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांची छायाचित्रं आहेत. होर्डिंगवर हिब्रू भाषेत लिहिलं आहे- 'यांना नेतन्याहूंचा पराभव व्हावा असं वाटतं.'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हे छायाचित्र इस्रायलमधील तेल अवीवजवळच्या महामार्गाच्या कडेला लावलेल्या लिकुड पक्षाच्या निवडणूक प्रचाराचं आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रचाराचा भाग असलेल्या या होर्डिंगवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोज्तबा खामेनेई, न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी, तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान आणि हिजबुल्लाहचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांची छायाचित्रं आहेत. होर्डिंगवर हिब्रू भाषेत लिहिलं आहे- 'यांना नेतन्याहूंचा पराभव व्हावा असं वाटतं.'

प्रा. अश्विनी महापात्रा म्हणतात, "इस्रायल आणि तुर्कीयेच्या लष्करी ताकदीची तुलना केली तर मागील 10 वर्षांत तुर्कीये लष्करी क्षमतेच्या बाबतीत लक्षणीयरित्या स्वावलंबी झाला आहे. तुर्कीये स्वतः ड्रोन तयार करतो आणि त्यांची इतर देशांना निर्यातही करतो. आता त्याने स्वतःची लढाऊ विमानं तयार करण्यासही सुरुवात केली आहे."

"तुर्कीयेने 1978-80 च्या सुमारास लष्करी आधुनिकीकरणावर अधिक भर देण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमेरिकेने तुर्कीयेवर निर्बंध लादले होते. त्यानंतर इतर देशांवरील लष्करी अवलंबित्व कमी करण्यावर तुर्कीने लक्ष केंद्रित केलं. गेल्या 30 ते 40 वर्षांत तुर्कीयेने या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे."

प्रा. महापात्रा म्हणतात, "मला वाटत नाही की, तुर्कीयेशी युद्ध करण्यासाठी इस्रायलकडे पुरेशी साधनं आहेत. हवाई ताकदीच्या बाबतीत सध्या इस्रायलचं तुर्कीयेवर थोडंसं वर्चस्व आहे. पण, तुर्कीयेला अमेरिकेकडून एफ-35 लढाऊ विमानं मिळाली, तर ही आघाडीही संपेल. तुर्कीयेचं नौदल अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तुर्कीये ही इस्रायलपेक्षा मोठी लष्करी शक्ती आहे."

युरोप आणि अमेरिकेत तुर्कीयेकडे अजूनही जागतिक धोका म्हणून पाहिलं जात नाही. त्यामुळे इराणबाबत अमेरिकेने घेतली तशी कठोर भूमिका तुर्कीयेच्या बाबतीत घेणं अमेरिकेसाठी सोपं असणार नाही. तुर्कीयेविरोधात तशी कारवाई करण्याची इच्छा असली तरी अमेरिकेला ते करणं सोपं नसेल.

तुर्कीयेतील अमेरिकेचे राजदूत टॉम बॅराक यांनी तुर्कीयेच्या सीमेजवळ असलेल्या सीरियातील हवाई तळावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याला विरोध केला. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेनं दिलेल्या आश्वासनानंतर आणि तुर्कीयेनेही तिथे आपले सैनिक तैनात नसल्याचं स्पष्ट केल्यानंतरही इस्रायलने हा हल्ला केला.

इस्रायलच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह

डाव्या विचारसरणीचा इस्रायली वृत्तपत्र 'हारेत्झ'ने 23 ऑगस्टच्या संपादकीय लेखात म्हटलं की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी उत्तर सीरियावर हवाई हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तुर्कीयेसोबत संघर्षाची एक नवीन आघाडी उघडली.

तेल अवीवमधील मुख्य महामार्गावर लावलेल्या एका मोठ्या होर्डिंगमुळे तुर्कीये हा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला. या होर्डिंगमध्ये तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान यांना इराण, हिजबुल्लाह आणि न्यूयॉर्कच्या महापौरांसोबत इस्रायलच्या विरोधकांच्या गटात दाखवण्यात आलं होतं. होर्डिंगवर लिहिलं होतं- 'यांना नेतन्याहूंचा पराभव व्हावा असं वाटतं, त्यांना जिंकू देऊ नका.'

2 डिसेंबर 2024 रोजी इराणमधील एका आंदोलकाने तेहरानमधील तुर्कीये दूतावासाबाहेर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची छायाचित्रं असलेलं पोस्टर हातात धरलं होतं. तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान आणि सीरियातील अलीकडच्या संघर्षांबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2 डिसेंबर 2024 रोजी इराणमधील एका आंदोलकाने तेहरानमधील तुर्कीये दूतावासाबाहेर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप एर्दोगान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची छायाचित्रं असलेलं पोस्टर हातात धरलं होतं. तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान आणि सीरियातील अलीकडच्या संघर्षांबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं.

'हारेत्झ'ने लिहिलं आहे की, सीरिया आणि संपूर्ण मध्य-पूर्वेत तुर्कीयेचा वाढता प्रभाव पाहता इस्रायलला चिंता वाटणं स्वाभाविक आहे. परंतु, अशा हल्ल्यांमुळे तुर्कीये माघार घेण्यास भाग पडेल का? तुर्कीयेशी चर्चा करण्याचे सर्व मार्ग आधीच वापरून झाले होते का? मोसाद प्रमुख आणि सीरियाचे परराष्ट्रमंत्री यांच्यात एकदा झालेली चर्चा ही सातत्याने सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांची जागा घेऊ शकते का?

"तुर्कीये हा नाटोचा सदस्य आणि अमेरिकेचा जवळचा मित्रदेश आहे. एकेकाळी तो इस्रायलचाही मित्रदेश होता आणि आजही तेल अवीवमध्ये तुर्कीयेचा दूतावास आहे. मग तुर्कीयेशी युद्ध झालं तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्याची किंमत किती मोजावी लागेल, याचा इस्रायलने कधी विचार केला आहे का?"

"इस्रायलसमोर मध्य-पूर्वेत अनेक नवीन आव्हानं उभी राहत आहेत. त्यामुळे त्याला आता नवीन धोरणांची गरज आहे. नेतन्याहू उत्तर सीरियातील हल्ल्याचं कौतुक करत असताना त्यांच्या डोळ्यांसमोरच नवीन आघाडी तयार होत होती आणि त्यात इस्रायलचा कसल्याही प्रकारचा समावेश नव्हता."

"केवळ बॉम्बहल्ले करून देशाची सुरक्षा कायम ठेवता येत नाही आणि प्रत्येक धोका संपवता येत नाही. हवाई हल्ले हे राजनैतिक प्रयत्न आणि विचारपूर्वक आखलेल्या धोरणाचा पर्याय होऊ शकत नाहीत. नेतन्याहू यांच्या काळात या दोन्ही गोष्टींचं महत्त्व सातत्याने कमी झालं आहे. त्यामुळे इस्रायलने अमेरिकेचे राजदूत टॉम बराक यांच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि तुर्कीयेशी थेट संघर्ष टाळला पाहिजे."

तुर्कीये हा इस्रायलला स्वतंत्र किंवा सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला मुस्लिमबहुल देश होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुर्कीये हा इस्रायलला स्वतंत्र किंवा सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला मुस्लिमबहुल देश होता.

नॉर्वेचे राजकीय अभ्यासक ग्लेन एरिक आंद्रे डाइसन यांच्याशी झालेल्या चर्चेत सौदी अरेबियातील अमेरिकेचे माजी राजदूत चार्ल्स फ्रीमन यांनी म्हटलं की, इस्रायलकडे दीर्घकाळ अस्तित्व टिकून राहण्यासाठी कोणतीही ठोस रणनीती नाही.

फ्रीमन म्हणाले, "इतर देशांना कायम लष्करी ताकदीच्या जोरावर दबावात ठेवता येऊ शकतं, या गृहितकावर ते काम करतात. पण कोणत्याही पद्धतीने ही अस्तित्वाची रणनीती नाही. त्यासाठी इस्रायल एक देश म्हणून किती काळ टिकेल, याबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे."

चार्ल्स फ्रीमन म्हणाले, "इस्रायल अनेक वर्षांपासून सीरियाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आपल्या सीमा वाढवण्याच्या धोरणावरही काम करत आहे. इस्रायल याला आपल्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे, असं मानतो. पण, टीकाकारांचं म्हणणं आहे की, इस्रायलच्या सीमा निश्चित नाही आणि तो आपल्या सोयीनुसार सीमा वाढवतो."

"तुर्कीयेमध्ये इस्रायलविरोधात मोठा जनक्षोभ आहे. एका सर्वेक्षणानुसार, जवळपास 97 टक्के तुर्की नागरिक इस्रायलच्या विरोधात आहेत. इस्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनीही तुर्कीयेला इराणपेक्षा मोठा धोका असल्याचं म्हटलं होतं."

'हारेत्झ'चे वरिष्ठ सुरक्षा विश्लेषक अमोस हरेल यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनला सांगितलं की, एर्दोगान यांची इस्रायलबाबतची भूमिका अत्यंत शत्रुत्त्वाची आहे. तुर्कीये सीरियात अनेक प्रकारच्या लष्करी हालचाली करत आहे. यातील काही हालचाली इस्रायलच्या लष्करासाठी चिंतेचा विषय आहेत. सीरियातील एका खास हवाई तळावरील तुर्कीयेच्या हालचालींचाही त्यात समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)