नेपाळ-तिबेट सीमेवर भयंकर पूर : 17 मृतदेह सापडले, 100 हून अधिक भारतीय बेपत्ता

फोटो स्रोत, Getty Images
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील 'भोटे कोशी' नदीला अचानक आलेल्या पुरामुळे, देशातील विविध जिल्ह्यांतून किमान 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
नेपाळ पर्यटन बोर्डनं दिलेल्या माहितीनुसार, 291 परदेशी नागरिकांसह एकूण 384 पर्यटकांचा संपर्क तुटला आहे.
नेपाळ पर्यटन बोर्ड आणि विविध ट्रॅव्हल एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे 291 परदेशी पर्यटक आणि 93 नेपाळी नागरिक बेपत्ता झाले असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
नेपाळ पर्यटन बोर्डनं स्पष्ट केलंय की, संपर्क तुटलेल्या लोकांमध्ये भारतीयांचा गट सर्वात मोठा असून त्यात 100 हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं म्हटलंय.
उत्तर नेपाळमधील काही भागांत आलेल्या भीषण पुरामुळे जीवित व वित्तहानीची मोठी भीती निर्माण झाली आहे. यात अनेक गावं वाहून गेली असून, जलविद्युत धरणासह विविध पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे.
बुधवारी पहाटे राजधानी काठमांडूच्या उत्तरेस असलेल्या रसुवा जिल्ह्यात हा पूर आला. हा भाग तिबेटच्या सीमेला लागून असून, चीनशी असलेल्या नेपाळच्या मुख्य व्यापारी मार्गावर आहे.
तिबेटमधून नेपाळमध्ये वाहणाऱ्या 'भोटे कोशी' नदीत वितळलेला बर्फ कोसळल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 'त्रिशुली' नदीलाही पूर आला आहे.
नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं खालील भागात असलेल्या अनेक जिल्ह्यांसाठी 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. रसुवाचे मुख्य जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी 'बीबीसी न्यूज नेपाळी'ला सांगितलं की, अधिकाऱ्यांना मोठ्या नुकसानीची शक्यता वाटत आहे. मात्र, नुकसानीच्या व्याप्तीचा अचूक अंदाज आताच घेणं घाईचं ठरेल.

फोटो स्रोत, Shaktimaya Tamang
नेपाळमधील भारतीय दूतावासाकडून मदतीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी
नेपाळमधील भारतीय दूतावासानं पूरपरिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आणि संबंधित माहिती देण्यासाठी आपत्कालीन क्रमांक जारी केलेले आहेत.
कोणत्याही माहितीसाठी या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल, असं दूतावासानं कळवलं आहे.
संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत:
- +977 985 131 6807
- +977 970 910 7500

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, "नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा केली आणि तिथल्या पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे."
"नेपाळला सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे. बचाव आणि मदतकार्याबाबत आमची पथके जवळून समन्वय साधत आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.
अनेक जणांची सुटका
आतापर्यंत मदत आणि बचाव कार्यात 12 जणांची सुटका करण्यात आली आहे.
सशस्त्र पोलीस दलाच्या 13 जवानांचा संपर्क तुटून ते बेपत्ता झाल्यानंतर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आल्याचं सशस्त्र पोलीस दलानं सांगितलं आहे.
सशस्त्र पोलीस दलाचे उप-प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितलं की, रसुवामधील मैलुंग येथून चार आणि तिमुरे इथून नऊ जण बेपत्ता आहेत.
त्यांनी सांगितलंय की, "आम्ही बालंबूमधील 100 खाटांचं रुग्णालय सज्ज ठेवलं आहे."
रसुवा आणि नुवाकोटमधून वाहणाऱ्या भोटे कोशी आणि त्रिशूल नद्यांमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या वृत्तावर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, RSS
काठमांडूमध्ये वास्तव्यास असलेल्या यी लियांग या चिनी व्यावसायिकाने बीबीसीला सांगितलं की, "आमच्या लॉजिस्टिक्स कंपनीचे सात कंटेनर ट्रक तिथे आहेत आणि त्यावर पूर्णपणे नेपाळी कर्मचारी कार्यरत आहेत. आमचा त्या सर्वांशी संपर्क तुटला आहे. तिथं नेटवर्क सिग्नल नसल्यामुळे आम्ही कोणाशीही बोलू शकत नाही."
"जितकं मला माहितीय, त्यानुसार कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. दरडी कोसळणं किंवा भूस्खलन होणं, विशेषतः पावसाळ्यात, या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, ही घटना मात्र अत्यंत गंभीर असल्याचं दिसून येत आहे."
नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं धोकादायक क्षेत्रांमधील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेतल्यानंतर, नेपाळचे पंतप्रधान बाळेंद्र शाह यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "वैद्यकीय पथकं, स्काउट्स आणि रेड क्रॉस यांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सुरू झाले आहे."
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील दोन चौक्यांवरील 'आर्म्ड पोलीस फोर्स'चे 13 जवान बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त, इतर डझनभर पोलीस कर्मचाऱ्यांशीही संपर्क तुटला आहे.
गेल्या वर्षी, सीमेच्या चिनी बाजूकडील हिमनद कोसळल्यामुळे रसुवामध्ये भीषण पूर आला होता, ज्यात 18 जणांचा बळी गेला होता.
बुधवारी ओढवलेल्या या आपत्तीची तीव्रता गेल्या वर्षीच्या पुरापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























