उत्तर कोरियात पाश्चात्य कपड्यांवर बंदी, तरीदेखील किम जाँग उन यांची मुलगी घालतेय पाश्चात्य कपडे, हे आहे त्यामागचं कारण

    • Author, सेंग्मी हेन
    • Role, बीबीसी न्यूज, सेऊल, दक्षिण कोरियामधून
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

उत्तर कोरियाचे शासक किम जाँग उन यांची मुलगी किम जू ए हिचे वेस्टर्न लक्झरी ड्रेस घातलेले फोटो सातत्यानं समोर येत आहेत.

अशा कपड्यांना 'बंडा'चं प्रतीक आणि 'समाजवादाच्या विरोधातील' मानून उत्तर कोरियात त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मात्र याला किशोरवयातील बंडखोरपणा मानण्याऐवजी, जू ए नं केलेली कपड्यांची निवड म्हणजे लेदर जॅकेट, हेअरस्टाईल इत्यादी गोष्टी, यामधून तिला देशाच्या सर्वोच्च नेत्याची संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तयार केलं जात असल्याचं सूचित होतं किंवा तसे संकेत मिळतात.

असं सांगितलं जात आहे की 2013 मध्ये जन्मलेल्या जू ए नं, नोव्हेंबर 2022 मध्ये वयाच्या फक्त नवव्या वर्षीच अधिकृतपणे पहिल्यांदा तिची सार्वजनिक उपस्थिती नोंदवली होती.

त्यावेळेस ती तिच्या वडिलांबरोबर एका भल्या मोठ्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासमोर चालताना दिसली होती. त्यावेळेस काळे केस असलेली, काळी पँट आणि पांढरे पॅडेड जॅकेट घातलेली जू ए लक्षवेधी पोशाखात दिसत होती.

तेव्हापासून तिची हेअरस्टाईल आणि पोशाख अधिकाधिक वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य शैलीचा होत चालला आहे.

उत्तर कोरियातील पाश्चात्य कपड्यांसंदर्भातील परिस्थिती

उत्तर कोरियानं 2020 मध्ये 'रिॲक्शनरी आयडियोलॉजी अँड कल्चर रिजेक्शन ॲक्ट' लागू केला होता. या कायद्याअंतर्गत 'बाह्य संस्कृती'वर बंदी घालण्यात आली.

मात्र 2023 मध्ये सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं एक व्हीडिओ जारी केला. त्यात किम जू ए पुन्हा तिचे वडील किम जाँग उन यांच्याबरोबर एका आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासमोर चालताना दिसली.

यावेळेस तिनं काळ्या रंगाचं पॅडेड जॅकेट घातलं होतं. असं सांगण्यात आलं की हा पोशाख क्रिश्चियन डियोर या फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊसचा पोशाख होता. तसंच त्याची किंमत जवळपास 1,900 डॉलर म्हणजे जवळपास 1,80,000 रुपये होती.

पुढील वर्षी, किम जू ए नं उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्योंगयोंगमधील हाय-राईज वॅनगार्ड स्ट्रीट निवासी परिसराच्या उद्घाटन सोहळ्यात जो पोशाख घातला होता, त्याच्याबद्दल एक व्हीडिओ स्पीच जारी करण्यात आले. यामध्ये तिच्या कपड्यांना अँटी सोशलिस्ट म्हणजे समाजवादविरोधी ठरवण्यात आलं आणि असं म्हटलं गेलं की अशा गोष्टी सरकारला आतून कमकुवत करतात.

उत्तर कोरियाच्या नेतृत्वाच्या जवळच्या एका सूत्रानं रेडिओ फ्री एशियाला ही माहिती दिली.

मात्र आता सांगण्यात येतं आहे की काही जणांना किम जू ए च्या स्टाईलची, तिच्या पोशाखाची नक्कल करायची आहे. म्हणजेच तसेच कपडे परिधान करायचे आहेत.

पाश्चात्य लक्झरी कपडे, ब्रँड्स याबाबत उत्तर कोरियातील बदल

जंग यून ली, कोरिया इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल युनिफिकेशनच्या नॉर्थ कोरिया रिसर्च डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. त्यांनी बीबीसी न्यूज कोरियनला सांगितलं, "काळ बदलला आहे. पिढ्यांमधील बदल खूपच लक्षणीय आहे. परकीय चलन कमावण्यासाठी परदेशात जाणाऱ्या मजुरांच्या संख्येत 2010 नंतर खूप मोठी वाढ झाली आहे."

कोरोनाच्या संकटाच्या काळात उत्तर कोरियाचे जवळपास 2,000 मजूर चीनमध्येच होते. "ते जेव्हा प्योंगयांगला परतले...त्यावेळेस ते त्यांच्यासोबत ते तेथील स्थानिक संस्कृतीदेखील घेऊन आले."

त्यांनी सांगितलं, "आधी लक्झरी वस्तू मुख्यत: जपानी ब्रँड्सपर्यंतच मर्यादित होत्या. जपानमध्ये राहणारे कोरियन लोक (जैनिची कोरियन) त्या वस्तू घेऊन यायचे. मात्र आता असं दिसतं की उत्तर कोरियाच्या अनेक लोकांना परदेशातील विविध ब्रँड्सबद्दल माहीत आहे. बॅग आणि कपडे (भलेही तस्करीद्वारे येतात) खूप महागडे असतात. त्यामुळे लोक सर्वात आधी परफ्यूमद्वारे त्याचा अनुभव घेण्यास सुरुवात करतात."

सर्वसामान्य पाश्चात्य फॅशनपासून दूर, मात्र राजघराण्याला विशेषाधिकार

अर्थात, जू ए तिच्या कुटुंबातील काही पहिली फॅशन आयकॉन नाही. सेजोंग इन्स्टिट्यूटचे उपसंचालक चोंग सोंग चांग यांनी बीबीसी न्यूज कोरियनला सांगितलं, "जू ए चं वय लपवता यावं, यासाठी तिला तिची आई री सोल जू यांच्यासारखे सूट आणि स्टायलिश कपडे परिधान करण्यासाठी दिले जात आहेत, असं दिसतं आहे. उत्तर कोरियामध्ये राजघराण्याबाहेरील एका सर्वसामान्य तरुणीसाठी पाश्चात्य पद्धतीचे कपडे परिधान करून फॅशनचं नेतृत्व करणं जवळपास अशक्य आहे."

"पाश्चात्य डिझाईनचे कपडे परिधान करून किम जू ए आणि री सोल जू एक 'वेगळी ओळख निर्माण करण्याची व्यूहरचना' दाखवत आहेत. ती म्हणजे, त्यांची सामाजिक स्थिती किंवा दर्जा सर्वसामान्य लोकांपेक्षा मूलभूतपणे वेगळा आहे. त्या असं कोणत्याही चिंतेशिवाय करू शकतात. कारण त्यांना विशेषाधिकार आहेत," असं ते म्हणाले.

मात्र जू ए नं तिचा फॅशनचा सेन्स किंवा जाण फक्त तिच्या आईकडूनच घेतलेली नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कोरियन स्टडीजचे प्राध्यापक ली वू-यंग म्हणाले, "जीन्स ही पाश्चात्य फॅशन आहे, असं उत्तर कोरियात मानलं जात असल्यानं त्यावर तिथे बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीदेखील जीन्स घातलेली किम जू ए दिसली आहे. परदेशी संस्कृतीवर कितीही बंदी घालण्यात आली आणि कायदे बनवले गेले. तरी उत्तर कोरिया हे एक असं ठिकाण आहे, जिथे सर्वोच्च नेत्यासाठी काहीही अशक्य नाही."

प्रतिमा निर्मिती, प्रोपगांडा करण्यासाठी पोशाखाचा वापर

चोंग यांच्या मते, किम जू ए नं अनेक प्रसंगी लेदर जॅकेट परिधान केलं आहे. वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाचा प्रोपगंडा आणि ॲजिटेशन विभाग त्यांचं काम करत असल्याचे हे संकेत आहेत. तिला सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळं आणि विशेष दाखवण्यासाठी हे केलं जात आहे.

ते पुढे म्हणाले, "चांगल्या दर्जाच्या चामड्यापासून बनलेले कपडे परिधान करणं मुळातच तुमचा विशेष दर्जा दाखवण्याचं लक्षण असतं. उत्तर कोरियातील सर्वसामान्य लोकांमध्ये चामड्यापासून बनलेले कपडे परिधान करणं सामान्य बाब नाही किंवा फारसं प्रचलित नाही."

"लक्झरी ब्रँड्स, लेदर जॅकेट आणि फर कोट यासारख्या महागड्या गोष्टी परिधान करणं उत्तर कोरियातील सर्वसामान्य लोकांना परवडत नाही किंवा शक्य नाही."

मागील पिढ्यांच्या फॅशनची नक्कल करण्याला 'इमेज रिप्लिकेशन' म्हटलं जातं. याचा वापर सत्तेत कायमचं राहण्यासाठी केला जात राहिला आहे.

यामध्ये किम जू ए चे वडील किम जाँग उन यांचाही समावेश आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या सुरुवातीच्या काळात, त्यांचे आजोबा किम इल सुंग यांच्याप्रमाणे फेडोरा टोपी आणि कोट घालून त्यांची प्रतिमा बळकट करण्याचा प्रयत्न केला होता.

"किम इल सुंग यांनी ज्या मार्गांचा वापर करून 45 वर्षे देशाचं नेतृत्व केलं, त्याच मार्गानं किम जाँग उन यांची राजवट सुरू राहावी आणि लोकांच्या मनात स्वाभाविकपणे त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे, याची खातरजमा करणं, हे वर्कर्स पार्टीचा प्रोपगांडा आणि ॲजीटेशन विभागाचं काम होतं," असं चोंग म्हणाले.

"असं म्हटलं जातं की किम जाँग उन जेव्हा पहिल्यांदा समोर आले, तेव्हा उत्तर कोरियातील लोकांना धक्का बसला होता. किम जाँग उन यांची पहिली झलक बऱ्याच अंशी तरुण किम इल सुंग यांच्यासारखी दिसत होती, यामुळे दक्षिण कोरियातील तज्ज्ञांना देखील धक्का बसला होता," असं ते पुढे म्हणाले.

किम जाँग उन यांचे आजोबा किम इल सुंग यांचं उत्तर कोरियातील लोकांच्या मनातील विशेष स्थान

उत्तराधिकारी म्हणून तरुण किम जाँग उन यांना अनुभवाच्या अभावामुळे सुरुवातीच्या टप्प्यात अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं.

ते दिसायला बरेचसे त्यांचे आजोबा किम इल सुंग यांच्यासारखे होते. जनतेशी संपर्क साधताना हीच गोष्ट त्यांच्या कामी आली.

परिस्थिती इथपर्यंत पोहोचली होती की उत्तर कोरियाच्या लोकांमध्ये अशी अफवा पसरली होती की किम इल सुंग यांचा पुनर्जन्म झाला आहे.

दक्षिण कोरियाच्या डोंगयांग विद्यापीठातील प्राध्यापक चुंग यंग-ते म्हणाले, "उत्तर कोरियात किम इल सुंग यांना एकप्रकारे देवताच मानलं जातं." त्यांच्या मते, याच कारणामुळे त्यांच्या कुटुंबाचं देखील लोकांच्या मनात एक विशेष स्थान आहे.

जू ए उत्तर कोरियात आधीपासूनच 'प्रिन्सेस' म्हणजे 'राजकुमारी' म्हणून ओळखली जाते. हे नामकरण तिच्या पूर्वजांच्या वंश परंपरेकडे सूचित करतं.

उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँग यांच्यासाठी 'प्रिन्सेस' या किताबाचा वापर केला होता. मात्र ही गोष्ट किम जू ए च्या जन्माच्या आधीची आहे.

रयू ह्यून-वू कुवेतमध्ये उत्तर कोरियाचे माजी कार्यवाहक राजदूत होते. नंतर ते दक्षिण कोरियात पळून गेले. ते म्हणाले, "किम यो जाँग यांचे वडील आणि किम इल सुंग यांचे पुत्र किम जाँग इल जिवंत असताना, किम यो जाँग यांना प्रिन्सेस म्हटलं जात होतं."

संपादन: ह्युनजंग किम, अँड्रयू वेब आणि स्टीफन हॉक्स

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)