डोळ्यांखाली डार्क सर्कल का येतात? त्यावर घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या 13 प्रश्नांची उत्तरं

डार्क सर्कल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मोहन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

आजकाल डोळ्यांखाली डार्क सर्कल (काळी वर्तुळं) येणं ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे.

अपुरी झोप आणि दिवसभर टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये मान घालून बसणं, हीच काय ती याची मुख्य कारणं आहेत असा लोकांचा समज असतो.

पण या डार्क सर्कल्समागे केवळ स्क्रीन टाईम नसून आणखीही अनेक कारणे जबाबदार असतात, असे त्वचारोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हल्ली डोळ्यांभोवतीची डार्क सर्कल घालवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रिम्स ऑनलाईन विकल्या जात आहेत. पण ही क्रिम्स खरंच किती गुणकारी आहेत, असा प्रश्न कायम उपस्थित केला जातो.

अशा वेळी त्वचारोग तज्ज्ञ प्रोफेसर पी. विजयलक्ष्मी सांगतात की, आजकाल लोक डोळ्यांखालील काळेपणाकडे केवळ तब्येतीची तक्रार म्हणून नाही तर सौंदर्याशी जोडलेली समस्या म्हणूनही बघतात.

डोळ्यांखाली येणारे हे डार्क सर्कल, त्याची मूळ कारणे आणि त्यावर नेमके कोणते उपाय करावेत, याविषयी लोकांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांनी दिली आहेत.

1. डोळ्यांखाली डार्क सर्कल कशामुळे येतात?

डोळ्यांभोवती डार्क सर्कल येण्यामागे अनेक कारणे असतात. यांचे प्रामुख्याने 4 गटांमध्ये वर्गीकरण करता येईल.

पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता.

घरात आई किंवा वडिलांना ही समस्या असेल तर मुलांच्या डोळ्यांखालीही डार्क सर्कल येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही कितीही उपचार घेतले, तरी हा त्रास पुन्हा समोर येतोच.

दुसरे कारण म्हणजे, डोळ्यांखाली येणारी सूज. डोक्यात कोंडा झाल्यास चेहऱ्यावर खाज सुटू शकते. खाज येणारा भाग सतत चोळल्यामुळे तिथे सूज येते आणि डोळ्यांभोवती डार्क सर्कल उमटू लागतात.

त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे हा काळेपणा येतो. याचे योग्य वेळी कारण समजले तर त्यावर उपचार सहज शक्य आहेत.

डार्क सर्कल

फोटो स्रोत, Getty Images

तिसरे कारण, डोळ्यांखालील भागातील रक्तप्रवाहात होणारे बदल.

तर चौथे कारण म्हणजे, वाढते वय. वयानुसार डोळ्यांखालील पेशी सैल आणि कमकुवत पडतात आणि डार्क सर्कल ठळक दिसू लागतात.

डोळ्यांखाली वारंवार डार्क सर्कल येण्यामागे मुख्यत्वे हीच कारणे असतात. विविध कारणांमुळे चेहऱ्याच्या बाह्य रचनेत होणारा हा केवळ एक बदल आहे.

त्यामुळे जोपर्यंत याचे नेमके कारण लक्षात येत नाही तोपर्यंत त्यावर अचूक उपचार करणे अवघड असते.

2. झोप आणि डार्क सर्कल यांचा संबंध?

झोप न मिळणे आणि डोळ्यांखाली डार्क सर्कल येणे यात थेट संबंध नाही.

पण एखाद्याला जर आधीपासूनच डोळ्यांखाली काळेपणाचा त्रास असेल आणि त्याची झोप पूर्ण झाली नाही तर ती वर्तुळे आणखी गडद दिसू लागतात.

व्यवस्थित झोप न मिळाल्यास शरीरात डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता होते.

त्यामुळे डोळ्यांभोवतीचा रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही आणि डार्क सर्कल अधिक ठळकपणे उठून दिसतात.

3. डार्क सर्कल आणि हृदयाचा संबंध असतो?

डार्क सर्कल आणि हृदय किंवा हृदयाशी संबंधित आजार यांचा एकमेकांशी असा थेट संबंध नसतो.

पण ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा लोकांमध्ये रक्ताभिसरण योग्य रीतीने न झाल्यामुळे डोळ्यांखाली काळेपणा येऊ शकतात.

तरीही हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे असे ठामपणे म्हणता येत नाही.

4. डार्क सर्कलचे प्रकार असतात का?

केवळ त्वचाविकार तज्ज्ञांनाच याबाबत माहिती मिळू शकते. काही लोकांच्या डोळ्यांखाली खड्डा पडल्यासारखा खोलगट भाग तयार होतो. पण डॉक्टरच ही गोष्ट बारकाईने तपासून सांगू शकतात.

अशा वेळी 'फिलर्स'च्या मदतीने हा भाग व्यवस्थित पूर्ववत करता येतो. तसेच खूप खाज आल्यामुळे सतत चोळल्याने तिथली त्वचा जाड होते आणि तिचे पापुद्रे सुटू लागतात. या समस्येवरही योग्य उपचारांनी मात करता येते.

5. डार्क सर्कल धोकादायक असतात का?

डोळ्यांखाली डार्क सर्कल असणे ही काही धोक्याची गोष्ट नाही. हा केवळ दिसण्याशी आणि सौंदर्याशी संबंधित विषय आहे. डार्क सर्कल असली तरीही कोणीही अगदी सामान्य आयुष्य जगू शकते.

पण चेहऱ्यावर ही वर्तुळे स्पष्ट दिसत असल्याने बरेच लोक सुरुवातीला स्वतःच्या मनाने काही ना काही उपचार करतात आणि नंतर डॉक्टरांकडे धाव घेतात.

बहुतांश लोक ही डार्क सर्कल घालवण्यासाठी नियमित उपचार करून घेण्यास प्राधान्य देतात.

6. दीर्घकाळ डार्क सर्कल असल्यास काय?

डोळ्यांखालील डार्क सर्कलमुळे किंवा ते कितीही काळासाठी असले तरी, कोणतेही नुकसान होत नाही. ही समस्या जुनी असो वा नुकतीच सुरू झालेली, यात घाबरण्यासारखे काही नसते.

फक्त याचे मूळ कारण वेळीच लक्षात आले तर योग्य उपचार सहज करता येतात.

7. स्क्रीनटाईमचा डार्क सर्कलशी संबंध असतो?

स्क्रीनकडे पाहताना त्यातील काही प्रकाशकिरण थेट डोळ्यांवर पडतात. आपण जेव्हा कडक उन्हात जातो तेव्हाही अशाच प्रकारे अनेक प्रकाशकिरण आपल्यावर पडत असतात. उन्हात गेल्याने जो परिणाम शरीरावर होतो तसाच काहीसा प्रभाव स्क्रीन पाहतानाही जाणवतो.

पण फार वेळ स्क्रीनसमोर बसून राहिल्याने डोळ्यांवर ताण येऊन त्रास सुरू होतो.

Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

8. डार्क सर्कलसाठी घरगुती उपाय कोणते?

त्वचेतील पाण्याचे प्रमाण आणि त्यात ओलावा टिकवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पाणी खूप गरजेचे असते.

बऱ्याचदा त्वचा कोरडी पडल्याने तिच्यावर सुरकुत्या दिसू लागतात. कारण त्वचेला योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही.

डोळ्यांवर काकडीचे काप ठेवल्याने त्या भागातील त्वचेला चांगला ओलावा मिळतो. काकडी थेट डोळ्यांखाली ठेवल्यामुळे तिथला कोरडेपणा कमी होतो.

याशिवाय काही प्रकारची समुद्री शेवाळे देखील यासाठी वापरली जाऊ शकतात. डोळ्यांखालील ओलावा वाढल्याने डार्क सर्कल बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होऊ शकते.

9. क्रीम्सचा फायदा होतो का?

आधी आपल्या त्वचेबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. त्वचेच्या आतून बाहेरील थरापर्यंत कोणताही बदल दिसायला किमान 4 आठवड्यांचा काळ जावा लागतो.

आपण घेत असलेला उपचार किती प्रभावी ठरतो हे समजायलाच कमीत कमी 1 महिना लागतो. यासाठी काही क्रिम्स उपलब्ध असल्या तरी काही दिवसांतच फरक दिसेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

बाजारात मिळणाऱ्या अशा क्रिम्स किती सुरक्षित आहेत याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांकडून आधी तपासणी करून घ्यावी, कारण समजून घ्यावे आणि त्यांनी लिहून दिलेल्या क्रिम्सच वापराव्यात. इंटरनेटवर मिळणाऱ्या कोणत्याही क्रिम्सवर असा आंधळेपणाने विश्वास ठेवू नये.

10. डार्क सर्कल येऊच नये यासाठी काय करावे?

उन्हात बाहेर पडताना प्रत्येकाने सनग्लासेस आणि सनस्क्रीन नक्की लावले पाहिजे. ही समस्या अनुवांशिक कारणांमुळे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेता येतात.

अर्थात या उपचारांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. सोबतच रोजच्या आहारात चांगल्या पोषक घटकांचा समावेश असायला हवा.

डोक्यातील कोंड्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येत असतील तर नियमित शॅम्पू वापरून ही समस्या नियंत्रणात ठेवता येते.

11. डार्क सर्कल पूर्णपणे बरे होतात?

डार्क सर्कल होण्याच्या मागचं कारण कोणतं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते समजल्यास त्यावर उपचार करणं अगदी सहज शक्य असतं.

यामागच्या प्रत्येक कारणावर उपचार सहज शक्य आहेत. फक्त योग्य तपासण्या करून आधी नेमके कारण जाणून घेणे सर्वांत महत्त्वाचे ठरते.

12. डार्क सर्कलवर उपलब्ध उपचार कोणते?

डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी झाले तरीही सनस्क्रीन लावणे थांबवू नये. ते नियमित वापरावे. सोबतच डोक्यातील कोंड्यावरही वेळीच नियंत्रण ठेवावे.

त्वचेतील मेलॅनिन वाढवणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी काही खास क्रिम्स मिळतात ज्यांच्या नियमित वापराने काळेपणा कमी होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी वेगवेगळे उपचार आहेत. वय वाढल्यामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांवर फिलर्सचा चांगला उपयोग होतो. तसेच काळेपणा घालवण्यासाठी लेझर ट्रिटमेंटचा पर्यायही उपलब्ध आहे.

केमिकल पील्सद्वारेही उपचार घेऊन डार्क सर्कल बऱ्याच अंशी नियंत्रणात आणता येतात.

काही औषधांच्या मदतीनेही हा त्रास आटोक्यात ठेवता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक उपचार हा प्रत्येकासाठीच गुणकारी ठरेल असे नाही. त्यामुळे आधी डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्यावी आणि त्यानंतरच उपचार सुरू करावेत.

Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

13. जीवनशैलीत बदलाचा फायदा होतो का?

डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्यामागे ठरावीक कारणेच असतात. ही कारणे शोधून ती दूर केली, तरच हा काळेपणा घालवणे शक्य होते. यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणारे (पाण्याचे पुरेसे प्रमाण असलेले), तसेच प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असणारा आहार घेतला पाहिजे.

वाढत्या वयासोबत त्वचेवर दिसणारे परिणाम रोखण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असलेला आहार घ्यावा. फळे आणि हिरव्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्याच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.

तसेच प्रोटीनयुक्त पदार्थांमधून शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड्स मिळतात. शाकाहारी लोक आपल्या आहारात सोयाबीन आणि डाळी/कडधान्यांचे प्रमाण वाढवू शकतात. तर मांसाहारी पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्याच भरपूर प्रोटीन्स असतात.

व्हिटॅमिन्सबद्दल सांगायचे तर, पाण्यात विरघळणारी अनेक जीवनसत्त्वे असतात. यात व्हिटॅमिन C आणि B12 भरपूर असलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

मोड आलेली कडधान्ये आणि मांसाहारातील लिव्हरसारख्या भागांत व्हिटॅमिन B12 भरपूर मिळते. लिंबू, संत्री आणि द्राक्षांसारख्या आंबट फळांतून शरीराला मुबलक व्हिटॅमिन C मिळते.

गाजर आणि पपईमधून भरपूर 'व्हिटॅमिन A' मिळते. व्हिटॅमिन E मिळवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा आहारात समावेश करता येतो. तसेच मासे, अंडी आणि दुधातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते.

यासोबतच शरीर हायड्रेटेड ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे भरपूर पाणी प्या.

(या लेखातील मते आणि माहिती ही केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा उपचारांसाठी थेट तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.