मादीच्या शोधात 4,000 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या 3 आफ्रिकन जंगली कुत्र्यांचा थक्क करणारा प्रवास

मोठ्या भूभागावर दूरवर संचार करणारे वन्यप्राणी अशी आफ्रिकन जंगली कुत्र्यांची ओळख आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोठ्या भूभागावर दूरवर संचार करणारे वन्यप्राणी अशी आफ्रिकन जंगली कुत्र्यांची ओळख आहे.
    • Author, हेलन ब्रिग्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

झांबियामधील आफ्रिकन जंगली कुत्र्यांच्या एका कळपाने तब्बल 2,485 मैलांचा म्हणजे सुमारे 4,000 किलोमीटर प्रवास पूर्ण करत एक नवा विक्रमच रचला आहे.

फक्त आपल्या जोडीदाराच्या शोधासाठी आफ्रिका खंडात जमिनीवर चालणाऱ्या कोणत्याही प्राण्याने इतका मोठा पल्ला गाठण्याची ही पहिलीच नोंद असावी, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

जंगलात माणसांचा हस्तक्षेप आणि वस्त्या वाढत असल्या, तरी वन्यजीव अजूनही कितीतरी लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतात, हेच या घटनेने सिद्ध केलं आहे.

या मोहिमेत सख्खे भाऊ असलेले 3 नर जंगली कुत्रे झांबियामधून नागमोडी वळणं घेत पुढे जात राहिले. वाटेत दाट मानवी वस्त्या, माणसांची ये-जा आणि मोठी शहरं असे अनेक अडथळे समोर आले. मात्र त्या सगळ्यावर मात करत या तिघांनी आपली ही अखंड पायपीट सुरूच ठेवली.

इतर काही जंगली कुत्र्यांचा शिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे लावलेल्या फासांमध्ये अडकून मृत्यू झाल्याचं जीपीएस ट्रॅकिंगद्वारे केलेल्या या अभ्यासात समोर आलं.

यावरून या प्राण्यांच्या जीवावर किती मोठं संकट घोंगावत आहे, हेच स्पष्ट होतं.

अशाच प्रकारे 3 मादी जंगली कुत्र्यांनीही (सख्ख्या बहिणींनी) असाच एक अद्भूत आणि खडतर प्रवास जवळपास पूर्ण केला होता, पण त्यातली एक मादी शिकाऱ्याच्या फासात अडकली आणि त्यांचा हा प्रवास तिथेच थांबला.

आफ्रिकन जंगली कुत्रे पृथ्वीवरील अत्यंत दुर्मीळ आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांपैकी एक मानली जातात.

आजच्या घडीला संपूर्ण जंगलांमध्ये मिळून अवघी 6,000 जंगली कुत्री शिल्लक राहिली आहेत.

वाढत्या मानवी वस्त्यांमुळे आफ्रिकेतील जंगली कुत्र्यांचा अधिवास आणि त्यांच्या मुक्त वावराची क्षेत्रं वेगाने नष्ट होत चालली आहेत.

फोटो स्रोत, Education Images/Universal Images Group/Getty Images

फोटो कॅप्शन, वाढत्या मानवी वस्त्यांमुळे आफ्रिकेतील जंगली कुत्र्यांचा अधिवास आणि त्यांच्या मुक्त वावराची क्षेत्रं वेगाने नष्ट होत चालली आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ही जंगली कुत्री नेहमी कळपात राहतात आणि मिळून शिकार करतात. नवीन भूप्रदेशांच्या शोधासाठी आणि इतर कळपांशी संधान बांधण्यासाठी ती दूरवर भटकंती करत असतात.

ज्या कळपात त्यांचा जन्म झाला, त्याच कळपात राहून त्यांची वंशवृद्धी शक्य नसते. त्यामुळे त्यांच्यासमोर दोनच पर्याय असतात.

एक तर स्वतःच्याच कळपात राहून मोठं झाल्यावर त्या कळपाचं नेतृत्व करणं किंवा वयाची 2-3 वर्षं पूर्ण होताच जोडीदाराच्या शोधात नवीन प्रदेशांकडे निघून जाणे.

या 3 नर जंगली कुत्र्यांनी जिथून सुरुवात केली तिथून ते पोहोचलेल्या ठिकाणापर्यंतचं थेट अंतर पाहिलं तर 8 महिन्यांत ते केवळ 260 मैल म्हणजे किलोमीटर इतकंच भरतं. मात्र, वाटेत नागमोडी वळणं घेत आणि वेगवेगळ्या भागांतून फिरत गेल्यामुळे त्यांना प्रत्यक्षात मूळ अंतरापेक्षा तब्बल 10 पट जास्त अंतर कापावं लागलं.

अशा प्रकारच्या प्रवासाला 'डिस्पर्सल' म्हणतात. म्हणजेच जोडीदाराच्या शोधात एकाच दिशेने पुढे जाणे. यात माघारी फिरणं नसतं.

हे प्राण्यांच्या नेहमीच्या 'स्थलांतरा'पेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. कारण स्थलांतरात प्राणी अन्न किंवा हवामानानुसार ऋतूनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि पुन्हा परततात.

आफ्रिकेतील सर्वात लांब स्थलांतर म्हणून 'वाइल्डबीस्ट' प्राण्यांचा प्रवास ओळखला जातो. ऋतूनुसार पाणी आणि अन्नाच्या शोधात ते टांझानिया ते केनियादरम्यान 400 मैलांहून अधिक अंतर धावतात, असं 'यूएन कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीशीज' सांगतात.

संपूर्ण जगाचा विचार केला तर जमिनीवर सर्वात प्रदीर्घ स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांमध्ये 'कॅरिबू' म्हणजे हरणांची एक प्रजाती अव्वल स्थानी आहे.

त्यांचा येण्या-जाण्याचा मिळून संपूर्ण प्रवास 839 मैल म्हणजे 1,350 किलोमीटर एवढा मोठा असतो. याव्यतिरिक्त, ग्रे लांडग्यांनी वर्षभरात 4,350 मैलांपेक्षा जास्त मजल मारल्याचे रेकॉर्ड्सही उपलब्ध आहेत.

पण इथे मुद्दा फक्त अंतराचा नाही, तर त्यांनी झांबियातून प्रवासासाठी निवडलेला मार्ग अधिक लक्षवेधी आहे.

या कुत्र्यांनी प्रमुख वन्यजीव क्षेत्रांमधून वाट काढली. राजधानी लुसाका आणि औद्योगिकदृष्ट्या गजबजलेल्या शहरांमधील मानवी गर्दीला मोठ्या शिताफीने चुकवत त्यांनी आपला प्रवास केला.

नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ वन्य प्राण्यांमध्ये आफ्रिकन जंगली कुत्र्यांची गणना होते.

फोटो स्रोत, Jacopo Raule/Getty Images

फोटो कॅप्शन, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ वन्य प्राण्यांमध्ये आफ्रिकन जंगली कुत्र्यांची गणना होते.

ताज्या संशोधनानुसार, पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील जंगली कुत्र्यांच्या टोळ्या पूर्वीच्या समजुतीपेक्षा एकमेकांशी जास्त जोडलेल्या असू शकतात.

या संशोधन अहवालाचे मुख्य लेखक आणि मॉन्टाना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्कॉट क्रील हे 1991 पासून या कुत्र्यांवर संशोधन करत आहेत.

या निष्कर्षांमुळे संवर्धनाच्या दृष्टीने एक नवीन आशेचा किरण दिसल्याचे ते म्हणाले.

"कुंपण घातलेले काही विशिष्ट प्रदेश सोडल्यास, पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील जंगली कुत्र्यांचे कळप एकमेकांशी जोडलेले असण्याची पूर्ण शक्यता दिसते," असं ते म्हणाले.

शिकाऱ्यांमुळे या प्राण्यांसमोर उभ्या ठाकलेल्या धोक्याचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला.

हा असामान्य प्रवास त्या 3 नर जंगली कुत्र्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. तर दुसऱ्या बाजूला, 3 मादी जंगली कुत्र्यांपैकी दोघींचा मृत्यू झाला.

कळपातील इतर कुत्रे वारंवार त्याच एका जागेवर फेऱ्या मारत असल्याचे संशोधकांनी पाहिले.

आपल्या टोळीतील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास हे प्राणी सहसा असेच वागतात.

रस्ते, वाढती शहरे आणि शेतीमुळे जंगलांचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे संरक्षित वनांच्या बाहेर प्राण्यांसाठी नैसर्गिक मार्ग तयार करण्याच्या मागणीला 'इकोलॉजी' जर्नलमध्ये छापून आलेल्या या अभ्यासामुळे मोठे समर्थन मिळाले आहे.

'द नेचर कॉन्झर्व्हन्सी' या पर्यावरण संस्थेतील 'काफ्यू संवर्धन' संचालक ब्रूस एलेंडर हे या संशोधन अहवालाचे सह-लेखक आहेत.

"जंगली कुत्रे आणि हत्तींसारखे प्राणी खूप मोठ्या भूभागावर फिरत असतात; भविष्यात त्यांची प्रजाती टिकून राहण्यासाठी जंगले एकमेकांशी जोडलेली असणे अतिशय गरजेचे आहे," असं रूस एलेंडर म्हणाले.

"आपण या संरक्षित जंगलांना वेगळे पडलेले एकेक बेट समजू शकत नाही. तसे केले, तर हे प्राणी जास्त काळ जगू शकणार नाहीत. आपल्याला या चौकटीबाहेर जाऊन खूप मोठ्या पातळीवर विचार करावा लागेल," असं ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)