'राज्यात पावसाचा जोर कायम'; जळगावला रेड अलर्ट, विदर्भ-कोकणात काय स्थिती, जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी पावसाचा प्रभाव आहे. काल 29 जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर दिसून आला. तर, आज 30 जुलै रोजीही पावसाची स्थिती काहीशी सारखीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (30 जुलै) विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर, जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या मध्य भागात आणि त्याला लागून असलेल्या ओडिशाच्या उत्तर अंतर्गत भागात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर पाणी साचणे, सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे, भूस्खलन होणे तसेच रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार तर काही भागांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, जुलै महिना संपत आला आहे, म्हणजे आपण मान्सूनच्या मध्यावर पोहोचलो आहोत. पण मराठवाड्यात यंदा अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला आहे, पुढचे दोन दिवस मराठवाड्यासाठी त्यामुळेच महत्त्वाचे आहेत.
आज कोणत्या जिल्ह्यांसाठी काय अलर्ट दिले आहेत आणि पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील हवामानाची काय स्थिती असेल जाणून घेऊयात.
या भागांना 'ऑरेंज अलर्ट'
राज्यातील रायगड जिल्ह्यासह धुळे, नाशिक, नाशिकचा घाट प्रदेश, पुणे, कोल्हापूर, साताऱ्याचा घाट प्रदेश तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, या भागांना आज 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
इथे काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळू शकतो. वाऱ्याच्या काही झोतांचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो.
येथे यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
बाकी दक्षिणेकडेचा काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
एकूणच पुढचे तीन चार दिवस राज्यात चांगला पाऊस अपेक्षित आहे, त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर होऊ शकतो.
पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसे असेल?
राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील हवामानाबाबतची माहिती शेअर केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये पावसासोबत सोसाट्याचा वाराही वाहू शकतो.
या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

फोटो स्रोत, @imdnagpur
दरम्यान उद्या 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.
1 ऑगस्टला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
























