पडलेले दात पुन्हा येणार? फिलिंग, रूट कॅनल, इम्प्लांट्सची गरज संपणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सारा स्लोट
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
शरीराच्या आरोग्यासाठी दात किती महत्त्वाचे आहेत, याची अनेकांना जाणीव नसते. दात पडल्यानंतर सध्या बसवले जाणारे कृत्रिम दात किंवा इतर उपचार कायमस्वरूपी आणि पूर्णपणे समाधानकारक नाहीत. पण जर आपले नैसर्गिक दात पुन्हा उगवता आले तर?
काही सर्वेक्षणांनुसार, 70 टक्क्यांहून अधिक प्रौढांना दंतवैद्याकडे (डेंटिस्ट) जाण्याची भीती वाटते. दात भरणे (फिलिंग), ड्रिलिंग करणे यांसारख्या उपचारांची भीती किंवा त्यांच्याबद्दलचा अविश्वास यामुळे अनेक जण दातांची नियमित तपासणी आणि स्वच्छता करून घेणं टाळतात.

फोटो स्रोत, BBC/ Serenity Strull
परंतु, जैव-रसायनशास्त्रज्ञ (बायोकेमिस्ट) हॅनेले रुओहोला-बेकर यांना जवळपास रोजच अशा लोकांचे ई-मेल येतात, जे दात पुन्हा उगवण्यासाठी कोणताही नवा प्रयोग करण्यास तयार असल्याचं सांगतात. त्यांची एकच इच्छा असते, आपले दात पुन्हा नैसर्गिकरित्या उगवावेत किंवा यावेत.
याचं कारण म्हणजे, रुओहोला-बेकर या जगभरातील अशा शास्त्रज्ञांपैकी एक आहेत, जे पुनरुत्पादक वैद्यकशास्त्राच्या (रेजेनेरेटिव्ह मेडिसिन) मदतीने पडलेले दात पुन्हा उगवण्यावर आणि पारंपरिक दंत उपचारांना पर्याय शोधण्यावर काम करत आहेत. याचा फायदा दात गमावलेल्या आणि दातदुखीने त्रस्त असलेल्या लाखो लोकांना होऊ शकतो.
जर हे संशोधन यशस्वी झालं, तर भविष्यात डेंटिस्टकडे गेल्यावर कृत्रिम साहित्य वापरून दात दुरुस्त करण्याची किंवा दात काढण्याची गरज कमी होऊ शकते.
त्याऐवजी खराब झालेला दात किंवा त्याचा भाग पुन्हा नैसर्गिकरित्या उगवता येईल. हे महत्त्वाचं आहे, कारण दात आपल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी अनेकांना वाटतं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात.
अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या 'इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन'च्या सहयोगी संचालक रुओहोला-बेकर म्हणतात, "जेव्हा आम्ही हे संशोधन सुरू केलं, तेव्हा मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली. दंतवैद्यकीय क्षेत्रात काहीतरी नवीन स्वीकारण्यासाठी लोक तयार आहेत."
दातांच्या उपचारांचं नवीन पर्व
अमेरिकेतील टफ्ट्स स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनच्या प्राध्यापिका पामेला येलिक म्हणतात, "दात म्हणजे 'जगाकडे पाहण्याची तुमची खिडकी' आहे. जर तुम्हाला तोंड उघडायला भीती वाटत असेल किंवा नीट खाता येत नसेल, तर तुमची स्थिती वेगाने खालावू शकते."
येलिक म्हणतात, 'पूर्वी तोंड आणि दातांचं आरोग्य हे 'संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, याकडे फारसं लक्ष दिलं जात नसत'. आता मात्र दातांच्या समस्या, विशेषतः हिरड्यांच्या आजारामुळे होणारे जंतू, हृदयविकार आणि श्वसन संस्थेच्या संसर्गाचा धोका वाढवू शकतात, हे अधिक स्पष्ट होत आहे. काही संशोधनांमध्ये याचा संबंध अल्झायमर आजाराशीही जोडला गेला आहे.
त्याचबरोबर, दात पडल्यामुळे इतर आजार होण्याचा धोका वाढतो आणि अकाली मृत्यूची शक्यताही वाढू शकते. दात नसल्यामुळे नीट खाता, चावता किंवा हसता येत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या सामाजिक आयुष्यावर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ही समस्या अनेकदा बालपणापासूनच सुरू होऊ शकते.

फोटो स्रोत, BBC/ Serenity Strull
या समस्यांवर उपचार करण्यासाठी डेंटिस्टकडे अनेक पर्याय आहेत. दाताला कीड लागल्यास खराब झालेला भाग काढून त्या जागी रेझिन कंपोझिटसारखं कृत्रिम साहित्य भरलं जातं. तसेच, दाताला छोटे तडे गेले असतील किंवा दात तुटला असेल, तर तेही फिलिंग करून दुरुस्तही करता येतात.
पण, हे उपचार कायमस्वरूपी उपाय नाहीत. उदाहरणार्थ, फिलिंग किती वर्षे टिकेल हे निश्चित नसतं. काही फिलिंग 5 वर्षे टिकतात, तर काही 20 वर्षांपर्यंत टिकू शकतात.
अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉय विद्यापीठातील 'ओरल बायोलॉजी'च्या प्राध्यापिका अॅन जॉर्ज यांच्या मते, अशा उपचारांनंतर अनेकांना पुन्हा पुन्हा दातांवर उपचार करून घेण्याची गरज पडते.
जॉर्ज म्हणतात, सध्याचे उपचार प्रामुख्याने दाताचा खराब झालेला भाग दुरुस्त करतात, पण 'दाताचं नैसर्गिक काम पुन्हा पूर्वीसारखं करत नाहीत'. त्याउलट, 'पुनरुत्पादक दंत चिकित्सा (रेजेनेरेटिव्ह डेंटिस्ट्री) हे या क्षेत्रात मोठा बदल घडवू शकते'. कारण या उपचारांमध्ये केवळ दुरुस्ती नाही, तर 'दात नैसर्गिकरित्या बरे' होण्यावर भर दिला जातो.
दातातील कीड आपोआप भरून निघणार?
"दात खराब होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे दाताला लागलेली कीड (कॅव्हिटीज)," असं जॉर्ज म्हणतात.
दाताचे चार मुख्य थर असतात - इनॅमल, डेंटिन, सिमेंटम आणि टूथ पल्प. दातांवर साचलेल्या प्लाकमधील जीवाणू साखरेवर वाढतात आणि आम्ल तयार करतात. हे आम्ल हळूहळू दाताचा बाहेरील इनॅमलचा थर झिजवते.
इनॅमलखाली डेंटिनचा थर असतो. तो इनॅमलपेक्षा अधिक मऊ असल्याने त्याला कीड लवकर लागते. त्यामुळे इनॅमल झिजल्यानंतर डेंटिन उघडे पडले की दाताला कीड लागण्याचा धोका आणखी वाढतो.
जॉर्ज या डेंटिनचा थर वाढण्यास, मजबूत होण्यास आणि स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांवर संशोधन करत आहेत. डेंटिन तयार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका जनुकाचा (जीन) शोध घेणाऱ्या संशोधकांच्या पथकाच्या त्या सदस्यही होत्या. त्यामुळे दात डेंटिन कसा तयार करतो आणि तो कसा टिकवून ठेवतो, हे अधिक चांगल्या प्रकारे समजलं आहे.
जॉर्ज यांच्या मते, या संशोधनामुळे भविष्यात असे उपचार विकसित होऊ शकतात, ज्यामुळे कीड लागलेल्या दातात स्वतः नवीन डेंटिन तयार होईल आणि दाताची दुरुस्ती होईल. त्यामुळे दातातील छिद्र भरण्यासाठी पारंपरिक फिलिंग करण्याची गरजही उरणार नाही.

रुओहोला-बेकर आणि त्यांची टीमही 'जिवंत फिलिंग' (लिव्हिंग फिलिंग) विकसित करण्यावर काम करत आहे. परंतु, त्यांचं संशोधन डेंटिनऐवजी दाताच्या बाहेरील इनॅमलच्या थरावर केंद्रित आहे.
दान केलेल्या अक्कलदाढांचा अभ्यास करताना त्यांना असं आढळून आलं की, इनॅमल तयार करणाऱ्या 'अॅमेलोब्लास्ट' नावाच्या विशेष पेशी दात बाहेर आल्यानंतर नष्ट होतात. त्यामुळे दात तुटल्यानंतर त्या पेशी पुन्हा सक्रिय करून नवीन इनॅमल तयार करता येत नाही.
यानंतर संशोधकांनी काही स्टेम सेलना रासायनिक संकेतांच्या मदतीने ॲमेलोब्लास्ट पेशींमध्ये रूपांतरित केलं. तसेच इतर काही स्टेम सेलना डेंटिन तयार करणाऱ्या ओडोंटोब्लास्ट पेशींमध्ये बदललं.
या दोन्ही प्रकारच्या पेशी प्रयोगशाळेत एकत्र आणल्यानंतर त्यांनी दातासारखी एक छोटी रचना (ऑर्गेनॉइड) तयार केली, जी स्वतःहून इनॅमल तयार करणारी प्रथिने निर्माण करू लागली.
रुओहोला-बेकर यांना वाटतं की, भविष्यात या इनॅमल तयार करणाऱ्या प्रथिनांचा वापर पोकळी भरण्यासाठी म्हणजेच फिलिंग तयार करण्यासाठी किंवा तडे गेलेल्या दातांवर लावण्यासाठी केला जाऊ शकतो.
पण त्यांचं अंतिम उद्दिष्ट प्रयोगशाळेत संपूर्ण नवीन दात तयार करण्याचं आहे. त्यासाठी दात तयार करणाऱ्या विशेष पेशी (इंजिनिअर्ड) रुग्णाच्या तोंडात बसवून, 'पुढचं काम निसर्गालाच करू द्यायचं', अशी त्यांची इच्छा आहे.
नवीन दात कसा तयार होईल?
एखादा दात खूप किडला असेल आणि खराब झाला असेल, तर तो काढून टाकणं हा सर्वात सोपा आणि योग्य उपचार ठरू शकतो. त्यानंतर त्या जागी स्क्रूसारखा भाग, कृत्रिम दात (क्राऊन) आणि त्या दोघांना जोडणारा भाग अशा तीन गोष्टींच्या मदतीने डेंटल इम्प्लांट बसवला जातो.
परंतु, डेंटल इम्प्लांटमध्ये नैसर्गिक दातांसारख्या संवेदना देणाऱ्या मज्जातंतू म्हणजेच नस नसते. त्यामुळे अन्न चावताना जास्त जोर लागल्याचं कळत नाही आणि त्यामुळे इम्प्लांटला तडा जाऊ शकतो.
त्याचबरोबर त्यावर जंतू (बॅक्टेरिया) साचल्यास संसर्ग होऊ शकतो आणि त्याचा परिणाम इतर निरोगी दातांवरही होऊ शकतो. कृत्रिम दात साधारणपणे 15 वर्षांनी बदलावा लागू शकतो आणि त्यासाठी मोठा खर्चही येऊ शकतो.
ब्रिटनमधील किंग्स कॉलेज लंडनच्या रिजनरेटिव्ह डेन्टिस्ट्री विभागाच्या संचालिका अॅना अँजेलोव्हा व्होल्पोनी यांच्या मते, प्रयोगशाळेत पूर्णपणे तयार केलेले नैसर्गिक दात हे इम्प्लांटपेक्षा अधिक चांगला आणि टिकाऊ पर्याय ठरू शकतात.
"दाताचा खराब झालेला भाग दुरुस्त करण्याऐवजी त्याच्या जागी नैसर्गिक पद्धतीने तयार झालेला नवीन दात बसवता येऊ शकतो," असं व्होल्पोनी सांगतात. त्या सध्या प्रयोगशाळेत असा दात तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या दातासारख्या पेशींच्या रचनेवरही (ऑर्गॅनॉइड) काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
व्होल्पोनी यांच्या रिसर्च टीमला असं आढळून आलं की, प्रौढ माणसाच्या हिरड्यांमधील पेशी आणि उंदरांमधील दात तयार करणाऱ्या पेशी एकत्र केल्यावर मुळांसह वाढणारी दातासारखी रचना तयार होऊ शकते.
आता त्या दात तयार होण्यासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक संकेत पुन्हा निर्माण करण्यावर आणि अशा विशेष जैवसाहित्यावर (बायोमटेरियल) काम करत आहेत, ज्यामुळे या पेशी एकत्र येऊन पूर्णपणे कार्यक्षम दात तयार करण्यास मदत करू शकतील.
दुर्दैवाने, हे नैसर्गिकरित्या घडत नाही. काही प्राण्यांप्रमाणे माणसांमध्ये एकदा कायमचे दात (अडल्ट सेट) आल्यावर त्यानंतर नवीन दात पुन्हा उगवत नाहीत. परंतु, शार्क माशांचे दात सतत नव्याने येत राहतात. त्यांचे दात 'कन्व्हेयर बेल्ट'प्रमाणे सतत नव्याने तयार होत असतात. कांगारू आणि हत्तींनाही आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा नवीन दाढा (मोलर्स) येतात.
डुकरांमध्येही एक जैविक वैशिष्ट्य आढळून येतं. त्यांच्या जबड्यात अजून बाहेर न आलेल्या कायमच्या दातांच्या अनेक कळ्या (टूथ बड्स) असतात. याच वैशिष्ट्यामुळे पामेला येलिक यांना मानवी आणि डुकराच्या दातांच्या पेशी एकत्र करून प्रौढ युकाटन मिनीपिग्समध्ये माणसाच्या दातांसारखे दात तयार करणं शक्य झालं.

फोटो स्रोत, BBC/ Serenity Strull
या संशोधनासाठी टीमने मानवी दातांमधून डेंटिन तयार करणाऱ्या पेशी घेतल्या. तसेच, कत्तलखान्यातून मिळालेल्या डुकराच्या जबड्यातील अजून बाहेर न आलेल्या दातांच्या कळ्यांमधून इनॅमल तयार करणाऱ्या पेशी घेतल्या.
"डुकराला अन्नासाठी कापलं गेलं तरी त्याच्या जबड्यात पुढचा दात तयार होण्यासाठी दाताच्या कळ्या आधीच तयार होत असतात," असं येलिक म्हणतात.
या पेशींची प्रयोगशाळेत वाढ झाल्यानंतर संशोधकांनी त्या दात तयार होण्यासाठी योग्य वातावरणासारखी कृत्रिम रचना (बायोइंजिनिअर्ड स्कॅफोल्ड) तयार करून त्यावर एकत्र ठेवल्या. त्यानंतर साधारण 3 महिन्यांत डुकराच्या नैसर्गिक दातांप्रमाणेच वेगाने दातासारख्या रचना तयार झाल्या.
येलिक म्हणतात, "या प्रयोगामुळे हे शक्य असल्याचा पुरावा मिळाला. त्यानंतर स्वतःच्या दातांच्या समस्यांवर असा उपचार करून घ्यायची इच्छा असलेल्या अनेकांनी आमच्याशी संपर्क साधला."
आता त्या हा प्रयोग अधिक कालावधीसाठी आणि थेट डुकराच्या जबड्यात करण्याची तयारी करत आहेत. पुढे जाऊन, डुकराच्या पेशींचा वापर न करता मानवी तोंडातच नवीन दात वाढतील, अशी पद्धत विकसित करण्याचं येलिक आणि त्यांच्या टीमचं ध्येय आहे.
संशोधनातून प्रत्यक्ष उपचारांपर्यंत
या उपचारांची गरज असणारे अनेक लोक असले, तरी दातातील कीड स्वतः भरून येणारे उपचार किंवा प्रयोगशाळेत तयार केलेले दात लोकांसाठी उपलब्ध होण्यासाठी आणखी काही वर्षे लागतील.
रुओहोला-बेकर म्हणतात, माणसांवर चाचण्या सुरू करण्यापूर्वी इतर प्राण्यांवर (प्राइमेट्स) अधिक संशोधन करावं लागेल. यासाठी आणखी संशोधन, वेळ आणि निधी लागणार आहे. तसेच, प्रयोगशाळेत तयार केलेले दात मानवाच्या तोंडात वाढू शकतील, यासाठी दात तयार होण्यासाठी अनुकूल वातावरणही निर्माण करावं लागेल.
दरम्यान, पुनरुत्पादक दंत चिकित्सेच्या संशोधनातून मिळणारी माहिती शरीरातील इतर अवयव आणि हाडे पुन्हा तयार करण्याच्या संशोधनालाही उपयोगी पडू शकते.
येलिक म्हणतात, 'दात हे अतिशय जिवंत अवयव' आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेत दात तयार करण्याच्या प्रयत्नांमुळे कठीण आणि मऊ ऊती एकत्र कशा काम करतात, हे वैज्ञानिकांना अधिक चांगल्या प्रकारे शिकायला मिळत आहे.
हे उपचार कदाचित लवकर उपलब्ध होणार नाहीत, तरी भविष्यात सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे नैसर्गिक दंत वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांसाठी नक्की उपलब्ध होतील, असा व्होल्पोनी यांना विश्वास आहे.
त्या म्हणतात, "मला भविष्यात हेच चित्र दिसत आहे. ते अजून पूर्णपणे स्पष्ट नाही, पण, आशादायक मात्र नक्कीच आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.























