'एकदा ऐकण्याची क्षमता गेली की परत येत नाही'; जाणून घ्या तुमची ऐकण्याची क्षमता कशी जपावी

भविष्यातही तुमची ऐकण्याची क्षमता सुरक्षित कशी ठेवाल?

फोटो स्रोत, BBC/ Serenity Strull/ Getty Images

    • Author, एलिझाबेथ अ‍ॅन ब्राउन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

कान खराब होण्यासाठी फक्त रॉकेटचा मोठा आवाज किंवा जोरात चालणारी गाणीच कारणीभूत नसतात. आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमुळेही कानांना दुखापत होऊ शकते.

भविष्यात अनेक वर्षांपर्यंत तुमचे कान चांगले राहावेत म्हणून तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या.

जिम सुटली तरी काही महिने मेहनत करून आणि घााम गाळून तुम्ही तुमची बॉडी पुन्हा पिळदार बनवू शकता. पण तुमच्या कानांचे तसे नसते.

एकदा का ऐकण्याची ताकद कमी झाली की ती परत मिळवता येत नाही.

अमेरिकेच्या क्लीव्हलँड क्लिनिकमधील कानांच्या डॉक्टर व्हॅलेरी पाव्हलोविच रफ म्हणतात, "एकदा का ऐकण्याची क्षमता गेली की ती परत कधीच येत नाही."

वाढत्या वयासोबत आपली ऐकण्याची क्षमता कमी होत जाते हे आपल्याला माहीतच आहे. पण आता अगदी लहान वयातच मुलांचे कान कमजोर होत असल्याचे श्रवणतज्ज्ञांच्या निदर्शनास येत आहे.

यामध्ये कॉलेजची मुलं आणि 10 वर्षांपेक्षा लहान मुलांचाही समावेश आहे.

अमेरिकेतील ॲरिझोना येथील मेयो क्लिनिकच्या श्रवणतज्ज्ञ जेमी बोगल म्हणतात, "तरुण वयात आपण सगळेच कानांची काळजी घेण्याबाबत हलगर्जीपणा करतो. पण आवाजाचा हा त्रास हळूहळू वाढतो आणि आपण लहानपणी दुर्लक्ष केल्याचा फटका पुढे मोठं झाल्यावर बसतो."

कान खराब होण्यासाठी फक्त रॉकेटचा मोठा आवाज किंवा जोरात चालणारे संगीत कार्यक्रमच कारणीभूत नसतात, तर आपल्या रोजच्या अशा अनेक साध्या गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या कानांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

भविष्यातही तुमची ऐकण्याची क्षमता सुरक्षित कशी ठेवाल?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

येत्या अनेक वर्षांपर्यंत तुमचे कान चांगले राहावेत म्हणून तुम्ही काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी ही बातमी पुढे नक्की वाचा.

आपल्या कानाच्या पडद्याच्या मागे कानाच्या अगदी आतल्या भागात द्रवाने भरलेली शंखासारखी एक छोटी जागा असते. त्याला 'कॉक्लिया' म्हणतात.

या भागात हजारो लहान-लहान केसांसारख्या पेशी असतात. या पेशींच्या वर नाजूक तंतूंचा पुंजका असतो आणि खाली एक न्यूरॉन (चेतापेशी) असतो.

हा न्यूरॉन ऐकण्याच्या नसेला जोडलेला असतो. ही नस कानाच्या मुख्य नसेला जोडलेली असते. ती मेंदूला संदेश पाठवते.

अतिशय तीव्र आवाजाच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्याने या ठिकाणी वादळी वाऱ्यासारखा परिणाम होतो. त्यामुळे हे बारीक नाजूक केस वाकतात किंवा तुटून जातात. आपल्या पापण्यांच्या केसांसारखे हे केस पुन्हा उगवत नाहीत.

पाव्हलोविच रफ म्हणतात, "माणसाच्या कानात जन्माच्या वेळेस जितक्या केसांसारख्या पेशी असतात तितक्याच त्या आयुष्यभर राहतात. एकदा का या पेशी नष्ट झाल्या की माणसाची ऐकण्याची ताकद कायमची जाते. ते पुन्हा कधीही ठीक केले जाऊ शकत नाही."

झेब्राफिश आणि कोंबड्यांसारख्या काही प्राण्यांमध्ये या केसांसारख्या पेशी पुन्हा कशा उगवतात यापासून प्रेरणा घेऊन संशोधक हे बारीक केस पुन्हा वाढवण्यासाठी जीन थेरपीवर (Gene therapies) काम करत आहेत.

पण तोपर्यंत बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे, असं पाव्हलोविच रफ म्हणतात. म्हणजेच तुमच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करा.

लाईव्ह गाण्यांचे कार्यक्रम आणि हेडफोनचा वापर

पाव्हलोविच रफ म्हणतात, "लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहसा लाऊडस्पीकरवर नेहमीच गरजेपेक्षा मोठा आवाज असतो."

अनेक कार्यक्रमांमध्ये आवाजाची पातळी इतकी जास्त असते की, अवघ्या 10 ते 15 मिनिटांतच आपल्या कानांना त्रास व्हायला सुरुवात होते.

त्या पुढे म्हणतात, "त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही इयरप्लग्स वापरले पाहिजेत. पण साधे फोमचे इयरप्लग्स वापरल्याने गाण्याचा मूळ आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही आणि तो बदलल्यासारखा वाटतो."

यासाठी फोमऐवजी 'हाय-फिडेलिटी इयरप्लग्स' वापरा जे कानठळ्या बसवणारा आवाज कमी करतात.

डॉक्टर पाव्हलोविच रफ सांगतात, '25 डॉलर्स (2 हजार 100 ते 2 हजार 125 रुपये) किंवा त्यापेक्षा कमी पैशात बाजारात उत्तम दर्जाचे हाय-फिडेलिटी प्लग्स मिळतात.'

ज्यांना संगीताची खूप आवड आहे त्यांनी संगीतकारांसाठी मिळणारे खास इयरप्लग्स खरेदी करायला हवेत. यांची किंमत साधारण 175 डॉलर्सपर्यंत (14,700 ते 14,875 रुपये ) असते आणि हे कानाच्या आकारानुसार फिट बसवण्यासाठी श्रवणतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.

भविष्यातही तुमची ऐकण्याची क्षमता सुरक्षित कशी ठेवाल?

फोटो स्रोत, Getty Images

क्रीडा स्पर्धांच्या बाबतीतही हीच काळजी घ्यावी लागते.

स्टेडियममध्ये चाहत्यांच्या ओरडण्याचा आवाज किती मोठा आहे यावर तिथले लोक तर अभिमान बाळगतात.

डॉक्टर पाव्हलोविच रफ सांगतात, "मॅच पाहायला आल्यावर अनेक जण लहान मुलांच्या कानांवर इयरप्रोटेक्टर्स घालतात. पण स्वतः मात्र काहीच वापरत नाहीत. पालकांनी स्वतःच्या कानाचाही विचार करायला हवा."

"तुमच्या स्वतःच्या कानांचे काय? हे बाळ जेव्हा मोठे होईल तेव्हा तुम्हाला त्याचा आवाज ऐकायचा नाहीये का?"

असे असले तरी आपण सगळेच काही रोज रोज स्टेडियम किंवा मोठ्या गाण्यांच्या कार्यक्रमांना जात नाही. खरं तर आपण जास्त करून हेडफोनवरच गाणी किंवा मोठे आवाज ऐकतो.

डॉक्टर पाव्हलोविच रफ सांगतात, "सतत आणि मोठ्या आवाजात हेडफोन वापरल्यामुळे लहान मुलांना आणि कॉलेजच्या मुलांना कमी ऐकू येण्याचा त्रास सुरू झाला आहे."

"त्यांनी त्यांच्या क्लिनिकमधील एका 6 वर्षांच्या लहान मुलीचे उदाहरण दिले. तिच्या घरच्यांना ती कमी ऐकतेय असे मुळीच जाणवले नव्हते, पण शाळेच्या लॅपटॉपचा आवाज सतत फुल ठेवून गाणी किंवा व्हीडिओ ऐकल्यामुळे तिच्या कानांना इजा झाली होती हे डॉक्टरांच्या तपासणीत समोर आले."

स्वीडनमध्ये 9 वर्षांच्या मुलांवर एक संशोधन करण्यात आले. यात नियमित हेडफोन वापरणारी मुलं आणि हेडफोन न वापरणारी मुलं यांच्या ऐकण्याच्या ताकदीमध्ये आकडेवारीवरून स्पष्ट फरक आढळून आला.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, मोबाईल, हेडफोन आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे जगातील 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळपास 1.35 अब्ज तरुणांचे कान वेळेआधीच खराब होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

आजकाल अनेक उपकरणांमध्ये आवाजाची मर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉल्यूम लिमिटर्स असतात. म्हणजे आवाज एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ देत नाहीत.

पाव्हलोविच रफ म्हणतात, "या नियमांचे किंवा मर्यादांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हेडफोन घातलेले असतानाही तुमच्या अगदी जवळ उभे असलेल्या व्यक्तीशी सहज बोलू शकत असाल, तर आवाजाची पातळी सुरक्षित आहे."

"पण जर समोरील व्यक्तीला तुमच्यावर ओरडावे लागत असेल किंवा तुम्हाला त्यांचा आवाज अजिबात ऐकू येत नसेल तर समजून जा की आवाज गरजेपेक्षा जास्त मोठा आहे."

बागकाम, घराची दुरुस्ती आणि प्रवासाला निघणे

गवत कापण्याचे मशीन, सुकलेली पाने उडवणारे मशीन, लॉन मूव्हर किंवा घराच्या दुरुस्तीच्या कामासाठी वापरली जाणारी विजेची करवत. बागकाम आणि घराच्या दुरुस्तीची ही कामे आश्चर्यकारकपणे खूप मोठ्या आवाजाची असू शकतात.

अमेरिकेत आता एक चांगला बदल होतोय. तिथे जास्त आवाज करणारी पेट्रोल-डिझेलची मशिन्स बंद करून त्याऐवजी कमी आवाज करणारी इलेक्ट्रिक मशिन्स वापरणे कायद्याने बंधनकारक केले जात आहे.

ही कामे करताना कानांच्या सुरक्षेसाठी इयरप्लग्स, कानांना पूर्ण झाकणारे इअरमफ्स किंवा एकाच वेळी दोन्ही गोष्टी वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पाव्हलोविच रफ आणि बोगल म्हणतात.

साधारणपणे तुम्हाला सहन होईल तितके जास्त 'नॉईज रिडक्शन रेटिंग' (NRR) असलेले प्रोटेक्शन वापरणे केव्हाही उत्तम. NRR चा प्रत्येक 1 पॉईंट आवाजाची तीव्रता सुमारे 1 डेसिबलने कमी करतो.

बोगल म्हणतात, "इअरमफ्स आकाराने थोडे मोठे असतात ते आवाजापासून अधिक सुरक्षा देतात आणि ते वापरताना चूक होण्याची शक्यता खूप कमी असते म्हणजे ते कानावर सहज फिट बसतात."

बोगल आणि पाव्हलोविच रफ म्हणतात की, जर तुम्हाला ही मोठ्या आवाजाची कामे करताना गाणी किंवा पॉडकास्ट ऐकायचे असेल, तर बाहेरचा गोंगाट रोखणारे खास 'नॉईज-कॅन्सलिंग इअरमफ्स' वापरा.

दुसरी गोष्ट म्हणजे गाडी चालवताना खिडकी खाली करून थंड हवेचा आनंद घेण्याचा मोह सगळ्यांनाच होतो.

शांत रस्त्यांवर असे करणे ठीक असले तरी हायवेवर गाडीचा वेग जास्त असताना खिडकी पूर्ण उघडी ठेवून प्रवास करणे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेसाठी हानिकारक ठरू शकते, असा इशारा पाव्हलोविच रफ देतात.

त्या म्हणतात की, खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा वेग आणि आवाज आपण विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त असतो. ज्यांना खिडकी खाली करून प्रवास करण्याची सवय आहे त्यांना बऱ्याचदा एका कानाचा बहिरेपणा किंवा एका बाजूने कमी ऐकू येण्याचा त्रास होतो, असे श्रवणतज्ज्ञांना पाहण्यात आला आहे.

या समस्येत आणखी भर घालतो तो आपला जुना मित्र म्हणजेच रेडिओ. वाऱ्याच्या आवाजात गाणे ऐकू यावे म्हणून आपण नकळतपणे संगीताचा आवाज खूप जास्त वाढवतो. पाव्हलोविच रफ म्हणतात, "हा एक प्रकारे दुहेरी फटका आहे."

डॉक्टर पुढे सांगतात की, बाईक चालवताना प्रत्येकाने कानात इयरप्लग्स घातलेच पाहिजेत. पण त्यासाठी साधे प्लग्स न वापरता 'हाय-फिडेलिटी इयरप्लग्स' वापरावेत जेणेकरून रस्त्यावरील ॲम्ब्युलन्सचे सायरन, अग्निशामक दल आणि वाहतुकीचे इतर महत्त्वाचे आवाज तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतील.

यामुळे रस्त्यावर सुरक्षितताही राहते आणि तुमच्या महागड्या बाईकचा जोरात येणारा आवाज कानाला त्रास न देता एकदम हलकासा वाटतो.

हे वाचल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की, आपल्याला खूप वेळा कानात इयरप्लग्स घालावे लागतील तर काळजी करू नका. बऱ्याच जणांना असेच वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कानाच्या आत कोणतीही गोष्ट घालताना नेहमी खूप जपून आणि सावध राहिले पाहिजे.

भविष्यातही तुमची ऐकण्याची क्षमता सुरक्षित कशी ठेवाल?

फोटो स्रोत, Getty Images

कान हा स्वतःहून स्वच्छ होणाऱ्या ओव्हनसारखा असतो. कानात तयार होणारा मेणासारखा मळ कानाचा आतील भाग कोरडा पडू देत नाही. तसेच मृत त्वचा आणि जंतू बाहेर काढण्याचे काम करतो.

कानाच्या त्वचेची नैसर्गिक रचना आणि आपण बोलताना किंवा अन्न चावताना होणारी जबड्याची हालचाल यामुळे हा मळ आणि त्यासोबतचा कचरा हळूहळू कानाच्या पडद्यापासून कानाच्या बाहेरील भागाकडे सरकतो. तसेच अंघोळ करताना तो सहज धुतला जातो.

आपण जेव्हा कानात इयरबड्स किंवा इयरप्लग्स सारख्या गोष्टी घालतो. तेव्हा कानातील मळ साफ होण्याऐवजी उलट आतल्या बाजूला दाबला जातो आणि कानाच्या पडद्याजवळ जाऊन जमा होतो. यामुळे कानात खाज सुटणे किंवा कान जड होणे अशा समस्या तयार होतात.

हळूहळू या मळाचा घट्ट गोळा बनतो आणि बाहेरचा आवाज कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ऐकू येणे कमी होते. तसेच कानात मळ साठून राहिल्याने आणि तिथे ओलसरपणा अडकल्याने कानात इन्फेक्शन (संसर्ग) देखील होऊ शकते.

कानात मळ जमा झाला आहे असे वाटल्यास स्वतः काही न करता डॉक्टर किंवा कानाच्या तज्ज्ञांना दाखवून तो साफ करून घेणे सर्वात चांगले. दुसरा पर्याय म्हणजे, मेडिकलमध्ये कानाचा मळ मऊ करणारी औषधे मिळतात. ती कानात टाकून मळ मऊ झाल्यावर एका छोट्या पंपासारख्या सिरिंजने कोमट पाणी सोडून तो मळ अलगद बाहेर काढता येतो.

डॉक्टर पाव्हलोविच रफ सांगतात की, रोज रात्री कानात इयरप्लग्स घालून झोपू नका. यामुळे कानात मळ जमा होऊन इन्फेक्शन होऊ शकते. पण जर तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर गावी गेला असाल जिथे आजूबाजूला खूप गोंगाट आहे किंवा रात्रीच्या विमानाने प्रवास करत असाल, तर काही वेळापुरते इयरप्लग्स वापरणे ठीक आहे.

फक्त दिवसाचा काही वेळ कानांना मोकळे ठेवा जेणेकरून कान स्वतःची स्वच्छता स्वतः करू शकतील.

तुम्ही कानाची काळजी घेण्यासाठी नेहमी इयरप्लग्स वापरता, पण तरीही हल्ली गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्रुपमध्ये लोकांचे बोलणे ऐकताना तुम्हाला त्रास होतोय. मग डॉक्टरांकडे जाऊन कान दाखवण्याची वेळ आली आहे. हे कसे समजायचे?

डॉक्टर बोगल सांगतात, "अमेरिकेसारख्या देशात लहान मुलांची शाळेतच कान तपासणी करण्याची उत्तम सोय आहे. पण मोठेपणी मात्र आपली वेगळीच सवय असते. जोपर्यंत आपल्याला स्पष्टपणे काही त्रास जाणवत नाही तोपर्यंत आपण कानांची तपासणी करायला डॉक्टरांकडे जातच नाही."

नेहमी असा सल्ला दिला जातो की, वयाच्या 60 वर्षांच्या आत एकदा कानांची तपासणी करून घ्यावी. पण कान खराब होण्याचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो.

डॉक्टर पाव्हलोविच रफ सांगतात, "अगदी 30 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा लहान मुलांनाही जर गर्दीच्या आणि गोंगाटाच्या ठिकाणी लोकांचे बोलणे ऐकताना किंवा समजून घेताना त्रास होत असेल, तर त्यांनी या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये."

"माझा सल्ला हाच आहे की, कानाचा थोडा जरी त्रास जाणवला तरी लगेच तपासणी करून घ्या. मोठ्या आवाजामुळे कान खराब होण्याआधी शरीरात एक लक्षण दिसते ज्याला 'टिनिटस' म्हणतात. यात कानात सतत सायकलच्या घंटीसारखा किंवा शिटीसारखा आवाज घुमत राहतो."

"जर तुम्ही एखाद्या मोठ्या आवाजाच्या कार्यक्रमातून आला असाल आणि तुमच्या कानात सतत असा आवाज येत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाऊन कान तपासून घ्यावेत," असा सल्ला डॉक्टर पाव्हलोविच रफ देतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)