92 वर्षांच्या डॉक्टर आजही करतात शस्त्रक्रिया; 68 वर्षांच्या सेवेत हजारो आयुष्यांना दिला आधार

92 वर्षीय डॉ. सुरी श्रीमाथी आजही सिझेरियन शस्त्रक्रिया करतात.
फोटो कॅप्शन, 92 वर्षीय डॉ. सुरी श्रीमाथी आजही सिझेरियन शस्त्रक्रिया करतात.
    • Author, बल्ला सतीश
    • Role, बीबीसी तेलगू प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

आजवर तुम्ही भेटलेल्या डॉक्टरांकडे सर्वाधिक अनुभव किती असेल? 30 वर्षे, 40 वर्षे की 50 वर्षे?

पण तुम्ही अशा डॉक्टरांना कधी भेटलात का ज्यांचा अनुभव तब्बल 70 वर्षांच्या जवळपास आहे.

कदाचित नाही...

मी ज्या डॉक्टरांना भेटलो, त्या एमबीबीएस केल्यापासून मागील 68 पेक्षाही जास्त वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्यांचं नाव आहे, डॉ. सुरी श्रीमाथी, त्या हैदराबादमध्ये राहतात. वयाच्या 92 व्या वर्षीही त्या ऑपरेशन करत आहेत.

1958 मध्ये सुरी श्रीमाथी यांनी एमबीबीएसची पदवी मिळवल्यानंतर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली होती. आजही त्या तितक्याच उत्साहाने दररोज रूग्णांची तपासणी करताना दिसतात. गरज पडल्यास त्या सिझेरियन प्रसूतीही करतात.

आजही त्या एखाद्या युवा डॉक्टरसारखी सेवा बजावतात.

ज्या वयात अनेकांना चालणं-फिरणं आणि दैनंदिन कामं करणंही कठीण जातं, त्या वयात त्या रुग्णांची तपासणी तर करतातच, पण वेळप्रसंगी संपूर्ण आत्मविश्वासाने शस्त्रक्रियाही करतात.

डॉ. सुरी श्रीमाथी स्वतः कार चालवत हॉस्पिटलला जातात. वयाच्या 92 व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे आणि त्यांचे हात थरथरतही म्हणजेच कंपही पावत नाहीत.

मी त्यांना विचारलं की, ऑपरेशन करताना त्यांचे हात कधी थरथरतात का? त्यावर त्यांनी लगेचच उत्तर दिलं की, "नाही थरथरत."

यानंतर त्या म्हणाल्या, "हे बघा, तुम्ही स्वतःच माझे हात पाहू शकता..." असं म्हणत त्यांनी आपले हात मला दाखवले.

डॉ. सुरी श्रीमाथी सांगतात की, इतर डॉक्टरांप्रमाणेच त्यांनाही औषधांची नावं आजही व्यवस्थित लक्षात राहतात.

तीन पिढ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर

डॉ. सुरी श्रीमाथी यांच्या सहकारी डॉ. रजनी कुमारी यांनी बीबीसीला सांगितलं की, "या वयातही त्यांचे हातात कधीच थरथरत नाही. आमच्या हातांना कधी कधी कंप येऊ शकतो, पण त्यांचे हात नेहमी स्थिर असतात."

त्या म्हणाल्या, "योग, ध्यान, संतुलित आहार, आपल्या व्यवसायाप्रती असलेली निष्ठा, तणावमुक्त स्वभाव आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे यामागचं कारण आहे. अनेकदा त्या झोपेचीही पर्वा न करता सलग काम करू शकतात."

डॉ. सुरी श्रीमाथी यांनी एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे म्हणजे आजी, आई आणि मुलीचे बाळंतपण केले आहे.

हा एक विशेष सन्मान असल्याचं त्यांना वाटतं.

डॉ. श्रीमाथी सांगतात की, "अनेक लोक मला त्यांचा लहानपणाचा फोटो दाखवतात. आणि म्हणतात की, 'माझा जन्म तुमच्याच हातून झाला होता'."

वृद्धापकाळातही डॉ. श्रीमाथी आजही समर्पित भावनेनं रुग्णांची सेवा करत आहेत.
फोटो कॅप्शन, वृद्धापकाळातही डॉ. श्रीमाथी आजही समर्पित भावनेनं रुग्णांची सेवा करत आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. श्रीमाथी यांच्या रुग्ण असलेल्या तुळशी त्यांच्याबद्दल बोलताना भावूक झाल्या. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "त्या रुग्णांच्या समस्या खूप संयमाने ऐकून घेतात. दिवस असो वा रात्र, त्यांना कधीही फोन केला तरी त्या कधीच चिडत नाहीत आणि शांतपणे उत्तर देतात."

"जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला थोडी भीती वाटली. इतक्या वयाच्या डॉक्टर सिझेरियन शस्त्रक्रिया व्यवस्थित करू शकतील का, असा प्रश्न माझ्या मनात आला होता."

"नंतर इतर रुग्णांचे चांगले अनुभव ऐकले. त्यांनी आमची किती चांगली काळजी घेतली, हेही मी पाहिलं. त्यानंतर माझी भीती पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्यांच्यावरील माझा विश्वास आणखी वाढला."

"ऑपरेशनच्या दरम्यान त्यांच्याबरोबर इतर सहायक असतात. पण सर्वात महत्त्वाची भूमिका त्याच पार पाडत असतात."

"माझ्या तिसऱ्या प्रसूतीच्यावेळी अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. ही बातमी समजताच त्या चहाही न पिता लगेचच रुग्णालयात आल्या."

"माझी प्रसूती होईपर्यंत त्यांनी जेवण केलं नाही. आई आणि बाळ सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच त्या जेवण करायला गेल्या."

डॉ. श्रीमाथी सांगतात की, "अनेक लोक मला त्यांचा लहानपणाचा फोटो दाखवतात. आणि म्हणतात की, 'माझा जन्म तुमच्याच हातून झाला होता'."

फोटो स्रोत, Tulasi

फोटो कॅप्शन, डॉ. श्रीमाथी सांगतात की, "अनेक लोक मला त्यांचा लहानपणाचा फोटो दाखवतात. आणि म्हणतात की, 'माझा जन्म तुमच्याच हातून झाला होता'."

सतत नवीन शिकण्याची सवय

वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत असतात. नवीन औषधं, संशोधन आणि तपासणीच्या नवीन पद्धती येत राहतात. अशा परिस्थितीत डॉ. सुरी श्रीमाथी स्वतःला नेहमी या नव्या घडामोडींशी अपडेट ठेवतात.

त्या म्हणाल्या, "मी नियमितपणे वैद्यकीय परिषदा आणि बैठकांमध्ये सहभागी होते. तसेच वैद्यकीय विषयांवरील लेख आणि संशोधनपत्रिकांचे वाचनही करते. नवीन औषधांबद्दल माहिती देण्यासाठी वैद्यकीय प्रतिनिधी येतात, तेव्हाही त्यांच्याकडून नवीन माहिती जाणून घेते."

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती ठेवण्यासाठी, अपडेट होण्यासाठी डॉ. श्रीमाथी आजही खूप मेहनत घेतात.
फोटो कॅप्शन, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती ठेवण्यासाठी, अपडेट होण्यासाठी डॉ. श्रीमाथी आजही खूप मेहनत घेतात.

डॉ. श्रीमाथींसोबत शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रजनी कुमारी म्हणाल्या, "आजही त्या या क्षेत्रातील नवनवीन घडामोडी सातत्याने शिकत असतात. एखादं नवीन तंत्रज्ञान आलं की, ते नीट समजून घेण्यावर त्यांचा भर असतो."

त्या पुढे म्हणाल्या की, "त्या प्रत्येक रुग्णाला पुरेसा वेळ देतात. रुग्णांच्या प्रत्येक प्रश्नाचं संयमाने उत्तरं देतात आणि कधी चिडतही नाहीत."

सरकारी डॉक्टर म्हणून...

डॉ. सुरी श्रीमाथी यांनी 1958 मध्ये उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतली होती.

एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी काही काळ सरकारी डॉक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रात एमडी पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी हैदराबादमध्ये दीर्घकाळ रुग्णसेवा केली.

आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, "एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर माझी पहिली नियुक्ती संगारेड्डी येथील एका रुग्णालयात झाली. तिथे माझ्यासमोर आलेली पहिली केस एका 13 ते 14 वर्षांच्या एका मुलीची होती."

"तिची आई तिला माझ्याकडे घेऊन आली आणि म्हणाली, 'माझी मुलगी गरोदर आहे, कृपया तिची तपासणी करा.' मी तपासणी केली तेव्हा मला धक्काच बसला. ती मुलगी गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात होती. माझ्या करिअरमधील ती माझी पहिलीच रुग्ण होती."

1958 मध्ये श्रीमाथी यांनी एमबीबीएस पूर्ण केलं होतं.
फोटो कॅप्शन, 1958 मध्ये श्रीमाथी यांनी एमबीबीएस पूर्ण केलं होतं.

त्या पुढे सांगतात, "मी भूल देऊन तिची सिझेरियन शस्त्रक्रिया केली. त्या रुग्णालयात दुसरे कोणतेही डॉक्टर नव्हते. त्यामुळे सर्जन, ॲनेस्थेशिया तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ अशा तिन्ही जबाबदाऱ्या मला एकटीला पार पाडाव्या लागल्या."

आज डॉ. श्रीमाथी हैदराबाद येथील आपल्या घरातूनच खासगी रुग्णसेवा देत आहेत.

ओपीडीमध्ये रुग्ण तपासण्यासाठी त्या 300 रुपये शुल्क घेतात. पण, ज्यांना हे शूल्क भरणं शक्य नसतं, त्यांच्याकडून त्या एकही रुपया घेत नाहीत.

त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचं काम नाही. कोणाचंही नुकसान न करता मी चांगली कमाई केली आहे. त्यातून मिळणारं समाधान हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे."

मात्र, आता डॉ. श्रीमाथी यांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचं प्रमाण हळूहळू कमी केलं आहे.

या सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या मदतीसाठी आणखी एक स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित असतात. परंतु, शस्त्रक्रियेचा मुख्य भाग आजही त्या स्वतःच करत असल्याचे त्यांनी सांगितलं.

डॉ. श्रीमाथींबद्दल सहकारी डॉक्टर काय सांगतात?

डॉ. रजनी कुमारी यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी 1986 मध्ये मॅडम यांच्याकडे वरिष्ठ हाऊस सर्जन म्हणून रुजू झाले. तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्यासोबतच काम करत आहे."

त्या म्हणाल्या, "मला शस्त्रक्रिया मॅडमनीच शिकवली. त्या माझ्या गुरू आहेत. मोठ्या रुग्णालयात कितीही काम असलं तरी डॉ. श्रीमाथी यांच्या रुग्णांना मी नेहमी प्राधान्य देत आले आहे. आम्ही दोघी काम करत आहोत, तोपर्यंत हे असंच सुरू राहील."

गेल्या 7 दशकांत शस्त्रक्रियेच्या पद्धतींमध्ये काय बदल झाले, असा प्रश्न डॉ. श्रीमाथी यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, "शस्त्रक्रियेचं तंत्र, टाके घालण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आणि भूल देण्याच्या पद्धती अशा अनेक गोष्टींमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत."

त्या म्हणाल्या, "वेळेबरोबर मी देखील स्वतःला बदललं आणि नवनवीन तंत्रज्ञान शिकले."

डॉ. रजनी कुमारी म्हणाल्या, "रुग्णांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. मूलभूत सुविधा नसतानाही त्यांनी त्या काळात उत्कृष्ट काम केलं होतं."

 डॉ. श्रीमाथी यांना त्यांच्या सहकारी स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्या गुरू मानतात.
फोटो कॅप्शन, डॉ. श्रीमाथी यांना त्यांच्या सहकारी स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्या गुरू मानतात.

त्या पुढे म्हणाल्या, "एक काळ असा होता की, आम्ही दर महिन्याला साधारण 120 गर्भवती महिलांची प्रसूती करत होतो. यापैकी बहुतांश महिला सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागातून येत असत."

"लोक फक्त त्यांच्या डॉक्टर म्हणून असलेल्या कौशल्यामुळेच त्यांच्याकडे येत नाहीत, तर त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि रुग्णांशी बोलण्याच्या पद्धतमुळेही ते येतात."

जेव्हा डॉ. श्रीमाथी यांना त्यांनी वैद्यकीय व्यवसायच का निवडला, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी एक रंजक उत्तर दिलं.

त्या म्हणाल्या, "त्या काळात मुलं आई-वडिलांना हवं तेच शिक्षण घेत असत. माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी डॉक्टर व्हावं, त्यामुळे मी वैद्यकीय शिक्षण घेतलं."

त्यावेळी कोणतीही प्रवेश परीक्षा होत नसत. केवळ गुणांच्या आधारे प्रवेश दिला जात असत.

त्या हसत म्हणाल्या, "खरं तर मला बालरोगतज्ज्ञ व्हायचं होतं. परंतु, माझ्या सर्व मैत्रिणींनी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र हेच क्षेत्र निवडलं. त्यामुळे मीही त्यांच्यासोबत त्याच क्षेत्रात गेले."

डॉ. श्रीमाथी यांनी लग्न केलं नाही. यामागचं कारण विचारलं असता त्या अगदी साधेपणाने म्हणाल्या, "तसं काही घडलंच नाही."

त्यानंतर त्यांनी या विषयावर काही भाष्य केलं नाही.

'खाणं सोडत नाही तर मग काम कसं थांबवायचं?'

डॉ. श्रीमाथी यांचे धाकटे भाऊ सुरी रामनाथ शास्त्री त्यांच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मला समजायला लागल्यापासून मी माझ्या बहिणीला डॉक्टर म्हणूनच पाहत आलो आहे. त्यांच्या दवाखान्यात नेहमीच खूप रुग्ण यायचे आणि त्या त्यांच्यावर उपचार करत असत."

शास्त्री हे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. श्रीमाथी आजही त्यांच्या कुटुंबासोबत वडिलोपार्जित घरात राहतात.

बहिणीबद्दल ते म्हणाले, "त्यांच्यासाठी रुग्णांवर उपचार करण्याची कोणतीही ठरलेली वेळ नव्हती. कोणालाही गरज भासली की, त्या मदतीसाठी नेहमी तयार असत."

वैद्यकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सल्ला देताना डॉ. श्रीमाथी म्हणाल्या, "जर तुम्ही ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं, तर यश आणि समृद्धी आपोआपच तुमच्याकडे येईल."

त्या म्हणाल्या, "फी आणि पैशांच्या मागे धावू नका. प्रामाणिकपणे, सचोटीने सेवा करत राहा, बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतील."

92 वर्षांच्या डॉ. सुरी श्रीमाथी आजही सिझेरियन शस्त्रक्रिया करत आहेत.
फोटो कॅप्शन, 92 वर्षांच्या डॉ. सुरी श्रीमाथी आजही सिझेरियन शस्त्रक्रिया करत आहेत.

इतक्या प्रदीर्घ वैद्यकीय प्रवासाचं वर्णन एका शब्दात कसं कराल, असं विचारलं असता त्या म्हणाल्या, "आनंद आणि आत्मसमाधान."

आपल्या बहिणीच्या सक्रिय सहभागाबद्दल रामनाथ शास्त्री म्हणतात, या वयातही त्यांनी इतकी मेहनत घ्यावी, असं मला वाटत नाही. पण तरीही मी त्यांना काम सोडण्यास सांगू शकत नाही.

ते म्हणाले, "त्यांना काम बंद करा असं सांगण्याचं धाडस माझ्यात नाही. त्यांची ऊर्जा आणि कामाप्रती असलेली निष्ठा आश्चर्यकारक आहे. लोक अडचणीच्या परिस्थितीत उपचारांसाठी त्यांच्याकडे येतात, मग मी त्यांना त्या रुग्णाला पाहू नका, असं कसं सांगू शकेन?"

डॉ. श्रीमाथी यांना विचारण्यात आलं की, जगभरात लोक लवकर निवृत्ती घेण्याचा विचार करत असताना, तुम्ही वयाच्या नव्वदीनंतरही काम का करत आहात?

यावर त्या हसत म्हणाल्या, "जोपर्यंत देव मला काम करण्याची ताकद देत राहील, तोपर्यंत मी काम करत राहीन."

शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारत आपलं बोलणं संपवलं, "जेव्हा आपण खाणं आणि आराम करणं सोडत नाही, तर मग फक्त काम करणं का थांबवावं?"

डॉ. श्रीमाथी यांच्या आरोग्याचं रहस्य

डॉ. श्रीमाथी सांगतात, "मी रोज सकाळी लवकर उठते. योग आणि प्राणायाम करते. कधी-कधी टीव्हीसुद्धा पाहते."

डॉ. श्रीमाथी निरोगी राहण्यासाठी काही टिप्सही देतात.

त्या सांगतात, "जे अन्न सहज पचतं ते खावं. तळलेलं आणि तेलकट पदार्थ केवळ चवीसाठी चांगले असतात, पण शरीरासाठी ते फारसे चांगले नसतात. वेळेवर जेवण करणे आणि वेळेवर झोपणे खूप महत्त्वाचं आहे."

त्या म्हणाल्या, "आमच्या काळात मैदानी खेळ, घरची कामं आणि रांगोळी काढण्यासारख्या कामांमुळे आम्हाला भरपूर सूर्यप्रकाश मिळायचा."

चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम खूप आवश्यक आहे. परंतु, हल्ली लोकांना चालायचंच नसतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)