लैंगिक शक्ती देते अशी मान्यता असलेल्या देवतेलाच दुसऱ्याचं वाटोळं करण्याचं साकडं का घातलं जायचं?

फोटो स्रोत, Gallery Oldham
- Author, डेझी डन
- Role, बीबीसी न्यूज कल्चर
- वाचन वेळ: 6 मिनिटे
पुराणकाळात अशा अनेक देवी होऊन गेल्यात ज्यांनी लिंग आणि शक्तीसंबंधी सर्व नियम तोडले. अशा देवता ज्या क्रूर होत्या ज्यांची भीती होती, तर दुसरीकडे त्यांना पूजलं ही जायचं अशा देवतांचा डेझी डन यांनी मागोवा घेतला आहे.
पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात बाथ नावाचं एक शहर होतं. या शहरातले लोक जेव्हा अंघोळीला जायचे, तेव्हा अनेकदा त्यांचे कपडे चोरीला जायचे. अशी नामुष्की ओढवल्यावर कोण काय करणार?
पण या बाथवासीयांना हे चांगलंच माहीत होतं. ते मदतीसाठी सुली नावाच्या देवीकडे याचना करायचे. रोमन साम्राज्यातील या थंड, गरम पाण्याच्या आंघोळीचे तलावांचं ती रक्षण करायची. जखमी लोकांना बरं करण्यासाठी ओळखली जाणारी ही देवी सूड उगवण्यासाठीही प्रसिद्ध होती.
उत्खननादरम्यान तिच्या या तलावांमधून 100 हून अधिक प्राचीन शिळा सापडल्या होत्या, या शिळांवर लोकांनी निवेदनं लिहिलेली असायची. लोकांचं नुकसान करणाऱ्यांना, लोकांची मालमत्ता चोरणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी लोक साकडं घालायचे. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी या ठिकाणी देवीला साकडं घातलं जायचं.
लंडनमधील ब्रिटीश म्युझियममध्ये 'फेमिनाईन पॉवर' या प्रदर्शनात बऱ्याच देवतांसंबंधित कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात सुली ही देवता सुद्धा आहे.
हे भव्य प्रदर्शन आहे, जगभरातल्या विविध संस्कृतीतून या ठिकाणी चित्रं, कलाकृती आणल्या गेल्या आहेत. मानवी संस्कृतीचा हजारो वर्षांच्या इतिहासाची झलक येथे पाहायला मिळते.

फोटो स्रोत, Trustees of the British Museum
या प्रदर्शनात स्थानिक रोमन देवता मिनर्व्हा, सुली पासून ते इजिप्शियन देवता सेखमेट, हिंदू देवता काली, जपानी कॅनन आणि मेक्सिकन कोटलिकूपर्यंत सर्वजणी आहेत.
या प्रदर्शनात ज्या स्त्री देवता आहेत त्यांची उपासना ही त्यांच्यातील विरोधाभासी गुणांसाठी केली जात असल्याचं दिसतं. आणि हे खरंतर एक आश्चर्य आहे. ज्याप्रमाणे सुली या देवतेमध्ये लोकांना बरं करण्याचं सामर्थ्य आहे त्याचप्रमाणे तिच्यात सूड उगवण्याचं ही सामर्थ्य आहे.
अगदी तसंच प्राचीन मेसोपोटेमियातील इनाना ही देवता प्रणय आणि युद्ध अशा दोन्हींची देवता म्हणून ओळखली जाते. मेसोपोटेमियातील प्राचीन प्रार्थनांमध्ये इनानाचं वर्णन एक क्रूर देवता म्हणून करण्यात आलं आहे. ही देवता रणांगणावरील पुरुषांना मृत्यू देते जेणेकरून त्याचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत राहतील.
तर इतर हस्तलिखितांमध्ये, इनानाचं वर्णन लैंगिक शक्ती प्रदान करणारी देवता म्हणून करण्यात आलं आहे. सुमेरियन राजांनी या देवतेसंदर्भात आपल्या कल्पकतेचा वापर केला. सुमेरियन राजांनी ते इनानासोबत झोपतात अशी परिकल्पना रचली, ज्यामुळे त्यांना युद्धात तिचं संरक्षण प्राप्त होतं असा समज रूढ झाला. हा प्रकार म्हणजे इनानाची भीती काही प्रमाणात कमी करण्याचा एक मार्ग होता.
रोमन देवी व्हीनसने तर मोहकतेच्या मर्यादाचं ओलांडल्या.
पृथ्वीवर लिंगभेद ही एक सामाजिक मर्यादा होती. या सामाजिक मर्यादा ओलांडण्याची क्षमता या देवींमध्ये होती. आणि याचमुळे या देवता या इतर मर्त्य स्त्रियांपेक्षा मोठ्या ठरल्या. इनाना मध्ये अशी एक शक्ती होती की ज्यामुळे ती पुरुषांचं स्त्रियांमध्ये आणि स्त्रियांचं पुरुषांमध्ये रूपांतर करायची.

फोटो स्रोत, Trustees of the British Museum
त्यामुळे ती स्वतः सुद्धा एक पुरुष असावी अशी वंदता आहे. प्रोफेसर असणाऱ्या मेरी बियर्ड, या प्रदर्शनातील पाच अतिथी व्याख्यात्यांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये एक निरीक्षण नोंदवलं. त्याप्रमाणे, ग्रीक देवी अथेना ही बुद्धीची देवता आहे. पण तिच्याकडे "लष्करी गुण सुद्धा आहे. आणि तिचा हा गुणधर्म ग्रीकांच्या स्त्रियांबाबतीत ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्याच्याशी विसंगत आहे."
रोमन देवता असणाऱ्या व्हीनसने मोहकतेच्या स्वीकृत मर्यादा ओलांडल्या. इनाना प्रमाणेच तीने ही रणांगणावरील आणि शय्यागृहातील पुरुषांच्या हृदयात स्थान मिळवलं. मेरी बियर्ड सांगतात, "व्हीनस आणि न थांबणाऱ्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरचं रोमला लष्करी विजय मिळलाय."
ट्रोजन वॉरचा नायक, शरणार्थी, एनिअस हा व्हीनसचा मुलगा असल्याचं ग्रीक पुराणांमध्ये सांगितलं जातं. ज्युलियस सीझरने या एनिअसमार्फत तो व्हीनसचा वंशज असल्याचा दावा केला होता. त्याच्या काही नाण्यांवर व्हीनसला स्थान देण्यात आलं होतं.
त्यानंतर आलेल्या रोमन राज्यकर्त्यांनी देखील रोमन देवता या त्यांच्या अधिकार क्षेत्रात कशा राहतील हेच पाहिलं. वेलिंग्टन, नेपोलियन तसेच राणी एलिझाबेथ प्रथम यांच्या काळात मिनर्व्हाचं चित्रण करण्यात आलं.
पूर्वापार इतिहास बघता शक्तीशी संबंधित महिला व्यक्तिरेखा या पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांसाठी महत्त्वाच्या असतात ही कल्पनाचं मुळात फसवी आहे. इजिप्तमधील 18 व्या राजघराण्यातं अमेनहोटेप नावाचा एक फारोह होता. त्यावेळी इजिप्त मध्ये रोगराई पसरली होती.
त्या रोगराईपासून आणि प्लेगपासून बचाव व्हावा म्हणून त्याने नाईल नदीवरील आपल्या दफनमंदिरात सेखमेटची शिल्प तयार करवून घेतली. त्यापैकी काही शिल्प आजही टिकून आहेत. यातील काही शिल्प बनवण्याची जबाबदारी पुरुषांवर होती.
प्रदर्शनाच्या वस्तूंची देखरेख करणाऱ्या बेलिंडा क्रेरार यांनी बीबीसी कल्चरशी संवाद साधला. त्या सांगतात, "या वस्तू नेमक्या कोण बनवतं हे आम्हाला ही ठाऊक नसतं. त्या पुरुषांनी बनवल्या असतील असा अंदाज आम्ही लावतो.
पण प्रत्येक प्रकरणात हा अंदाज बरोबरच असला पाहिजे असं ही नसतं. आता तुम्ही बघाल, तर प्रदर्शनाच्या पहिल्या विभागात एक ब्राँझची थाळी आहे. ही थाळी बर्मिंगहॅममध्ये बनवलेली असून स्त्रियांनी ती सजवली आहे."
क्रूर पण तरीही आदरस्थानी
बऱ्याच देवता स्त्रियांच्या गर्भधारणेसाठी तसेच सुखरूप बाळंतपणासाठी साहाय्य देतात अशी मान्यता आहे. आता याउलट व्हावं म्हणून ही काही शक्ती अस्तित्वात होत्या. स्त्री शक्ती देवता या सामान्य स्त्रियांना मदत करण्यापेक्षा बऱ्याचदा त्यांच्या चिंतेचं कारण ठरतात.

फोटो स्रोत, PAce Gallery
सुमेरियन लोकांमध्ये एक लामाश्तू नावाची देवता आहे. तिचं डोकं सिंहाचं असून गाढवाचा जबडा आहे. ही देवी स्त्रिया बाळंत होत असताना बाळ चोरून नेण्यासाठी त्यांच्या घरात शिरते अशी मान्यता होती. मेक्सिकोमध्ये एक अफवा होती.
असं म्हटलं जायचं की, प्रसूतीच्या वेळी मरण पावलेल्या माता ज्यांना सिहुआटेटीओ म्हणजे "दैवी स्त्रिया" म्हटलं जातं, त्यांचे आत्मे अझ्टेक या वर्षात पाच दिवसांसाठी यायचे. आणि हे आत्मे नवजात बालकांना पाळण्यातून उचलून पसार व्हायचे. म्हणून लिलिथचं वर्णन अॅडमची पहिली पत्नी, बालमृत्यू आणि वंध्यत्व आणणारी म्हणून करण्यात आलं.
ज्या गोष्टीची भीती वाटते तशा प्रकारच्या देवता
समकालीन कलाकार किकी स्मिथने लिलिथचं एक शिल्प तयार केलं होतं. हे शिल्प प्रदर्शनातील एका भिंतीवर उंचावर ठेवण्यात आलं आहे. लिलिथचे भयंकर निळेशार डोळे तुम्हाला घाबरवतील.
मुळात बघायला गेलं तर मानवाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या भीतीचीच गहन अभिव्यक्ती म्हणजे या देवता होत्या. स्त्री देवतांच्या ज्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात त्या भीतीपोटी रचल्या गेल्या असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
या कथांमध्ये स्त्री शक्ती ही मानवी संकल्पनेचा मूळ असा भाग होती. सुरुवातीच्या बऱ्याच संस्कृतींमध्ये असं दिसतं की पृथ्वी स्वतः स्त्री असून ती देवतांच्या वर्तनाभोवती फिरते.
डेमीटर आणि पर्सेफोनची प्राचीन ग्रीक मिथक ही ऋतूंचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी वापरण्यात आली. या मिथकाप्रमाणे, डेमीटर पिकांचं संरक्षण करायची. एकदा डेमीटरच्या मुलीचं म्हणजेच पर्सेफोनचं हेड्स ऑफ अंडरवर्ल्डने अपहरण केलं. हे ऐकून डेमीटर शोकग्रस्त झाली. आणि या शोकातूनचं तिच्या संरक्षणाखाली असलेली पिकं जगावायला ती असमर्थ ठरली.
डाळिंबाच्या बियांच्या सेवन करून पर्सेफोन वर्षातील काही काळ अंधकारात गेली. जेव्हा ती स्वर्गात परतली तेव्हा तिच्या आईला प्रचंड आनंद झाला. याच आनंदात तिने वसंत ऋतु आणि त्याच्या फळांच्या आगमनाची घोषणा केली. अगदी असंच काहीसं हिंदू ग्रंथांमध्ये देखील लिहिलं आहे. देवी लक्ष्मीला जेव्हा त्रास झाला तेव्हा तिने पृथ्वी सोडली ज्यामुळे भूमीत अंतर्धान पावली असं वर्णन हिंदू पुराणात वाचायला मिळतात.
या कथांमध्ये स्त्री शक्ती ही मानवी संकल्पनेचा स्वाभाविक असा भाग होती. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार शिवाची पत्नी सती, तिच्या मृत्यूनंतर भौतिक विश्वाचा भाग बनल्याची मान्यता आहे.
तिचं शरीर विभागलं आणि ती शकले पृथ्वीवर पडली. तिच्या शरीराचा भाग असलेली योनी ज्या ठिकाणी पडली तिथेच म्हणजे आसाममध्ये कामाख्या मंदिराची कोनशीला रचली गेल्याची वदंता आहे. आजही पावसाळ्यात याठिकाणी उत्सव भरतो.
ज्या ठिकाणी उत्सव भरतो तिथं लोह ऑक्साईडची गळती होतं असते. त्यामुळे तिथं असलेल्या झऱ्याला नैसर्गिकरित्या लाल रंग प्राप्त होतो. देवीला जणू मासिक पाळी आली आहे या आश्चर्यात उपासक त्या लाल रंगाच्या वाहत्या झऱ्याकडे पाहतात.
या स्त्री देवतांच्या उपासनेच्या पद्धती महत्त्वाच्या आहेत. मात्र तरी पृथ्वीवरील स्त्री शासन का विनाशकारी आहे हे स्पष्ट करण्यासाठी पुरुषांनी स्त्री देवतांना त्यांच्या मानवी समकक्षांपेक्षा अधिक शक्ती प्रदान केल्या आहेत.
इजिप्शियन सेखमेट तिच्या जीवनदान देणार्या क्षमतेसाठी ओळखली जाते. अगदी त्याचप्रमाणे श्रीलक्ष्मी आणि डेमेटर यासुद्धा याचं प्रकारात मोडणाऱ्या स्त्री देवता आहेत. पण जसं त्या जीवन देऊ शकतात तसाच त्या विनाश ही घडवू शकतात.
असं म्हटलं जातं की जेव्हा सेखमेटचे वडील सूर्यदेव असणाऱ्या रा यांच्या विरुद्ध नश्वरांनी बंड केलं होतं तेव्हा तिला पृथ्वी लुटण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. सेखमेटने तिला अगदी सांगितल्याप्रमाणेचं केलं. पण पृथ्वी लुटता लुटता ती रक्तपिपासू बनली.
तिच्या या रक्तपिपासू वृत्तीची तिच्या वडिलांना इतकी लाज वाटली की त्यांनी तिला परत बोलावलं. पण सेखमेट काही ऐकणाऱ्यातली नव्हती. तिला थांबवण्यासाठी म्हणून तिच्या वडिलांनी तिला रक्त भासवून मद्य प्राशन करायला लावलं. जेणेकरून ती खूप मद्यपान करेल आणि मदोनम्त होईल.
आजही, सत्तेत असलेल्या स्त्रियांबद्दल जितका आदर दाखवला जातो तितकीच त्यांच्या बद्दल भीती बाळगली जाते. यातूनच त्यांच्या यशात, त्यांच्या शिखरावर जाण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण केला जातो. भूतकाळातील उदाहरणांवरून काहीही दिसो पण पुरुषीवृत्तीचा अपेक्षाभंग करत अधिकार स्थानावर असलेल्या महिला व्यक्तिरेखा नेहमीचं उठून दिसतात. यामुळेच त्यांची सर्वव्यापी विद्वत्ता काही वेळा लोकांना खोटी वाटते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























