भारतात कमाल तापमानात कशी झाली वाढ? उष्णतेच्या लाटांबाबतचं संशोधन काय सांगतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
वाढत्या तापमानाची झळ गेले काही दिवस सगळ्यांनाच बसते आहेत. ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेबाबत इशाराही देण्यात आला आहे. पण ही उष्णतेची लाट काही तात्कालिक गोष्ट नाही.
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीबद्दल अनेकदा बोललं जातं. त्यावर उपाय काय याची चर्चा होते. मात्र या हवामान बदलाचे थेट परिणाम आता दिसायला लागले आहेत.
याचाच परिणाम म्हणजे देशभरात उष्णतेच्या लाटेचे हॉटस्पॉट तयार होत आहेत.
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी अर्थात आयआयटीएमच्या (IITM) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्णतेची लाट म्हणजे असामान्य उष्ण हवामानाचा असा कालावधी जो साधारणपणे दोन किंवा अधिक दिवस टिकतो.
उष्णतेची लाट मानली जाण्यासाठी, त्या विशिष्ट भागातील तापमान ऐतिहासिक सरासरीपेक्षा जास्त असणे आवश्यक असते.
संशोधन काय?
आयआयटीएमच्या शास्त्रज्ञ बी पद्माकुमारी, श्रावणी बॅनर्जी आणि एम व्ही रमणा यांनी हे संशोधन केलं आहे.
त्यांनी यात 1981 पासून 2020 पर्यंतच्या तापमान वाढीचा आणि उष्णतेच्या लाटांचा अभ्यास केला आहे. या संशोधनानुसार भारतात कमाल तापमानात साधारण 1.0±0.12 ° सेल्सियसची वाढ झाली आहे.
हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचं नोंदतानाच ही वाढ आकड्यात 1 अंशाची दिसत असली तरी त्याचा परिणाम मोठा दिसत असल्याचं शास्त्रज्ञ नोंदवतात.
यामध्ये साधारणपणे दर दशकाला 0.26 ± 0.03 °C अशी वाढ होत गेली आहे. मात्र एकविसावं शतक सुरू होताना एकूण 0.5 °C अंशाची वाढ झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
तर 1981 च्या तुलनेत 2020 मध्ये 1.0 °C (1.04 ± 0.12 °C) ची वाढ दिसत आहे. या वाढीला मानवजन्य कारणं म्हणजेच शहरीकरण, वृक्षतोड अशा बाबी कारणीभूत ठरत असल्याचं शास्त्रज्ञ नोंदवतात. यात मान्सून पूर्व काळात कमाल तापमानात सर्वाधिक बदल दिसल्याचं हे संशोधन नोंदवतं.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना शास्त्रज्ञ पद्माकुमारी यांनी सांगितलं की ," एका अंशाची वाढ ही आकडेवारीत जरी कमी दिसत असली तरी त्याचा परिणाम हा उष्णतेच्या लाटांवर दिसतो.
या वाढीमुळे उष्णतेच्या लाटा या वारंवार, मोठ्या कालावधीसाठी आणि अधिक तीव्र होताना दिसतात. याचा परिणाम आरोग्यासह पाण्याची मागणी वाढण्यापासून पिकांवर ताण येण्यापर्यंत अनेक गोष्टींवर होतो."
उष्णतेच्या लाटांचा परिणाम कुठे दिसतोय?
उष्णतेच्या लाटेतल्या या तापमानाचा त्रास पूर्वी उत्तर भारतात प्रामुख्याने जाणवायचा. मात्र आता देशातल्या इतर भागातही याची झळ बसायला लागल्याचं हे संशोधन नोंदवतं. आकडेवारी नुसार जम्मू कश्मिर मध्ये कमाल तापमानात मोठी वाढ दिसून येते.
मात्र तिथलं मुळातलं तापमान कमी असल्यामुळे तिथल्या मानववस्तीला त्याचा धोका दिसत नसल्याचं संशोधन नोंदवतं.
अर्थात माणसांना नसला तरी इथल्या पर्वतीय परिसंस्थांना याची झळ बसत असल्याचं संशोधनात मांडलं गेलं आहे.
या संशोधनानुसार उत्तर भारतासह आता मध्य भारतातही उष्णतेच्या लाटा दिसत आहेत. उत्तर पश्चिमेतील राज्यांच्या बरोबरीने द्वीकल्पीय भागातही कमाल तापमानात वाढ दिसते.
त्यातच आता दक्षीणेकडच्या राज्यांचीही भर पडली आहे. दक्षिणेकडील राज्यात कमाल तापमानात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाल्याचं आकडेवारी दर्शवते.

यात प्रामुख्याने महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश मध्ये उष्णतेच्या लाटांचा परिणाम दिसत आहे. या भागात दरवर्षी साधारण अडीच ते पाच दिवस कमाल तापमानात वाढ होऊन उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.
पश्चिम बंगालचा किनारपट्टीचा भाग, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या भागात सर्वाधिक तापमानाचा फटका बसत असल्याचं दिसतं.
या भागात शहरीकरणाचा वेग जास्त असल्यानं आणि 2050 पर्यंत साधारण देशातील 50% लोक शहरात रहायला येतील असा अंदाज असल्यानं याचा मोठा परिणाम जाणवेल असं संशोधन मांडतं. वाढत्या तापमानाचा परिणाम ज्येष्ठ नागरिक आणि पाच वर्षांखालील मुलांवर जास्त जाणवेल.
कालावधीतही वाढ
संशोधनातील आकडेवारीनुसार 1981 ते 1990 दरम्यान उष्णतेच्या लाटांचा कालावधी साधारण 1 ते 4 दिवसांचा असायचा. याचा परिणाम मध्य आणि उत्तर भारतात प्रामुख्याने दिसायचा.
या काळात इथलं तापमान साधारण 47 अंश सेल्सियस पर्यंत गेल्याचीही नोंद आढळते.
2001 ते 2010 च्या दरम्यान उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणाऱ्या भागाची व्याप्ती तर वाढलीच शिवाय त्याचा कालावधी देखील 2-4 दिवस ते 4-6 दिवसांपर्यंत गेला.
द्वीकल्पीय भागात काही वेळा साधारण 6-8 दिवसांसाठीही उष्णतेची लाट निर्माण झाल्याचं संशोधनातली आकडेवारी दर्शवते.

फोटो स्रोत, BBC/Surabhi Shirpurkar
यात 2011–2020 च्या दशकात आणखी वाढ झाली. सध्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम वर्षाकाठी 4-10 दिवसांपर्यंत जाणवत आहे.
तसंच त्याची व्याप्ती वाढून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात त्याचा परिणाम सर्वाधिक दिसत असल्याचं नोंदवलं गेलं आहे. इथं वर्षाकाठी 8 ते 10 दिवस उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवतो.
यात तापमानवाढही नोंदवली गेली असून कमाल तापमान 47 ते 50 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचत असल्याचं दिसत आहे.
एल निनोचा परिणाम
यंदा पावसाळ्यावर एल निनोचं सावट असेल असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
या अभ्यासावरून दिसतंय की एल निनोचा परिणाम ज्या वर्षांमध्ये दिसला त्या वर्षांमध्ये तापमानातही साधारण 1.03±0.44 °C ची वाढ दिसली.
यावरून असे दिसून येते की जागतिक तापमानवाढीमुळे उष्णतेच्या लाटांच्या तीव्रतेत एकूण वाढ झाली असली तरी, अलीकडच्या दशकांमध्ये (2001-2020) एल निनो घटनांनी अतिरिक्त तापमानवाढीचा प्रभाव पाडला आहे, त्यामुळं तीव्र उष्णतेची परिस्थिती आणखी वाढली आहे.
यातील बराचसा बदल गेल्या दोन दशकांत घडला आहे, म्हणजेच 2001 ते 2020 या कालावधीत तापमान वाढीचा वेग वाढला आहे.
भारतात 1970 ते 2019 या काळात एकूण 706 हून अधिक उष्णतेच्या लाटा आल्या. 1970 दरम्यान वर्षाकाठी साधारण 3 वेळा उष्णतेची लाट जाणवत होती. ते प्रमाण 2020 पर्यंत वर्षाकाठी सुमारे 25 पर्यंत वाढलं आहे.
भारतातील उष्ण लहरींची वारंवारता, एकूण कालावधी आणि कमाल कालावधी वाढला आहे. तसंच त्यांच्या भौगोलिक व्याप्तीमध्येही लक्षणीय बदल झाले आहेत. भविष्यात भारतातील उष्ण लहरींची वारंवारता आणि तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.
महत्वाचं म्हणजे, 2015 ते 2025 पर्यंत, प्रत्येक वर्ष हे आता पर्यंतच्या 10 सर्वात उष्ण वर्षांमध्ये गणले गेले.
या अभ्यासानुसार दक्षिण आशियामध्ये विशेषत: भारतात 1960 पासून उष्ण दिवसांची आणि उष्ण रात्रींची वारंवारता वाढली आहे.
वाढते हॉटस्पॉट
या संशोधनादरम्यान अशी ठिकाणं ओळखण्यासाठी हॉटस्पॉट इंडेक्स तयार करण्यात आला. यात भारतातील उष्णतेच्या लाटेचा परिणाम होणाऱ्या हॉटस्पॉट क्षेत्रांची नोंद करण्यात आली.
या हॉटस्पॉट पैकी मध्य भारतात सातत्याने उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो.
तसंच पश्चिम भारतात विशेषत महाराष्ट्रात तसंच दक्षिणेकडील द्वीपकल्पीय राज्ये, ज्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश आहे इथेही हा परिणाम दिसायला लागल्याचं नोंदवलं गेलं आहे.

याशिवाय इंडो गँगेटीक भागातील मैदानी प्रदेश, ज्यात उत्तर भारताचा मोठा भाग समाविष्ट आहे हा देखील हॉटस्पॉट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे.
आकडेवारी दर्शवते की गेल्या काही वर्षांमध्ये देशात तापमानवाढीचा परिणाम जाणवणाऱ्या भारात दीड पटीने वाढ झाली आहे. उष्णतेच्या हॉटस्पॉट्सच्या भौगोलिक विस्तार तो 1981-2000 मध्ये 11,90,000 चौरस किमी होता तो आता 2001-2020 मध्ये 18,10,000 चौरस किमी पर्यंत पोहोचला आहे.
कारणे काय
तापमान वाढीसाठी वृक्षतोड, जंगल नष्ट होणे आणि शहरीकरण यामुळे हा परिणाम दिसत असल्याचं संशोधक नोंदवतात. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 2050 पर्यंत यात दुप्पट ते तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.
हॉटस्पॉट इंडेक्स
कोणत्या भागात हा परिणाम सर्वाधिक जाणवतो हे शोधण्यासाठी या संशोधनात हिटवेव्ह हॉटस्पॉट इंडेक्स तयार करण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटांचा हॉटस्पॉट निर्देशांक (HHI) हा, कालांतराने उष्णतेच्या लाटा कुठे अधिक काळ टिकून राहत आहेत हे ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे.
केवळ एका घटकाचा विचार करण्याऐवजी, HHI उष्णतेच्या लाटांच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंचा एकत्रितपणे विचार करतो, जसे की त्या किती वेळा येतात, किती काळ टिकतात, त्यांची तीव्रता किती असते आणि त्यांचा परिणाम किती मोठ्या क्षेत्रावर होतो.
ही सर्व माहिती एकाच निर्देशांकात एकत्रित केल्यामुळे, ज्या प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटांची परिस्थिती सर्वात तीव्र आणि बिघडत चालली आहे, ते प्रदेश अचूकपणे ओळखणे सोपे होते. धोरणकर्त्यांसाठी, HHI हे निर्णय-सहाय्यक साधन म्हणून काम करू शकते.
उष्णता कृती योजना, आरोग्यसेवा सज्जता आणि शहरी शीतकरण धोरणे यांसारख्या उपाययोजनांची तातडीने गरज असलेल्या उच्च-जोखीम असलेल्या प्रदेशांना ओळखण्यास ते मदत करते.

फोटो स्रोत, BBC/Surabhi Shirpurkar
परिणाम आणि उपाययोजना
दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि अधिक वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याचे धोके लक्षणीयरीत्या वाढतात, विशेषतः वृद्ध, मुले आणि घराबाहेर काम करणारे मजूर यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
पद्माकुमारी म्हणाल्या, "आमच्या अभ्यासात आम्ही घराबाहेर काम करणाऱ्या मजुरांचा समावेश केला कारण ते सर्वाधिक प्रभावी होतात. दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेमुळे उत्पादकता कमी होऊ शकते, आरोग्याचे धोके वाढू शकतात आणि कामाचे तास मर्यादित होऊ शकतात."
"शेतीमध्ये, वाढत्या तापमानामुळे पिकांवर ताण येऊ शकतो आणि उत्पन्न घटू शकते, तर शहरी भागांमध्ये, उष्णतेच्या लाटांमुळे ऊर्जेची मागणी, पाण्याची टंचाई आणि पायाभूत सुविधांवरील दबाव वाढतो असं दिसलं"

फोटो स्रोत, Getty Images
याच बाबी लक्षात घेऊन सरकारने नियोजन करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
पद्माकुमारी म्हणाल्या, "आमच्या अभ्यासानुसार, उष्णतेच्या लाटेची केंद्रे नवीन प्रदेशांमध्ये, विशेषतः द्वीपकल्पीय भारतात, पसरत आहेत.
याचा अर्थ असा की, केवळ पूर्वी प्रभावित झालेल्या भागांवर अवलंबून राहण्याऐवजी, उष्णता कृती योजना अद्ययावत, प्रदेशनिष्ठ आणि अधिक सक्रिय असणे आवश्यक आहे."
"महत्त्वाचे म्हणजे, या योजनांमध्ये बाहेर काम करणाऱ्या कामगारांचाही स्पष्टपणे समावेश करून त्यांचे संरक्षण केले पाहिजे, कारण दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने ते सर्वाधिक असुरक्षित असतात.
या बरोबरच तापमान कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही विचार धोरणकर्त्यांनी करायला हवा."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























