'बॉन्डेज सेक्स' पद्धतीने प्रियकराची हत्या? महिलेला अटक, पोलीस तपासात धक्कादायक माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बंगळुरूहून बीबीसीसाठी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
(इशाराः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)
एकत्रित 'चांगला वेळ घालवू' असं सांगून आपल्या प्रियकराला घरी बोलावलं. त्यानंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिल्याचा एका महिलेवर आरोप आहे. या घटनेत त्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमा आणि किरण हे दोघेही एका मोबाइल सर्व्हिस कंपनीत एकत्र काम करत होते. त्याठिकाणीच त्यांची मैत्री झाली आणि सुमारे एका वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
बंगळुरूचे (उत्तर-पश्चिम) पोलीस उपायुक्त नागेश डीएल यांनी बीबीसीला सांगितलं की, "किरण तिला टाळत आहे, असं प्रेमाला वाटत होतं. पण खरं कारण चौकशीनंतरच समजू शकेल."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमा हिने किरणला बायदरहल्ली पोलीस ठाणे हद्दीतील अंजन नगर येथील आपल्या घरी बोलावलं होतं. त्या वेळी तिची आई आणि भाऊ कामाला गेले होते.
किरण घरी येताच प्रेमाने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्याचे हात बांधले आणि त्याचे कपडे काढले. त्यानंतर त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलीस हे प्रकरण 'पूर्वनियोजित हत्या' मानत आहेत. संशयित महिलेने ही घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली होती का? असं पोलिसांना विचारण्यात आलं. त्यावेळी उपायुक्त नागेश यांनी 'या घटनेचा कोणताही व्हीडिओ उपलब्ध नसल्याचे' स्पष्ट केले आहे.
एका छोट्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घराला आग लागली. शेजाऱ्यांनी बादल्यांतून पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात न आल्याने त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावलं.
किरणने आत्महत्येचा प्रयत्न केला, असं सुरुवातीला पोलिसांना सांगण्यात आलं. पण आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे हत्येचं प्रकरण असल्याचं स्पष्ट केलं.
किरणचे वडील नरसिम्हा हे तुमकूर जिल्ह्यातील चिक्कनायकनहळ्ळी मधील त्यांच्या गावातून येणार होते, त्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
किरणला प्रेमाबरोबर लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे प्रेमाने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
मुलाला खूप प्रेमाने वाढवलं होतं, असं नरसिम्हा यांनी पत्रकारांना सांगितलं.
ते म्हणाले, "मी त्याला कधीही मारलं नाही. तो त्याचं भविष्य चांगलं घडवेल या आशेनं आम्ही त्याला बंगळुरूला पाठवलं होतं."
बीडीएसएम म्हणजे काय आणि ते असुरक्षित का मानलं जातं?
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ही हत्या बीडीएसएमशी (BSDM) संबंधित असू शकते असा संशय व्यक्त केला आहे. या हत्येनंतर लोक इंटरनेटवर 'बॉन्डेज सेक्स'बद्दल शोध घेत आहेत.
पुरुष किंवा महिलेला बांधून ठेवणे हा लैंगिक वर्तनाचा एक भाग मानला जातो, ज्याला बीडीएसएम (बॉन्डेज, डिसिप्लिन, डॉमिनन्स, सबमिशन, सॅडिझम आणि मॅसोचिझम) म्हटलं जातं.
यामध्ये दोन्ही बाजूंच्या सहमतीने, कल्पनांवर आधारित भूमिका साकारून केल्या जाणाऱ्या लैंगिक वर्तनाचा समावेश असतो.
हा विषय हॉलिवूड चित्रपट 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' नंतर अधिक चर्चेत आला.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी तमिळनाडूच्या होसूर येथील एका प्रकरणात एका जिम ट्रेनरने पोलिसांना सांगितलं होतं की, 'बॉन्डेज सेक्स' दरम्यान त्याच्या पत्नीच्या नाकातून रक्त येऊ लागलं, त्यानंतर तो तिला रुग्णालयात घेऊन गेला.
मात्र पोलीस तपासात त्याने पत्नीचे हात-पाय बांधून कपड्याने तिचा गळा दाबल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.
माहितीनुसार, पती जिम चालवत होता, तर पत्नी प्ले-स्कूल चालवत होती.
जावई हुंड्यासाठी त्यांच्या मुलीचा छळ करत असे. याच कारणामुळे दोघांमध्ये भांडण होत असत, असा आरोप मृत पत्नीच्या वडिलांनी केला होता. त्यांना दोन मुलंही आहेत.
जगभरातील अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असा दावा करतात की, मृत्यू बीडीएसएम दरम्यान झाला. मात्र पोलीस तपासात अनेकदा हा बचाव खोटा ठरतो.
अशा प्रकरणांना आता 'फिफ्टी शेड्स डिफेन्स' असंही म्हटलं जाऊ लागलं आहे.
भारतामध्ये हत्या प्रकरणे साधारणपणे फायद्यासाठी केलेली हत्या, घरगुती हिंसाचार किंवा हुंड्याच्या मागणीसारख्या प्रकारात वर्गीकृत केली जातात. बीडीएसएमच्या आधारावर त्यांची नोंद सहसा केली जात नाही.
बहुतेक प्रकरणांमध्ये हा मुद्दा तपासादरम्यान समोर येतो आणि तिथेच तो फेटाळला जातो. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बीडीएसएम हे 'असुरक्षित आणि असामान्य' आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























