अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी अटक झालेला ऋतिक कुमार कोण आहे?

फोटो स्रोत, Sanyukta Devi
- Author, सीटू तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
बिहारमधील बेगुसराय शहरातील साधंसुधं दिसणारं एक घर सध्या चर्चेत आहे.
शहरातील डुमरी मोहल्ल्यात असलेलं हे घर सुमारे 600 चौरस फुटांचं आहे. या घराजवळून जाणारे लोक आता कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात.
खरं तर, हे घर ऋतिक कुमार ऊर्फ रोशन याचं आहे.
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी ऋतिक कुमार हा एक आहे.
या प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
19 ऑक्टोबरला ऋतिक कुमारला अटक करण्यात आली, तेव्हा त्याची आई संयुक्ता देवी यांनी त्याला आपला मुलगा मानण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर अटक झालेला ऋतिक कुमार हाच आपला मुलगा असल्याची त्यांनी पुष्टी केली.
कोण आहे ऋतिक कुमार?
ऋतिक कुमार हा मूळचा बेगुसरायमधील मटिहानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बदलपुरा गावचा रहिवासी आहे.
सुमारे 15 वर्षांपूर्वी ऋतिकचं कुटुंब मटिहानीहून बेगुसराय शहरात आलं. येथे त्यांनी पिपरा नामक परिसरात लिट्टी-समोसे विकण्याची एक छोटीशी हातगाडी सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक छोटं दुकान सुरू केलं. या दुकानात साड्या आणि हिंदू देवी-देवतांच्या पूजेसाठी वापरले जाणारे कपडे विकले जातात.
ऋतिकच्या वडिलांचं नाव रामू महतो, तर आईचं नाव संयुक्ता देवी आहे. या दाम्पत्याला ऋतिक, त्याचा धाकटा भाऊ आणि एक बहीण अशी 3 मुलं आहेत. बहिणीचं लग्न झालं आहे.
रामू महतो लिट्टी-समोस्यांचं दुकान चालवतात, तर त्यांची पत्नी संयुक्ता देवी कपड्यांचं दुकान सांभाळतात.

फोटो स्रोत, Sanyukta Devi
सुमारे 2 वर्षांपूर्वी या दाम्पत्याने बेगुसराय शहरातील डुमरी मोहल्ल्यात एक घर बांधलं. मात्र, या घराला अद्याप रंगरंगोटी करण्यात आलेली नाही.
रामू महतो यांच्या एका शेजाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, "ऋतिक साधारण 22 वर्षांचा आहे. तो 2 वर्षांपूर्वीच येथून दिल्लीला गेला होता. त्याला स्टायलिश राहायला आवडायचं."
"तो केस वाढवायचा, जिममध्ये जायचा आणि अंगावर टॅटू काढण्याची त्याला हौस होती. काही दिवस त्याने वडिलांच्या दुकानात काम केलं. मात्र, नंतर तो दिल्लीत कुठेतरी स्वयंपाकाचं काम करू लागल्याचं समजलं."
'माझा मुलगा स्वयंपाकी आहे, त्याला फसवलं जातंय'
ऋतिकला अटक झाल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी त्याची आई संयुक्ता देवी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ऋतिकला ओळखण्यास नकार दिला होता.
स्थानिक पत्रकार सुरेंद्र किशोरी यांनी बीबीसीला सांगितलं, "सुरुवातीला त्यांनी ऋतिक आपला मुलगा असल्याचं नाकारलं होतं. मात्र, नंतर कोटा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना फोन केला. त्यानंतर अटक झालेला तरुण आपलाच ऋतिक असल्याची त्यांना खात्री पटली. "
"त्या सातत्याने आपली विधानं बदलत आहेत. अटकेनंतर आम्ही पहिल्यांदा त्यांच्या दुकानात गेलो, तेव्हा रामू महतो अर्धा तास तिथे होते. मात्र, त्यानंतर ते गायब झाले. आता ऋतिकची आईच माध्यमांसमोर येत आहेत."

फोटो स्रोत, Sanyukta Devi
बीबीसीचा संयुक्ता देवी यांच्याशी थेट संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र, त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला आहे.
संयुक्ता देवींनी स्थानिक पत्रकारांना सांगितलं, "ऋतिक काही महिन्यांपूर्वी दिल्लीहून मुंबईला आला होता. तिथेही तो स्वयंपाकाचं काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने घरातून सेकंडहँड दुचाकी खरेदी करण्यासाठी 40 हजार रुपये घेतले होते. तो ऑगस्ट महिन्यात बेगुसरायला आला होता आणि 1 ऑक्टोबरला परत गेला. त्याचे केस खूप लांब होते. मात्र, नवस फेडण्यासाठी त्याने मुंडन केलं होतं."
संयुक्ता देवी यांनी स्थानिक माध्यमांना असंही सांगितलं की, ऋतिक कुमारचं एका तरुणीवर प्रेम होतं आणि दोघांनाही लग्न करायचं होतं. मात्र, त्या तरुणीच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं.
त्या म्हणाल्या, "माझ्या मुलाला गोवण्यात येत आहे. माझा मुलगा शिकलेला आहे. तो कोणाचा जीव घेऊ शकत नाही किंवा कोणावर गोळीबारही करू शकत नाही."
रॅपिडोचं स्पष्टीकरण
संयुक्ता देवी यांच्या म्हणण्यानुसार, ऋतिक कुमार स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मात्र, ऋतिक रॅपिडोची दुचाकीही चालवत होता.
ऋतिकला अटक झाल्यानंतर रतनपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांचं एक पथक त्याच्या घरीही गेलं होतं. रतनपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी गणेश शंकर यांनी बीबीसीला सांगितलं, "संयुक्ता देवी यांना आपला मुलगा रॅपिडो चालवतो, याची माहिती नाही."

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, रॅपिडोने 19 ऑक्टोबरला एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवेदन प्रसिद्ध करून ऋतिकबाबत माहिती दिली.
या निवेदनानुसार, "ऋतिक 14 ऑक्टोबरपासून रॅपिडो कॅप्टन (दुचाकी चालक) म्हणून सक्रिय नव्हता. मात्र, घटनेच्या दिवशी म्हणजेच 18 ऑक्टोबरला त्याने ग्राहक म्हणून रॅपिडोच्या सेवेचा वापर केला होता."
स्थानिक माध्यमांमध्ये ऋतिक कुमारच्या सोशल मीडिया अकाउंटचीही चर्चा सुरू आहे.
प्रभात खबर या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, "ऋतिकचे मित्र सांगतात की, तो आपल्या लूक, व्यक्तिमत्त्व आणि फिटनेसबाबत जागरूक होता. सोशल मीडियावर त्याचे हेवी वर्कआउट करतानाचे टॅटू दाखवतानाचे आणि बीएमडब्ल्यूसोबतचे व्हीडिओ चर्चेत आहेत. मात्र, त्याचं हे चित्र त्याच्या वास्तविक आर्थिक परिस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं."
नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर रविवारी, 18 ऑक्टोबरला संध्याकाळी मुंबईत अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत त्याचा चालक जखमी झाला.
मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात, जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गोळीबाराची घटना घडली. मुंबईच्या पश्चिम विभाग-2 चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) मोहित गर्ग यांनी टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला होता.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, या गोळीबारात 2 जण जखमी झाले होते. त्यात टायगर श्रॉफचा फिरदौस नावाचा चालकही होता. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली होती. या हल्ल्यात टायगर श्रॉफला गोळी लागली नव्हती.

फोटो स्रोत, ANI
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राजस्थानमधील कोटा येथून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. नंतर मुंबई पोलीस त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला घेऊन आले. या तिन्ही आरोपींपैकी ऋतिक कुमार हा एक आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
टायगर श्रॉफचे वकील अजिंक्य मिरगल यांनी माध्यमांना सांगितलं की, तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)































