एल निनो : भारतातील शेतीपासून जपान-चीनमधील चक्रीवादळांपर्यंत; 'हे' आहेत 5 मोठे परिणाम

फोटो स्रोत, EPA
- Author, सारा कीथ-लुकास
- Role, मुख्य हवामान प्रेझेंटर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
गेल्या काही महिन्यांपासून एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्याचा जागतिक हवामानावरही मोठा परिणाम दिसू लागला आहे.
एल निनोमुळे हवामानातील अत्यंत टोकाच्या घटनांची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, इंडोनेशिया, भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे.
जागतिक हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, 'एल निनो'चा हा विक्रमी प्रभाव आणखी वाढणार असून तो किमान 2027 पर्यंत कायम राहू शकतो.
जगभरामध्ये एल निनोचे परिणाम आधीच जाणवू लागले आहेत. त्याचे 5 प्रमुख परिणाम जाणून घेऊया.
1) 2015 नंतरच्या सर्वात भीषण वणव्यांचा सामना करणारा इंडोनेशिया
एल निनोच्या वर्षांमध्ये इंडोनेशियात सामान्यतः उष्णता वाढते आणि हवामान कोरडे राहते. त्यामुळे सध्या इंडोनेशियामध्ये 2015 नंतरचे सर्वात भीषण वणवे लागले आहेत.
या वर्षी जानेवारीपासून इंडोनेशियामध्ये किमान 8 लाख 95 हजार 657 हेक्टर जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. हे क्षेत्रफळ ग्रेटर लंडनच्या जवळपास 6 पट मोठं आहे.
एल निनोचा प्रभाव नसलेल्या गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा आगीत जळालेलं क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त आहे.
या वणव्यांमुळे इंडोनेशियात शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्याशिवाय, रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
सुमात्रा आणि कालीमंतानमधील लाखो लोकांना या आगींमुळे पसरलेल्या विषारी धुराचा त्रास झाला आहे. या धुरामुळे साधारण 1 लाख 75 हजार लोकांना श्वसनाचे विकार झाले आहेत.
खोकला, ब्राँकायटिस आणि न्यूमोनियासारख्या गंभीर आजारांच्या 40 हजारांहून अधिक रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
2) 'पूर्व पॅसिफिक'मध्ये चक्रीवादळे वाढली
एल निनोमुळे पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये चक्रीवादळांची तीव्रता वाढते. यंदा या भागात चक्रीवादळांची हालचाल आतापर्यंत बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे.
आतापर्यंत या भागात एकूण 22 वादळांना नावं देण्यात आली आहेत. त्यापैकी 12 चक्रीवादळे (हरिकेन्स) होती, तर 10 चक्रीवादळे अतिशय शक्तिशाली होती.
चक्रीवादळांची ही आकडेवारी एका वर्षातील सरासरी संख्येपेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे, चक्रीवादळांचा हंगाम संपायला आणखी 2 महिने बाकी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
एल निनोमुळे समुद्राचे तापमान वाढते आणि वातावरणाच्या वरच्या थरातील वारे मंदावतात, कमकुवत होतात. त्यामुळे वादळांना जास्त ताकद मिळणं सोपं जातं.
एल निनोमुळे समुद्राचं पाणी खूप गरम किंवा उबदार झाल्याने पोलो चक्रीवादळाची ताकद वेगानं वाढली. या वादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 285 किलोमीटरपर्यंत पोहोचला.
पोलोबरोबरच ओडॅलिस आणि नोलो ही आणखी 2 चक्रीवादळेही त्याचवेळी पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये सक्रिय होती.
विशेष म्हणजे, एका महिन्याच्या कालावधीत असं दोनदा घडलं आहे.
यापूर्वी सप्टेंबरमध्येही समुद्राचे पाणी खूप गरम झाल्यामुळे मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरात लोवेल, करिना आणि मेरी ही तीन चक्रीवादळे एकाच वेळी तयार झाली होती.
यापूर्वी 2015 मध्ये पॅसिफिक महासागरात एकाच वेळी 3 चक्रीवादळे तयार झाली होती.
3) अटलांटिक महासागरात यंदा चक्रीवादळे कमी
याउलट, अटलांटिक महासागरात चक्रीवादळांची हालचाल खूपच कमी आहे. म्हणजे हा महासागर शांत राहिला आहे.
एल निनोमुळे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये वाऱ्यांचा वेग आणि दिशा बदलण्याचे (विंड शीअर) प्रमाण वाढते. त्यामुळे वादळे कमकुवत होतात आणि नवीन वादळे तयार होण्याची शक्यता कमी होते, त्यावर मर्यादा येते.
आयसेस हे एकमेव चक्रीवादळ अमेरिकेतील फ्लोरिडा पॅनहँडल आणि अलाबामा किनारपट्टीवर धडकलं आहे.
उपग्रहांद्वारे हवामानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून (1960 च्या दशकापासून), सर्वात उशिरा तयार झालेलं हे पहिलंच चक्रीवादळ आहे.
यापूर्वी 2002 आणि 2013 मध्ये 11 सप्टेंबरला चक्रीवादळ तयार होण्याचा सर्वात उशिराचा विक्रम नोंदवला गेला होता.
एका सामान्य वर्षात आतापर्यंत 10 वादळे, 5 चक्रीवादळे आणि 2 अतिशक्तिशाली चक्रीवादळे तयार झालेली असतात.
परंतु, यंदा आतापर्यंत केवळ 8 उष्णकटिबंधीय वादळे आली आहेत. त्यांची नावे आर्थर, बर्था, क्रिस्टोबल, डॉली, एडुवर्ड, फे, गोन्झालो आणि हॅना अशी आहेत.
4) पावसाचे प्रमाण घटल्याने भारतातील शेतीला धोका
भारतातही हवामान कोरडे आणि उष्णता वाढली असून पाऊस कमी झाला आहे. शेतीसाठी महत्त्वाचा असलेला मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा 13 टक्क्यांनी कमी झाला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, पावसातील ही घट अजूनही 'सामान्य' श्रेणीत आहे. परंतु, देशभरात सर्वच ठिकाणी सारखा पाऊस पडलेला नाही. तफावत मोठी आहे. त्यामुळे पावसाची सरासरी आकडेवारी संपूर्ण चित्र स्पष्ट करत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मध्य भारतात अपेक्षेप्रमाणे जवळपास सामान्य पाऊस झाला. पण, पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा 26 टक्के कमी पाऊस पडला. त्यामुळे या भागांना 'अत्यंत कमी पावसाचा' (असाधारण) सामना करावा लागला. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही सरासरीपेक्षा 24 टक्क्यांनी कमी पाऊस झाला.
महत्त्वाचं म्हणजे, जिथे पाऊस सरासरीच्या जवळपास झाला, तिथेही तो मान्सूनमध्ये नेहमीप्रमाणे नियमित पडला नाही. कधी बराच काळ पाऊस पडलाच नाही म्हणजे मोठा खंड पडला, तर कधी अतिवृष्टी झाली.
यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्याचा धोका वाढतो आणि शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढतात.
भारतात मान्सूनवर अनेक हवामान घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे मान्सूनमधील बदलांसाठी केवळ एल निनोच जबाबदार नसावा, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
5) पूर्व चीन आणि जपानला शक्तिशाली चक्रीवादळांचा तडाखा
पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागातही यंदा वादळे अधिक सक्रिय आहेत. पूर्व चीन आणि जपानमध्ये मेसॅक आणि दुजुआन यांसारख्या वादळांमुळे अलीकडे मोठ्या प्रमाणावर पूर आले आणि भूस्खलन झाले.
जपानच्या हवामान विभागानुसार, यंदा पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये आतापर्यंत 10 उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार झाली आहेत. 1966 नंतरच्या कोणत्याही वर्षात एका हंगामातील चक्रीवादळांची ही सर्वाधिक संख्या आहे.
एल निनोच्या काळात, पॅसिफिक महासागराचे पाणी गरम झाल्यामुळे वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होतो. परिणामी, चक्रीवादळे जपान आणि पूर्व चीनपासून दूर, पॅसिफिक महासागराच्या पूर्वेकडील भागात निर्माण होण्याची शक्यता वाढते.
परंतु, यामुळे ही वादळे जमिनीवर पोहोचण्यापूर्वी जास्त अंतर पार करतात. या काळात त्यांना समुद्राच्या गरम पाण्यातून अधिक ऊर्जा मिळते. त्यामुळे जमिनीवर धडकण्यापूर्वी ही वादळे अधिक शक्तिशाली चक्रीवादळांमध्ये बदलू शकतात.
यंदा आणखी काही चक्रीवादळे तयार होण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं. त्यामुळे जपान किंवा पूर्व चीनला पुन्हा चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





























