पित्याच्या मृत्यूनंतर मुलगा कॅनडातून परतला आणि मग कुटुंबातील तिघांनी स्वतःला का संपवलं; नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, HARDIK
सूचनाः या मजकुरातील तपशील काही वाचकांना विचलित करू शकतात.
बडोद्यातील चार दरवाजा परिसरात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याच परिसरातील नरसिंहजी पोलजवळ असलेल्या डाला पटेल पोलमध्ये एका कुटुंबातील तिघांनी एकत्र आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
पोलमधील एका बंद घरात आई, तिचा मुलगा आणि मुलीचा मृतदेह आढळून आला.
बीबीसी गुजरातीचे बडोदा येथील प्रतिनिधी हार्दिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाला पटेल पोलमध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय आरतीबेन सोनी, त्यांचा 23 वर्षीय मुलगा नीलकंठ सोनी आणि 20 वर्षीय मुलगी जेनी सोनी हे गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर दिसत नव्हते.
त्यांनी सांगितलं की, घर सतत आतून बंद असल्यानं शेजारी आणि नातेवाईकांना संशय आला.
हार्दिक यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक रहिवाशांनी कुटुंबीयांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या तिघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
कुटुंबात नेमकं काय घडलं?
हार्दिक सांगतात, सुमारे वर्षभरापूर्वी या कुटुंबाचे प्रमुख चेतनभाई सोनी यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता.
वडिलांच्या निधनानंतर कॅनडामध्ये शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा नीलकंठ बडोद्यात परतला होता.
हे कुटुंब जुना पादरा रोड येथे आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय करत होतं. मात्र आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत मानल्या जाणाऱ्या या कुटुंबानं इतकं मोठं पाऊल का उचललं, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

फोटो स्रोत, HARDIK
या घटनेमुळे नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.
या कुटुंबीयांचे नातेवाईक सांगतात, हे तिघं असं काही करतील यावर अजून त्यांचा विश्वास बसत नाहीये.
त्यांच्या मते, चेतनभाई यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबानं धैर्यानं परिस्थितीचा सामना केला होता.
नातलगांना म्हणणं आहे की, मृतांना कोणतीही आर्थिक अडचण किंवा मोठी समस्या असल्याचं त्यांना कधीच जाणवलं नव्हतं.
'मी दरवाजा उघडला आणि जे पाहिलं त्यामुळे हादरलो'
या कुटुंबीयांचे नातेवाईक आणि व्यावसायिक भागीदार केतन शाह म्हणाले, "मी दुकानातून इथं आलो तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. फोन केला तरी कुणी उत्तर दिलं नाही. दरवाजा उघडल्यानंतर जे पाहिलं त्यामुळे मी हादरून गेलो."
"त्यांचे एक काका जवळच राहतात. आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर इथं बोलावून घेतलं."
केतन शाह म्हणाले, "आम्ही आयुर्वेदिक रुग्णालयात भागीदार आहोत. मी त्यांना गेली 12 वर्षे ओळखतो."
त्यांनी सांगितलं की, व्यवसायात आर्थिक व्यवहारांसह कोणतीही अडचण नव्हती.
"व्यवसायातील गुंतवणूक आमची आहे. व्यवसाय चालवण्याची जबाबदारी त्यांची होती. आम्ही कधीही हिशेब मागितला नव्हता."

फोटो स्रोत, HARDIK
या कुटुंबातले सदस्य दार उघडत नाहीये असा फोन आल्यावर आपण तिथं लगेच गेलो असं त्यांनी सांगितलं.
केतन शाह यांनी सांगितलं, "माझा सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. त्यासाठी आम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीही स्थापन केली आहे. माझं कुटुंब आणि या कुटुंबातील तीन सदस्य - नीलकंठभाई, आरतीबेन आणि त्यांची मुलगी जेनी सोनी असे त्यात भागीदार होते."
या प्रकरणाबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे?
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बडोदा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, एफएसएल पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सयाजी रुग्णालयात पाठवले आहेत.
बडोदा शहराचे डीसीपी अँड्र्यू मॅकएवान म्हणाले, "आम्ही घरात प्रवेश केला तेव्हा तिघेही मृतावस्थेत आढळले."
"आरतीबेन सोनी या आई आहेत, नीलकंठ त्यांचा मुलगा आहे आणि जेनी त्यांची मुलगी आहे. अशा प्रकारे तिघांनी आत्महत्या केली आहे."

फोटो स्रोत, HARDIK
अँड्र्यू मॅकएवान म्हणाले, "मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात येईल."
पोलीस सध्या घटनास्थळाची पाहणी करत असून परिसरातील लोकांची चौकशीही करणार आहेत.
अँड्र्यू मॅकएवान म्हणाले, "या प्रकरणात अर्ज दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल."
कुटुंबातील सदस्यांनी नेमक्या किती दिवसांपूर्वी आत्महत्या केली, हे सध्या पोलिसांसाठी गूढ आहे.
कुटुंबीयांनी काय सांगितलं?
मृतांच्या नातेवाईक हितेशभाई सोनी यांनी सांगितलं की, ही घटना त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे.
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, "असं काही घडेल, असं आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्यासाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे."
"त्यांना आर्थिक अडचणी होत्या की नाहीत, याबाबत आम्हाला माहिती नाही."
हितेशभाई म्हणाले, "अलीकडेच त्यांनी एक फ्लॅट भाड्यानं घेतल्याची आणि तिथं राहायला जाणार असल्याची माहिती मिळाली होती."
"मात्र यामागचं कारण आर्थिक असावं असं आम्हाला वाटत नाही. कारण त्यांचे नातेवाईक आणि भाऊ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत."
त्यांच्या म्हणण्यानुसार, वर्षभरापूर्वी वडिलांच्या निधनानंतर मुलगा नीलकंठ कॅनडातून वडोदऱ्यात परत आला आणि तिथेच स्थायिक झाला.
वडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्ष उलटल्यावर कुटुंबाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, हा आता पोलीस तपासाचा मुख्य विषय आहे.

फोटो स्रोत, HARDIK
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























