गावात सिंह, दारात बिबटे; या गावात लोक जगतात तरी कसे?

फोटो स्रोत, BBC/Getty
- Author, गोपाल कटेशिया
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
- Reporting from, वलादरहून (गिर सोमनाथ)
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
(महत्त्वाची सूचनाः या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.)
गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील वलादर गावात गुरुवारी (22 ऑक्टोबर) सकाळी गोबरभाई गोहिल यांच्या घराबाहेर एक मेलेलं वासरू आढळलं.
या वासराच्या मानेवर खोल जखमा दिसत होत्या. तिथे साकळलेलं रक्तही स्पष्टपणे दिसत होतं.
नेमकं काय घडलं होतं, हे सांगताना गोबरभाई यांच्या पत्नी लाखूबेन यांच्या आवाजात भीती स्पष्टपणे जाणवत होती.
त्या सांगतात, "मी इथं भांडी घासत होते. तेवढ्यात मला आवाज आला. मी दरवाजा उघडून बाहेर आले."
"मी पाहिलं की एका सिंहिणीनं वासराला पकडलं होतं. मी 'हुड... हुड...' असा आवाज केला, तेव्हा तिनं वासराला सोडलं आणि निघून गेली."
लाखूबेन सांगतात, "मला थोडी भीती वाटली. सिंहिणीनं वासराला खाल्लंही होतं. सिंह रोज गावात येतात. अशी घटना घडली तर भीती वाटणारच ना!"
सिंहीण दिसताच गोबरभाईंच्या पत्नीने आरडाओरडा केला
शेतकरी असलेले गोबरभाई सांगतात की, 21 ऑक्टोबरच्या रात्री साधारण 11 वाजता एक सिंहीण आपल्या दोन बछड्यांसह त्यांच्या घराजवळ आली होती.
तिनं मोकाट फिरणाऱ्या एका वासराची मान पकडली होती.

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
गोबरभाई सांगतात, "पत्नीनं आरडाओरडा केल्यावर मीही धावत बाहेर आलो. सिंहीण वासराला ओढत नेत होती. आम्ही आरडाओरडा केला, तेव्हा ती वासराला तिथेच सोडून निघून गेली. पण तोपर्यंत वासराचा मृत्यू झाला होता."
10 दिवसांपूर्वी सिंहिणीच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
साधारण 10 दिवसांपूर्वी, म्हणजेच 12 ऑक्टोबरच्या रात्रीही अशीच एक सिंहीण वलादर गावात आली होती.
त्या सिंहिणीने 30 वर्षीय महेश राठोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
महेश राठोड यांना पाच मुलं होती. कामाच्या शोधात ते 2 महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासह वलादर गाव सोडून पोरबंदरला गेले होते.
तिथे ते मासे-प्रक्रिया करणाऱ्या एका कारखान्यात काम करत होते.
मात्र, कुटुंबातील एका नातेवाईकाचं निधन झाल्यामुळे महेश राठोड 12 ऑक्टोबरला एकटेच वलादर गावात आले होते. अशी माहिती त्यांचे लहान भाऊ मुकेश राठोड यांनी दिली.

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महेश राठोड गावाच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडपांनी वेढलेल्या घराबाहेर झोपले होते.
त्याचवेळी एका सिंहिणीनं त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारल्यानंतर तिने त्यांना ओढत जवळच्या एका शेतात नेलं.
महेश राठोड यांच्या मृतदेहाचे अवशेष 14 ऑक्टोबरच्या सकाळी सापडले होते.
सिंहिणीला पकडलं, तरी गावात सिंह येणं सुरूच राहिलं
यानंतर वन विभागाने कमी वयाच्या एका सिंहिणीला पकडून पिंजऱ्यात बंद केलं.
परंतु, वलादर गावातील लोकांचं म्हणणं आहे की, या घटनेनंतरही दररोज रात्री गावातील रस्त्यांवर सिंह येतच आहेत.
गोबरभाई यांच्या घराजवळ वासराची शिकार करणारी सिंहीण आणि तिची दोन बछडे 21 ऑक्टोबरच्या रात्री गावातील चौकातही दिसली होती.
नवरात्रीत गरबा आयोजित करण्यासाठी या चौकात मंडप उभारण्यात आला होता. सिंहीण आणि तिची बछडे याच मंडपाच्या आसपास फिरत होती, असं गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
शेतकरी सिंहांबद्दल बोलत असतानाच ऐकू आली डरकाळी
सिंहाच्या हल्ल्यात महेश राठोड यांचा मृत्यू झाल्यानंतर वलादर गावात काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी मी आणि बीबीसीचे सहकारी बिपिन टंकारिया 21 ऑक्टोबरला गावात गेलो.
आम्ही 22 ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत गावात थांबलो. त्या दिवशी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आम्ही वलादर गावाच्या चौकात शेतकरी परेशभाई कांजीभाई कयाडा यांची मुलाखत घेत होतो.
गावात परेशभाई यांना 'मामलतदार' या नावानेही ओळखलं जातं.
परेशभाई म्हणाले, "सिंहांमुळे सध्या आमच्या गावाची परिस्थिती खूपच वाईट आहे. सिंह केवळ रात्रीच नाही, तर दिवसा सुद्धा गावात येतात."
"आमचं गाव बागायती शेतीसाठी ओळखलं जातं. गावातील 80 टक्के जमिनीवर फळबागा आहेत, तर उरलेल्या 20 टक्के जमिनीवर ऊसासारखी पिकं घेतली जातात."
"शेतात पाणी देण्यासाठी, शेतात आणि बांधावर जाण्याची गरज पडते. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम आहे. पण सिंहांमुळे आम्ही शेतात जायचं तरी कसं?"

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
परेशभाई सांगतात, "सिंह वारंवार गावात येत असतात. दर 4-5 दिवसांनी ते इथे एखाद्या प्राण्याची शिकार करतात. अशा परिस्थितीत आम्ही स्वतःचं रक्षण कसं करायचं? आमच्या गावापासून जंगलाची हद्द 3 किलोमीटर दूर आहे."
"ते म्हणतात की गावकरी सिंहांना दगड मारतात. जर कोणी दगड मारत असेल, तर त्यांनी त्याचा व्हीडिओ काढायला हवा ना?"
"वन विभागाने त्याचं रेकॉर्डिंग करायला हवं. ऐकताय ना? तुम्हालाही सिंहाचा आवाज ऐकू येत असेल. तो सध्या जवळच्याच एखाद्या फळबागेत असावा."
आम्ही परेशभाई यांची मुलाखत व्हीडिओमध्ये रेकॉर्ड करत होतो. त्याच वेळी गावाच्या चौकाच्या उत्तरेकडून एका सिंहिंणीची डरकाळी ऐकू आली.
बोलता बोलता परेशभाई थांबले. त्यांनी आम्हालाही शांत राहून डरकाळी ऐकायला सांगितलं.
'काल रात्री सिंह गरब्याच्या मंडपात आले होते'
सिंहाची डरकाळी ऐकू आल्यानंतर परेशभाई हसत म्हणाले, "काल रात्री 11 वाजता सिंह इथे देवीच्या गरब्याच्या मंडपात गरबा खेळायला आले होते."
"तुम्ही गावात कोणालाही विचारून पाहा. रात्री साडेअकराच्या सुमारास इथे एका प्राण्याची शिकार झाली. तसंच 5-7 दिवसांपूर्वी सिंहानं एका व्यक्तीला मारून खाल्लं."

फोटो स्रोत, UGC
परेशभाई सांगतात, "आता आम्ही जगायचं तरी कसं? खूप भीती वाटते. शेतात गेलो, तर दिवसासुद्धा सिंह आणि बिबट्यांची भीती असते. केवळ रात्रीच भीती वाटते असं नाही."
परेशभाई आणि चौकात जमलेल्या इतर लोकांनी आम्हाला सांगितलं की, थोड्याच वेळात सिंह गावाच्या गल्ल्यांमध्ये येतील, याची त्यांना खात्री आहे.
आम्ही रात्री साडेनऊच्या सुमारास वलादर येथून निघून गेलो.
परंतु, 23 ऑक्टोबरला गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की, 22 आणि 23 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या रात्री सिंह गावाच्या गल्ल्यांमध्ये दिसले नाहीत.
गावाजवळ सिंहांचा वावर
सुमारे 2 हजार लोकसंख्या असलेलं वलादर हे एक छोटं गाव आहे. गावाच्या पूर्वेला शिंगोडा नदी, तर पश्चिमेला सोमात नदी वाहते.
गावातील बहुतांश शेतीत आंब्याच्या बागा आहेत. उरलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो.

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
संशोधकांच्या मते, गिरच्या जंगलाजवळ अशा प्रकारच्या शेतीमुळे सिंह आणि इतर वन्य प्राण्यांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळू शकतं.
वलादर गावात कुरणाची जमीनही मोठ्या प्रमाणात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, तिथे असलेल्या खाखरा आणि अभागा यांसारख्या झुडपांमुळे सिंहांना राहण्यासाठी चांगली जागा मिळते.
याव्यतिरिक्त, वलादरमध्ये एक राखीव जंगलही आहे.
'दरवर्षी 5-7 बकऱ्या सिंहांच्या भक्ष्यस्थानी'
वलादरमध्ये शेतकऱ्यांशिवाय पशुपालकही राहतात. मेंढ्या आणि बकऱ्या चारून ते आपला उदरनिर्वाह करतात.
बीबीसीशी बोलताना 26 वर्षीय पशुपालक विपुल वंश म्हणाला, "मी 8 ते 9 वर्षांपासून जनावरं चारतोय. तेव्हापासून मी जिथे कुठे जातो, तिथे मला जंगली प्राणी दिसतात."
"दरवर्षी माझ्या 5 ते 7 बकऱ्या सिंहांच्या भक्ष्यस्थानी पडतात. असं वाटतं की, आम्ही बकऱ्या पाळतो ते त्यांना खायला घालण्यासाठीच."
"आम्ही रस्त्यात कुठे थांबूही शकत नाही. थांबलो तर सिंह बकऱ्या उचलून घेऊन जातात."
विपुल म्हणतो, "आम्ही 7 जण सोबत असलो, तरी दरवर्षी 5 ते 7 बकऱ्या कमी होतात."
"घरातून बिबटे बकऱ्या उचलून नेतात, तर बाहेर सिंह आणि सिंहिणी हल्ला करतात."
"जेव्हा सकाळी 5-7 वाजता बकऱ्या चरायला बाहेर पडलो, की समोर जंगली प्राणी दिसतात."
"म्हशीसारखं मोठं जनावर असेल, तर ते सिंहाला पळवून लावतात. परंतु, बकरीला सिंह पाठलाग करून पकडतो."

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
बिबटे 12 फूट उंच भिंतही ओलांडतात
विपुल वंशच्या घराची भिंत सुमारे 12 फूट उंच आहे.
पण बाजूच्या भिंतीचा आधार घेऊन बिबटे 12 फूट उंच भिंत ओलांडून वारंवार त्यांच्या घरात उड्या मारून आणि बकऱ्यांची शिकार करत असत.
यापासून बचाव करण्यासाठी विपुलने वर्षभरापूर्वी मासे पकडण्यासाठी वापरलं जाणारं एक जुनं जाळं विकत घेतलं.
त्याने लाकडांच्या मदतीने हे जाळं भिंतीवर बांधलं. त्यामुळे भिंतीची उंची आणखी 4 फुटांनी वाढली.
पण विपुलच्या म्हणण्यानुसार, सुमारे आठवडाभरापूर्वी एका बिबट्यानं हे जाळंही ओलांडलं आणि एका बकरीची शिकार केली.
'5 हजार रुपयांत बकरी कुठे मिळते?'
बालूभाई राठोड नावाचे आणखी एक पशुपालक रात्री आपल्या बकऱ्यांना एका बंदिस्त जागेत ठेवतात आणि दरवाजा लावून घेतात.
ते म्हणतात, "आमच्यासाठी रोजीरोटी खूप महत्त्वाची आहे. माझ्या एका बकरीची किंमत 10 ते 15 हजार रुपये आहे."
"परंतु, सिंह किंवा बिबट्याने बकरी मारली, तर वन विभाग केवळ 5 हजार रुपये नुकसानभरपाई देतो. 5 हजार रुपयांत बकरी मिळते का?"
बालूभाई म्हणतात, "एकच बकरी असेल, तर ती चरत असताना तुम्ही तिला धरून ठेवू शकता. पण बकऱ्या जास्त असतील, तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी चरतात. अशावेळी सिंह येतो, बकऱ्यांना मारतो आणि निघून जातो."
शेतकऱ्यांच्या मदतीने जनावरं चरायला नेतात पशुपालक
विपुल वंश सांगतो की, शेतांजवळ सिंहांचा धोका कमी करण्यासाठी वलादरमधील पशुपालकांनी शेतकऱ्यांच्या वेळेनुसार मेंढ्या-बकऱ्या चरायला नेण्याचं वेळापत्रक ठरवलं आहे.

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
तो म्हणतो, "आम्ही सकाळी 10 वाजता इथून निघतो. बकऱ्यांना सिंह लगेच पकडतो. त्यामुळे आम्ही 10 वाजल्यानंतरच बकऱ्यांना घेऊन बाहेर पडतो."
"तोपर्यंत संपूर्ण गाव जागं झालेलं असतं आणि शेतकरी आपापल्या शेतात पोहोचलेले असतात. शेतात सिंह दिसला, तर शेतकरी आम्हाला सावध करतात. ते सांगतात, 'भाऊ, जरा काळजी घ्या.'"
"त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मला बकऱ्यांना घरी आणावं लागतं."
विपुल म्हणतो, "त्यानंतर शेतकरी गावात परततात आणि त्यांच्या मागोमाग सिंहही गावात येतात."
"शेतकरी शेतात असपर्यंत आम्ही शेताच्या बांधावर बकऱ्या चरण्यासाठी नेतो. शेतकरी गावात परतण्याआधीच आम्हाला बकऱ्यांना घरात बंद करावं लागतं."
महिलांना धोका
महिलांना दुप्पट धोका आहे, असं शेतकरी गीताबेन मकवाना म्हणतात.
त्या रागाने म्हणतात, "सिंह आणि बिबट्यांच्या भीतीमुळे महिलांना पुरुषाशिवाय शेतात काम करायला जाता येत नाही."
महेश राठोड आणि त्यांची पत्नी कंचनबेन यांना 3 मुली आणि 2 मुलं आहेत. त्यांची सर्वांत मोठी मुलगी सुमारे 10 वर्षांची आहे.

फोटो स्रोत, Bipin Tankaria/BBC
गीताबेन आणि त्यांचे पती भरतभाई मकवाना 5 बिघे जमिनीवर ऊसाचं पीक घेतात. ते पशुपालनही करतात.
हे दाम्पत्य जेव्हा शेतात नसतं तेव्हा ते आपल्या गायी आणि म्हशींना तिथेच असलेल्या बंदिस्त गोठ्यात ठेवतात. त्यामुळे सिंह आणि बिबट्यांच्या हल्ल्यापासून त्यांचं संरक्षण होतं.
गीताबेन म्हणतात, "आम्ही सकाळी खूप लवकर शेतात जाऊ शकत नाही. परंतु, डेअरीमध्ये दूध पोहोचवण्यासाठी गायी-म्हशींचं दूध लवकर काढावं लागतं."
"शेतात पोहोचल्यावर आम्ही आधी सिंह किंवा बिबट्याच्या पायांचे ठसे आहेत का, ते तपासून पाहतो. त्यानंतरच गायी-म्हशींना गोठ्यातून बाहेर काढतो."
गावाबाहेर शौचाला जाणाऱ्यांना भीती
गावातील आमच्या दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान आम्ही काही लोकांना डब्यात पाणी घेऊन शौचासाठी गावाबाहेर जाताना पाहिलं.
अशी दृश्यं प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी दिसली. गावात 63 वर्षीय कादरबख्श मकराणी यांना कादुभाई या नावानेही ओळखलं जातं.
ते सांगतात, "गावाबाहेर दररोज सिंहांची डरकाळी ऐकू येते. बाजारातही ते गायी आणि वासरांचा पाठलाग करताना दिसतात."

फोटो स्रोत, UGC
गावातील बहुतांश लोकांनी घरात शौचालयं बांधली आहेत.
कादुभाई म्हणतात, "चांगली गोष्ट म्हणजे आता लोक 100-200 रुपये कमावू लागले आहेत. सरकारनेही मदत म्हणून 12 हजार रुपये दिले आहेत."
"या पैशांमधून बहुतेकांनी घरात शौचालयं बांधली आहेत. नाहीतर काय परिस्थिती झाली असती, याचा विचार करा."
आजूबाजूच्या गावांतही सिंहांचा वावर
"सिंहांचा त्रास केवळ याच गावात आहे, असं नाही," असं कादुभाई म्हणतात.
"सिंह सांढणीधार, कंटाला आणि लीमध्रा या गावांमध्येही जातात. 4-5 दिवसांपूर्वी ते पाणिकोटा या गावातही दिसले होते."
ते म्हणतात, "सिंहांचा त्रास होतो, हे खरं आहे. परंतु आम्ही सरकारला काय सांगणार? आणि सांगितलं तरी सरकार आमचं ऐकेल का?"
मागील 5-7 वर्षांत गावात सिंहांचा वावर वाढला
वलादर गावातील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेले जितुभाई सोलंकी सांगतात की, त्यांच्या भागात अनेक दशकांपासून सिंह दिसत आहेत.
परंतु, गेल्या 5 ते 7 वर्षांपासून गावाच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने सिंह फिरू लागले आहेत.
जितुभाई म्हणतात, "आज तुम्ही तो मेलेला प्राणी पाहिलात ना? वलादरमध्ये अशीच परिस्थिती आहे. जवळपास रोजच असं घडतं."
"2024 मध्ये 45 जनावरांची शिकार झाली होती."
ते म्हणतात, "जनावरांनाही आणि माणसांनाही धोका आहे. सतत भीती वाटत राहते. रात्री शौचाला जायचं असलं, तरी सोबत कोणाला तरी घेऊन जावं लागतं."
"शेतकरी रात्री शेतात जाता शकत नाहीत. त्यामुळे रानडुक्कर आणि नीलगायी पिकं खाऊन टाकतात."
वन विभागानं काय म्हटलं?
बीबीसीशी बोलताना गिर पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत तोमर यांनी सांगितलं, "राज्य सरकारने महेश राठोड यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे."
"ज्या सिंहिणीने त्यांच्यावर हल्ला केला होता, तिलाही पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे."
वन विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, वलादरमध्ये अशा अनेक जागा आहेत, जिथे सिंह आणि बिबट्यांचा वावर असतो.
ते म्हणाले, "हे गाव गिर जंगलाच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे येथे सिंह आणि बिबट्यांचा सतत वावर असतो."
"माणसं आणि सिंह यांच्यात संघर्ष होऊ नये, यासाठी आमचे कर्मचारी सतत प्रयत्न करत आहेत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























