सोनम वांगचूक आणि सीजेपीमध्ये सध्या काय सुरू आहे, नड्डांच्या हस्ते उपोषण सोडल्यानं चर्चांना उधाण

सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू असताना अभिजीत दिपके यांच्याबरोबर.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू असताना अभिजीत दिपके यांच्याबरोबर.
Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरील उपोषणस्थळावरून 18 जुलै रोजी जबरदस्तीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सोनम वांगचूक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या तोंडातून किंवा नसांमधून काहीही देऊ नये, असं त्यावेळी गीतांजली यांनी म्हटलं होतं.

परंतु, एक दिवस झाल्यानंतर गीतांजली यांची भूमिका बदललेली दिसली. नेत्यांनी सोनम वांगचूक यांची भेट घेऊन संसदेत शिक्षण सुधारण्याचा मुद्दा उपस्थितीत केला, तर ते उपोषण सोडतील, असं म्हणायला सुरुवात केली.

यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही केली नव्हती.

अखेर गुरुवारी मध्यरात्री सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं. त्यांचं उपोषण केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत संपुष्टात आलं. त्याचवेळी आंदोलकांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचे आरोपही होत आहेत.

ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश यांनी एक्सवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत जे. पी. नड्डा सोनम वांगचूक यांचे उपोषण सोडवत असल्याचे दिसते. तर दुसऱ्या फोटोत जंतर-मंतरवरील तरुण आंदोलक आपलं उपोषण अभिनेत्री शबाना आझमी आणि आरजेडीचे खासदार मनोज झा यांच्या उपस्थितीत सोडताना दिसत आहेत.

या फोटोसोबत उर्मिलेश यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "काही वेळा फोटोच सर्व काही सांगून जातात. ते स्वतःच गुपितं उघड करतात."

गुरुवारी मध्यरात्री सोनम वांगचूक यांचं उपोषण सोडवण्यात आंलं.

फोटो स्रोत, @Wangchuk66

फोटो कॅप्शन, गुरुवारी मध्यरात्री सोनम वांगचूक यांचं उपोषण सोडवण्यात आंलं.

न्यूज आणि विश्लेषण वेबसाइट 'द वायर'चे संस्थापक एम. के. वेणू यांनी एक्सवर लिहिलं, "यातून चांगला संदेश जात नाही. सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडण्यासाठी एखाद्या तटस्थ व्यक्तीला बोलवायला हवं होतं किंवा सीजेपीच्याच एखाद्या प्रतिनिधीकडून उपोषण सोडायला हवं होतं."

प्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांनी एक्सवर लिहिलं, "आधी एनएसए लावला, मग काढला. उपोषणाला बसवलं, मग उठवलं आणि शेवटी पाणी पाजलं. हे सर्व किमान विद्यार्थ्यांमध्ये तरी जाऊन करायला हवं होतं."

सोनम वांगचूक आणि सीजेपी यांच्या भूमिका आणि विचारांमधील वाढत चाललेली दरीही अनेकजण अधोरेखित करत आहेत.

एम. के. वेणू यांनी लिहिलं आहे की, "वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याऐवजी जंतर-मंतरवर बसायला हवं होतं, असं म्हटलं."

"परंतु, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनाचं स्वागत करत, जर ते सीजेपीच्या मागण्यांच्या समर्थनासाठी असेल तर जंतर-मंतर असो किंवा दुसरं कोणतंही ठिकाण, आंदोलनाचा कोणताही मंच स्वीकारार्ह असल्याचे सांगितले होते."

दोघांच्या विचारांमध्ये वाढलेलं अंतर

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एम. के. वेणू लिहितात, "या मुद्द्यावर सीजेपीची भूमिका सोनम वांगचूक यांच्यापेक्षा वेगळी होती. वांगचूक यांनी भाजपच्या मंत्र्यांशी चर्चेदरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विषय संसदेत चर्चेदरम्यान विचारात घेतला जाऊ शकतो, असे सांगितले. परंतु, सीजेपीचं म्हणणं आहे की, आधी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतरच पुढील प्रक्रिया व्हावी."

राहुल गांधी यांच्या आंदोलनाबाबत गीतांजली यांनी इंडिया टुडेच्या शोमध्ये राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, "पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनात गांभीर्याचा अभाव होता. राहुल गांधींनी जंतर-मंतरवर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला असता, तर ते अधिक प्रामाणिक वाटलं असतं. आता लोकांना आणखी फसवता येणार नाही. हा एक जागरूक भारत आहे."

जंतर-मंतरवरून हलवल्यानंतर रुग्णालयात सोनम वांगचूक यांची सरकारच्या प्रतिनिधींशी अनेकदा भेट झाली. पण, सीजेपीच्या प्रतिनिधींशी त्यांच्या भेटीचा एकही फोटो समोर आला नाही.

सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हे सोनम वांगचूक यांना सातत्याने उपोषण सोडण्याचे आवाहन करत होते. परंतु, ते जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उपोषण सोडतील, याचा त्यांना आधी अंदाज होता की नाही, याबाबत सीजेपीने काहीही म्हटलेलं नाही.

सुहास पळशीकर

याच आठवड्यात सोमवारी (20 जुलै) सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली होती.

दोन्ही प्रवक्ते जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, यावेळी सीजेपीने अट ठेवली की, चर्चा मंत्र्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी नाही, तर एखाद्या तटस्थ ठिकाणीच होईल.

यातूनही सोनम वांगचूक आणि सीजेपी यांच्या भूमिकेतील फरक स्पष्ट दिसून येतो. एकीकडे सोनम वांगचूक यांनी भाजपच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं, तर दुसरीकडे सीजेपीने मंत्र्यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी जाऊन चर्चा करण्यास नकार दिला.

वांगचूक यांच्याबरोबर अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय राहिलेले आणि राजकीय विश्लेषक असलेले योगेंद्र यादव यांनी उपोषण मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, त्यांनी या निर्णयावर काही तिखट प्रश्नही उपस्थित केले आहेत.

योगेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत म्हटलं की, "ज्या आश्वासनाच्या आधारावर सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, त्यात फक्त इतकंच म्हटलं आहे की, शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. पण शांततापूर्ण आंदोलकांवर मुळात गुन्हे दाखल व्हायलाच नकोत."

"मग सरकारच ठरवणार का की, कोणते आंदोलक शांततापूर्ण होते आणि कोण नव्हते? आधीच दाखल झालेल्या 11 एफआयआरचं काय होणार? त्यामुळे उपोषण संपलं म्हणजे आंदोलन संपलं नाही, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या सीजेपीच्या तरुण नेत्यांचं मी कौतुक करतो. सोनम वांगचूक यांनीही आंदोलन संपल्याचं म्हटलेलं नाही. आंदोलन सुरूच राहणार आहे."

18 जुलै रोजी जेपी नड्डा यांनी सीजेपीच्या दोन प्रवक्त्यांशी चर्चा केली होती.

फोटो स्रोत, @JPNadda

फोटो कॅप्शन, 18 जुलै रोजी जेपी नड्डा यांनी सीजेपीच्या दोन प्रवक्त्यांशी चर्चा केली होती.

2023 मधील एका फोटोत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे सोनम वांगचूक आणि त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांच्यासोबत दिसत आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे हा फोटो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मार्च 2023 मधील त्या पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी वांगचूक दाम्पत्यांच्या विचारांचे तसेच शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.

गुरुवारी (23 जुलै) परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात सोनम वांगचूक यांच्या बेमुदत उपोषणाचा 26वा दिवस होता. त्याच दिवशी धर्मेंद्र प्रधान यांची 2023 मधील ही जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले.

त्यावेळी सोनम वांगचूक यांनीही तितक्याच उत्साहाने धर्मेंद्र प्रधान यांना नाविन्यपूर्ण कल्पनांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले होते. या भेटीनंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) प्रत्यक्षात राबवण्यासाठी आपण आणखी ठाम झालो आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यावेळीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

सोनम वांगचूक यांची राजकीय भूमिका काय?

सोनम वांगचूक यांच्यासारखं व्यक्तिमत्व कसं घडतं? वांगचूक सरकारला प्रश्न विचारतात, परंतु उत्तर मिळेपर्यंत ते संघर्ष करतात का?

राजकीय विश्लेषक आणि 'गांधी: द एंड ऑफ नॉन-व्हायोलन्स' या पुस्तकाचे लेखक मानस फिराक भट्टाचार्जी यांनी 17 जुलै रोजी फ्रंटलाइन मासिकात लिहिलं होतं की, "इंजिनिअर म्हणून सोनम वांगचूक यांनी सरकारी शाळांची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला."

"ते ना राज्यविरोधी आहेत, ना सरकारविरोधी. लोकांना उपदेश देण्यासाठी ते सार्वजनिक जीवनात आलेले नाहीत. कोणत्याही विचारसरणीचा झेंडा घेऊनही ते पुढे आलेले नाहीत. एक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी काम करण्यासाठी ते आले आहेत."

भट्टाचार्जी यांनी लिहिलं आहे, "सरकारांची विचार करण्याची पद्धत सोनम वांगचूक यांच्यासारखी नसते. कारण त्यांचं राजकारण वर्तमानावर असतं. भविष्यासाठी दूरचा विचार करण्याला तेवढं महत्त्व दिले जात नाही. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर (सध्याचं अहिल्यानगर) तुरुंगात असताना भारताच्या भविष्यासाठी अनेक रात्री जागून विचार केला आणि त्यावर भरपूर लेखन केलं होतं."

ते पुढे लिहितात, "जे सरकार भविष्याकडे गांभीर्याने पाहत नाही, ते भविष्यासाठी विचार करणाऱ्या लोकांना घाबरते. त्यामुळेच सोनम वांगचूक यांची भूमिका राजकीय वाटू लागते. पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पर्यावरणाची हानी करणाऱ्यांचे हित जपले जात असल्याचा प्रश्नही उपस्थित होतो."

एमके वेणू

लडाखचे कार्यकर्ते शृंग गाफेल यांनी एक्सवर लिहिलं, "सोनम वांगचूक यांच्या आयुष्यावर चित्रपट बनला (बायोपिक), तर त्यांची भूमिका कोण साकारेल?"

"ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे, ज्यांचा एकेकाळी देशभक्त म्हणून गौरव झाला, आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. पण नंतर त्यांच्यावर 'देशविरोधी', 'चिनी एजंट' आणि 'पाकिस्तानी एजंट' असल्याचे आरोप झाले."

"त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा (एनएसए) सामना करावा लागला, 6 महिने तुरुंगात राहावे लागले आणि आता त्यांच्या प्रकृतीबद्दल भारताचे पंतप्रधानही सार्वजनिकपणे चिंता व्यक्त करत आहेत. ही खरोखरच एक असाधारण कथा आहे. यावर एक चांगला चित्रपट होऊ शकतो."

राजकीय विश्लेषक सबा नक्वी यांनी एक्सवर लिहिलं की, "भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे आंदोलन केवळ चर्चेपुरतं नव्हतं, तर लोकांच्या भावना आणि संतापाचं प्रतीक होतं."

"सरकारने वांगचूक यांची भेट घेतली, पण इतर कोणतीही ठोस सवलत दिलेली नाही. दुसरीकडे आंदोलकांवर पेलेट गन वापरल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत समोर आलेला हा फोटो अनेकांना सहजपणे रुचणारा नाही."

"त्यांनी उपोषण सोडणं योग्यच होतं. परंतु, हे आंदोलन सुरू करणारे अभिजित दिपके जर त्यावेळी तिथे उपस्थित असते आणि त्यांनीच वांगचूक यांना पहिला घास भरवला असता, तर त्याचा संदेश वेगळा गेला असता."

कॉक्रोचच्या आंदोलनाची पुढची दिशा काय?

या आंदोलनाची तुलना आता पूर्वीच्या अनेक मोठ्या आंदोलनांशी केली जात आहे. 1974-75 मधील जेपी आंदोलन आणि 2011-13 मधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, या दोन मोठ्या आंदोलनाशी तुलना केली जात आहे.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी लिहिलं आहे की, "कॉक्रोच आंदोलन त्या दोन्ही आंदोलनांच्या तुलनेत अधिक विस्कळीत आहे. या आंदोलनाची ताकद प्रामुख्याने लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यावर आणि अनेक वर्षांपासून दडपलेल्या नाराजीवर आधारित आहे. हे आंदोलन अद्याप देशभर पसरलेलं नसलं, तरी आता त्याचे पडसाद दिल्लीबाहेरही उमटू लागले आहेत."

"जेपी आंदोलनात हळूहळू संविधान आणि घटनात्मक संस्थांना कमकुवत करू इच्छिणाऱ्या अनेक शक्ती एकत्र आल्या. त्यात पुराणमतवादी, उजव्या विचारांचे तसेच पुरोगामी आणि डाव्या विचारांचे गटही सहभागी झाले होते."

सोनम वांगचुक

फोटो स्रोत, @INC

फोटो कॅप्शन, राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासाबाहेर धरणं आंदोलन केलं.

"2011 मधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची सुरुवात वादग्रस्त नेतृत्वाखाली झाली. जेपी आंदोलनाप्रमाणेच यातही वेगवेगळ्या विचारसरणीचे गट एकत्र आले. पण शेवटी या आंदोलनावर अशा शक्तींचा प्रभाव वाढला, ज्यांचा उद्देश घटनात्मक लोकशाही कमकुवत करणे हा होता."

पळशीकर यांनी लिहिलं की, "जेपी आंदोलनामुळे सरकार तर बदलले, पण त्यानंतर फारसा बदल झाला नाही. उलट, त्यामुळे संविधानविरोधी विचारांच्या शक्तींना सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा झाला."

"याउलट, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा राजकारणावर अधिक मोठा परिणाम झाला आणि त्यातून सत्ताबदलाचा मार्ग प्रशस्त झाला."

"आता प्रश्न असा आहे की कॉक्रोच आंदोलन पुढे कोणत्या दिशेने जाईल? असंही होऊ शकतं की, या आंदोलनातून काहीच निष्पन्न होणार नाही.

यामुळे लोकांच्या मनातील संताप व्यक्त करण्याची संधी त्यातून मिळेल. पण कालांतराने तिची ऊर्जा ओसरण्याचीच शक्यता अधिक आहे. शेतकरी आंदोलनाप्रमाणे काही मागण्या मान्यही होऊ शकतात, परंतु हळूहळू या आंदोलनाची तीव्रताही कमी होऊ शकते."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन