थायलंड : बँकॉकमध्ये बारला लागलेल्या आगीत 27 जण ठार, 60 हून अधिक जखमी

फोटो स्रोत, Getty Images
थायलंडची राजधानी बँकॉकमधील चातुचक परिसरामधील एका बारला सोमवारी रात्री उशीरा भीषण आग लागल्याने 27 लोकांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेमध्ये 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक लोक अद्यापही बेपत्ता असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अग्निशमन दलाला सोमवारची मध्यरात्र उलटल्यानंतर आग लागल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या तुकडीनं पाहिलं की, लोक आग आणि धूरापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बारच्या मेन गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

फोटो स्रोत, Fire & Rescue Thailand
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर समोर आलेल्या काही व्हीडिओमध्ये एका बारमधून आगीच्या उंच ज्वाळा उठताना आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत.
या व्हीडिओंत लोक किंचाळताना तर काहीजण पडतानाही दिसून येतात. किमान दोन व्यक्तींना आग लागल्याचं दिसून येत आहे.

फोटो स्रोत, APTN
घटनास्थळी पोहोचलेले थायलंडचे उपपंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितलं की, आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आगीच्या कारणाचा तपास सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

फोटो स्रोत, Getty Images
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाने सुमारे अर्धा तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. परंतु, तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं.
प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये नऊ पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Reuters
पंतप्रधानांनी सांगितलं की, आग लागली तेव्हा बारमध्ये सादरीकरण करणाऱ्या एका म्युझिशियनचीही चौकशी करण्यात आली. त्या संगीतकाराच्या म्हणण्यानुसार, आगीची सुरुवात एका इलेक्ट्रिकल कट-आउट स्विचमधून झाली. त्यानंतर, मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात आग व धूर पसरला.

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधानांनी सांगितलं की, बाहेर पडण्याऐवजी अनेक लोक इमारतीच्या मागील बाजूस गेले आणि शौचालयांमध्ये लपले. त्यांनी सांगितलं की, बहुतेक मृतदेह तिथूनच बाहेर काढण्यात आले.
'रॉन्ग बिअर ना लॅट फ्राओ' (Rong Beer Na Lat Phrao) असं स्थानिक पातळीवर ओळखला जाणारा हा बार बँकॉकच्या चटुचक (Chatuchak) जिल्ह्यात स्थित आहे. 'डेली न्यूज' या थाई वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हे या भागातील एक लोकप्रिय रेस्टॉरंट आणि मनोरंजनाचं ठिकाण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आग आटोक्यात आणल्यानंतर काढलेल्या अस्वस्थ करणाऱ्या छायाचित्रांमध्ये, बारच्या बाहेर रांगेत ठेवलेल्या अनेक मृतदेहांना ठेवलेल्या पिशव्या आणि त्या परिसराभोवती उभारलेला मोठा सुरक्षा बंदोबस्त दिसून येतो.
आतल्या बाजूला फर्निचर, भिंती आणि छत पूर्णपणे काळे पडले असून छताचा काही भाग सोलून निघालेला आहे.
बँकॉकचे गव्हर्नर चाटचार्ट सिट्टीपुंट यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि सांगितलं की, आतील भागात सजावटीचं ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























