कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग-2' आहे का? सोशल मीडियावर अशी टीका का होतीये?

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग 2' आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना आज (15 जून) जयपूर येथे आंदोलन करत असताना मारहाण करण्यात आली. त्यावर अभिजीत दिपकेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, भविष्यात हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालत राहील.

दिल्ली, पुणे, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू नंतर आज जयपूरमध्ये सीजेपीचे आंदोलन झाले त्यात ही घटना घडली.

एकीकडे 'कॉक्रोच जनता पार्टी' सध्या देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलनं करते आहे तर दुसरीकडे, या आंदोलनाविषयीची उत्सुकता आणि साशंकता दोन्हीही अद्याप कायम आहे.

सोनम वांगचुक आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासारखे काही मोठे चेहरे अभिजीत दिपके यांच्यासोबत या आंदोलनाच्या मंचावर दिसून आले आहेत.

तर दुसरीकडे, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने वा इतर कोणत्याही पक्षाने अद्याप तरी कॉक्रोच जनता पार्टीबाबत काही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाहीये.

एकीकडे, बरेच जण 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेतून या आंदोलनाकडे पाहत आहेत; तर दुसरीकडे, हा अण्णा आंदोलनाचाच 'भाग 2' आहे, अशी टीका करत काही जण साशंकताही व्यक्त करताना दिसत आहेत.

हे आंदोलन सरकारविरोधातील असंतोषाला कमी करणारा सेफ्टी व्हॉल्व्ह आहे का? हा अण्णा आंदोलनाचाच हा 'भाग 2' आहे का? या आंदोलनाचं भविष्य काय, या प्रश्नांचा घेतलेला हा धांडोळा...

'अण्णा आंदोलना'शी होणारी तुलना

2011-12 च्या सुमारास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'ने केलेल्या आंदोलनाशी 'कॉक्रोच जनता पार्टीच्या' आंदोलनाची तुलना केली जात आहे.

काही टीकाकारांच्या मते, अण्णा हजारे यांचं आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत असून त्याचा वापर करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष सत्तेत आला.

ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर असं मत ठामपणे मांडताना दिसतात.

बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. ते सांगतात की, "सत्तेतीलच लोक कॉक्रोच जनता पार्टीसारखी आंदोलनं उभी करतात, जेणेकरून एक सेफ्टी वॉल्व्ह असावा. घरामध्ये कुकर फुटू नये म्हणून कुकरला जशी शिट्टी असते, तशा शिट्टीचं काम अशी आंदोलनं करत असतात."

हे आंदोलन नाही, तर सरकारी प्रोजेक्ट आहे, असंही ते सांगतात.

ते म्हणतात की, "या आंदोलनाला पाठिंबा देणारे लोक एकतर भोळे आहेत किंवा कमालीचे धूर्त आहेत. या देशात खरं आंदोलन होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे."

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग 2' आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

अण्णा आंदोलनामुळे देशातील लोकशाहीवादी लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना असल्यामुळे, आता 'ताक फुंकून पिणं' या पद्धतीनं या आंदोलनाकडे पाहिलं जात असल्याचं ज्येष्ठ पत्रकार रवि आमले सांगतात.

म्हणूनच, अचानक सुरू झालेल्या 'कॉक्रोच आंदोलना'मागे काही योजना वा कट आहे का, याबाबत होणाऱ्या सगळ्या चर्चा या 'कॉन्स्पीरसी थेअरी'च्या पातळीवर सुरू झालेल्या आहेत, असं मत ते व्यक्त करतात.

तर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात की, "या आंदोलनाला 'अण्णा आंदोलन पार्ट टू' म्हणणं, हे न्यूनगंड आणि भीतीतून आलेलं मत आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणतात की, "सीजेपीच्या आंदोलनामुळे विरोधात असलेल्या काँग्रेसनं वा इतर कुणीही एवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही. आताच्या घडीला जणू काही काँग्रेसच्या तीनशे जागा येणार आहेत आणि कुणीतरी मोठा राजकीय प्रतिस्पर्धी अचानक आलेला आहे, अशी काही काँग्रेसची स्थिती नाहीये."

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग 2' आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अण्णा हजारेंचे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे आंदोलन ( संग्रहित )
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विश्वंभर चौधरी स्वत: अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील सहकारी राहिलेले आहेत. मागे वळून पाहताना त्या आंदोलनाचं आणि तेव्हाच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण वस्तुनिष्ठपणे न करता, सोयीस्कर पद्धतीनं करण्यावर ते टीका करतात.

या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, "अण्णा हजारेंचं आंदोलन जर पूर्णपणे संघप्रणीतच आंदोलन होतं, तर मग तुम्ही तोच प्रयोग या आंदोलनावर करा ना, काय हरकत आहे? तुम्ही या आंदोलनाचा वापर करा. त्यावर स्वार व्हा."

राहुल गांधींनी या आंदोलनाविषयी कोणतंही नकारात्मक भाष्य केलेलं नाहीये. शिवाय, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या आंदोलनाला व्हीडिओ करून पाठिंबा व्यक्त केलाय, याकडेही ते लक्ष वेधतात.

"सरकारविरोधातील कोणतंही जनआंदोलन हे विरोधकांनी धोका न समजता संधी समजली पाहिजे," हे स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांचं मत ते उद्धृत करतात.

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रातील एका लेखात योगेंद्र यादव यांनी म्हटलंय की, "देशात तरुणांमध्ये जी अस्वस्थता निर्माण होत आहे, तिचे 'कॉकरोच जनता पार्टी' हे एक अत्यंत प्रभावी आणि नाविन्यपूर्ण प्रकटीकरण आहे. यापेक्षा अधिक काही नाही आणि यापेक्षा कमीही नाही. या नवजात संघटनेकडून राजकीय उद्धाराची 'तारणहारासारखी' अपेक्षा बाळगणे हे भोळेपणाचे ठरेल. तसेच, काही काल्पनिक षड्यंत्रांच्या शंकांमुळे तरुणांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवणे हे आत्मघातकी ठरेल. जेव्हा जनता सरकारविरुद्ध आपली अस्वस्थता आणि संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरते, तेव्हा विरोधी पक्षांनी याकडे धोका म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहिले पाहिजे."

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ सांगतात की, "मागील तीन वर्षांपूर्वीपर्यंत अभिजीत दिपके आम आदमी पक्षाशी संबंधित होता, एवढंच एक मुख्य कारण त्याला अण्णा आंदोलनाशी जोडण्याचं मुख्यत: आहे. तो जर त्यांच्याशी निगडीत नसता, तर कदाचित असं काही जोडण्याची घाई लगेच झाली नसती."

पुढे ते सांगतात की, "आताच्या काही ओपिनियन मेकर्सच्या मते, अण्णांच्या आंदोलनाचाच गैरफायदा घेऊन, उपयोग करून मोदींनी आपली मूळं रुजवली आणि संघाचे लोक त्यावेळी त्यामध्ये होते आणि म्हणून अण्णा आंदोलनाला त्यावेळी एवढा प्रतिसाद मिळाला. पण, अण्णांच्या आंदोलनात कोण नव्हतं? सगळेच होते. कंटाळलेले काँग्रेसवाले, समाजवादी विचारांचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, प्रादेशिक पक्षांचे, अगदी कुठल्याच पक्षाचे नसतील असे सगळेच होते. त्यामुळे, ते आंदोलन फक्त संघाचंच होतं, ते संघानेच घडवून आणलं, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरेल."

"हे आंदोलन देशाची सद्य:स्थिती पालटवण्यात यशस्वी होईल का? तर, मुळात तशी अपेक्षा बाळगण्याची गरजच नाही! आजची तरुणाई असे आंदोलन करते आहे, हेच मोठे यश आहे. यातून पुढे राजकीय पक्ष स्थापन होईल का, व्हावा का? होवो, अथवा न होवो! तो पक्ष आम आदमी पक्षाच्या वाटेने जाईल का? जावो, अगर न जावो! हे आंदोलन विरून किंवा भरकटत जाईल का, कोणाच्या हातात जाईल का, याचा गैरफायदा कोणी उचलेल का? यात संघ-भाजपच घुसखोरी करतील का किंवा आताच केलेली असू शकते का? या सर्व शक्यता व संभाव्य मर्यादा लक्षात घेऊनही कॉक्रोच जनता पार्टीचे स्वागतच करायला हवे!" असं ते सांगतात.

उत्स्फुर्तपणे सुरू झालेलं की सरकारपुरस्कृत आंदोलन?

कॉक्रोच जनता पार्टीचं अचानक तयार होणं आणि अभिजीत दिपकेसारख्या नव्या चेहऱ्यानं कमी कालावधीत देशभर चर्चेला येणं, यामुळे या आंदोलनाभोवती बरीच साशंकता आणि गोंधळ निर्माण झालेला आहे.

रवि आमले

रवि आमले सांगतात की, "हे फक्त काँग्रेसच्या भूमिकेबद्दलच नाही, तर सगळ्यांच्याच प्रतिक्रिया अशा गोंधळाच्या आहेत. त्यामुळे चित्र स्पष्ट नाहीये."

"जे लोकशाहीवादी आहेत, त्यांना असं वाटणं साहजिक आहे की, सरकारविरोधात कुणीतरी आंदोलन उभं करतंय, हेच महत्त्वाचं आहे. या दृष्टीकोनातूनही 'गाजराच्या पुंगी'सारखं याकडे पाहिलं जातंय. वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली."

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग 2' आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

पण, तरुणाईतला संताप अधिक धुमसण्याआधी त्याच्यावर पाणी ओतण्यासाठीचं हे आंदोलन होऊ शकतं, किंवा होऊ घातलंय का, हे नीट तपासून पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणतात.

पुण्यात झालेल्या आंदोलनात अभिजीत दिपकेंना पाठिंबा देणारे विश्वंभर चौधरी हे 'रस्त्यावरचं बिगरराजकीय आंदोलन' असल्याचं ठामपणे सांगतात.

विश्वंभर चौधरी

ते म्हणतात की, " 'सीजेपी'ला निवडणुकीच्या राजकारणातील राजकीय पक्ष करणार नसल्याचं अभिजीतने ठामपणे सांगितलंय. शिवाय, राजकीय पक्षांच्या जीवावर काहीही होणार नाही, अशी सध्याची वस्तुस्थिती आहे. आताच्या दडपणूक करणाऱ्या स्थितीला तोंड देण्याची क्षमता ही राजकीय पक्षांपेक्षा बिगरराजकीय आंदोलनात जास्त आहे."

एकीकडे, 'संसदीय राजकारण फक्त संसदेत नव्हे, तर ते जंतरमंतरवरही चालतं,' असं मत विश्वंभर चौधरी व्यक्त करतात तर दुसरीकडे, 'शेतकरी आंदोलनासारखी इतर अनेक आंदोलनं चिरडणारं सरकार या आंदोलनासाठी मात्र इतकी गुलाबं का अंथरतंय,' असा सवाल राजू परुळेकर उपस्थित करतात.

ते म्हणतात की, "उमर खलिद अजूनही विनाखटला तुरूंगात आहे, स्टेन स्वामींना साधा स्ट्रॉ मिळाला नव्हता. गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्यांना कितीतरी दिवस जामीन मिळाला नाही. याचं साधं कारण आहे की, यांचा विरोध सत्तेनं ठरवलेला नाही."

राजू परूळेकर

'पंतप्रधान मोदींऐवजी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कशासाठी?'

बीबीसी मराठीशी बोलताना राजू परूळेकर सांगतात की, "सरकारलाच या आंदोलनाची गरज आहे, असं दिसतंय. आंदोलन वगैरे करण्याचं स्वातंत्र्य या देशात असतं, तर शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच का थांबवलं? विनेश फोगाटला उचलून का नेलं? कारण ते सत्तेनं ठरवलेलं नव्हतं. शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलन या आंदोलनांनाच विरोध का झाला?"

"'सीजेपी'चं आंदोलन, त्याला होणारा खर्च या सगळ्याला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. गृहमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय पोलीस यंत्रणा अशा प्रकारच्या कोणत्याही कृती सहकार्याच्या भूमिकेत खेळीमेळीनं होऊ देत नाही," असं मत ते व्यक्त करतात.

राजीनामा मागायचा असेल तर मोदींचा मागितला पाहिजे, मग धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन काय साध्य होणार, असाही सवाल ते उपस्थित करतात.

हे दोन्ही प्रश्न वैध आहेत, असं म्हणत विश्वंभर चौधरी आपलं मत मांडतात.

ते म्हणतात की, "याआधी दडपलेली सगळी आंदोलनं ही नेपाळ आणि बांग्लादेशच्या आधीची आहेत. सरकार सीजेपीच्या या आंदोलनाला घाबरलेलं आहे. कारण, हे आंदोलन अनप्रेडीक्टेबल आहे आणि जेनझीचं आहे. म्हणूनचं तर सरकारनं त्यांचे अकाऊंट्स बंद केले ना? जर हे सरकारपुरस्कृत आंदोलन असतं, तर ही खाती कशाला बंद केली असती?"

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग 2' आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

शिवाय, "या मुलाला उत्स्फुर्तपणे एका मुद्द्यावर रिस्पॉन्स मिळाला. आज तो धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतोय, पण उद्या तो मोदींचा राजीनामा मागणारच नाही, असं आपण का गृहित धरतोय? त्याच्याबरोबरची सोनम वांगचुक, प्रकाश राजसारखी मंडळी प्रगल्भ मंडळी आहेत. ती संघाची माणसं आहेत का?" असाही प्रतिप्रश्न ते करतात.

विनोद शिरसाठ म्हणतात की, "गेल्या महिन्यातील 15 तारखेला सुरू झालेल्या या पार्टीचा प्रवास आता फक्त एक महिन्याचा झाला आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये अभिजीत दिपके यांच्या पुढच्या प्रवासाच्या सगळ्या शक्यता गृहित धरूनही तुम्ही ज्योतिषासारखं फक्त भविष्यांकन करणार आहात की तो काय बोलतोय, काय करतोय, काय अजेंडा ठरवतोय, यानुसार तुम्ही मतं ठरवणार आहात? आतापर्यंत एका महिन्याच्या काळात त्याने दिलेल्या सगळ्या मुलाखतींमध्ये कुठेही त्याच्या बोलण्यात वा कार्यपद्धतीत संघाचं काही दिसतंय का? नसेल, तर मग इतक्यातच त्याला संशयाचा जराही फायदा न देता तुम्ही समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात कसं काय उभं करता?"

दुसरीकडे, या आंदोलनाचं विश्लेषण करताना रवि आमले कळीचा मुद्दा उपस्थित करतात. ते म्हणतात की, जर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच, तर पुढे कॉक्रोच जनता पार्टीचं काय?

"धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यावर पुढे काय करायला राहतच नाही. नवा मुद्दा घेऊन काही करण्यासाठीचं जे बळ लागतं, मग ते आर्थिक असो वा मनुष्यबळ असो, ते यांच्याकडे आहे, असं मला वाटत नाही. जोवर यांच्यामागे विरोधीपक्ष उभे राहत नाहीत, तोवर ते मिळणार नाही," असंही रवि आमले स्पष्ट करतात.

तर राजू परुळेकर म्हणतात की, "सध्या अशी परिस्थिती आहे की, सरकारला हवं तेच होईल. झुरळवाले फक्त एकच मुद्दा घेऊन आलेत. कारण यांना जेवढं लिहून दिलंय, तेवढंच त्यांना करायचं आहे."

विनोद शिरसाठ

जेनझीचं आंदोलन आणि विरोधकांची स्पेस

या आंदोलनाच्या 'जेनझी' स्वरूपावर रवि आमले म्हणतात की, "आपण म्हणताना असं म्हणतोय की, हे जेनझीचं आंदोलन आहे. पण, ही सगळी पिढी एकच एक नाहीये. यांच्या राजकीय जाणिवा सगळ्यांच्या सारख्या आहेत का? दिल्लीच्या आंदोलनातली मुलं आणि मराठवड्यातला तरुण यांच्या जाणिवा वेगळ्या आहेत. त्यांचे वर्गीय विचार वेगळे आहेत. कोण आरक्षणाच्या समर्थनार्थ आहे तर कोण विरोधात आहे, अशा प्रकारची ही पिढी आहे. अशी तरूण पिढी आंदोलन करतीये, तर ती कितपत पुढे जाईल, याबाबत साशंकता आहे."

पुढे ते सांगतात की, "नेपाळमधील आंदोलनामागे जी अनेक वर्षांची तयारी होती, ती कुणी लक्षातच घेत नाहीये. बालेनशाह हा चेहरा दिसत असला तरी त्याच्यामागे त्याची एक संस्था होती, जी अनेक वर्षे काम करत होती. भ्रष्टाचार विरोध या एका महत्त्वाचा मुद्द्यांसह त्यांनी इतर मुद्दे घेऊन जागृती केली होती. तसं आता या 'नीट'च्या आंदोलनातून काहीही झालेलं नाहीये."

दुसऱ्या बाजूला, कॉक्रोच जनता पार्टी नुकताच सुरू झालेला जेनझीचाच आक्रोश आहे. आणि यांचा हिंसेवर विश्वास नाही, ही चांगली गोष्ट आहे, असं मत विश्वंभर चौधरी व्यक्त करतात.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा अण्णा आंदोलनाचा 'भाग 2' आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात की, "सरन्यायाधीशांच्या विधानातून हे उभं राहिलं असलं तरी त्यामागे बारा वर्षांची खदखद आहे. अण्णांच्या आंदोलनामागेही अशाच खऱ्या-खोट्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांची चीड लोकांमध्ये होती. म्हणजे रियालिस्टीक आणि प्रोजेक्टेड करप्शन असं दोन्हीही त्यामागे उभं होतं. काँग्रेसच्या सत्तेला लोक वैतागले होते. त्याचा एक उत्कलनबिंदू आलेला होता, त्यातून ते उभं राहिलं. इथंही बारा वर्षांच्या दडपशाहीनंतर तो आलेला आहे. हा एक समान मुद्दा आहे."

विनोद शिरसाठ म्हणतात की, "मोदी सरकारच्या सर्व दमनकारी उलाढालींमुळे, देशातील लोकशाहीप्रेमी व खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी व्यक्ती अस्वस्थ झाल्या आहेत, त्यांना देशाची कधी नव्हे इतकी चिंता वाटायला लागली आहे. त्यातच भर म्हणजे या केंद्रीय सत्तेच्या विरोधात ठामपणे उभे राहणारे राजकीय पक्षच दिसत नाहीत. अनेक प्रादेशिक पक्ष एकेका घराण्याच्या दावणीला बांधलेले आहेत, त्यांचे नेते स्वतःची मान सोडवून घेण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करीत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष 12 वर्षांनंतरही मरगळ झटकायला तयार नाही. 'भारत जोडो' यात्रेनंतर राहुल गांधी यांनी कात टाकली, तेव्हापासून त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे आणि व्यक्तिमत्त्वात हुशारी व निर्भयपणा आला आहे. पण त्यांना काँग्रेस पक्ष संघटनेत जान आणण्यात पूर्ण अपयश आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर सीजेपीचे आंदोलन होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे."

या आंदोलनाचं स्वरूप स्पष्ट करताना रवि आमले सांगतात की, "अण्णा आंदोलन अत्यंत जाणीवपूर्वक ठोस अशा मागण्या घेऊन उभं करण्यात आलं होतं. त्याच्यामागे त्यांनी समाजामधून एक मोठा असंतोष जमा केलेला होता. ते आंदोलन सोशल मीडियाचं नव्हतं पण मीडियामधून त्याला मोठी साथ मिळालेली होती. त्याचा फायदा अण्णा आंदोलनाला नक्कीच झाला. पण, कॉक्रोचच्या आंदोलनाला मीडियाचा पाठिंबा नाहीये. विरोधी विचारांच्या संघटना किंवा राजकीय पक्ष अशा कोणत्याही यंत्रणा दिसत नाहीयेत. हा सगळ्यात मोठा फरक आहे."

विश्वंभर चौधरी सांगतात की, "अण्णांचं आंदोलन हे आर्थिक मुद्द्यावरून आलेलं होतं. तर, सध्या तरी झुरळ आंदोलन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आंदोलन आहे. त्यामुळे, दोन्ही आंदोलनाची पूर्णपणे तुलना करता येत नाही. पण, मागील आंदोलनातून शिकून पुढे जाण्याची ही नक्कीच एक संधी आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)