9/11 च्या जखमा : 'वडिलांचं फक्त हेल्मेट मिळालं, ते सापडलेच नाही'; 25 वर्षांनंतरही पटली नाही मृतदेहाची ओळख

Juliette Scauso and her dad, firefighter Dennis Scauso

फोटो स्रोत, Juliette Scauso

    • Author, मॅडलिन हॅल्पर्ट
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

गेल्या 25 वर्षांपासून ज्युलिएट स्काउसोकडं तिच्या वडिलांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसातील आठवणीची एकमेव गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांचं अग्निशमन दलाचं तुटलेलं हेल्मेट.

ज्युलिएटचे वडील डेनिस स्काउसो न्यूयॉर्क शहर अग्निशमन विभागाच्या (FDNY) धोकादायक रसायनांशी संबंधित (hazmat) युनिटमध्ये 12 वर्षं कार्यरत होते. खरंतर 11 सप्टेंबर 2001 रोजी त्यांची ड्युटी नव्हती. मात्र अतिरिक्त मोबदला (overtime pay) मिळावा म्हणून त्यांनी शिफ्ट बदलली होती.

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दक्षिण इमारतीत (South Tower) डेनिस असण्याची शक्यता होती, असं स्काउसो कुटुंबाला सांगण्यात आलं. त्यांचा बॅज क्रमांक असलेलं हेल्मेट काही महिन्यांनी सापडलं.

"माझ्या वडिलांचा मृत्यू झाला या सत्यासह मी जवळपास संपूर्ण आयुष्य जगले. आम्ही त्यांना कधीच परत मिळवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारून जगायला मी शिकले," असं ज्युलिएट स्काउसोनं सांगितलं. वडिलांच्या मृत्यूच्यावेळी त्या अवघ्या चार वर्षांच्या होत्या.

न्यूयॉर्क शहराच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या (Office of Chief Medical Examiner) माहितीनुसार, डेनिस स्काउसो हे 11 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही अशा 1,000 हून अधिक व्यक्तींमधील एक आहेत.

त्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यांमध्ये जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला.

आपल्या वडिलांचं फक्त हेल्मेट मिळालं असं ज्युलिएट सांगतात.

फोटो स्रोत, Juliette Scauso

फोटो कॅप्शन, आपल्या वडिलांचं फक्त हेल्मेट मिळालं असं ज्युलिएट सांगतात.

गेल्या महिन्यात शहर प्रशासनाने दहशतवादी हल्ल्यांतील यापूर्वी ओळख न पटलेल्या एका पीडिताची ओळख जाहीर केली. तो ओळख पटलेला 1,654वा बळी ठरला. यासाठी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटिव्ह जेनेटिक जिनियॉलॉजी (FIGG) या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

"या पद्धतीत खरोखरच मोठी क्षमता आहे," असं शहराच्या वैद्यकीय परीक्षक कार्यालयातील न्यायवैद्यक मानववंशशास्त्र विभागाच्या संचालक अँजेला सोलर म्हणाल्या.

"यामुळे आणखी कुटुंबांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची आशा आहे आणि भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आणखी अवशेषांची तपासणी करता येईल, अशीही अपेक्षा आहे."

9/11 नंतर सोलर यांच्या कार्यालयाने वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 2,753 लोकांच्या अवशेषांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत मृतांपैकी 60 टक्के लोकांची ओळख पटवण्यात यश आलं आहे.

"ओळख पटवण्याच्या दृष्टीने पाहिलं तर हा कदाचित जगाने अनुभवलेल्या सर्वांत गुंतागुंतीच्या प्रयत्नांपैकी एक आहे," सोलर म्हणाल्या.

25 वर्षांनंतरही डीएनए जुळणी सुरू

पीडितांची ओळख पटवण्याच्या प्रयत्नांपुढे अनेक अडचणी आल्या.

विमानांनी धडक दिल्यामुळे आणि जेट इंधनामुळे लागलेल्या आगींमुळे मानवी अवशेषांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे अनेक प्रकरणांत डीएनए नमुन्यांसाठी फक्त अवशेषांचे काही भागच उपलब्ध होते, असं सोलर यांनी सांगितलं.

स्काउसो यांनी सांगितलं की, हल्ल्यांची वेळ अशी होती की अनेक अग्निशमन कर्मचारी शिफ्ट बदलत होते. मात्र काही जण मदतीसाठी थांबले आणि उपलब्ध असलेलं अतिरिक्त साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले.

परिणामी, प्रथम प्रतिसाद देणारे काही कर्मचारी इतरांच्या नावाचे गणवेश घालून सापडले. त्यामुळे ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली.

Juliette Scauso

फोटो स्रोत, Juliette Scauso

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये इतर 9/11 हल्ल्यांच्या ठिकाणांच्या तुलनेत खूपच जास्त बळी गेले होते.

अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 77 हे विमान पेंटागॉनवर आदळल्याने मृत्युमुखी पडलेल्या 184 लोकांपैकी पाच जणांची ओळख आजतागायत पटलेली नाही. यामागेही अशाच प्रकारच्या परिस्थिती कारणीभूत होत्या.

नॅशनल पार्क सर्व्हिसच्या माहितीनुसार, पेन्सिल्व्हेनियातील शॅंक्सव्हिलजवळील शेतात कोसळलेल्या युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट 93 मधील सर्व 40 पीडितांची डीएनए, दंत नोंदी आणि बोटांचे ठसे यांच्या आधारे ओळख पटवण्यासाठी पुरेसे अवशेष मिळाले होते.

भविष्यातील चाचण्यांसाठी डीएनए जतन राहावा म्हणून वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील अवशेष पॅक करून सीलबंद ठेवण्यात आले आहेत.

हल्ल्यांनंतरच्या सुरुवातीच्या काळात पीडितांची ओळख बोटांचे ठसे किंवा दंत नोंदींच्या आधारे पटवली जात होती. मात्र पुढे अशा नोंदी उपलब्ध नसल्यास कार्यालयाने डीएनएकडे मोर्चा वळवला. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अवशेषांमधून डीएनए काढून त्याच नमुन्यांची पुन्हा तपासणी करणं शक्य झालं.

"म्हणूनच इतकी वर्षं उलटल्यानंतरही नवनवीन ओळखी पटत आहेत. कारण उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक नव्या तंत्रज्ञानासह आम्ही पुन्हा चाचणी करत राहिलो आहोत," सोलर म्हणाल्या.

मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, 9/11 नंतर डीएनए तंत्रज्ञानाच्या मदतीनं 1,495 पीडितांची ओळख पटवण्यात आली आहे. काहींची ओळख केवळ डीएनएच्या आधारे, तर काहींची अनेक पद्धतींचा वापर करून पटवली गेली.

गेल्या वर्षी शहर प्रशासनाने जाहीर केलं की डीएनएच्या मदतीने, हल्ल्यांनंतर 24 वर्षांनी, आणखी तीन पीडितांची ओळख पटली आहे. त्यात 26 वर्षीय चलन व्यापारी रायन फिट्झजेराल्ड, बॉस्टनहून लॉस एंजेलिसकडे जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 11 मधील 72 वर्षीय बाबरा कीटिंग, तसेच एका महिलेचा समावेश होता, तिची ओळख तिच्या कुटुंबाने गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला.

सोलर यांनी सांगितलं की, नव्या FIGG तंत्रज्ञानात whole genome sequencing चा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण अनुवंशिक कोड वाचता येतो.

यामुळे तपास करणारे पीडितांच्या अधिक दूरच्या नातेवाईकांशी संभाव्य अनुवंशिक जोड्या किंवा जुळण्या (matches) शोधू शकतात. असे जोड आढळल्यानंतर न्यूयॉर्क पोलीस विभाग पीडितांच्या अधिक जवळच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास मदत करतो.

जुन्या जखमा पुन्हा उघडणारा प्रवास

ज्या लोकांचे अवशेष अद्याप सापडले नाहीत अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचे फोन आजही दर आठवड्याला न्यूयॉर्कच्या वैद्यकीय परीक्षक कार्यालयात येतात.

अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीवर अंत्यसंस्कारही करता आलेला नाही. मात्र काही कुटुंबं अवशेष सापडल्यानंतरही ते न्यूयॉर्कमधील 9/11 स्मारकस्थळी असलेल्या विशेष संग्रहस्थानी (repository) ठेवण्याचा निर्णय घेतात.

हे संग्रहस्थान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागेवरील खडकाच्या थरात (bedrock) बांधण्यात आलं असून तेथे केवळ वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश आहे. जवळच कुटुंबांना शोक व्यक्त करण्यासाठी 'रिफ्लेक्शन रूम' नावाची खासगी जागाही उपलब्ध आहे.

"त्यांच्या प्रिय व्यक्ती आयुष्याच्या अखेरच्या क्षणी जिथं होत्या, तिथंच त्यांना राहू द्यावं असं अनेक कुटुंबांना वाटतं," सोलर म्हणाल्या.

काही लोकांना अवशेष सापडल्याची माहितीही नको असते. कारण ती खात्री त्यांच्यासाठी खूप वेदनादायी ठरू शकते, असं कुटुंबांना माहिती देण्याचं काम करणाऱ्या सोलर यांनी सांगितलं.

स्काउसो अशाच लोकांपैकी एक आहेत.

अलीकडच्या काळात आपल्या नातेवाईकांची अखेर ओळख पटल्याचा फोन आलेले काही लोक त्यांना माहीत आहेत. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासाठी अशा यादीत पुढचा क्रमांक आपलाच असेल, ही कल्पनाही भीतीदायक आहे.

ग्राउंड झिरो

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या कुटुंबानं अनेक प्रकारची कामं करणाऱ्या आणि जॅझ संगीतावर प्रेम करणाऱ्या डेनिस यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.

"आता या टप्प्यावर ओळख पटल्याने त्यांच्या मृत्यूची वस्तुस्थिती बदलणार नाही. त्यामुळे मला माझे वडील परत मिळणार नाहीत. मी दुःखासोबत जगायला आणि त्याचा स्वीकार करायला ज्या पद्धतीने शिकलेय, त्याचा तो एक (आयुष्याचा) भाग बनला आहे. त्यामुळे भूतकाळ पुन्हा उकरून काढण्याची माझी इच्छा नाही," त्या म्हणाल्या.

"विशेषतः 25 वर्षांनंतर, त्यामुळे जुन्या जखमा पुन्हा उघड्या होतील." तरीही, स्काउसो म्हणतात, हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे.

सोलर यांनी पाहिलं आहे की अशा बातम्यांमुळे कुटुंबांना एकाच वेळी दिलासा आणि दुःख, दोन्ही मिळतात.

"त्यांना आधीपासूनच माहीत असलेली गोष्ट त्यातून अधिकृतरीत्या पुष्टी होते. त्यांच्या प्रिय व्यक्तींचा 9/11 मध्ये मृत्यू झाला हे त्यांना माहीत असतं. पण अनेक कुटुंबांच्या मनात अवशेषांची अधिकृत ओळख पटेपर्यंत कुठेतरी एक प्रश्न कायम राहतो," असं सोलर म्हणाल्या.

"नवी ओळख पटल्यावर कदाचित ते पुन्हा तो अनुभव जगत असतील. पण त्याच वेळी 9/11 नंतरच्या त्यांच्या प्रवासातील एक अध्याय पूर्णही होत असतो," त्या पुढे म्हणाल्या.

सोलर यांच्यासाठी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांसाठी हे काम अत्यंत वैयक्तिक स्वरुपाचं आहे. कारण त्यांपैकी काही जण 9/11 च्या दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते.

त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी विमानं या इमारतींवर आदळल्यानंतर ग्राउंड झिरोला पोहोचले होते आणि इमारती कोसळल्या तेव्हाही ते तिथंच होते.

न्यूयॉर्कमधील हल्ल्यांतील प्रत्येक पीडिताची ओळख पटवण्यात यश येईल, अशी अपेक्षा नाही, याची त्यांना जाणीव आहे. काही प्रकरणांत एखाद्या व्यक्तीचं कोणतेही अवशेष अस्तित्वात नसण्याची शक्यता आहे.

तरीही ते हे प्रयत्न थांबवणार नाहीत.

"जोपर्यंत उत्तरांच्या शोधात असलेली कुटुंबं आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी शोध सुरू ठेवू," सोलर म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.