मनावरचा ताण हृदयापर्यंत कसा पोहोचतो? चिंता, नैराश्य आणि हृदयविकाराचं नातं समजून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
हृदयविकार म्हटलं की उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा धूम्रपान यांसारख्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनांनी मानसिक आरोग्याचाही हृदयाच्या आरोग्याशी घनिष्ठ संबंध असल्याचं अधोरेखित केलं आहे.
नैराश्य, चिंता आणि दीर्घकालीन ताण यांचा संबंध हृदयविकाराचा धोका वाढण्याशी असल्याचं अनेक अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे.
मनुष्याला ताण येतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनलिनसारख्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तदाब वाढणं, हृदयाचे ठोके वेगवान होणं आणि रक्तवाहिन्यांमध्ये दाह होण्याची म्हणजे इन्फ्लमेशनची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये झोप कमी असणं, व्यायाम कमी असणं, अयोग्य आहार किंवा व्यसनं यांसारख्या सवयी अधिक आढळू शकतात. या घटकांचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मनावरचा ताण हृदयापर्यंत कसा पोहोचतो?
मानसिक आरोग्य आणि हृदय यांच्यातील संबंध फक्त भावनिक नाही तर जैविकही आहे. शरीरातील 'फाइट ऑर फ्लाइट' यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिनसारखे ताणसंबंधी हार्मोन्स स्रवतात.
अल्पकालीन परिस्थितीत ही नैसर्गिक प्रतिक्रिया उपयुक्त असली तरी सततचा ताण असल्यास त्याचा परिणाम हृदय व रक्तवाहिन्यांवर होऊ शकतो.
आतापर्यंतच्या संशोधनांनुसार दीर्घकालीन ताण आणि नैराश्य यांचा संबंध दाह (inflammation), स्वायत्त मज्जासंस्थेतील बदल आणि हृदयविकाराच्या वाढलेल्या धोक्याशी जोडला गेला आहे.
काही अभ्यासांनी हृदयविकार आणि नैराश्य यांच्यात 'दुतर्फा संबंध' असल्याचंही सुचवलं आहे. म्हणजे नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो आणि हृदयविकारानंतर नैराश्य येण्याची शक्यताही वाढू शकते.
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या 2025 च्या निवेदनात मानसिक आरोग्य आणि हृदयविकार यांच्यातील परस्परसंबंधांबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यात काय फरक?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. त्याची नीट माहिती घेणं आवश्यक आहे.
चिंता आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते तेव्हा पॅनिक अटॅक आला असं म्हणतात.
पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीला अचानक छातीत धडधडू लागतं, घाम येतो, भीती वाटते, अस्वस्थ वाटून कुठंतरी मोकळ्या हवेत जावं असं वाटू लागतं, तोंड सुकतं. सर्व लक्ष शरीराकडे केंद्रित होतं.
अशा रुग्णाने घाबरुन अधिक धावपळ केल्यास हृदयाचे ठोके अधिक जलदगतीनं पडून आणखी भीती वाटायला लागते. घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते.

फोटो स्रोत, Getty Images
अशी लक्षणं दिसल्यावर धावपळ करुन डॉक्टरकडे जाऊन इसीजी काढल्यावर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं समजतं. तुम्हाला पॅनिक अटॅक आला असावा असं डॉक्टर सांगतात.
पण घरी आल्यावरही व्यक्तीला आपल्या दुखण्याचं मूळ कारण शरीरातच असावं असं वाटत असतं आणि ते डॉक्टरांनाच सापडत नाहीये असं वाटून रुग्ण डॉक्टर बदलत राहातो.
एखादे डॉक्टर त्याला शेवटी मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतात. तेव्हाही व्यक्तीला हे पटत नसतं.
कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शारीरिक लक्षणं दिसत असल्यामुळे त्याचं मूळ मनामध्ये असेल असं व्यक्तीला वाटत नाही. त्यामुळे रुग्ण मनोविकारतज्ज्ञाकडे जायला टाळाटाळ करतात.
अशा रुग्णांशी नीट संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन चिंतेचं मूळ शोधावं लागतं. घरच्याघरी तसेच कोणत्याही तपासण्यांविना निदान करू नये असं डॉक्टर सुचवतात.
पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक यातला फरक डॉक्टरच तपासणीनंतर, चाचणीनंतर सांगू शकतात. त्यांनी केलेले निदान लक्षात घेऊन मग उपचार घेतले पाहिजेत.

फोटो स्रोत, Getty Images
पॅनिक अटॅक हे सर्वसाधारपणे शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे येतात. शारीरिक कारणांमध्ये उत्तेजित अवस्था (एक्साइटमेंट) येण्यामुळे हे होऊ शकतं.
कॉफी किंवा कॅफिन असणारी कोल्ड्रिंक्स, निकोटीन, अतिरेकी चहापान किंवा उत्तेजक द्रव्यांचे सेवन यामुळे ही स्थिती येऊ शकते.
तसेच सेराटोनिन, थायरॉईड, ॲड्रनलिन यांच्या प्रमाणात होणारी अनियमितता कारणीभूत असते. वेगाने श्वास घेणाऱ्या व्यक्तींनाही त्रास उद्भवू शकतो असं डॉक्टर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
शारीरिक कारणांबरोबरच सतत चिंताग्रस्त असणे, नैराश्य, तीव्र भीती (फोबिया) अशा कारणांमुळेही पॅनिक अटॅक येऊ शकतात.
एखादी नको असलेली, भीती निर्माण करणारी घटना, गोष्ट घडल्यास, तशी व्यक्ती, प्राणी समोर आल्यास व्यक्तीला असा अनुभव येऊ शकतो. काही व्यक्तींना कोणत्याही स्पष्ट कारणांविना अचानक पॅनिक ॲटॅक येऊ शकतो.
याबरोबरच हार्ट अटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट यातही फरक आहे. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा- हार्ट अटॅक, कार्डिअॅक अरेस्टची लक्षणं कशी ओळखायची? या 5 टेस्टमुळे होऊ शकते मदत
दीर्घकाळ ताण असेल तर काय होतं?
दीर्घकाळ ताणाखाली राहिल्यास शरीर कायम 'अलर्ट मोड'मध्ये राहते. अशावेळी ताणाशी संबंधित हार्मोन्स सतत सक्रिय राहतात. त्यामुळे हृदयाला अधिक काम करावे लागते, रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडतो. कालांतराने यामुळे शरीरात दाह वाढू शकतो आणि हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.
हे तर आपल्या लक्षात आलं, आता नैराश्याचा आपल्या हृदयावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊ.
हा प्रश्न आम्ही डॉ. प्रशांत पवार यांना विचारला. ते फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी (नवी मुंबई) येथे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. पवार म्हणाले, "नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं विविध अभ्यासांतून दिसून आलंय. नैराश्याचा परिणाम ताणाशी संबंधित हार्मोन्स, शरीरातील दाह, झोपेची गुणवत्ता, शारीरिक हालचालीं आणि आरोग्यदायी सवयींवर होऊ शकतो. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "अॅड्रेनलिनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो, तर कोर्टिसोल शरीराला ताणाचा सामना करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध करून देतो. अल्पकाळासाठी ही प्रतिक्रिया उपयुक्त असली तरी वारंवार किंवा दीर्घकाळ ती सक्रिय राहिल्यास हृदयावरील ताण वाढू शकतो. तसेच उच्च रक्तदाब, रक्तातील साखर आणि चरबीचे चयापचय यांमध्ये बदल होऊ शकतात."
मग मानसिक ताणाच्या बाबतीत कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नयेत असं विचारल्यावर डॉ. पवार म्हणाले, "ताणाचा हृदयावर परिणाम होत असल्याची काही शारीरिक लक्षणं दिसू शकतात. यामध्ये धडधड वाढणं, छातीत दडपण किंवा जडपणा जाणवणं, श्वास लागणं, चक्कर येणं, जास्त घाम येणं आणि सतत थकवा जाणवणं यांचा समावेश होतो."
मात्र, ही लक्षणं दिसली तर ती केवळ ताणामुळेच आहेत असं गृहीत धरू नये, असा इशारा ते देतात. विशेषत: लक्षणं नवीन असतील, तीव्र असतील किंवा वारंवार होत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
तरुणांनाही धोका असू शकतो
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव देढिया यांच्या मते, निरोगी हृदय म्हणजे केवळ कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि व्यायाम यांचाच विचार करणे नव्हे.
आपण ताणाचे व्यवस्थापन कसे करतो आणि मानसिक आरोग्याची किती काळजी घेतो, याचाही हृदयाच्या आरोग्यावर महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो.
ते सांगतात, आजचे तरुण वाढत्या कामाच्या ताणाचा, आर्थिक दबावाचा आणि सामाजिक अपेक्षांना तोंड देत आहेत. त्याचबरोबर बैठं जीवनमान आणि अपुरी झोप या समस्याही वाढत आहेत. या घटकांकडे वेळीच लक्ष दिल्यास पुढील आयुष्यातील हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
डॉ. वैभव देढिया म्हणतात, "मानसिक आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असा विचार आपण आता थांबवायला हवा. मेंदू आणि हृदय यांच्यात सतत संवाद सुरू असतो. त्यामुळे यापैकी एकाची काळजी घेतल्यास दुसऱ्याचेही संरक्षण होऊ शकते."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























