तोंडातली जखम बरी होत नाही? तरुणांमध्ये 'हेड अँड नेक' कॅन्सर वाढतोय

फोटो स्रोत, Getty Images
हेड अँड नेक (Head & Neck) कॅन्सरचे रुग्ण वाढत असताना, चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्येही या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
पूर्वी हा आजार मुख्यतः मध्यमवयीन किंवा वृद्ध लोकांमध्ये दिसत होता, पण आता तरुण पिढीतल्यालोकांमध्येही त्याचं प्रमाण वाढतंय. यामागे सर्वात मोठा वाटा तंबाखू, गुटखा आणि मद्यपान यांचा असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
भारतात ओरल कॅन्सरचे 80-90 टक्के रुग्ण तंबाखूजन्य पदार्थ खाण्याशी संबंधित असल्याचं दिसतं.
तंबाखू आणि मद्य यांचा एकत्र परिणाम कॅन्सरचा धोका आणखी वाढवतो.
याशिवाय, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा नव्याने उदयास येणारा महत्त्वाचा घटक आहे, तो विशेषत: घशाच्या कॅन्सरशी जोडला जात आहे.
HPV संबंधित घशाच्या कॅन्सरचे प्रमाण जगभरात विशेषतः तरुणांमध्ये वाढत आहे.
HPV चे काही प्रकार घसा आणि टॉन्सिलच्या भागात संसर्ग करून कालांतराने कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे HPV लसीकरण आणि सुरक्षित आरोग्य सवयींबाबत जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.
बदललेली जीवनशैली, फास्टफूड, ताणतणाव, आणि धूम्रपान किंवा व्हेपिंगची वाढती सवय हे सर्व घटक तरुणांमध्ये धोका वाढवत आहेत.
या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं साधी वाटतात. तोंडात जखम न भरणं, घसा दुखणं, आवाज बदलणं. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. योग्य वेळी निदान झाल्यास हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण उशीर झाला तर उपचार कठीण होत जातात. त्यामुळे जागरूकता आणि लवकरात लवकर तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
डोके आणि मान (Head & Neck) कॅन्सर हा एक व्यापक प्रकार असून त्यात तोंडाचा (Oral) कॅन्सरही समाविष्ट होतो.
ओरल कॅन्सर हा फक्त तोंडातील भागापुरता मर्यादित असतो, तर हेड अँड नेक कॅन्सरमध्ये घसा, स्वरयंत्र, नाक यांसारखे इतर अवयवही येतात. म्हणजेच, ओरल कॅन्सर हा या मोठ्या गटातील एक उपप्रकार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या मते, डोकं आणि मान कॅन्सरच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे एकापेक्षा जास्त घटक कारणीभूत आहेत सर्वात मोठं कारण म्हणजे तंबाखूचे विविध प्रकार सिगारेट, बीडी, गुटखा, पान. हे सर्व पदार्थ थेट कॅन्सरजन्य गोष्टींशी संबंधित आहेत.
यासोबतच मद्यपान केल्यास धोका आणखी वाढतो आणि हे सगळं एकत्रित येणं सर्वात घातक मानलं जातं.
तसेच, HPV संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याने विशेषत: घशाच्या कॅन्सरमध्ये वाढ दिसून येते. भारतात सुमारे 33% हेड अँड नेक कॅन्सर रुग्णांमध्ये HPV आढळतो, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Prashanth Vishwanathan/Bloomberg via Getty Images
तरुणांमध्येव्हेपिंग आणि ई-सिगारेट्सचा वाढता वापर, तसेच झोपेचा अभाव, भरपूर प्रक्रिया केलेले पदार्थ, तोंडाचं आरोग्य नीट नसणं याही गोष्टी धोका वाढवतात.
सध्या 20 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये हा वाढता ट्रेंड अधिक दिसतो, विशेषतः पुरुषांमध्ये.
म्हणूनच, तंबाखू पूर्णतः थांबवणं, मद्यपान मर्यादित ठेवणं, HPV लसीकरण, नियमित तपासणी आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणं या प्रतिबंधात्मक उपायांनी या कॅन्सरपासून मोठ्या प्रमाणात रक्षण करता येतं.
डोकं आणि मान (Head & Neck) कॅन्सरची लक्षणं
- तोंडात जखम किंवा अल्सर 2–3 आठवड्यांत भरत नसेल
- सतत घसा दुखणे किंवा खवखव
- आवाजात बदल किंवा बसणं
- गिळताना त्रास किंवा वेदना
- तोंडात लाल किंवा पांढरे डाग दिसणं
- मान किंवा जबड्याजवळ गाठ जाणवणं
- कानात वेदना
- तोंडातून किंवा घशातून रक्त येणे
- वजन अचानक कमी होणं
भारतात काय स्थिती?
भारतातील तरुणांमध्ये डोकं आणि मान कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागील सर्वात मोठं कारण म्हणजे लहान वयातच तंबाखूच्या विविध प्रकारांचा वाढता वापर म्हणजे सिगारेट, गुटखा, पानमसाला आणि धूररहित धूम्रपानाची साधनं यांचा वापर होतो आहे.
याशिवाय अयोग्य आहारपद्धती, सततचा ताण, अपुरी झोप, मद्यपान आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला न घेणं हे जीवनशैलीशी संबंधित घटकही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
तसेच, वाढती जनजागृती आणि सुधारित निदान तंत्रज्ञानामुळे तरुण वयोगटात हे कर्करोग लवकर आणि अधिक प्रमाणात समोर येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल डॉ. मोहसिन शेख यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. डॉ. शेख हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (एचएनसीआयआय) येथे सल्लागार कर्करोग शल्यविशारद म्हणून कार्यरत आहेत.
ते सांगतात, तंबाखू आणि गुटखा हे भारतातील डोकं आणि मान कर्करोगाशी संबंधित जोखीम वाढवणारे घटक आहेत. "धूररहित तंबाखू आणि सुपारीयुक्त पदार्थ नियमितपणे चघळल्यास, विशेषतः तरुणांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तंबाखूबरोबर मद्यपान केल्यास हा धोका अधिक वाढतो. धूररहित धूम्रपान साधनांचाही वापर चिंतेचा विषय बनत आहे, कारण निकोटीन आणि रासायनिक उत्तेजक पदार्थांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे तोंड आणि घशाच्या आतील आवरणाला हानी पोहोचू शकते. मात्र, भारतीय लोकसंख्येशी संबंधित दीर्घकालीन अभ्यास अजून सुरू आहेत."
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि झटपट अन्नसंस्कृतीमुळेही या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे का? असं विचारल्यावर डॉ. शेख म्हणाले, "जीवनशैलीशी संबंधित घटक थेट कर्करोग निर्माण करत नसले तरी ते शरीराची प्रतिकारशक्ती कमी करून धोका वाढवतात. अपुरं पोषण करणारा आहार, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती, सततचा मानसिक ताण, मद्यपान आणि अनियमित झोप या सर्व गोष्टी शरीराच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात आणि पेशींमध्ये होणाऱ्या सुरुवातीच्या हानीपासून संरक्षण करण्याची क्षमता कमी करतात. तंबाखूबरोबर हे घटक मिळून कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढवतात."
ते सांगतात, "तरुणांकडून दुर्लक्षित होणारी सुरुवातीची लक्षणं म्हणजे तोंडातील न भरून येणारे व्रण, गिळताना त्रास होणे, आवाज बसणे, मानेवर कारण नसताना सूज येणं, तोंडात पांढरे किंवा लाल डाग दिसणे, वारंवार घसा दुखणे, तोंडातून रक्त येणे, जबड्यात वेदना आणि अचानक वजन कमी होणं. सुरुवातीच्या अवस्थेत ही लक्षणे सहसा वेदनारहित असल्याने अनेकजण वैद्यकीय तपासणी करायला वेळ लावतात आणि हा विलंब गंभीर ठरू शकतो."
हा कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो का?
सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास डोके आणि मान कर्करोगाचे उपचार अनेकदा यशस्वीपणे करता येतात आणि उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात.
लवकर निदान झालं तर केवळ रुग्ण जगण्याचं प्रमाण वाढत नाही, तर बोलणे, गिळणे यांसारखी महत्त्वाची कार्यं आणि रुग्णाच्या एकूण जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासही मदत होते. म्हणूनच जनजागृती आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. हितेश सिंघवी हे ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्स येथे हेड अँड नेक ऑन्कोसर्जरी विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. ते सांगतात,"सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालेला हेड अँड नेक कॅन्सर मोठ्या प्रमाणात उपचारक्षम असून अनेक वेळा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लवकर निदान झाल्यास उपचार कमी आक्रमक असतात, रुग्ण लवकर बरा होतो आणि बोलणे व गिळणं यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्षमतेचे जतन होण्याची शक्यता जास्त असते. भारतात उशिरा निदान होणे हे अजूनही मोठे आव्हान आहे."

फोटो स्रोत, Getty Images
भारतात यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत असं विचारल्यावर डॉ. सिंघवी म्हणाले, "आज याच्या उपचारपद्धती अत्यंत प्रगत आणि वैयक्तिक स्वरूपाच्या झाल्या आहेत. कॅन्सरची अवस्था आणि जागा लक्षात घेऊन मिनिमली इन्वेसिव्ह सर्जरी, रोबोटिक सर्जरी, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. ऑन्कोलॉजिस्ट, सर्जन, रेडिएशन तज्ज्ञ, न्यूट्रिशनिस्ट आणि पुनर्वसन तज्ज्ञ यांच्या संयुक्त उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे परिणाम आणि जीवनमान अधिक चांगले होत आहे."
ते पुढं म्हणाले, "कॅन्सरच्या जागेनुसार बोलणं, चावणं, गिळणं आणि श्वास घेणं यांसारख्या मूलभूत कार्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. रुग्णांना वेदना, खाण्यात अडचणी, वजन कमी होणं आणि मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो. मात्र आधुनिक पुनर्रचना शस्त्रक्रिया, स्पीच थेरपी, पुनर्वसन आणि सहाय्यक उपचारांच्या मदतीने अनेक रुग्ण पुन्हा आत्मविश्वासाने सामान्य जीवन जगू शकतात."
हा कॅन्सर टाळण्यासाठी काय करता येईल?
- तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणं.
- मद्यपान मर्यादित ठेवणं किंवा टाळणं
- तोंडाची स्वच्छता राखणं.
- फळं आणि भाज्यांनी समृद्ध असा संतुलित आहार घेणं.
- नियमित व्यायाम करणं आणि ताण नियंत्रणात ठेवणं.
- स्वतःहून औषधं घेणं टाळणं.
- कोणतीही लक्षणे दीर्घकाळ दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं.
- नियमित आरोग्य तपासणी.

फोटो स्रोत, Getty Images
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























