एकट्याने जेवणं आणि मिळून जेवणं याचा आरोग्याशी जवळचा संबंध; अभ्यासातून ही माहिती आली समोर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डेविड रॉबसन आणि अलेसिया फ्रांको
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
रोजच्या जेवणाच्या पद्धतीत केलेला एक साधा बदल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चमत्कार करू शकतो.
यामुळे नैराश्य दूर राहण्यास मदत होते, स्मरणशक्तीशी संबंधित आजाराचा धोका टळू शकतो, जेवणाचा खरा आनंद घेता येतो आणि तुमचे आयुष्यही वाढू शकते.
ही गोष्ट आहे माणसाच्या सर्वात जुन्या सवयींपैकी एका सवयीची. ती म्हणजे 'कमेन्सॅलिटी', म्हणजेच सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची सवय.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि मानवी वर्तनाचे अभ्यासक प्रोफेसर जॅन-इमॅन्युएल डी नेव्ह यांच्या मते, "एकत्र बसून जेवणे हा एकमेकांमधील नातेसंबंध घट्ट करण्याचा, विश्वास वाढवण्याचा आणि नात्यांना जोडणारा एक महत्त्वाचा धागा आहे."
याचा आपल्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर आणि एकूणच सुखी आयुष्यावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो.
आजच्या धावपळीच्या जगात लोकांमध्ये अंतर वाढल्यामुळे एकत्र जेवण्याची ही सुंदर संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे.
पण, खरं तर एकमेकांशी पुन्हा जोडले जाणे आणि जेवणाच्या टेबलावर मैत्रीचे तेच जुने बंध नव्याने घट्ट करणे, हे आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप जास्त सोपे आहे.
एकत्र जेवल्याने मानसिक आरोग्य सुधारू शकते
एकत्र जेवण्याच्या सवयीवर झालेल्या बहुतांश अभ्यासांतून हे समोर आलं आहे की, याचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आहे.
चीनमधील झेजियांग प्रांताच्या 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन'मधील संशोधक शिनी वांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात एक संशोधन केले.
या संशोधनासाठी 60 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील 9,361 महिलांचा अभ्यास करण्यात आला.
जेवताना सोबत बसणाऱ्या माणसांची संख्या एखाद्या व्यक्तीमधील नैराश्याची पातळी किंवा त्याचा धोका किती आहे, हे स्पष्टपणे दाखवून देते, हे अभ्यासातून समोर आलं.
महिलांचं एकूण आरोग्य, त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्या एकट्या राहतात की कुटुंबासोबत, अशा अनेक घटकांचा बारकाईने विचार केल्यानंतरही या निष्कर्षात काहीच बदल झाला नाही.
संशोधकांच्या मते, एकत्र बसून जेवण्याच्या साध्या सवयीतच अशी काही मोठी शक्ती दडलेली आहे, जी आपल्या मानसिक आरोग्याला सावरते.
जगातील इतर अनेक अभ्यासांतूनही हेच सत्य समोर आले आहे. टोकियोमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार कुटुंबासोबत राहत असूनही जेवताना मात्र एकटे बसणाऱ्या 65 ते 74 वयोगटातील ज्येष्ठांमध्ये, इतरांसोबत एकत्र जेवणाऱ्यांच्या तुलनेत डिप्रेशनची लक्षणे उद्भवण्याची शक्यता तब्बल 5 पटीने जास्त असल्याचे दिसून आले.
याचा सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा मिळतो तो 'वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट'मधून. जगभरातील लोकांचे विचार जाणून घेणाऱ्या 'गॅलप'च्या जागतिक सर्व्हेवर आधारित आनंदाचा हा वार्षिक ताळेबंद असतो.
2024 मध्ये जपानची प्रसिद्ध फूड कंपनी 'अजिनोमोटो'ने या अहवालात लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर एक स्वतंत्र विभाग जोडण्यासाठी सहकार्य केले होते, ज्यामध्ये खालील प्रश्नांचा समावेश होता:
(1 ) मागच्या 7 दिवसांमध्ये तुम्ही किती दिवस ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीसोबत दुपारचे जेवण केले?
(2) मागच्या 7 दिवसांमध्ये तुम्ही किती दिवस ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीसोबत रात्रीचे जेवण केले?

फोटो स्रोत, Getty Images
डी नेव्ह यांनी अलीकडच्या 'वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट'मध्ये एकत्र जेवण्याच्या महत्त्वाला अधोरेखित करणारा एक विशेष भाग लिहिला आहे.
डी नेव्ह सांगतात, "हे आकडे पाहून मला प्रचंड आश्चर्य वाटले. कारण हा सर्व्हे जगभरातील तब्बल 1,50,000 लोकांच्या उत्तरांवर आधारित होता."
त्यांच्या टीमला असे दिसून आले की, जे लोक नियमितपणे इतरांसोबत मिळून जेवतात, त्यांच्यामध्ये भावनिक सुख, आनंद आणि मानसिक समाधानाची पातळी कितीतरी पटीने जास्त असते.
या अभ्यासाचा निकाल प्रत्येक वेळी एकसारखाच लागला ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
डी नेव्ह सांगतात, "माणूस आयुष्यात किती समाधानी आहे, हे जेवढे त्याच्या नोकरीवरून आणि मिळणाऱ्या पगारावरून ठरते, अगदी तेवढाच मोठा प्रभाव त्याच्या एकत्र जेवण्याच्या सवयीवरून दिसून येतो."
वास्तविक पाहता, नोकरी आणि पैसा हेच माणसाच्या सुखाचे सर्वात मोठे आधार मानले जातात. पण सहभोजनाचा प्रभावही त्यांच्याइतकाच मोठा आढळला.
नेमका काय फायदा होतो?
डी नेव्ह स्पष्ट करतात की, एकत्र बसून खाण्याबाबत विचारलेले प्रश्न हे एखादी व्यक्ती समाजात किती मिसळते किंवा तिचा सोशल कनेक्ट कसा आहे, हे दाखवणारे असू शकतात. पण तरीही सहभोजनाच्या या साध्या पद्धतीमध्ये काहीतरी विशेष जादू नक्कीच आहे, ज्याचा थेट परिणाम मनावर होतो.
डी नेव्ह सांगतात की, इंग्रजीतील 'कंपॅनियन' म्हणजे सोबती किंवा मित्र हा शब्द लॅटिनमधील 'कम' आणि 'पॅनीस' या शब्दांतून आला आहे. ज्याचा अर्थ 'रोटी किंवा अन्न वाटून घेणारा' असा आहे.
दुसरीकडे याच अर्थाचा चिनी शब्द 'हुओ बान' अशा शब्दांपासून तयार झाला आहे. ज्याचा संदर्भ स्वयंपाकघरातील एकाच चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या सैनिकांशी आहे.
ते सांगतात, "एकत्र जेवण्याची ही भावना माणसाच्या संस्कृतीत शतकानुशतके अगदी खोलवर रुजलेली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील जैविक मानववंशशास्त्रज्ञ रॉबिन डनबार यांनी आपल्या 'फ्रेंड्स' या पुस्तकात लिहिले आहे की, अन्न नैसर्गिकरीत्याच मेंदूतील एंडॉर्फिन प्रणालीला चालना देते.
एंडॉर्फिन्स हे शरीरातील असे हार्मोन्स आहेत, ज्यामुळे आपल्याला आतून आनंदी आणि उत्साही वाटते. याचा फायदा असा होतो की, जेवणाच्या टेबलावर जोडली गेलेली नाती आणखी घट्ट होतात आणि आपण एकमेकांशी मनापासून जोडले जातो.
आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, सोबत कोणीतरी असले की आपल्याला जेवणाचा किंवा खाण्याचा आनंद अधिक मिळतो.
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एरिका बूथबी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काही संशोधनांमध्ये समोर आले की, एकट्याने चॉकलेट खाण्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीसोबत बसून चॉकलेट खाणाऱ्या लोकांना त्याची चव खूप जास्त आवडली आणि रुचकर वाटली.
विस्मृतीच्या आजाराचा धोका टळतो
एकत्र बसून जेवल्याने मेंदूची वय वाढण्याची प्रक्रिया मंदावू शकते.
2025 मध्ये जपानमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले की, जे लोक नेहमी एकटेच जेवतात, त्यांच्या मेंदूतील विचार आणि स्मरणशक्तीशी संबंधित महत्त्वाच्या भागांचा आकार आकुंचन पावतो. यामध्ये प्रामुख्याने 'मेडियल टेम्पोरल लोब' आणि 'हिप्पोकॅम्पस' या भागांचा समावेश होतो.
यातील काही गोष्टी थेट खाण्यापिण्याच्या सवयींशी जोडलेल्या नक्कीच होत्या. सहसा एकट्याने जेवणारे लोक आहाराच्या पौष्टिकतेकडे तितकेसे लक्ष देत नाहीत. पण एवढेच याचे एकमेव कारण असू शकत नाही.
यातून स्पष्ट होते की, माणसांमधील वावर आणि सामाजिक संवाद कमी होणे हेसुद्धा पुढे जाऊन मेंदूच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत होते.
अभ्यासकांचे असे मत आहे की, सर्वांसोबत बसून जेवल्यामुळे मिळणारा आनंद आणि आपुलकी मानसिक ताण कमी करण्याचे काम करते. आणि मानसिक ताण हा मेंदूचे कार्य मंदावण्यामागचा सर्वात मोठा धोका मानला जातो.
आणखी एक शक्यता अशी आहे की, जेवणादरम्यान होणाऱ्या गप्पा आणि संवाद मेंदूला अतिरिक्त मानसिक चालना देतात ज्यामुळे वृद्धापकाळापर्यंत मेंदू सक्रिय राहू शकतो.
अभ्यासादरम्यान यात सहभागी लोकांची कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजेच आकलनक्षमता सर्वसाधारण असल्याचे मानले गेले होते. परंतु संशोधकांनी असा इशारा दिला की मेंदूच्या रचनेतील ही घट पुढे जाऊन त्यांच्यामध्ये विस्मृतीच्या आजाराचा धोका वाढवू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
जगभरातील खाण्यापिण्याच्या संस्कृतीत किती विविधता आहे, हे 'वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट'मधून स्पष्ट होते. पण अशा काळातही सर्वांनी एकत्र येऊन सुखाने जगण्याची परंपरा जपणाऱ्या देशांकडून आपल्याला नक्कीच खूप काही शिकण्यासारखे आहे.
जपानचे उदाहरण घेतले, तर तिथे लोक आठवड्यातून सरासरी 4 पेक्षाही कमी वेळा कोणासोबत तरी बसून जेवताना दिसतात.
ब्रिटन आणि अमेरिकेत लोक आठवड्यातून सरासरी 7 ते 8 वेळा इतरांसोबत जेवतात. तर इटलीमध्ये हा आकडा थेट 9 वर जातो.
इटलीची ओळखच मुळात त्यांच्या एकत्र येऊन खाण्यापिण्याच्या दिलखुलास संस्कृतीमुळे आहे. युनेस्कोने जेव्हा इटालियन जेवणाच्या परंपरेचा 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून गौरव केला तेव्हा त्यांनीही स्पष्ट केले की अन्न हे घर असो वा शाळा किंवा कोणतेही सण-समारंभ, प्रत्येक ठिकाणी "कुटुंब आणि माणसांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे" मोठे काम करते.
म्हणूनच आजच्या धकाधकीच्या आधुनिक युगातही एकत्र जेवण्याची ही सुंदर संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यात इटली सर्वांत पुढे आहे यात काहीच नवल नाही.
50 वर्षांपूर्वी जगात जेव्हा फास्ट फूडची क्रेझ झपाट्याने वाढू लागली, तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून इटलीत 'स्लो फूड चळवळ' सुरू झाली.
स्थानिक खाद्यसंस्कृती टिकवणे आणि पर्यावरणपूरक खाण्याच्या पद्धती रुजवणे हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट तर आहेच. पण त्यासोबतच दिवसातील काही वेळ प्रत्येकाने एकत्र बसून जेवण्यासाठी काढला पाहिजे यावरही या चळवळीने नेहमीच भर दिला आहे.
'स्लो फूड इटालिया'च्या अध्यक्षा बार्बरा नाप्पिनी सांगतात, "इटलीमध्ये सहभोजन करणे हे केवळ जेवणापुरते मर्यादित नसून तो एक जगण्याचा दृष्टिकोन आहे. एकत्र मिळून स्वयंपाक करणे, जेवणाची तयारी वाटून घेणे या साऱ्यासाठी एकमेकांविषयी प्रेम, काळजी आणि संयम लागतो."
मैत्रीसाठी एकत्र जेवणे
या सगळ्या परंपरेनंतरही 21 व्या शतकातील धकाधकीच्या आयुष्याने इटलीतील अनेक लोकांना एकटे पाडले आहे. पण जर तुम्हाला एकटे जेवण्याचा कंटाळा आला असेल तर त्यावर मात करणे वाटते तितके कठीण नाही.
तुमच्याच आजूबाजूला अशी माणसे असू शकतात जे तुमच्यासोबत जेवणाच्या टेबलावर बसायला एका पायावर तयार असतील आणि त्यांना त्याचा मनापासून आनंद वाटेल.
अनेक संशोधनांमधून हे स्पष्ट झाले आहे की, लोक अशा जेवणाच्या आमंत्रणाला आपण विचार करतो त्यापेक्षा खूप लवकर होकार देतात.
लोकांना आपल्यासोबत राहायला किती आवडते आणि ते आपल्यासोबत वेळ घालवण्यासाठी किती उत्सुक आहेत, याचा अंदाज लावण्यात आपण अनेकदा कमी पडतो.
म्हणूनच तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी एकटेपणाशी झगडत असेल आणि ज्यांना मस्त जेवणासोबत मनमोकळ्या गप्पा मारायला नक्कीच आवडेल असे तुम्हाला वाटत असेल तर विचार न करता थेट त्याला जेवायला बोलावणे हाच सर्वात सोपा उपाय आहे.
आणि जर खरंच सोबत जेवायला कोणाला बोलवावे हे तुम्हाला सुचत नसेल तर आजचं तंत्रज्ञान यावर भन्नाट तोडगा देऊ शकतं..
2019 मध्ये इटालियन टेक उद्योजक पाओलो बावारो यांनी एकट्याने जेवणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी 'टॅब्लो' (Tablo) नावाचं अॅप सुरू केलं. आजवर तब्बल 3,00,000 पेक्षा जास्त वेळा याचा वापर केला गेला आहे.
यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही की, याचे बहुतांश युझर्स हे तरुण आहेत. ज्यांचं सरासरी वय साधारण 30 वर्षे आहे.
यावर बावारो म्हणतात, "त्या वयात नवीन मित्र बनवणं खरंच खूप कठीण असतं. तुम्ही कामात प्रचंड व्यग्र असता, तुमच्या बऱ्याच मित्रांचे स्वतःचे संसार सुरू झालेले असतात. तुम्हाला लोकांमध्ये मिसळायचं असतं, वेळ घालवायचा असतो, पण बाहेर नेमकं कोणासोबत जायचं हेच सुचत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
बावारो स्पष्ट करतात की, त्यांचे हे ॲप कुठल्या एका ठरावीक वर्गासाठी नसून, याकडे केवळ एक डेटिंग ॲप म्हणून मुळीच पाहिले जाऊ नये.
माणसाला मित्र आणि ओळखीची सर्वाधिक गरज ज्या वयात भासते, नेमक्या त्याच वयात लोकांचे सोशल नेटवर्क वाढवणे हाच यामागचा खरा हेतू आहे.
आम्ही जेव्हा डी नेव्ह यांच्याशी या ॲपबाबत चर्चा केली, तेव्हा त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जमील झाकी यांच्या एका अभ्यासाची आठवण करून दिली.
झाकी यांनी कॉलेज कॅम्पसमधील लाजाळू मुलांसाठी एका कॉफी शॉपमध्ये निखळ मैत्रीच्या भेटी घडवून आणल्या होत्या. या छोट्याशा उपक्रमाने विद्यार्थ्यांचा लोकांमध्ये मिसळण्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढवला. डी नेव्ह सांगतात की, असे छोटे-मोठे प्रयत्न "माणसाला आयुष्यभरासाठी सकारात्मक ऊर्जा आणि फायदा देऊ शकतात."
म्हणूनच एकत्र बसून खाण्यापिण्यामुळे तुम्हाला केवळ घट्ट आणि दीर्घकाळ टिकणारी मैत्रीच मिळत नाही तर तुमचे आरोग्य आणि एकूणच आयुष्यातील आनंदही कित्येक पटींनी वाढू शकतो.
(डेव्हिड रॉब्सन हे पुरस्कारप्राप्त विज्ञान लेखक आहेत.तर अलेसिया फ्रँको या इतिहास, संस्कृती, समाज, कथाकथन आणि मानवी जीवनावरील त्यांचा प्रभाव अशा विषयांवर लेखन करणाऱ्या पत्रकार आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
























