भारतात 'या' ठिकाणी डॉक्टर कधीकधी शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची जात विचारतात; जाणून घ्या ते असं का करतात

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शारदा व्ही
- Role, बीबीसी तमिळ
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टर रुग्णाकडून त्याच्या आरोग्याची स्थिती, कोणत्याही औषधाची ॲलर्जी आहे का, तसेच जुना वैद्यकीय इतिहास याविषयी माहिती घेतात.
मात्र काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, रुग्ण कोणत्या समुदायाचा किंवा समूहाचा आहे हे जाणून घेणे भूलतज्ज्ञांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अतिशय गरजेचे असते.
यामागे एक महत्त्वाचे वैद्यकीय कारण आहे.
आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये राहणाऱ्या तेलगू भाषिक आर्य वैश्य तसेच कोमुट्टी चेट्टियार/वैश्य चेट्टी समुदायातील काही व्यक्तींमध्ये 'स्यूडोकोलिनस्टेरेज' (Pseudocholinesterase) नावाच्या एन्झाइमची कमतरता जनुकीयदृष्ट्या आढळते.
ऑपरेशनदरम्यान रुग्णाचे स्नायू शिथिल करण्यासाठी 'स्कोलीन' हे औषध दिले जाते. मात्र ही कमतरता असणाऱ्या व्यक्तींमध्ये या औषधाचा परिणाम नेहमीपेक्षा कितीतरी तास जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
बंगळुरूच्या होस्मॅट हॉस्पिटलमधील भूलतज्ज्ञ डॉ. संतोष चिपरे यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले, "ऑपरेशनपूर्वी रुग्णाला भूल देण्यासाठी जे 'स्कोलीन' हे औषध दिले जाते. त्यामुळे रुग्णाचा श्वास काही क्षणांसाठी थांबतो."
"नेमक्या याच दरम्यान रुग्णाला कृत्रिम श्वास देण्यासाठी श्वसननलिका बसवली जाते. सर्वसाधारणपणे 10 मिनिटांत रुग्ण पुन्हा स्वतःहून नैसर्गिक श्वास घेऊ लागतो. पण ज्यांच्या शरीरात 'स्यूडोकोलिनस्टेरेज' या एन्झाइमची कमतरता असते त्यांना नैसर्गिकरीत्या श्वास घ्यायला कित्येक तास लागू शकतात."
स्यूडोकोलिनस्टेरेज म्हणजे नेमकं काय ?
पुढे माहिती देताना ते म्हणाले, "स्कोलीनमुळे जिवाला थेट धोका नसतो. मात्र जोपर्यंत रुग्ण स्वतः श्वास घ्यायला लागत नाही तोपर्यंत त्याला व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवावे लागते. रुग्णाचा श्वास तत्काळ पूर्ववत सुरू करू शकेल असा कोणताही 'रिव्हर्सल डोस' किंवा औषध उपलब्ध नसते. अखेर काही तासांनी रुग्ण आपोआप नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ लागतो."
डॉ. संतोष चिपरे यांनी सांगितले की, हा प्रकार तेलगू भाषिक वैश्य चेट्टी समाजातील काही लोकांमध्ये तुलनेने जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणूनच भूल देण्यापूर्वी डॉक्टर रुग्णाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारपूस करतात.
मात्र याचा अर्थ असा मुळीच नाही की त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये ही कमतरता असेलच. असा गैरसमज करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फोटो स्रोत, Santhosh Chipre
स्यूडोकोलिनस्टेरेज हे आपल्या लिव्हरमध्ये तयार होणारे एक प्रकारचे एन्झाइम आहे. रक्ताभिसरणासोबत शरीरात फिरणारे हे एन्झाइम ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला दिले जाणारे 'सक्सिनिलकोलिन' आणि 'मिवाक्युरियम' यांसारखी स्नायू शिथिल करणारी औषधे पचवण्याचे म्हणजेच विघटन करण्याचे काम करते.
जर शरीरात हे एन्झाइम योग्य प्रमाणात नसेल किंवा ते नीट काम करत नसेल तर त्या औषधांचा परिणाम शरीरात दीर्घकाळ राहतो. परिणामी स्नायूंची हालचाल थांबते आणि रुग्णाला स्वतःहून नैसर्गिक श्वास घ्यायला बराच वेळ लागतो.
एरवी दैनंदिन जीवनात या समस्येचे कोणतेही लक्षण जाणवत नाही. पण जेव्हा एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी पहिल्यांदा भूल दिली जाते किंवा विशिष्ट औषधे दिली जातात, नेमके तेव्हाच ही जनुकीय कमतरता समोर येते.
"ऑपरेशन संपलं तरी रुग्ण शुद्धीवर आला नाही"
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अशी जनुकीय कमतरता असलेल्या रुग्णांना स्कोलीन दिल्यास ते पूर्णपणे पूर्वस्थितीत येण्यासाठी तब्बल 6 ते 24 तास लागू शकतात.
या समस्येचा रुग्णावर काय परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट करणारा एक प्रत्यक्ष अनुभव चिदंबरम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे प्रोफेसर आणि भूलतज्ज्ञ डॉ. एम. महेंद्रन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितला.
त्यांनी सांगितले, "एका माजी नौदल अधिकाऱ्याच्या पित्ताशयातील खडे काढण्यासाठी आम्ही ऑपरेशन केले होते. त्यावेळी ते त्या विशिष्ट समाजाचे आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. ऑपरेशन तर केवळ अर्ध्या तासात सुरळीत पार पडले, मात्र त्यानंतर रुग्ण वेळेत डोळे उघडून शुद्धीवर आलाच नाही."

फोटो स्रोत, Getty Images
पुढे सांगताना ते म्हणाले, "रुग्ण शुद्धीवर न आल्यामुळे जेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे विचारपूस केली तेव्हा ते त्या विशिष्ट समाजाचे असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्यांच्या शरीरात 'स्यूडोकोलिनस्टेरेज' या एन्झाइमची कमतरता असावी असा अंदाज आम्ही लावला. त्यांना जवळपास 6 तास व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आणि त्यानंतर कुठे जाऊन ते स्वतःहून श्वास घ्यायला लागले."
शस्त्रक्रिया करणारे सर्जन डॉ. राजा महेंद्रन यांनी स्पष्ट केले, "रुग्णाला त्याच्या समाजाबद्दल विचारणे थोडे अवघडल्यासारखे वाटू शकते. पण ही माहिती न घेता जर स्कोलीन दिले तर किरकोळ ऑपरेशननंतरही रुग्णाला कित्येक तास व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर ठेवावे लागते."
"अचानक अशी परिस्थिती ओढवल्यास कुटुंबीय घाबरतात, गोंधळात पडतात आणि उपचारांचा खर्चही विनाकारण वाढतो. म्हणूनच भूल देण्याआधी आम्ही योग्य औषध निवडण्यासाठी या पार्श्वभूमीची चौकशी करून खबरदारी घेतो."
स्कोलीनचा वापर का केला जातो?
आजच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात 'रोक्युरोनियम' आणि 'व्हेक्युरोनियम'सारखी स्नायू सैल करणारी सुरक्षित पर्यायी औषधे सर्रास उपलब्ध आहेत. मात्र तरीही काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये 'स्कोलीन'ला अजूनही तोड नाही आणि त्याचे महत्त्व आजही टिकून आहे, असे डॉ. एम. महेंद्रन यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, "ऑपरेशनच्या वेळी रुग्णाचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स व्हावेत आणि शरीराची हालचाल थांबावी यासाठी स्कोलीन हे औषध दिले जाते."
"विशेषतः ज्यांनी तोंडाच्या कर्करोगासाठी रेडिएशन थेरपी घेतली आहे, तोंडाची शस्त्रक्रिया झालेले रुग्ण किंवा ज्यांच्या जबड्याच्या विशिष्ट रचनेमुळे घशात श्वासनलिका टाकणे अत्यंत कठीण असते, अशा रुग्णांच्या बाबतीत स्कोलीन अत्यंत गुणकारी आणि उपयुक्त ठरते."

फोटो स्रोत, Mahendran
"सध्याच्या काळात स्कोलीनचा वापर आधीपेक्षा बराच कमी झाला आहे आणि डॉक्टर इतर पर्यायी औषधांना पसंती देत आहेत. तरीही काही आणीबाणीच्या क्षणी स्कोलीन जेवढ्या वेगाने आणि अचूकपणे काम करते, तेवढा जलद आणि प्रभावी परिणाम ही पर्यायी औषधे देऊ शकत नाहीत," असंही त्यांनी नमूद केलं.
संशोधन काय सांगते?
2017 मधील 'जर्नल ऑफ फार्मसी प्रॅक्टिस अँड कम्युनिटी मेडिसिन' या नामांकित मेडिकल जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले होते.
'एका भारतीय समुदायामध्ये स्यूडोकोलिनस्टेरेजची कमतरता' या विषयावरील या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतातील आर्य वैश्य समाजात ही जनुकीय कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
या संशोधनात असे नमूद केले आहे की, आर्य वैश्य समुदायातील लोकांमध्ये 'होमोझायगस म्युटेशन' आढळण्याचे प्रमाण 2 ते 4 टक्के इतके असू शकते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा मुलाला आई आणि वडील या दोघांकडूनही एकाच जनुकाची सदोष कॉपी मिळते तेव्हा त्याला 'होमोझायगस म्युटेशन' म्हटले जाते.
अशा वेळी त्या जनुकातील कमतरतेचे परिणाम शरीरावर उघडपणे दिसण्याची शक्यता खूप जास्त असते. याउलट, जर आई आणि वडिलांकडून मिळालेल्या जनुकांमध्ये वेगवेगळे बदल असतील, तर त्याला 'हेटरोझायगस म्युटेशन' असे म्हणतात.
"शस्त्रक्रिया झालेल्या त्या माजी नौदल कर्मचाऱ्यामध्ये बहुधा 'हेटरोझायगस म्युटेशन' असावे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर या एन्झाइम कमतरतेचा संपूर्ण परिणाम न होता, तो केवळ काही प्रमाणातच दिसून आला असावा. परिणामी खूप जास्त काळ न लागता सुमारे 6 तासांनंतर ते स्वतःहून नैसर्गिक श्वास घेऊ शकले," अशी माहिती डॉ. एम. महेंद्रन यांनी दिली.
2017 च्या या संशोधन अहवालात कोईम्बतूरमधील एका अभ्यासाचाही दाखला देण्यात आला आहे. तिथे तपासलेल्या 22 पैकी तब्बल 9 जणांमध्ये 'स्यूडोकोलिनस्टेरेज' या एन्झाइमची कमतरता निष्पन्न झाली होती.
याशिवाय अमेरिकेत अत्यंत क्वचित आढळणारी 'सायलेंट फिनोटाइप' ही अतिशय गंभीर जनुकीय स्थिती (यामध्ये शरीरात हे एन्झाइम नगण्य किंवा अजिबात नसते) वैश्य समाजात दर 24 लोकांमागे एका व्यक्तीमध्ये असण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे.
या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे की, वैश्य समाजात अनेक पिढ्यांपासून आपापल्या जाती-समुदायात विवाह करण्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे 'BCHE' या विशिष्ट जनुकातील बदल पुढील पिढ्यांमध्ये सातत्याने टिकून राहण्याची आणि पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते.
दरम्यान, "आजच्या काळात वेगवेगळ्या समाजांमध्ये विवाह होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या 'स्यूडोकोलिनस्टेरेज' एन्झाइमच्या अभावाचे प्रमाण पुढील पिढ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसत आहे," अशी माहिती डॉ. महेंद्रन यांनी दिली.
इतर देशांतील लोकांमध्येही अशी समस्या असते का?
ही समस्या फक्त तेलगू भाषिक आर्य वैश्य किंवा तमिळनाडूमधील कोमुट्टी चेट्टियार/वैश्य चेट्टी समाजापुरतीच मर्यादित नाही.
आर्य वैश्य समाजाप्रमाणेच, स्यूडोकोलिनस्टेरेज एन्झाइमची कमतरता पर्शियन ज्यू, अलास्कातील काही स्थानिक आदिवासी समुदाय आणि युरोपीय वंशाच्या काही लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळते, अशी नोंद अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या 'MedlinePlus' या अधिकृत डेटाबेसमध्ये करण्यात आली आहे.
जगभरातील आकडेवारीचा विचार केल्यास, ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून दर 3 हजार ते 5 हजार लोकांपैकी एखाद्या व्यक्तीमध्येच अशी जनुकीय कमतरता आढळू शकते, असेही यात नमूद केले आहे.
एका साध्या रक्तचाचणीद्वारे या एन्झाइमची पातळी सहज तपासता येते. मात्र शस्त्रक्रियेपूर्वी प्रत्येक रुग्णाची ही तपासणी सरसकट केली जात नाही.
जर कुटुंबात आधी कोणाला असा त्रास झाला असेल किंवा डॉक्टरांना उपचारादरम्यान तशी शंका आली, तरच ही विशेष चाचणी करून घेण्यास सांगितले जाते.
डॉ. एम. महेंद्रन यांनी माहिती दिली, "कीटकनाशकामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांचे स्नायू आखडतात किंवा त्यांची हालचाल पूर्णपणे मंदावते. स्यूडोकोलिनस्टेरेज एन्झाइमचा अभाव असलेल्या रुग्णांना काही विशिष्ट भूल देणारी औषधे दिल्यावरही अगदी अशीच परिस्थिती उद्भवते."
"म्हणूनच विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करताना प्रतिबंधक औषधे कितपत गुणकारी ठरेल हे तपासण्यासाठी आम्ही रुग्णाच्या शरीरातील या एन्झाइमचे प्रमाण तपासून पाहतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























