आयफेल टॉवर वाद : स्वामीनारायण संप्रदायाचे साधू महिलांपासून लांब का राहतात?

फोटो स्रोत, Kenzo TRIBOUILLARD / AFP via Getty Images
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
पॅरिसमधील आयफेल टॉवरजवळ अलीकडे घडलेल्या एका घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर विशाल अशा स्वामीनारायण संप्रदायाचा एक भाग असलेल्या बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मध्ये महिलांप्रती भूमिका काय आहे, याविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हा संप्रदाय सुमारे 200 वर्षे जुना आहे. त्याची स्थापना स्वामीनारायण यांनी केली होती. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. तेव्हा त्यांचं नाव घनश्याम पांडे होतं.
स्वामीनारायण पंथाचे अनुयायी स्वामीनारायणांना 'देव' मानतात.
पॅरिसमधील वादामुळे या संप्रदायाच्या शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक परंपरेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बीबीसीनं या विषयाशी संबंधित काही प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
उदाहरणार्थ, स्वामीनारायण संप्रदायाच्या धार्मिक ग्रंथांमध्ये महिलांविषयी नेमके काय लिहिलंय आणि साधू महिलांपासून इतके दूर का राहातात?
स्वामीनारायण मंदिरांमध्ये नियमित येणाऱ्या भक्तांच्या म्हणण्यानुसार, महिलांना आशीर्वाद घेण्यासाठी संतांच्या चरणस्पर्श करण्याची परवानगी दिली जात नाही. या विषयावर बीबीसीने BAPS च्या अधिकृत प्रवक्त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
भारतात धार्मिक स्थळांवर महिलांवर निर्बंध असण्याची परंपरा नवी नाही. केरळमधील शबरीमला मंदिर महिलांच्या प्रवेशबंदीच्या मुद्द्यावरून अनेक वर्षे वादाच्या केंद्रस्थानी राहिलंय.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं ही बंदी हटवण्याचा आदेश दिला होता, मात्र या प्रकरणावरील अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
बीबीसीशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि विवेकवादी सरूप ध्रुव म्हणाल्या, "माझ्या मते प्रत्येक धर्माने महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे अस्पर्श्य मानलंय. काही धर्मांनी मात्र ते आपले वैशिष्ट्य म्हणून मांडलंय, इथं स्वामीनारायण संप्रदायानं तेच तत्व पाळलंय."
या संप्रदायाची रचना समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं करण्यात आली होती, असं समाजशास्त्रज्ञ आणि स्वामीनारायण संप्रदायाचे अभ्यासक गौरांग जानी यांना आढळलंय.
स्वामीनारायण संप्रदायाची सुरुवात
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस, हिंदू धर्मात अनेक संप्रदाय आधीच अस्तित्वात असताना, घनश्याम पांडे यांनी 1801 मध्ये एका नव्या परंपरेची सुरुवात केली आणि तिला स्वामीनारायण संप्रदाय असं नाव दिलं.
तेव्हापासून या संप्रदायाचे मुख्यालय गुजरातमध्ये आहे.
1801 मध्ये स्थापना झाल्यापासून या संप्रदायात शिष्यांसाठी, विशेषतः संतांसाठी, ब्रह्मचर्याचे कठोर नियम आहेत. संतांनी कोणत्याही स्त्रीला स्पर्श करू नये किंवा तिच्याकडे पाहू नये, असं भगवान स्वामीनारायण यांनी 'शिक्षापत्री' या ग्रंथात लिहून ठेवलंय.
BAPS ने आयफेल टॉवरच्या वादावर काय म्हटलं?
BAPS च्या साधूंच्या प्रतिनिधीमंडळाने त्यांच्या कठोर ब्रह्मचर्यव्रतांमुळे महिलांशी मर्यादित संपर्क ठेवण्याची विनंती केली होती, असे आरोप केले जात आहेत.
यानंतर आयफेल टॉवर व्यवस्थापनाने महिला कर्मचाऱ्यांना त्यांची कामाची जागा तात्पुरती सोडण्यास सांगितलं होते. त्यांच्या जागी पुरुष कर्मचाऱ्यांना नेमण्यात आलं आणि काही भागांमध्ये महिलांना "दृष्टीआड राहण्यास" किंवा "इतरांना दिसणार नाही अशा प्रकारे राहाण्यास" सांगण्यात आल्याचे आरोप करण्यात आले.
या वादावर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते, "आम्हाला पॅरिसमधील BAPS मंदिराच्या उद्घाटनाची माहिती आहे. मात्र, आयफेल टॉवरशी संबंधित विशिष्ट मुद्दा हा संबंधित पक्षांमधील पूर्णपणे अंतर्गत आणि परस्पर समन्वयाचा विषय आहे."
तर "पॅरिसमधील साधूंच्या भेटीचं नियोजन आयफेल टॉवर प्रशासनाशी पूर्वनियोजितरीत्या समन्वय साधून करण्यात आलेलं. भेटीची वेळ नियमित कामकाज सुरू होण्यापूर्वी ठेवण्यात आलेली, जेणेकरून तेथील कर्मचारी, इतर पर्यटक आणि स्थळाच्या नियमित कामकाजात कमीत कमी व्यत्यय येईल" असं BAPS च्या निवेदनात म्हटलं होतं.
निवेदनात पुढे म्हटले होते, "आम्ही स्पष्ट करू इच्छितो की हा समन्वय टॉवरच्या कार्यपद्धती आणि व्यवस्थेचा विचार करून साधण्यात आला होता."
"मोठ्या संख्येनं लोकांची भेट कोणत्याही गैरसोयीशिवाय पार पडावी आणि टॉवरच्या कर्मचाऱ्यांना किंवा सर्वसामान्य जनतेला अडथळा निर्माण होऊ नये, हा त्यामागील उद्देश होता."
"कोणत्याही टप्प्यावर लिंगाआधारीत (लिंगभेदभाव करणारी) कोणतीही मागणी करण्याचा हेतू नव्हता."
"याउलट कोणताही अर्थ काढला जात असेल, तर तो आमच्या संप्रदायाच्या किंवा प्रतिनिधीमंडळाच्या भावना आणि मूल्यांचं प्रतिनिधित्व करत नाही."
निवेदनात असंही म्हटलंय की, BAPS लिंग, पार्श्वभूमी किंवा श्रद्धा यांचा विचार न करता सर्वांशी समानता, परस्पर आदर आणि सेवेच्या तत्त्वांप्रती कटिबद्ध आहे.
हे मूल्य त्यांच्या परंपरेच्या शिकवणीच्या केंद्रस्थानी आहेत आणि जगभरातील त्यांच्या कार्यामध्ये प्रतिबिंबित होतात.
समाजशास्त्रज्ञ काय म्हणतात?
तथापि, BAPS परंपरेच्या नियमित अनुयायांसाठी हे काही नवीन नाही.
उदाहरणार्थ, गौरांग जानी यांच्या आई स्वामीनारायण मंदिरात नियमित दर्शनासाठी जात असत.
जानी हे प्रख्यात समाजशास्त्रज्ञ असून गुजरात विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.
त्यांच्या आईला देवाचे सर्वसाधारणपणे दर्शन घेण्याची किंवा मंदिरात मुक्तपणे फिरण्याचीही परवानगी नव्हती. महिलांना मंदिरात प्रवेश मिळत असला तरी त्यांना नेहमी पुरुषांपासून वेगळं ठेवलं जाई, हे त्यांनी पाहिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "धर्माच्या बाबतीत आपला सामाजिक इतिहास सांगतो की महिलांनी या गोष्टी देवाची इच्छा म्हणून स्वीकारल्या."
"धार्मिक विधी आणि परंपरांवर प्रश्न विचारू नयेत, असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. म्हणूनच स्वामीनारायण मंदिरांमध्येही ही प्रथा हळूहळू व्यापकपणे स्वीकारली गेली. मोठ्या संख्येनं महिला नियमितपणे दर्शनासाठी येत असतात."
मात्र, हे सर्व कसं सुरू झालं याच्यामागचं कारण मात्र एकदम रंजक आहे.
जानी यांच्या मते, ब्रह्मचर्याचे हे कठोर नियम इतर धार्मिक परंपरांपासून स्वतःला वेगळे दाखवण्याच्या प्रयत्नाचा भाग होते.
त्या काळात विविध परंपरांमध्ये अनुयायी मिळवण्यासाठी स्पर्धा होती.
ते म्हणाले, "या संप्रदायाला हिंदू धर्मातील इतर परंपरांशी, विशेषतः वैष्णव संप्रदायाशी स्पर्धा करावी लागत होती. त्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर ब्रह्मचर्यावर भर दिला आणि लोकांना संप्रदायाचे साधू होण्यासाठी ब्रह्मचर्य पाळण्यास प्रोत्साहित केलं."
स्वामीनारायण संप्रदायाचा विस्तार
पश्चिम भारतात 19व्या शतकाच्या सुरुवातीस या संप्रदायाचा उदय झाला. त्याचे संस्थापक स्वामीनारायण यांचा जन्म 1781 मध्ये आजच्या उत्तर प्रदेशमधील छपैया गावात घनश्याम या नावानं झाला होता.
भारतभर सात वर्षं भ्रमंती केल्यानंतर ते गुजरातमध्ये आले आणि 1801 मध्ये संप्रदायाची स्थापना केली.
वंचित आणि उपेक्षित समाजघटकांमधील पोकळी भरून काढणं आणि त्यांना आकर्षित करणं हा या संप्रदायाचा उद्देश होता.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES
पुढे जगाच्या अनेक भागांत स्थायिक झालेला गुजरातचा पाटीदार समाज या संप्रदायाचा सर्वांत मोठा अनुयायी समूह बनला.
याच कारणामुळे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच, 1945 मध्ये नैरोबी येथे या संप्रदायाचे पहिलं आंतरराष्ट्रीय मंदिर उभारण्यात आलं.
स्वामीनारायण संप्रदायातील साधूंचे राजकीय नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. स्थानिक महापौरांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत अनेक नेत्यांचा त्यात समावेश होतो.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वेबसाइटनुसार, "बीएपीएसचे प्रमुख स्वामी महाराज यांनी एप्रिल 1971 ते नोव्हेंबर 2007 या कालावधीत 5 खंडांमध्ये 713 मंदिरांचे बांधकाम करून प्राणप्रतिष्ठा केली."
BAPS संस्थेच्या वेबसाइटनुसार, त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जगभरात अंदाजे 1300 मंदिरे बांधली.
ब्रह्मचर्याचं पालन का केलं जातं?
स्वामीनारायण यांनी लिहिलेल्या 'शिक्षापत्री' या पवित्र ग्रंथात 'अनुयायांसाठी' आचारसंहिता दिली आहे.
212 श्लोक असलेल्या या ग्रंथात गृहस्थ, महिला, साधू आणि आजीवन ब्रह्मचर्यव्रत घेतलेल्या संन्याशांसाठी वेगवेगळे नियम दिले आहेत.
ही शिक्षापत्री अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिण्यात आली होती.
त्यात महिलांसाठीही काही नियम आहेत.
मासिक पाळीदरम्यान महिलांनी तीन दिवस कोणत्याही व्यक्तीला, कपड्याला किंवा भांड्याला स्पर्श करू नये. चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतर ते करू शकतात, असं त्यात म्हटलंय.
तथापि, महिलांशी संबंधांबाबतचे सर्वात कठोर नियम महिलांसाठी नव्हे तर साधू आणि आजीवन ब्रह्मचर्य पाळणाऱ्या संन्याशांसाठी आहेत.
त्यांनी जाणूनबुजून कोणत्याही महिलेला स्पर्श करू नये, तिच्याशी बोलू नये किंवा तिच्याकडे पाहू नये, असंही त्यात लिहिलंय.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES
या संस्थेच्या संकेतस्थळानुसार, या नियमाचा उद्देश महिलांना कनिष्ठ किंवा अपवित्र मानणं नाही. तर साधूंना आध्यात्मिक साधनेदरम्यान सांसारिक इच्छा आणि आसक्तीपासून दूर ठेवणं हा त्यामागील हेतू आहे.
मात्र या प्रथेचे टीकाकार म्हणतात की, धार्मिक कारणं काहीही असली तरी प्रत्यक्षात त्याचा भार महिलांवरच येतो, कारण पुरुष साधूंचे ब्रह्मचर्य टिकवण्याची जबाबदारी महिलांवर टाकली जाते.
अनेक महिला कार्यकर्त्यांच्या मते मूळ प्रश्न पुरुषांच्या भावनांचा आणि त्यांच्या संयमाचा होता, परंतु त्याचे परिणाम आणि अडचणी महिलांनाच सहन कराव्या लागल्या.
परंतु बडोद्यातील हरिधाम सोखडाच्या साधूंच्या संघात महिलांना प्रवेश देण्याची परंपरा आहे.
त्याची स्थापना स्वर्गीय हरिप्रसाद स्वामी यांनी केली होती. ते BAPS पासून वेगळे झाले होते. तेव्हापासून हरिधाममध्ये संन्यास घेतलेल्या महिला, म्हणजे साध्वी, देखील आहेत.
बीबीसीने हरिधामचे अधिकृत प्रवक्ते साधक स्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही टिप्पणी करण्यास नकार दिला.
महिला काय म्हणतात?
सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि विवेकवादी सरूप ध्रुव म्हणाल्या, "साधूंना स्वतःच्या भावना आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येते, म्हणूनच या संप्रदायात महिलांशी असा व्यवहार केला जातो."
त्या पुढे म्हणाल्या, "साधू महिलांविषयीच्या स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना महिलांकडे पाहण्याची, त्यांना स्पर्श करण्याची किंवा एखाद्या महिलेचा फोटो पाहण्याचीही परवानगी नाही. त्यामुळे समस्या महिलांमध्ये नाही, तर या संप्रदायातील साधूंमध्ये आहे."
ध्रुव या विवेकवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आपल्या लेखनातून आणि रस्त्यावरच्या नाट्यप्रयोगांद्वारे धर्मांमध्ये महिलांबाबत असलेल्या भेदभावपूर्ण वर्तनाविरोधात सातत्यानं आवाज उठवत आहेत.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGE
जे घडले आणि जे घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं प्रसिद्ध कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मल्लिका साराभाई सांगतात.
बीबीसीशी बोलताना त्यांनीही सांगितले की समस्या पुरुषांमध्ये आहे, महिलांमध्ये नाही.
"जर एखादी महिला दिसली की पुरुष स्वतःच्या भावना आणि इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर शिक्षा महिलांना का मिळावी?"
"त्यांनी स्वतःचे डोळे बंद करावेत किंवा जिथे महिला आहेत तिथे जाणे टाळावे. मी शाकाहारी आहे म्हणून बाहेर पडल्यावर माझ्या आसपासच्या सगळ्या मांसाहारी दुकानांनी बंद व्हावे, अशी मागणी करण्यासारखे हे आहे."
फ्रान्स आणि महिलांच्या अधिकारांचा इतिहास
एका बाजूला भारतात स्वामीनारायण संप्रदायातील महिलांविषयीच्या वागणुकीमुळे काही प्रमाणात विरोध दिसून आला होता. परंतु पॅरिसमध्येही तसेच झाल्याचे आरोप झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला.
अनेकांच्या मते, फ्रान्समध्ये महिलांच्या अधिकारांसाठी लढणारी भक्कम अशी स्त्रीवादी परंपरा असल्याने हा विषय तेथे अधिक चर्चेत आला.
त्यात कार्यकर्त्या ऑलिम्प द गूज यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी 1791 मध्ये Declaration of the Rights of Woman and of the Female Citizen हे पुस्तक प्रकाशित केलं होतं.
त्यामध्ये त्यांनी म्हटलं, "जर महिलांना फाशीच्या तख्तावर चढण्याचा अधिकार असेल, तर त्यांना राजकीय व्यासपीठावर उभे राहण्याचाही अधिकार असला पाहिजे."
1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान आधुनिक युरोपीय लोकशाहीच्या मूलभूत कल्पनांचा जन्म फ्रान्समध्ये झाला.
तथापि, महिलांना एक शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातो.
महिलांनाही मतदानाचा अधिकार असलेली खरी लोकशाही 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्थापन होऊ शकली नाही.
त्यानंतर महिलांना त्यांच्या शरीरावरील आणि आर्थिक स्वातंत्र्यावरील अधिकार मिळवून देण्यासाठी अनेक दशकं कायदेशीर लढाया सुरू राहिल्या.
लुईझ वाइस यांसारख्या आघाडीच्या महिलांनी 1930 च्या दशकात La Femme Nouvelle (द न्यू वूमन) ही चळवळ सुरू केली.
त्यांनी अहिंसक आंदोलन केले, मोठे सार्वजनिक निदर्शने आयोजित केली आणि निवडणुका लढवल्या. मात्र त्या काळातील कायद्यांनुसार त्यांना कोणतेही पद निवडून मिळू शकत नव्हते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान फ्रेंच प्रतिकार चळवळीत महिलांच्या मोठ्या योगदानाची दखल घेत जनरल चार्ल्स द गॉल यांनी 21 एप्रिल 1944 रोजी महिलांना मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार देणाऱ्या आदेशाला मंजुरी दिली.
फ्रान्समधील महिलांनी 29 एप्रिल 1945 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मतदान केले.
आज फ्रान्समध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत मोठी प्रगती झाली आहे.
युरोस्टॅटच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 48.6 टक्के आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























