You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अपंगावर गोळ्या झाडल्या, कैद्याचा कडेलोट; सैनिकावर युद्ध गुन्ह्याचे आरोप झालेलं हे प्रकरण काय?
- Author, टिफनी टर्नबुल आणि लेना लेम
- Reporting from, सिडनी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
इशारा: या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.
युद्ध गुन्ह्यांचे गंभीर आरोप असलेले बेन रॉबर्ट्स-स्मिथ शुक्रवारी व्हीडिओ लिंकच्या माध्यमातून सिडनीतील न्यायालयात हजर झाले. या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीदरम्यान ते शांतपणे बसून होते.
त्यांना ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक सन्मान असलेले सैनिक समजलं जातं. पण याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्यावर हत्येचे 5 गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
हे सर्व प्रकार ते अफगाणिस्तानात तैनात असताना घडल्याचं समोर आलं आहे. त्या काळात ते ऑस्ट्रेलियाच्या स्पेशल एअर सर्व्हिसमध्ये (SAS) कार्यरत होते.
बीबीसीनं पाहिलेल्या न्यायालयातील नवीन कागदपत्रांमधून रॉबर्ट्स-स्मिथ यांच्यावर असलेल्या आरोपांचा सविस्तर आणि धक्कादायक तपशील समोर आला आहे.
त्यांच्यावर एका अपंग अफगाण बंदीची हत्या आणि बेड्या घातलेल्या कैद्याला डोंगर कड्यावरून लाथ मारून खाली पाडल्याचा गंभीर आरोप आहे.
तसंच 'ब्लडिंग' नावाच्या एका पद्धतीचा आधार घेऊन त्यांनी नवीन सैनिकांना इतरांच्या हत्येचे आदेश दिले. तसंच त्यांनी स्वतःची गैरकृत्यं लपवण्यासाठी कैद्यांजवळ असं काही साहित्य ठेवलं की ज्यामुळं त्यांच्या चुका सिद्ध करता येतील.
रॉबर्ट्स-स्मिथ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या वकिलांच्या मते, हा ऑस्ट्रेलियातील अशा स्वरूपाचा पहिलाच आणि अनोखा खटला आहे. कारण यापूर्वी देशात स्वतःच्याच एखाद्या सैनिकावर युद्ध गुन्ह्यांचा खटला कधीही चालवण्यात आलेला नाही.
12 एप्रिल 2009
रॉबर्ट्स-स्मिथ यांनी वयाच्या 18 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्समध्ये (ADF) दाखल होऊन करिअरची सुरुवात केली. 2003 मध्ये स्पेशल एअर सर्व्हिसमध्ये (SAS) रुजू होण्यापूर्वी ते दोनदा ईस्ट तिमोरमध्ये तैनात होते.
12 एप्रिल 2009 रोजी त्यांना 'व्हिस्की 108' नावाच्या एका परिसरात पाठवण्यात आलं तोपर्यंत त्यांच्याकडे दशकाहून अधिक काळाचा अनुभव होता. त्यांना 'मेडल ऑफ गॅलेंट्री'ने देखील सन्मानित करण्यात आले होते.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, मध्य अफगाणिस्तानच्या तारिन कोटच्या जवळ असलेल्या या भागात ऑस्ट्रेलियन सैन्य आणि तालिबान बंडखोरांमध्ये युद्ध सुरू होते.
हवाई हल्ल्यानंतर संबंधित भागावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी रॉबर्ट्स-स्मिथ यांच्या 'एसएएस' (SAS) टीमकडे सोपवण्यात आली आणि त्यांना तिथे बोलावले गेले.
कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे की, त्या ठिकाणी एक भुयार आढळून आले होते ज्यातून 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या गेल्या. ते मोहम्मद इस्सा आणि त्यांचा अपंग मुलगा अहमदुल्लाह होते जो कृत्रिम पायाच्या मदतीने चालायचा.
सरकारी पक्षाच्या आरोपानुसार, रॉबर्ट्स-स्मिथ यांनी अहमदुल्लाह यांना जमिनीवर पाडले आणि मशीन गनने त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या.
कागदपत्रांमध्ये पुढं नमूद केलं आहे, "ही कारवाई इतर अनेक ऑस्ट्रेलियन सैनिकांनी पाहिली होती."
सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, यानंतर रॉबर्ट्स-स्मिथ मोहम्मद इस्साकडे वळले. त्यांनी 'पर्सन 4' नावाच्या सहकाऱ्याला सोबत घेतले आणि दुसऱ्या एका सैनिकाकडून शस्त्राचे सायलेन्सर मागवून घेतले. त्यांनी मोहम्मद इस्साला गुडघ्यावर बसवून 'पर्सन 4'ला "याला गोळी मार," असा आदेश दिला. त्या सैनिकाने आदेश पाळला आणि गोळी झाडली.
कागदपत्रांनुसार, ही मोहीम संपल्यावर रॉबर्ट्स-स्मिथ यांनी सांगितले की, त्यांनी 'पर्सन 4'कडून 'ब्लडिंग' (म्हणजेच पहिल्यांदा शत्रूचा जीव घेण्याची कृती) करवून घेतली आहे.
11 सप्टेंबर 2012
पण ऑगस्ट 2012 च्या अखेरीस ऑस्ट्रेलियन सैनिकांसोबत काम करणारा अफगाण नॅशनल आर्मीचा एक सैनिक त्यांच्याच विरोधात गेला. त्याने 3 सैनिकांची हत्या केली आणि इतर दोघांना जखमी केले.
त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. सार्जंट हिकमतुल्लाह असे या अफगाण सैनिकाचे नाव होते.
हिकमतुल्लाह नावाच्या या सार्जंटला पकडणे हे ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्ससाठी (ADF) सर्वात महत्त्वाचे काम बनले होते.
'व्हिक्टोरिया क्रॉस' या राष्ट्रकुलमधील सर्वोच्च लष्करी बहुमानाने सन्मानित रॉबर्ट्स-स्मिथ 2 आठवड्यांनंतर हिकमतुल्लाहचा शोध घेत दरवान गावात पोहोचले.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, 11 सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर त्यांच्या टीमने एका कोरड्या नदीच्या काठी असलेल्या अनेक ठिकाणांची झडती घेतली आणि 3 जणांना ताब्यात घेतले. यापैकी एका व्यक्तीचे नाव अली जान होते.
सरकारी पक्षाच्या आरोपानुसार, रॉबर्ट्स-स्मिथ यांनी कैद्यांची लष्करी कारवाईच्या दृष्टीनं चौकशी केली. त्यात त्यांनी बेड्या घातलेल्यांना बेदम मारहाण केली.
यानंतर, असाही आरोप आहे की, रॉबर्ट्स-स्मिथ अली जानला ओढत एका खडकाच्या कडेला घेऊन गेले. तिथे त्यांचा एक सहकारी (ज्याला 'पर्सन 11' म्हटले गेले आहे) देखील उपस्थित होता.
न्यायालयीन कागदपत्रांमध्ये दावा करण्यात आला, "अली जानच्या हातात बेड्या होत्या आणि इतर सैनिकांनी त्याला पकडून ठेवलं होतं. असं असूनही रॉबर्ट्स-स्मिथ यांनी त्याला लाथ मारली त्यामुळं तो जवळजवळ 10 मीटर दूर जाऊन पडला आणि त्याचे दात तुटले. त्याला अनेक जखमा झाल्या."
कागदपत्रांमध्ये असेही म्हटले आहे की, 'पर्सन 4' आणि स्थानिक गावकऱ्यांनी ही घटना पाहिली होती. यानंतर रॉबर्ट्स-स्मिथ आणि 'पर्सन 11' खाली उतरले जिथे अली जान जखमी अवस्थेत पडले होते.
'पर्सन 4' ने सांगितलं की, त्याने रॉबर्ट्स-स्मिथ आणि 'पर्सन 11' ला थोडा वेळ बोलताना पाहिले. त्या दोघांकडेही रायफल होत्या.
जेव्हा 'पर्सन 4' ची पाठ दुसरीकडे होती तेव्हा अनेक गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्याने वळून पाहिले तेव्हा 'पर्सन 11' ने आपली रायफल खांद्यावर घेतली होती.
फिर्यादी पक्षाचा असा आरोप आहे की, 'पर्सन 11' ने अली जानवर गोळी झाडली. खटल्यादरम्यान रॉबर्ट्स-स्मिथ यांनी या आरोपांचं खंडन केलं आणि सांगितलं की, कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते आणि तिथे कोणताही खडक किंवा कडा नव्हता.
20 ऑक्टोबर 2012
20 ऑक्टोबर 2012 रोजी रॉबर्ट्स-स्मिथ पेट्रोल कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांना स्याचोव्ह गावात 'ऑब्जेक्टिव्ह पाइन' नावाच्या एका कथित बंडखोराच्या शोधात पाठवण्यात आले होते.
त्या मोहिमेच्या अहवालात असे म्हटले आहे की, तिथल्या एका तळावर झालेल्या चकमकीत 2 जणांचा बळी गेला.
त्यानंतर काही वेळातच इतर दोघेही मारले गेले. त्यांनी शरणागती पत्करण्यास नकार दिल्याने शेतात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ग्रेनेडने हल्ला करण्यात आला.
सरकारी पक्षाच्या मते, दिलेली माहिती खोटी होती. 'पर्सन 66' या कनिष्ठ सैनिकाने साक्ष दिली की, ज्या 2 व्यक्तींना शेतात मारले गेले, ते खरे तर शरण आलेले बंदी होते आणि रॉबर्ट्स-स्मिथच्या सांगण्यावरूनच त्यांची हत्या करण्यात आली.
त्याच्या दाव्यानुसार, त्या दोघांना सुरुवातीला एका ठिकाणी पकडून ठेवले होते. तिथे चौकशी करत असताना रॉबर्ट्स-स्मिथ यांनी त्यातील एकाच्या पोटावर जोरात मारले.
कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, त्या दोन्ही व्यक्तींना शेताच्या कडेला नेऊन उभं करण्यात आलं. एका वरिष्ठ सैनिकाने आधी एका व्यक्तीवर गोळी झाडली. रॉबर्ट्स-स्मिथ यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या बेड्या आणि डोळ्यांवरील पट्टी काढली आणि 'पर्सन 66' ला देखील तसेच करण्याचा आदेश दिला.
फिर्यादी पक्षाचा असा दावा आहे की, त्या व्यक्तीला जमिनीवर पाडण्यात आलं होतं. आपली पहिलीच मोहीम असलेला 'पर्सन 66' काही क्षण थांबला आणि त्याने त्या व्यक्तीच्या छातीवर 2 ते 3 गोळ्या झाडल्या.
कागदपत्रांमध्ये असं म्हटलं आहे की, त्यानंतर त्याने पाहिले की रॉबर्ट्स-स्मिथ यांनी दोन्ही व्यक्तींच्या अंगावर एक ग्रेनेड फेकला.
फॉरेन्सिक चौकशीदरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये एका व्यक्तीच्या शरीरावर त्याला बांधून ठेवल्याच्या स्पष्ट जखमा दिसून आल्या. दुसऱ्या मृताच्या शरीरावरही अशाच स्वरूपाच्या काही खुणा दिसल्या आहेत.
खटला सुरू व्हायला 'अनेक वर्षे लागू शकतात'
रॉबर्ट्स-स्मिथ यांनी 2012 च्या शेवटी सक्रिय कर्तव्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि 'डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस' हा सन्मान मिळाल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी अधिकृतपणे निवृत्ती घेतली.
याच्या सुमारे 1 वर्षानंतर अफगाणिस्तानमधील युद्धात झालेल्या कथित गुन्ह्यांबाबतच्या चर्चांची दखल घेत लष्करी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले. यानंतर या प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या.
2018 येईपर्यंत रॉबर्ट्स-स्मिथ यांचे नाव अनेक गंभीर प्रकरणांमध्ये संशयित म्हणून घेतले जाऊ लागले.
त्यांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आणि या विरोधात एक ऐतिहासिक मानहानीचा खटला दाखल केला. परंतु ते हा खटला हरले.
त्या दिवाणी खटल्यात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात रॉबर्ट्स-स्मिथ यांनी म्हटले होते की, त्यांनी कधीही युद्धाच्या नियमांचे उल्लंघन केले नाही. या प्रतिज्ञापत्रातील माहिती आता फौजदारी खटल्याच्या पुराव्यांमध्ये वापरली जात आहे.
त्यांनी असेही म्हटले, "कैद्याची हत्या करणे कधीही मान्य केले जाऊ शकत नाही."
तसेच त्यांनी 'थ्रोडाउन' तंत्राचा वापर केल्याचेही नाकारले. थ्रोडाउन म्हणजे चकमक झाल्यावर एखाद्या मृत व्यक्तीजवळ मुद्दाम शस्त्र किंवा रेडिओ ठेवून ती कारवाई योग्य असल्याचे भासवणे.
न्यायालयीन कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे की, रॉबर्ट्स-स्मिथ यांनी त्यांच्या जुन्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही नवीन माहिती जोडण्यास, बदल करण्यास किंवा त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला."
कागदपत्रांनुसार, या कथित हत्यांमध्ये एक विशिष्ट पद्धत दिसून येते. प्रत्येक वेळी अटक केलेल्या व्यक्तीला बेड्या ठोकून काही वेळ कोठडीत ठेवले गेले.
त्यांची उलटतपासणी झाली आणि ते पूर्णपणे सैन्याच्या ताब्यात असतानाही त्यांची हत्या करण्यात आली.
विशेष म्हणजे त्या वेळी समोरून शत्रूचा कोणताही हल्ला किंवा चकमक सुरू नव्हती. या प्रत्येक घटनेचा किमान एक तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हजर आहे, असा दावा करण्यात आला आहे.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, या प्रकरणात असे 3 साक्षीदार आहेत ज्यांनी स्वतः एक किंवा अधिक कैद्यांच्या हत्येत सहभागी असल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्या दाव्यानुसार, त्यांनी ही कृत्ये एकतर रॉबर्ट्स-स्मिथ यांच्या आदेशावरून किंवा त्यांच्या संमतीने केली होती.
दुसरीकडे, रॉबर्ट्स-स्मिथ यांच्या कायदेशीर टीमने या सविस्तर आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच न्यायालयात आपली बाजूही मांडलेली नाही. हा खटला प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी अजून बराच अवकाश आहे.
शुक्रवारी रॉबर्ट्स-स्मिथ यांना जामीन देताना न्यायाधीश ग्रेग ग्रोगिन यांनी कडक अटी घातल्या. त्यांनी म्हटले, "या प्रकरणातील आरोपी म्हणून रॉबर्ट्स-स्मिथ यांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास "काही आठवडे किंवा महिने नाही, तर अनेक वर्षांचा काळ जाऊ शकतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)