सीयूईटी-यूजी परीक्षेच्या विलंबानंतर आता या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची एनटीएची माहिती

शिफ्ट-1 मध्ये काही केंद्रांमध्ये परीक्षा सुरू होण्यास विलंब झाल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मान्य केलं.

फोटो स्रोत, Vipin Kumar/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, शिफ्ट-1 मध्ये काही केंद्रांमध्ये परीक्षा सुरू होण्यास विलंब झाल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मान्य केलं.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी होणारी सीयूईटी-यूजी 2026 परीक्षा शनिवारी (30 मे) काही केंद्रांवर उशीरा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

ही परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)नं म्हटलं आहे की जे विद्यार्थी उपस्थित होते आणि ज्यांचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन झालं होतं, मात्र ज्यांनी परीक्षा दिली नाही, अशांना पुन्हा संधी मिळेल.

याआधी एनटीएनं सांगितलं होतं की 'काही तांत्रिक बिघाडांमुळे परीक्षेला उशीर झाला. त्या दूर करण्यात आल्या.'

"परीक्षा उशीरा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळदेखील दिला जाईल," असं एनटीएनं म्हटलं होतं.

राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी परीक्षांमध्ये होत असलेल्या गोंधळ, अनियमिततेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कथित सेंटरचा व्हीडिओ पोस्ट करत एक्सवर लिहिलं, "देशाला एका सुशिक्षित पंतप्रधानाची आवश्यकता आहे."

याआधी 3 मे ला झालेली नीट ची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारीनंतर रद्द करण्यात आली होती. आता 21 जून नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.

या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर तीव्र टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अजून हे प्रकरण शांतदेखील झालं नव्हतं तोपर्यंत सीयूईटीच्या परीक्षेत विलंब झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही परीक्षादेखील एनटीएकडून आयोजित केली जाते.

या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार

शनिवारी (30 मे) संध्याकाळी एनटीएनं एक निवेदन जारी करत म्हटलं, "परीक्षा केंद्रावर 3,765 उमेदवारांची बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. मात्र ते परीक्षा पुन्हा सुरू होण्यापूर्वीच निघून गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. एनटीए अशा उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेईल."

एनटीएच्या निवेदनात म्हटलं आहे, "काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे शिफ्ट-1 ची परीक्षा सुरू होण्यास उशीर झाला होता. यातून तणाव निर्माण झाला, हे आम्हाला माहिती आहे. यामुळे निर्माण झालेल्या चिंतेबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो."

शनिवारी (30 मे) सीयूईटी-यूजी 2026 ची परीक्षा ठेवण्यात आली होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शनिवारी (30 मे) सीयूईटी-यूजी 2026 ची परीक्षा ठेवण्यात आली होती.

एनटीएनं म्हटलं आहे, "परीक्षा पुन्हा सुरू झाल्यानंतर बहुतांश उमेदवार (जवळपास 95 टक्के) त्यांची परीक्षा पूर्ण करू शकले."

निवेदनानुसार, "टीसीएस आयन या तांत्रिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीला मूळ कारणांचा तपास करून तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे."

एजन्सीनं म्हटलं आहे की पुन्हा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तारीख आणि इतर माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.

परीक्षेला उशीर होण्याबाबत एनटीए काय सांगितलं?

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "टीसीएसनं सांगितलं की त्यांच्याकडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शनिवारी सीयूईटी-यूजी 2026 च्या काही सेंटर्सवर परीक्षा उशीरा सुरू झाली.

नंतर अडचण दूर करण्यात आली आणि परीक्षेला जितका उशीर झाला, तितकाच अतिरिक्त वेळ दिला गेला."

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच सीयूईटी परीक्षा घेते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच सीयूईटी परीक्षा घेते.

एनटीएनं पुढे लिहिलं आहे, "विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही प्रामाणिकपणे खेद व्यक्त करतो."

एनटीएनं मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर (+91-11-40759000) आणि ईमेल (cuet-ug@nta.ac.in) जारी केला आहे.

विरोधी पक्षांकडून जोरदार टीका

केंद्र सरकारनं शिक्षण व्यवस्था उदध्वस्त केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं आहे, "नीट, सीबीएसई आणि आज सीयूईटी. चार परीक्षा. एक कोटी विद्यार्थी. एकदेखील प्रामाणिकपणे झाली नाही. दावे 'विश्वगुरू'चे, मात्र देशात एक परीक्षा घेऊ शकत नाही. मोदीजींनी संपूर्ण शिक्षण व्यवस्था उदध्वस्त केली आहे. ज्या पिढीचं भवितव्य तुम्ही उदध्वस्त करत आहात. तीच पिढी आता तुम्हाला जाब विचारेल."

या प्रकरणावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांनीदेखील वक्तव्यं केलं आहे.

आतिशी यांनी एक्सवर लिहिलं आहे, "आधी नीट, मग सीबीएसई, आता सीयूईटी...आज सीयूईटी परीक्षा 'तांत्रिक बिघाडा'मुळे उशीरानं सुरू झाली."

त्यांनी परीक्षेला विलंब होण्याबद्दल जारी केलेली नोटीस शेअर करत लिहिलं, "आज भारतात लाखो विद्यार्थी परीक्षा देणार होते आणि अनेक तास वाट पाहिल्यानंतर सर्व सेंटर्सच्या बाहेर नोटीस लावण्यात आली आहे."

राहुल गांधी यांनी परीक्षांबाबत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राहुल गांधी यांनी परीक्षांबाबत सरकारला प्रश्न विचारले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी एक व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, "वाराणसीमधील सीयूईटी परीक्षा केंद्रांचे फोटो आहेत. विद्यार्थ्यांना सांगितलं जात आहे की सर्व्हरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे."

त्या व्हीडिओमध्ये दावा करण्यात आला आहे, "हे शीतला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहे. ते उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील लोहतामधील सीयूईटी 2026 चं केंद्र आहे. ही परीक्षा सकाळी 9:00 वाजता सुरू होऊन 10:00 वाजता संपणार होती. मात्र आता 10:50 झाले आहेत आणि आम्हाला माहिती मिळाली आहे की अजून परीक्षा सुरू झालेली नाही."

याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नीट परीक्षेच्या पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली होती.

केजरीवाल यांनी एका व्हीडिओ संदेशात म्हटलं, "नीट परीक्षेत पेपरफुटी टाळण्यासाठी हवाई दलाच्या विमानांचा वापर केला जाणार आहे. यामुळे पेपर फुटणं थांबेल का? आपलं सरकार निरक्षरांसारखं कसं काय वागू शकतं?"

त्यांनी पुढे म्हटलं आहे, "पेपरफुटी रोखण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे माफियांच्या तावडीत सापडलेली आहे. जर यात सुधारणा करायची असेल तर सर्वांना मिळून काम करावं लागेल. कोणीही एक व्यक्ती एकट्यानं काहीही करू शकत नाही."

एनटीएवर टीका

दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी एनटीएबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

ते एएनआय या वृत्तसंस्थेला म्हणाले, "नरेंद्र मोदी सरकारनं एनटीए नावाची एक एजन्सी सेंटरच्या स्तरावर बनवली आहे. ते म्हणतात की देशात जितक्या परीक्षा होतील, त्या सर्व एनटीए घेईल. जेव्हापासून ही एजन्सी तयार झाली आहे, तेव्हापासून देशातील तरुण, मुलांची फसवणूक होते आहे. कोणतीही परीक्षा योग्यप्रकारे होत नाही."

NEET

फोटो स्रोत, ANI

"नीट परीक्षा योग्य प्रकारे घेतली जात नाहीये. सीबीएसईपासून एसएससीपर्यंतच्या परीक्षांमध्ये सरकारला अपयश आलं आहे. आज एनटीएनं सीयूईटी परीक्षेचीदेखील चेष्टा करून टाकली आहे."

"आज विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचले, तर परीक्षेची वेळ बदलून टाकली. कोणाचं केंद्र बदलत आहेत तर कोणाची तारीख बदलण्यात येते आहे. सर्व अनागोंदी आहे. ही चेष्टा नाही. संपूर्ण कुटुंब परीक्षेसाठी किती परिश्रम घेतं, ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच समजू शकत नाहीत."

राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी एक्सवर लिहिलं, "नीट परीक्षेनंतर सीबीएसई बोर्ड परीक्षा आणि आता सीयूईटी परीक्षा. हे सर्व शासन व्यवस्थेत असणाऱ्या उणीवांमुळे आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार शासनव्यवस्था चालवू शकत नाही."

"निवडणुका आणि मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचं गुणगान करण्यात व्यग्र राहिल्यामुळे व्यवस्थेमध्ये संरचनात्मक अकार्यक्षमता निर्माण झाली आहे. आरएसएसची संस्थात्मक सामान्य दर्जाची कार्यप्रणाली 21 व्या शतकातील गुंतागुंतीच्या प्रशासकीय गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)