टी-20 टीमचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश, 'ही' आहेत कारणं

टी-20 टीमचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश, काय आहेत कारणं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर याची भारतीय पुरुष टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे आणि वैभव सूर्यवंशीला देखील टी-20 संघात स्थान मिळालं आहे
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) शनिवारी (6 जून) आयर्लंड, इंग्लंड आणि एशियन गेम्स 2026 साठी टी-20 संघाची घोषणा केली आहे.

अलीकडेच भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला संघामध्ये स्थान मिळालेलं नाही. आता टी-20 संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमात 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. वैभवला पहिल्यांदा भारताच्या टी-20 संघात स्थान मिळालं आहे.

तिलक वर्माकडे संघाचं उपकर्णधार देण्यात आलं आहे. तर हार्दिक पांड्याला तिन्ही स्पर्धांमध्ये संघात स्थान असणार नाही.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एका पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा केली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या विराट कोहलीच्या जागी यशस्वी जायसवालला संघात स्थान देण्यात आलं आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका 13 जूनपासून सुरू होणार आहे.

हार्दिक पांड्याबाबत काय म्हणाले?

या सर्वच स्पर्धांमध्ये हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळालेलं नाही.

पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की "हार्दिक पांड्या बंगळुरूच्या सीओई (सेंटर ऑफ एक्सलन्स) मध्ये आहे. तो एका रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅममध्ये सहभागी आहे."

"तो लवकरच अंतिम चाचणीसाठी येईल आणि तो क्लियरन्सच्या प्रक्रियेत असेल. रोहितदेखील पुढील 2-3 दिवसांमध्ये सीओईमध्ये जाईल. आम्ही त्यांच्या अंतिम फिटनेस क्लियरन्सची वाट पाहत आहोत."

सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरला टी-20 संघाचा कर्णधार केलं जाण्याबद्दल निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर पत्रकार परिषदेत म्हणाले, "त्यानं गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या फ्रेंचायझींचं नेतृत्व करताना कशी कामगिरी केली आहे ते आपण पाहिलं आहे. त्यानं एकदा (आयपीएल टायटल) जिंकलं. जबरदस्त सुरुवात केल्यानंतर या वर्षीचा सीजन त्याच्यासाठी आणखी कठीण ठरला. एक कर्णधार ज्या गोष्टींना सामोरं जातो, ते सर्व त्यानं पाहिलं आहे."

याशिवाय अजित आगरकर म्हणाले, "त्याची स्वत:ची वैयक्तिक कामगिरीदेखील खूपच चांगली राहिली आहे. टी-20 विश्वचषक संघातदेखील त्याला जवळपास स्थान मिळालंच होतं. मात्र सूर्या अजूनही संघात आहे. त्याच्यासाठी कोणतीही जागा नव्हती. माझ्या मते तो आता खूप अनुभवाबरोबरच एक 'स्टँड-आऊट कँडिडेट' आहे. हे स्पष्टपणे एक आव्हान असेल."

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आता श्रेयस अय्यर असेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आता श्रेयस अय्यर असेल

वैभव सचिन तेंडुलकरला मागे टाकणार का?

तर 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची भारतीय सीनियर संघात निवड झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. भारतीय पुरुष संघात निवड होणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

वैभव सूर्यवंशीनं अलीकडेच आयपीएलच्या मोसमात 237.30 च्या स्ट्राईक रेटनं 776 धावा केल्या होत्या.

आयर्लंड आणि इंग्लंडच्या टी-20 दौऱ्याआधी सूर्यवंशी श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत 9 ते 21 जून पर्यंत भारताच्या ए टीमसाठी खेळणार आहे.

जर वैभव सूर्यवंशीनं आयर्लंड किंवा इंग्लंडविरुद्ध खेळताना पदार्पण केलं, तर तो वयाच्या 16 व्या वर्षाआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.

सचिन तेंडुलकरनं कसोटी सामन्यात पदार्पण केलं तेव्हा त्याचं वय 16 वर्षे आणि 205 दिवस होतं. तर त्यानं 16 वर्षे आणि 238 दिवस वय असताना एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं.

वैभव सूर्यवंशीनं अलीकडेच आयपीएलच्या सीजनमध्ये ऑरेंज कॅपदेखील जिंकली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वैभव सूर्यवंशीनं अलीकडेच आयपीएलच्या सीजनमध्ये ऑरेंज कॅपदेखील जिंकली होती

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आहे. तो 18 वर्षे आणि 80 दिवस वय असताना या फॉरमॅटमध्ये पहिला सामना खेळला होता.

बेलफास्टमध्ये 26 आणि 28 जूनला भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळेल. त्यानंतर इंग्लंडमध्ये 1 ते 11 जुलैपर्यंत पाच टी-20 सामने खेळेल.

वैभव सूर्यवंशीची सीनियर टीममध्ये निवड झाल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवर लिहिलं आहे, "बिहारचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची फक्त 15 वर्षे आणि 71 दिवस वय असताना भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्याची प्रतिभा, प्रचंड परिश्रम आणि कटिबद्धता यामुळे हे ऐतिहासिक यश मिळालं आहे."

"वैभवनं संपूर्ण बिहारचा गौरव वाढवला आहे. मला खात्री आहे की तो भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी करून देश आणि राज्याचं नाव आणखी मोठं करेल. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा."

वैभव सूर्यवंशीची निवड का करण्यात आली?

वैभवला टीम इंडियामध्ये स्थान मिळाल्याबद्दल ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांनी एक्स या सोशल मीडियावरील एका व्हीडिओ पोस्टमध्ये म्हटलं आहे, "वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएलचा सीजन खूपच जबरदस्त ठरला. त्यानं 700 हून अधिक धावा केल्या. यात विशेष गोष्ट म्हणजे त्यानं ज्या स्टाईलनं या धावा केल्या ते अपेक्षांपलीकडचं होतं."

"त्याच्या वयाबद्दल उपस्थित केल्या जात असलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, मायकल क्लार्क सारख्या दिग्गज खेळाडूंना वाटतं की त्याला टी-20 साठी टीम इंडियात स्थान मिळालं पाहिजे. हा योग्य निर्णय आहे. जर 2-3 वर्षांनी हा निर्णय घेतला गेला असता तर तो निराश होऊ शकला असता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभवचं स्वागत आहे."

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी वैभव सूर्यवंशीला शुभेच्छा दिल्या आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी वैभव सूर्यवंशीला शुभेच्छा दिल्या आहेत

अयाज मेमन यांनी सूर्यकुमारचं कर्णधारपद गेल्याबद्दल आणि श्रेयस अय्यर याला कर्णधारपद मिळाल्याबद्दल देखील एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे.

ते म्हणाले, "जर तुम्हाला संघात तुमचं स्थान टिकवता येत नसेल, तर तुम्हाला कर्णधार कसं काय केलं जाऊ शकतं. सूर्यकुमार यादवच्या धावा होत नव्हत्या. मग तो विश्वचषक असो की त्याआधी असो आणि आता आयपीएल. त्याची स्पर्धा पाहा कोणाशी आहे, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा आणि आता कर्णधार झालेला श्रेयस अय्यर."

"कर्णधारपदाच्या बाबतीत श्रेयससमोर संजू सॅमसन, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांचं आव्हानदेखील होतं. मात्र त्यानं आयपीएलचा किताब जिंकला आहे. त्याच्यामध्ये कर्णधाराची क्षमता आहे आणि तो यासाठी पात्र आहे."

एशियन गेम्ससाठीचा भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उप कर्णधार), रवि बिश्नोई, अभिषेक शर्मा, नीतीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी.

इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा( उप कर्णधार), रवि बिश्नोई, अभिषेक शर्मा, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.