You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणच्या आयआरजीसीचे कमांडर-इन-चीफ सार्वजनिकरित्या समोर का येत नाहियेत?
- Author, बीबीसी मॉनिटरिंग
- वाचन वेळ: 3 मिनिटे
ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी, इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे कमांडर-इन-चीफ आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच ते प्रसारमाध्यमांमध्ये दिसलेले नाहीत.
मार्च महिन्यात त्यांना आयआरजीसीच्या या सर्वोच्च पदावर नियुक्त केल्याचं वृत्त आलं होतं.
ते सार्वजनिकरित्या शेवटचे 11 फेबुवारीला समोर आले होते. त्यावेळेस इराणच्या दक्षिण भागातील शिराज या शहरात 1979 च्या क्रांतीच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका सभेत त्यांनी इराणविरुद्ध कोणताही चुकीचा अंदाज बांधण्याबाबत 'शत्रू'ला इशारा दिला होता.
काही न्यूज वेबसाईट्सनं 1 मार्चला वृत्त दिलं होतं की वाहिदी यांना आयआरजीसीचा नवा कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
अर्थात, या वेबसाईट्समध्ये सरकारच्या प्रमुख वृत्तसंस्था किंवा आयआरजीसीशी संबंधित वृत्तसंस्थांचा समावेश नव्हता.
एक दिवस आधीच, अमेरिका-इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात मेजर जनरल मोहम्मद पाकपोर आणि अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे वृत्त आलं होतं.
वृत्तानुसार, या नियुक्तीआधी, वाहिदी आयआरजीसीचे डेप्युटी कमांडर-इन-चीफ होते.
आतापर्यंत काय माहिती समोर आली?
इराणच्या राज्यघटनेनुसार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकारी सर्वोच्च नेत्याला असतो.
अयातुल्लाह अली खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून मोज्तबा खामेनी यांनी 8 मार्च निवड झाली होती.
हे जर खरं असेल, तर त्याचा अर्थ असा की वाहिदी यांची नियुक्ती, एकतर सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर तयार झालेल्या हंगामी नेतृत्व परिषदेनं केली किंवा आधीपासूनच निश्चित करण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार करण्यात आली.
मोज्तबा खामेनी हे स्वत:देखील त्यांची नियुक्ती झाल्यापासून सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत.
अर्थात, त्यांनी लेखी स्वरुपात वक्तव्यं जारी केली आहेत. मात्र त्यांनीच वाहिदी यांची नियुक्ती केली की नाही हे स्पष्ट नाही.
वाहिदी यांच्या नावानं शेवटचा संदेश 19 मार्चला जारी झाला होता. तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यात बसीज संघटनेचे कमांडर ब्रिगेडियर जनरल गुलामरेजा सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. वाहिदी यांनी संदेशात सुलेमानी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता.
त्यावेळेस इराणमधील प्रसारमाध्यमांनी त्यांचा उल्लेख आयआरजीसीचे कमांडर-इन-चीफ असा केला होता.
आयआरजीसीशी संबंधित फार्स न्यूज एजन्सीनं 22 एप्रिलला वृत्त दिलं होतं की कार्यवाहक (ॲक्टिंग) गुप्तचर मंत्र्यांनी गार्ड कॉर्प्स डे बद्दल वाहिदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या वृत्तात त्यांना कार्यवाहक कमांडर-इन-चीफ म्हणण्यात आलं होतं. अर्थात, गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली हे मात्र त्यात सांगण्यात आलं नव्हतं.
आयआरजीसीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुलनेत, वाहिदी यांची अनुपस्थिती लक्षात येते.
पेजेश्कियान आणि गालिबाफ यांच्याबरोबर मतभेदाच्या बातम्या
एअरोस्पेस फोर्सचे प्रमुख मजीद मौसवी सातत्यानं सभांमध्ये दिसत आहेत. ते सोशल मीडियावरदेखील सक्रिय आहेत.
त्यांच्या 19 एप्रिलला जारी झालेल्या एका व्हीडिओमध्ये ते एका भूमिगत क्षेपणास्त्र केंद्राचा दौरा करताना दिसले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 एप्रिलला जेव्हा इराणमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं सांगितलं, तेव्हा इराणमधील अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी एकजुटीचा संदेश दिला.
मात्र, वाहिदी यांनी कोणतंही वक्तव्यं केलं नाही.
अर्जेंटिनामध्ये 1994 मध्ये ज्यू सामुदायिक केंद्रामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 85 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात सहभागी असल्याचा आरोप वाहिदी यांच्यावर आहे.
इराण इंटरनॅशनल, या लंडनमधील विरोधी चॅनलनं त्यांच्या नियुक्तीनंतर अनेक दावे केले आहेत.
यामध्ये, युद्धाच्या काळातील निर्णय आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याबरोबर असलेल्या मतभेदांचा समावेश आहे.
त्याचबरोबर असाही दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानच्या मध्यस्थीनं झालेल्या इराण-अमेरिका चर्चेच्या वेळेस इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बगर गालिबाफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न वाहिदी यांनी केला होता.
सीएनएननं 24 एप्रिलला वृत्त दिलं होतं की अमेरिकेच्या लष्करी योजना आखणाऱ्यांनी, इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांना, लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करण्यासाठी पर्याय तयार केले आहेत. या वृत्तामध्ये त्यात वाहिदी यांचं नावदेखील असल्याचं सांगण्यात आलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन