पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूने घेतले 7 बळी; गावठी दारू विषारी बनण्यामागे आहे 'हे' कारण

फोटो स्रोत, UGC
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी (28 मे) विषारी दारू प्यायल्यानं7 जणांचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एकाच दिवशी सात नागरिकांचा मृत्यू झाला असून, आणखी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
या घटनेत आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात एकूण 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 5 जण पोलिसांच्या तर 3 जण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत.
या घटनेबाबत बोलताना, पिंपरी चिंचवडचे डीसीपी संदीप आटोळे म्हणाले की, "प्राथमिक तपासात आम्हाला असे आढळले आहे की विषारी दारू पिल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून, 3 जण सध्या उपचार घेत आहेत. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे."
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचं स्पष्ट केलंय.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रेसनोटद्वारे आतापर्यंत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय, 'पिंपरी-चिंचवडच्या दापोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुगेवाडी परिसरात 28 मे रोजी संशयास्पद मृत्यूची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली.
प्राथमिक तपासात काही नागरिकांनी विषारी दारू पिल्याची माहिती समोर आली असून, त्यातूनच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 नोंद करण्यात आला असून, विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कारवाईची मागणी
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, बंदी असलेल्या हातभट्टीच्या गावठी (विषारी) दारूमुळेच या नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
या परिसरात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

फोटो स्रोत, UGC
दरम्यान, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यात तातडीने 8 जणांना अटक करण्यात आली. आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. या संपूर्ण यंत्रणेची पाळंमुळं शोधून ती नष्ट करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला.
दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी,अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गावठी दारू का बनते विषारी?
देशी दारूला कच्ची दारू असंही म्हणतात. तिचं मिश्रण करणं अतिशय सोपं असतं. पण या कच्च्या दारूची झिंग म्हणजे त्यामुळं होणारी नशा वाढवण्याच्या नादात ती विषारी बनते.
सामान्यत: गूळ आणि उसाच्या मळीपासून देशी दारू तयार केली जाते. त्यात युरिया आणि बेलाची पानं टाकली जातात. त्यामुळे त्याची नशा आणखी जास्त होते.
दारू जास्तीत जास्त चढावी, यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन टाकलं जातं, ते मृत्यूला निमंत्रण देते. ट
गेल्या काही वर्षांत अशी माहिती मिळाली आहे की ऑक्सिटॉसिनमुळे वंध्यत्व येतं आणि मज्जासंस्थेशी निगडीत आजार होतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्या सेवनामुळे डोळ्यात जळजळ, खाज आणि पोटात जळजळ होऊ शकते. दीर्घकाळ सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
कच्च्या दारूत युरिया आणि ऑक्सिटॉसिन सारखे रासायनिक पदार्थ मिसळल्यास मिथिल अल्कोहोल तयार होतं आणि त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
मिथिल अल्कोहोल शरीरात जाताच झपाट्याने रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे शरीराच्या आतले अवयव निकामी होतात आणि लगेच मृत्यू ओढवतो.
जे द्रव्य दारू म्हणून विकलं जातं ते 95 टक्के शुद्ध अल्कोहोल म्हणतात. त्याला इथेनॉलसुद्धा म्हणतात.
उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका असे स्टार्च असलेले पदार्थ एकत्र आंबवून इथेनॉल तयार केलं जातं.
या इथेनॉलमध्ये आणखी नशा टाकण्यासाठी त्यात मिथेनॉल टाकलं जातं. त्यात कास्ट अल्कोहोल किंवा कास्ट नॅप्था या नावाने ओळखलं जाणारं मिथेनॉल मिसळलं जातं की दारूचं संतुलन बिघडतं आणि ती धोकादायक बनते.
मिथेनॉल विषारी असतं
रसायनशास्त्रातील सर्वांत सोपंसरळ अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल. सामान्य तापमानात ते द्रवरूपात आढळतं.
हे एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव्य आहे. त्याचा गंध इथेनॉलसारखाच असतो. त्याचा वापर अँटीफ्रीझर म्हणून, म्हणजे गोठणबिंदू कमी करण्यासाठी केला जातो. तसंच एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आणि इंधन म्हणूनही मिथेनॉल वापरलं जातं.
मिथेनॉल अतिशय विषारी असतं, हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचा वापर पिण्यासाठी अजिबात केला जात नाही. ते प्यायल्यामुळे मृत्यू ओढवतो तसंच दृष्टी जाण्याचाही धोका असतो.
औद्योगिक क्षेत्रात इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, कारण इथेनॉलची विरघळण्याची क्षमता जास्त आहे. त्याचा वापर वॉर्निश, पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर आणि इतर द्रव्यं तयार करण्यासाठी होतो.
दारूच्या अनेक प्रकारात, जखमा स्वच्छ करताना जंतू नष्ट करण्यासाठी तसंच प्रयोगशाळेत द्रावण (solvent) म्हणून त्याचा वापर करण्यात येतो.
मृत्यू कसा होतो?
विषारी दारू प्यायल्यामुळे शरीरात काय होतं?
या प्रश्नावर डॉ. अजित श्रीवास्तव म्हणतात, "सामान्य दारू ही इथाईल अल्कोहोल असते तर मिथाईल अल्कोहोल विषारी असते. कोणतंही अल्कोहोल शरीरात लिव्हरच्या माध्यमातून अल्डिहाईडमध्ये बदलतं. मात्र मिथाईल अल्कोहोलचं फॉर्मलडिहाईड नावाच्या विषात रूपांतर होतं.
"या विषाचा सगळ्यांत जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. आंधळेपणा हे त्याचं पहिलं लक्षण आहे. एखाद्याने जास्त दारू प्यायली तर फॉर्मिक अॅसिड शरीरात तयार होतं. त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो," श्रीवास्तव सांगतात.
आश्चर्याची गोष्ट अशी की विषारी दारूचा उपचारही दारूनेच होतो.
डॉ. अजित श्रीवास्तव सांगतात, "मिथाईल अल्कोहोलचा उपचार इथाईल अल्कोहोल आहे. विषारी दारूला उतारा म्हणून गोळ्याही मिळतात. मात्र भारतात त्या जास्त प्रमाणावर उपलब्ध नाहीत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























