'रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यानं बाळ आईच्या पोटातच दगावलं', कुटुंबाचा आरोप; हिंगोलीत नेमकं काय घडलं?

हिंगोलीत प्रसुती वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावल्याची घटना समोर आली आहे.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

हिंगोलीत प्रसुती वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावल्याची घटना समोर आली आहे.

"रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यानं ती उपलब्ध झाली नाही. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती, तर बाळाचा जीव वाचला असता," असा आरोप नातेवाईकांनी केला.

याप्रकरणी कुटुंबाने आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळपणामुळे हे घडल्याचा आरोप केला आहे. यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उभी असूनही ती गरोदर महिलेस उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दुसरीकडे आरोग्य विभागाने रुग्णालयातील रुग्णवाहिकेमध्ये डिझेल उपलब्ध होतं. मात्र, गाडीचा चालक उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. नक्की काय घडलं? जाणून घेऊया.

नेमकं काय घडलं?

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील जवळा बाजारमधील आरोग्य उपकेंद्रावर 25 पेक्षा जास्त गावांच्या नागरिकांनी आरोग्य सेवा अवलंबून आहे.

नालेगाव येथील मनीषा ओमप्रकाश इंगळे यांना प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर 26 मे रोजी याच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

मात्र, प्रसुती गुंतागुंतीची असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

हिंगोली जिल्ह्यातील घटना

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तत्काळ शासनाच्या 102, 108 या प्रसुतीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला.

परंतू, फोन करून 1 तासाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका पोहोचली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संपर्क केला असता रुग्णवाहिकेत डिझेल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका मिळणार नसल्याचे आरोग्य व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

तब्बल दीड तास थांबूनदेखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. दुसरीकडे गरोदर महिलेला प्रसुती वेदना होत असल्याने अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून हिंगोलीचं शासकीय रुग्णालय गाठलं.

मात्र, प्रसुतीदरम्यान मनीषा इंगळे यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं.

'..तर बाळ वाचलं असतं'

मनीषा इंगळे यांच्या आई अनिता शंकरराव राखुंडे म्हणाल्या, "रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो. पंरतु, रुग्णवाहिका काही आली नाही. त्यावेळी आरोग्य केंद्रातही रुग्णवाहिका उभी होती. मात्र, त्यात डिझेलचा प्रॉब्लम आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं."

"मग आम्ही दुसरी गाडी मागवली आणि दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांनी तपासून सिझेरियन केले. परंतु, बाळ पोटातच दगावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं," अशी माहिती त्यांनी दिली.

अनिता राखोंडे, प्रसुती झालेल्या मनीषा इंगळे यांची आई
फोटो कॅप्शन, अनिता राखोंडे, प्रसुती झालेल्या मनीषा इंगळे यांची आई

राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी मात्र या प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाही करण्याची मागणी केली आहे.

तर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील डिझेल उपलब्ध नसल्यास आणि यात आरोग्य अधिकारी दोषी असल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रोहिणी खडसे यांनी व्यवस्थेने या बाळाचा खून केल्याचा आरोप केला. तसेच या संपूर्ण प्रकरणांमध्ये नेमकं दोषी कोण आहे असा संतप्त प्रश्न विचारत आरोग्य विभागावर टीका केली.

व्हीडिओ कॅप्शन, हिंगोलीत अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू, चौकशीचे आदेश

दोषींवर कारवाईचे आदेश

जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य यंत्रणेने 4 जणांची चौकशी समिती नेमल्याची माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "रुग्णवाहिकेत डिझेलचा साठा होता. परंतू, चालक काही कारणास्तव सुटीवर होता."

"त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था न केल्याचे प्राथमिक दर्शनी निदर्शनास आले आहे. या प्रकरणी चौकशी पथक स्थापन करण्यात येत असून चौकशीअंती दोषी कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल," असंही त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)