SIR : 'बीपी वाढला, झोपेतही तेच दिसतं', शिक्षकांवर मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा

राजू बोकडे हे नागपूरला राहतात. इथून दररोज 45 किलोमीटर जंगलाच्या रस्त्यानं त्यांच्या शाळेत जातात.
फोटो कॅप्शन, राजू बोकडे हे नागपूरला राहतात. इथून दररोज 45 किलोमीटर जंगलाच्या रस्त्यानं त्यांच्या शाळेत जातात.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"माझा अचानक बीपी वाढला होता. गेल्या 52 वर्षात मला कधी बीपीचा त्रास झाला नाही. पण, आता या कामामुळे मानसिक ताण इतका वाढला की बीपीचा त्रास झाला."

सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 पर्यंत सतत काम करणारे शिक्षक राजू बोकडे त्यांना होणारा त्रास सांगत होते. बोकडे यांच्याकडं निवडणूक आयोगाचं एसआयआरचं काम आहे.

पण, सोबतच त्यांना सकाळी शाळा देखील करावी लागते. त्यानंतर गावात फिरून एसआयआरचं काम करायचं आणि घरी आल्यावर तेच फॉर्म स्कॅन करायचे.

असे दिवसाचे 17 तास काम केल्यानं आणि अचानक दिनक्रम बदलल्यानं शारीरिक समस्या येऊ लागल्याचं ते सांगतात.

एसआयआर आणि अतिरिक्त कामाविरोधात शिक्षकांचं आंदोलन झाल्यानंतर खरंच एसआयआरच्या कामाचा शिक्षकांवर किती ताण आहे? त्याचा शाळांवर काही परिणाम होतोय का? यासाठी आम्ही नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये पोहोचलो.

चारगाव आणि सुराबर्डी अशा दोन्ही गावचे एसआयआरचे काम करणारे शिक्षक राजू बोकडे आम्हाला भेटले. त्यांचं काम कसं चालतं? कोणत्या समस्या येतात? हे बघण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण वेळ घालवला.

'एसआयआरचं काम करायचं, पण वेळ वाढवून द्या'

राजू बोकडे हे नागपूरला राहतात. इथून दररोज 45 किलोमीटर जंगलाच्या रस्त्यानं त्यांच्या शाळेत जातात.

नागपूर जिल्ह्यातील चारगाव शाळेतील ते शिक्षक आहेत. पण, त्यांच्या शेजारच्या सुराबर्डी शाळेतील शिक्षक रजेवर असल्यानं त्या शाळेची जबाबदारीही त्यांनाच दिली आहे. सोबतच एसआयआरचं काम पण दिलेलं आहे.

याआधी एसआयआरचं काम करणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश होते. पण, राजू बोकडे यांना कार्यमुक्त केलंच नाही. कारण, त्यांच्या सुराबर्डीच्या या शाळेत ते एकमेव शिक्षक आहेत.

त्यानंतर शासनानं सकाळी 7 -12 शाळा सुरू ठेवण्याचे आदेश काढले. आता त्यांना सकाळी शाळा करून त्यानंतर एसआयआरचे काम करावे लागते.

सकाळी शाळा करायची आणि त्यानंतर उरलेल्या वेळात एसआयआरचं काम करायचं. त्यामुळे कामाचा ताण वाढल्याचं शिक्षक सांगतात.
फोटो कॅप्शन, सकाळी शाळा करायची आणि त्यानंतर उरलेल्या वेळात एसआयआरचं काम करायचं. त्यामुळे कामाचा ताण वाढल्याचं शिक्षक सांगतात.

बोकडे सांगतात, "शिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार सकाळी साडेसात ते बारा शाळा घ्यायची आहे. त्यानंतर बीएलओचं काम करायचं. दुपारच्या वेळी लोक भेटत नाही आणि सकाळी आपली शाळा असते. मग सायंकाळच्या वेळी काम करायचं.

एसआयआरचं काम 30 जून पासून सुरू झालं ते 30 जुलैपर्यंत आहे. पण, मतदारांची संख्या, भेटीची संख्या आणि जे कामाचं स्वरुप आहे हे इतकं जास्त आहे की, हा वेळ कमी पडतोय.

30 जुलैपर्यंत असलं तरी आमचे वरिष्ठ आम्हाला 20 दिवसात काम पूर्ण करायला सांगतात. त्याचं कारण म्हणजे इतर वेळ प्रशासकीय कामात द्यायला लागणार आहे."

त्यांना एसआयआर राष्ट्रीय काम आहे म्हणून करायचं आहे. पण, त्यासाठी त्यांना वेळ वाढवून पाहिजे आहे. म्हणजे एसआयआरसोबत विद्यार्थ्यांना नीट शिकवता येईल आणि कामाचा ताणही येणार नाही.

कमीत कमी तीन महिने तरी वाढवून द्यायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

शिक्षकांवर मानसिक ताण येतोय का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बोकडे शाळा संपल्यानंतर गावात एसआयआरसाठी फिरतात. पण, ग्रामीण भाग असल्यानं आणि सगळे शेतकरी, शेतमजूर असल्यानं घरी कोणी भेटत नाही.

त्यामुळे एकाच घरी तीन ते चार वेळा भेटी द्यायला लागतात. एक फॉर्म भरायला जवळपास 20 मिनिटं लागतात, असं त्यांचं म्हणणं आहे.

ते एसआयआरची प्रक्रिया समजावून सांगतात, "एसआयआरमध्ये मतदारांना प्रत्येकी दोन फॉर्म देतो. एक प्रत त्यांना द्यायची आहे आणि एक त्यांच्याकडून भरून घ्यायची आहे. पासपोर्ट फोटो घ्यायचे आहे. जन्म तारीख, आधार क्रमांक, आईचं नाव, वडिलांचं नाव, 2002 च्या यादीत त्यांचं नाव असेल तर त्यांची माहिती, नसेल तर त्यांचे आई-वडिल, आजी आजोबा यांच्यासोबत मॅप करायचं. त्यांची माहिती यात भरायची.

ग्रामीण भागात कोणाकडे फोटो नसतात. आयोगानं त्यात सोय केली की लाईव्ह कॅमेऱ्यानं फोटो घ्यायचा. अडचण अशी असते की गावात नेटवर्क नसतं. त्यांची माहिती घेतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा फोटो घेतो.

यात लवकर काम व्हायचं तर उलट होत आहे. काही माहिती अशी असते की त्यांना आईचं नाव आठवत नाही, काही नाही. मग आपण त्यांच्या मुलाला विचारायचं, नातेवाईकांना विचारायचं. थोड्या समस्या आहे. शहराच्या मानाने सहकार्य ग्रामीण भागात चांगलं आहे."

शिक्षक बोकडे शाळा संपल्यानंतर गावात एसआयआरसाठी फिरतात.
फोटो कॅप्शन, शिक्षक बोकडे शाळा संपल्यानंतर गावात एसआयआरसाठी फिरतात.

एसआयआरच्या कामामुळे मानसिक ताण येत असल्याच्या तक्रारी आहेत. सकाळी शाळा करायची आणि त्यानंतर उरलेल्या वेळात एसआयआरचं काम करायचं. त्यामुळे कामाचा ताण वाढल्याचं शिक्षक सांगतात.

"सकाळी 6 ते रात्री 11 काम करायचं, झोपायला रात्री 12 वाजातात. म्हणजे जो तुमचा रुटीन आहे तो पूर्णपणे बदलला आहे.

माझा बीपी तर वाढलाच. पण, माझे मित्र आहेत त्यांनाही रात्री झोप न येणं, झोपेत तेच दिसणं, स्कॅनिंग झालं का बाबा, इतके आकडे आपण दिले का, आपलं काम झालंच पाहिजे अशा सगळ्या गोष्टी त्यांना झोपेत दिसतात.

शिवाय वेळेवर कोणतं काम आलं तर आपण जाऊ शकत नाही. स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. घरी आल्यानंतरही तेच काम करायला लागतं. याचा मानसिक ताण जाणवतोय." असं बोकडे सांगतात.

यासाठीच शिक्षण विभागानं 6 जुलैला पत्रक काढून ज्या शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती झालेली नाही त्यांनी एसआयआरचं काम करणाऱ्या शिक्षकांना शैक्षणिक कामकाजामध्ये सहकार्य करावे जेणेकरून शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार नाही असं म्हटलंय.

पण, बोकडे यांना ते पण लागू होत नाही. कारण, ते सुराबर्डीच्या शाळेत एकमेव शिक्षक आहेत.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय का?

30 जूनपासून एसआयआरचं काम सुरू झालं. त्याचदिवशी विदर्भातल्या शाळा देखील सुरू झाल्या. त्यामुळे पहिल्यांदा शाळेत येणारा विद्यार्थी जास्त वेळ शिक्षकासोबत घालवणार नाही, तर तो शिक्षकापासून अधिक दूर जाईल, त्याच्यावर काय परिणाम होईल अशी भीती महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे विजय साळकर बोलून दाखवतात.

तसेच ग्रामस्थ आणि पालक सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता व्यक्त करताना दिसले. आम्ही एसआयआरचं काम कसं चालतं हे बघत असतानाच गावातल्या पालकांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता आमच्याकडे बोलून दाखवली.

चारगावातील गोविंदा नेवारे म्हणतात, "मुलं कसे शिकणार याचा मला विचार आला. आमच्या गावातील शाळा पाचव्या वर्गापर्यंत आहे. एक शिक्षक गावात एसआयआरच्या कामासाठी फिरतो आणि एका शिक्षक एक ते पाचचे वर्ग भरवतो. सगळे मुलं एकाच वर्गात एकत्र कशी शिकणार? शिक्षक हेच काम करत बसेल तर मुलांना कोण शिकवणार आहे?"

एसआयआरचं काम 30 जून पासून सुरू झालं ते 30 जुलैपर्यंत आहे. पण, मतदारांची संख्या, भेटीची संख्या आणि जे कामाचं स्वरुप आहे हे इतकं जास्त आहे की हा वेळ कमी पडतोय.
फोटो कॅप्शन, एसआयआरचं काम 30 जून पासून सुरू झालं ते 30 जुलैपर्यंत आहे. पण, मतदारांची संख्या, भेटीची संख्या आणि जे कामाचं स्वरुप आहे हे इतकं जास्त आहे की हा वेळ कमी पडतोय.

विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी सकाळी सात ते बारा शाळा घेण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले.

पण, 17 तास काम करायला लागतं. त्यामुळे मानसिक ताण आल्यानंतर विद्यार्थ्यांना नैसर्गिक न्याय द्यायला पाहिजे तसा देऊ शकत नसल्याची खंत बोकडे बोलून दाखवतात.

ते म्हणतात, "शाळा सुरू झाल्यानंतर आपल्यामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये उत्साह असतो. आपला नवीन गोष्टी सुरू करण्याकडे कल असतो. पण, मानसिक स्थिती अशी झाली की सहा तास इकडे द्यायचे आणि मग एसआयआरचं काम करायचं. त्यात विद्यार्थ्याला योग्य न्याय द्यायचा तो देऊ शकत नाही.

दोन्ही कामं मानसिक परीक्षा पाहणारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना 30 दिवसात चांगल्यारितीनं शिकवू शकत नाही. मी तर म्हणेन हे काम उन्हाळ्यात जसं जणगणनेचं होतं तसं झालं असतं तर चांगलं झालं असतं. किमान आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगला वेळ देता आला असता."

एसआयआरचं काम 30 जून पासून सुरू झालं ते 30 जुलैपर्यंत आहे. पण, मतदारांची संख्या, भेटीची संख्या आणि जे कामाचं स्वरुप आहे हे इतकं जास्त आहे की हा वेळ कमी पडतोय.
फोटो कॅप्शन, एसआयआरचं काम 30 जून पासून सुरू झालं ते 30 जुलैपर्यंत आहे. पण, मतदारांची संख्या, भेटीची संख्या आणि जे कामाचं स्वरुप आहे हे इतकं जास्त आहे की हा वेळ कमी पडतोय.

बोकडे तर एसआयआरचं काम करणाऱ्या शिक्षकांचे एक प्रतिनिधी आहेत. पण, याविरोधात इतर शिक्षकांनी आंदोलनही उभारलं होतं.

राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन झाले. इथंच उपस्थित असणारे शिक्षक आणि नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे लिलाधर ठाकरे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशी मागणी करतात.

ते म्हणतात, "सर्वात मोठं राष्ट्रीय काम कोणतं असेल तर शिक्षणाचं आहे. त्यामाध्यातून नवीन पिढी घडणार आहे. राष्ट्रीय कामाची व्याख्या केली तर आमचं काम सरकार बुडवत आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षण बुडवत आहे.

त्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी किंवा सर्व विभागाचे कर्मचाऱ्यांनी एसआयआरचं काम झाल्यानंतर आमचं जे शिक्षण मागे राहिलं अभ्यासक्रम मागे राहिलं ते पूर्ण करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी शाळेत यायला पाहिजे. हे सरकार मान्य करणार आहे का?"

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि शिक्षकांवर येणाऱ्या मानसिक ताणाबद्दल आम्ही राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासोबत बोललो. पण, यावर आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही असं ते म्हणाले.

निवडणूक आयोगाचे म्हणणं काय आहे?

ग्रामीण भागात एसआयआरची प्रक्रिया सोपी आहे. लोक सहकार्य देखील करतात. शेतात गेल्यानंतर बीएलओ आलेला आहे तुम्ही येऊन जा असं सांगतात. ग्रामीण भागात ताण कमी असतो, असं मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "कोणाला वाटत असेल वेळ कमी पडत आहे तर, काळजी करायचं कारण नाही. व्यवस्थित काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिलेला आहे. प्रत्येक जिल्हानिहाय काय स्थिती आहे त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय घेणार.

आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. पण, मुदतवाढ नाही म्हणून कोणीही फार ताण घेण्याची गरज नाही. आपलं चांगलं काम करत राहा. वेळ कमी पडत असेल तर आवश्यक मुदत आपल्याला मिळणार. काळजी करू नये.

तसेच संपूर्ण राज्यात बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांचे शैक्षणिक तास कमी करायचे आणि बाकी वेळात काम करायचे.

बीएलओ म्हणून काम करत आहेत ते महत्वाचं आहे. शैक्षणिक काम आणि एसआयआरचं काम सोबत कसं होऊ शकेल, याची आम्ही पूर्ण काळजी आहोत," असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.