'जननेंद्रिय चोरी'च्या अफवा, 80 हून अधिक जणांचं लिंचिंग; आफ्रिकेत हे नेमकं काय घडतंय?

बोनिफेस म्गाला

फोटो स्रोत, Alfred Lasteck / BBC

फोटो कॅप्शन, बोनिफेस म्गाला आणि त्यांच्या एका मित्राला रेस्तरॉमधून बाहेर ओढून काढत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
    • Author, मुंगई न्गिगे
    • Role, बीबीसी ग्लोबल डिसइन्फर्मेशन यूनिट
    • Author, अल्फ्रेड लास्टेक
    • Role, बीबीसी आफ्रिका
    • Reporting from, टुंडुमा
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

ऑक्टोबर 2025 ते जुलै 2026 दरम्यान 'जननेंद्रिय चोरी'च्या अफवांनंतर 80 हून अधिक लोकांची जमावाकडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक माहिती बीबीसीच्या ग्लोबल डिसइन्फर्मेशन यूनिटनं आफ्रिकेतील सहा देशांच्या पोलीस दलाकडून गोळा केलेल्या आकडेवारीतून आढळून आलं.

'एखाद्या पुरुषाच्या खांद्यावर साध्या पद्धतीने थोपटल्यास त्याचे जननेंद्रिय आकसून जाऊ शकते किंवा ते गायब होऊ शकते' या अफवेमुळे इतक्या हत्या झाल्यात.

खरंतर 'जननेंद्रिय'संदर्भातील या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सोशल मीडियावर पसरवली जाणारी चुकीची माहिती या अफवांना खतपाणी घालत आहे.

टांझानियातील मेकॅनिक बोनिफेस म्गाला यांनी एप्रिलमध्ये त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग बीबीसीला सांगितला. जननेंद्रियांची चोरी करणारी व्यक्ती असा आरोप करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.

(सूचना : या बातमीतील काही वर्णनं विचलित करू शकतात.)

ते म्हणाले, "ते ओरडत होते की, आम्ही कोणाचे तरी जननेंद्रिय चोरले आहे. तिथे खूप मोठी गर्दी असल्यामुळे आम्हाला तिथून निसटण्याचा कोणताही मार्ग नव्हता."

त्यांचा अनुभव बीबीसीने पाहिलेल्या व्हीडिओंमध्ये दिसणाऱ्या घटनांसारखाच होता.

या व्हीडिओंमध्ये काही पुरुष असा दावा करताना दिसतात की, अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे जननेंद्रिय, म्हणजेच लिंग आणि अंडकोष, गायब झाले किंवा आकसले.

यानंतर जमाव कथित आरोपींकडून चोरलेली वस्तू परत करण्याची मागणी करतो. मोठ्या कालावधीपासून चालत आलेल्या शंका आणि अंधश्रद्धा यांमुळे अशा अफवांना बळ मिळालंय.

आफ्रिकेतील ज्या समुदायांमध्ये जादूटोण्यावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, सोशल मीडियामुळे या अफवा आणखी वाढल्या आहेत.

अफवा पसरल्या कुठून? उगम कुठे आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अलीकडच्या अफवांची ही लाट गेल्या वर्षी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधून (DRC) सुरू झाल्याचे दिसते. तिथे 2008 मध्येही अशा अफवा पसरल्या होत्या.

त्यानंतर या अफवा हळूहळू संपूर्ण परिसरात पसरू लागल्या. त्या बुरुंडी, झांबिया आणि टांझानियासोबतच मोझांबिक, अंगोला, मलावी आणि केनियापर्यंत पोहोचल्या.

झांबियामध्ये जननेंद्रिय गायब होण्याच्या अफवांनी मार्चमध्ये पहिल्यांदा जोर पकडला. त्यावेळी एका महिलेची जमावाने मारहाण करून हत्या केली होती. त्यानंतर ही दहशत सीमा ओलांडून टांझानियापर्यंत पोहोचली.

झांबियाच्या सीमेजवळ असलेल्या टांझानियातील टुंडुमा या गजबजलेल्या व्यापारी शहराजवळ म्पेम्बा येथे आपल्या घरी म्गाला डोक्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विळ्याच्या आकाराच्या जखमेच्या व्रणावरून बोटे फिरवतात आणि त्यांच्यासोबत घडलेला वेदनादायी प्रसंग सांगतात.

म्गाला म्हणतात, "त्या दिवशी मी मृत्यूच्या इतका जवळ पोहोचणार आहे, हे मला माहीत असते, तर मी त्या रेस्तरॉमध्ये जेवायला गेलोच नसतो. पण मृत्यू आपल्यापासून किती जवळ आहे, हे आपल्याला माहीत नसते."

ते आणि त्यांचा एक मित्र एक एप्रिल रोजी कार विकण्याच्या संदर्भात एका ग्राहकाला भेटण्यासाठी टुंडुमा येथे गेले होते. त्यांनी आधी दुपारचे जेवण करण्याचा निर्णय घेतला.

रेस्तरॉमध्ये बसल्यानंतर काही वेळातच एका जमावाने त्यांना बाहेर ओढून नेले.

त्यांच्या हनुवटीवर असलेले दोन छोटे व्रण आणि तुटलेला एक दात हे देखील त्या घटनेच्या खुणा आहेत.

मारहाणीदरम्यान ते बेशुद्ध झाले होते. दोन दिवसांनी म्गाला यांना रुग्णालयात शुद्ध आली. तिथे त्यांना त्यांच्या मित्राची हत्या करण्यात आल्याचं समजलं.

आता ते आपल्या पत्नी आणि चार मुलांसोबत घरी राहतात. ते लंगडत चालतात आणि त्यांना सतत डोकेदुखी होत असल्याचे सांगतात.

ते पुन्हा मेकॅनिक म्हणून काम करण्यासाठी कामावर परतू शकलेले नाहीत. मात्र, शेजारी आणि मित्रांनी त्यांच्या आवश्यक औषधांच्या काही खर्चासाठी मदत केल्याचे ते सांगतात.

'जननेंद्रिय चोरी'च्या अफवा, 80 हून अधिक जणांचं लिंचिंग; आफ्रिकेत हे नेमकं काय घडतंय?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

ज्या दिवशी म्गाला आणि त्यांच्या मित्रावर हल्ला झाला, त्याच दिवशी पेशाने छायाचित्रकार असलेले मायकेल सिलाव्वे यांनीही टुंडुमा येथे असाच आणखी एक हल्ला पाहिला.

जननेंद्रिय चोरीशी संबंधित व्हीडिओ टिकटॉकवर पसरल्यानंतर लोकांमध्ये भीती वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

त्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर लोकांना पळताना पाहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जवळच एका व्यक्तीवर आरोप करून त्याला मारहाण केली जात असल्याचे त्यांना समजले. नंतर त्याला पेटवून देण्यात आले.

23 वर्षीय सिलाव्वे यांनी बीबीसीला सांगितले, "त्याला पेटवून दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्व लोक तिथून पळून गेले."

बीबीसी ग्लोबल डिसइन्फर्मेशन यूनिटनं पडताळणी केलेल्या या हल्ल्याच्या एका व्हीडिओमध्ये लोकांचा समूह एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतो. हा व्हीडिओ टिकटॉक आणि फेसबुकवर एक लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

लोक त्या व्यक्तीकडून कथितरीत्या चोरलेले जननेंद्रिय परत करण्याची मागणी करत आहेत, असं व्हीडिओमध्ये दिसतं.

सिलाव्वे म्हणाले, "अशा घटना सातत्याने वाढत होत्या आणि लोकांना मारहाण केली जात होती. आमच्यासारखे तरुण घारबरलेले होते. मात्र, आता कळलंय की, या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही."

बीबीसीच्या तपासणीत काय आढळले?

मोम्बा जिल्ह्यातील टुंडुमामध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय फॅशन डिझायनर आशा स्टिव्हन म्वाकिलासा यांचेही असेच मत आहे. त्या म्हणतात, "माझ्या लक्षात आलं की हे खरं नव्हतं."

पण तरीही यामुळे काळजी मिटली नाही. विशेषतः त्यांचे पती किंवा मुलगा घराबाहेर असताना त्यांना काळजी वाटते. मात्र, पोलीस आता गस्त घालत असल्याचे त्या सांगतात.

मोम्बा जिल्ह्याचे आयुक्त एलियास डॅनियल म्वांडोबो यांनी बीबीसीला सांगितलं की, "स्थानिक तपासातून काही घटनांमागे जाणीवपूर्वक गुन्हेगारी हेतू असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी गुन्हे करण्याचा आणि लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचला होता."

टांझानियातील सर्वात मोठे शहर दार एस सलाम येथे चित्रित केलेल्या आणखी एका व्हीडिओमध्ये जमाव एका व्यक्तीला बाजारातील धुळीच्या रस्त्यावरून फरफटत नेताना दिसतो.

लोक त्याला ढकलतात, पकडतात आणि मारहाण करतात. आपण निर्दोष असल्याचं ती व्यक्ती वारंवार सांगताना दिसते. मात्र, लोक त्याच्याकडून जननेंद्रिय परत करण्याची मागणी करत आहेत.

बीबीसीच्या डिसइन्फर्मेशन यूनिटने मोझांबिक आणि केनियामध्ये झालेल्या हल्ल्यांचेही अशाच प्रकारचे व्हीडिओ सत्यापित केले आहेत.

जमावाची हिंसा, कथित प्रत्यक्षदर्शींची वक्तव्यं, कथित घटनांशी संबंधित इशारे, तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या घटनांचे व्हीडिओ म्हणून सादर केलेल्या डझनभर रेकॉर्डिंग्ज टिकटॉक आणि फेसबुकवर प्रसारित होत आहेत.

बीबीसीने विश्लेषण केलेल्या अशा अनेक पोस्ट अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामध्ये जमावाची हिंसा दाखवणाऱ्या काही व्हीडिओंचाही समावेश आहे.

मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले, "आम्ही शेअर करण्यात आलेल्या सामग्रीचा आढावा घेत आहोत. आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारी सामग्री आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल."

टिकटॉकलाही बीबीसीनं प्रतिक्रिया विचारली. मात्र, टिकटॉकनं अद्याप उत्तर दिले नाही.

काही सोशल मीडिया क्रिएटर लोकांना सावध राहण्याचा सल्ला देतात. मात्र, हे स्पष्ट होत नाही की, ते या दाव्यांवर स्वत: विश्वास ठेवतात की, अधिकाधिक लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतायेत.

काही लोक तर कथित ताविजांचाही प्रचार करत आहेत. या ताविजांमुळे जननेंद्रिय चोरीपासून संरक्षण मिळते, असा दावा हे लोक करतायेत. दुसरीकडे, काही विनोदी कलाकारांनी या दाव्यांची खिल्ली उडवत उपरोधिक व्हीडिओही तयार केले आहेत.

लेखक ज्युलियन बोनोम यांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे अफवा पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पसरतात. त्या मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचतात. एकदा अफवा पसरायला सुरुवात झाली की त्यावर नियंत्रण ठेवणेही अधिक कठीण होते.

त्यांच्या 'द सेक्स थीव्ह्स: द अँथ्रोपॉलॉजी ऑफ अ रूमर' या पुस्तकात 'जननेंद्रिय चोरी'शी संबंधित अफवा कशा पसरल्या आणि लोक त्यावर विश्वास का ठेवतात, याचा अभ्यास करण्यात आला आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, लोक केवळ एखाद्याचे जननेंद्रिय गायब झाल्याचे ऐकत नाहीत. तर त्यांच्यासमोर त्रस्त लोक असे सांगतानाही दिसतात की त्यांच्यासोबत असे घडले आहे. किंवा ते या आरोपांवर जमावाची प्रतिक्रिया देखील पाहतात.

ते म्हणतात की, सोशल मीडियावरचे व्हीडिओ कुठलीही पडताळणी न केलेल्या दाव्यांवर विश्वास निर्माण करतात. याचं कारण लोक व्हीडिओच्या माध्यमातून घटना लगेच पाहू शकतात.

त्यांच्या मते, सध्याचे डिजिटल वातावरण आणि यापूर्वी पसरलेल्या अशा अफवांच्या काळातील परिस्थिती यांच्यातील हा 'सर्वात महत्त्वाचा फरक' आहे.

मोझांबिकमध्ये सर्वाधिक प्रकरणं

या जीवघेण्या अफवांची सर्वाधिक प्रकरणं मोझांबिकमध्ये आढळली आहेत. इथल्या पोलिसांनी मे महिन्यात सांगितले होते की, सहा आठवड्यांच्या कालावधीत 55 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये एक पोलीस अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांचाही समावेश होता.

मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल चापो यांनी या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या अफवा आणि मृत्यूंचा जाहीर निषेध केला होता. हे दावे खोटे असल्याचे त्यांनी सांगितले होते. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा कोणताही भाग गायब झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही वैद्यकीय पुरावा सरकारला मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

एप्रिलमध्ये दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर त्यांच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता. ही घटना काबो डेलगाडो प्रांतात घडली.

हा परिसर टांझानियाच्या सीमेला लागून असून जवळपास दशकभरापासून इस्लामी बंडखोरीमुळे प्रभावित आहे.

हल्ले झालेल्या भागांमधील आरोग्य केंद्रे अनेक आठवडे बंद ठेवावी लागली. या काळात अधिकाऱ्यांनी या दाव्यांना उत्तर देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली. या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेदरम्यान सरकारने सांगितले की, काही भीती कोरो सिंड्रोमशी संबंधित असू शकतात.

हा एक मानसिक विकार आहे, ज्याला जननेंद्रिय गायब होणे किंवा आकसणे यासंबंधीच्या हिस्टेरियाच्या नावानेही ओळखले जाते.

हिंसाचाराच्या सर्वात अलीकडच्या घटना केनियामध्ये घडल्या आहेत. तिथे क्वाले आणि मोम्बासा या किनारी काउंटी भागांमध्ये जमावाने पाच लोकांची हत्या केली.

अशाच प्रकारच्या दाव्यांमुळे मलावीमध्येही जमावाच्या हल्ल्यांना चालना मिळाली. तिथे आठ लोकांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images

जुलैमध्ये पहिल्या घटनांच्या बातम्या आल्यानंतर मोम्बासा काउंटीचे आयुक्त मोहम्मद नूर यांनी काही कंटेंट क्रिएटर्सना यासाठी जबाबदार धरले. केवळ जास्त व्ह्यूज आणि लक्ष वेधून घेण्यासाठी हे लोक असे दावे पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले.

नूर यांनी बीबीसीला सांगितलं, "अशा प्रकारची चुकीची माहिती सहजपणे लोकांचे जीव घेऊ शकते."

यानंतर पोलिसांनी हिंसाचारावर नियंत्रण मिळवले आणि अनेकांना अटक केली, असे त्यांनी सांगितले.

यामध्ये एक वडील आणि त्यांचा मुलगाही होता. दोघांनी एका महिलेवर हल्ला केल्याचा गुन्हा कबूल केला होता. त्या महिलेवर पुरुषांचे जननेंद्रिय गायब करण्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर दोघांनाही एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

अशाच प्रकारच्या दाव्यांमुळे मलावीमध्येही जमावाच्या हल्ल्यांना चालना मिळाली. तिथे आठ लोकांचा मृत्यू झाला.

शेजारील देश टांझानियातील टुंडुमा येथे मेकॅनिक म्गाला अजूनही त्या हल्ल्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांची मानसिक वेदना अजूनही ताजी आहे.

ते म्हणतात, "जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा आजही मला खूप वेदना होतात. माझ्या मित्राचा ज्या प्रकारे विनाकारण मृत्यू झाला, ते आठवून मला दुःख होते. कारण आजपर्यंत मला माहीत नाही की नेमकं काय घडत होतं."

ते म्हणतात, "अचानक कोणत्याही कारणाशिवाय लोक तुमच्यावर दगड फेकू लागले. आणि मग तुमचा जीव गेला तर?"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)