ISROचा नवा विक्रम: एकाच वेळी सोडले 31 उपग्रह - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter / @PIB_India
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) ISROने एकाच वेळी सोडले 31 उपग्रह
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने एकाच वेळी 31 उपग्रहांचं प्रक्षेपण करून नवा विक्रम केला आहे. त्याचबरोबर 380 किलोग्रॅम वजनाच्या भूनिरीक्षण उपग्रह HysISचंही यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter / @PIB_India
आंध्र प्रदेश स्थित श्रीहरिकोटो येथील सतीश धवन स्पेस स्टेशनवरून Polar Satellite Launch Vehicle (PSLV)चं हे 45वं उड्डाण होतं. आज तकने ही बातमी दिली आहे.
HysISचा उपयोग शेती, जंगल, भूनिरीक्षण, पर्यावरण अभ्यास सारख्या कामांसाठी होणार आहे. तसंच दहशतवाद विरोधी यंत्रणांमध्ये पाळत ठेवण्यासाठीही त्याचा वापर होणार आहे.
2) माजी RAW अधिकारी UPSCचे नवे अध्यक्ष

फोटो स्रोत, Twitter/All India Radio
केंद्रीय गुप्तचर संस्था 'RAW'चे माजी अधिकारी अरविंद सक्सेना यांची Union Public Service Commissionचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2015पासून ते UPSCचे सदस्य होतेच, अशी बातमी 'ऑल इंडिया रेडिओ'ने दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सक्सेना यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून B.E तर IIT Delhi मधून M.Tech पूर्ण केलं. 1976 मध्ये ते पोस्टल सर्व्हिसमध्ये रुजू झाले होते.
1988मध्ये पोस्टल सर्व्हिस सोडून केंद्रीय गुप्तचर संस्था Research and Analysis Wing (RAW)मध्ये ते रुजू झाले. नेपाळ, चीन, पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांतील घडामोडींचा त्यांचा अभ्यास आहे.
3) CBIसंचालक नियुक्तीचा अधिकार केंद्र सरकारचाच
CBI संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे अधिकार केंद्र सरकारला असून केंद्रीय दक्षता आयुक्तांना CBIच्या भ्रष्टाचार प्रकरणांवरच नव्हे तर सर्व प्रकरणांवर देखरेख करण्याचे अधिकार असल्याचा युक्तिवाद गुरुवारी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला.
सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ हे युक्तिवाद करत होते, अशी महाराष्ट्र टाइम्सने बातमी दिली आहे.
आलोक वर्मा यांचे अधिकार काढून घेण्याच्या निर्णयाला कोणताही आधार नव्हता. त्यांच्याविरुद्ध तक्रारी असल्यास त्यांना नियुक्त करणाऱ्या समितीकडे जाता आलं असतं. वर्मा यांची नियुक्ती करणाऱ्या उच्चाधिकार समितीच्या मंजुरीशिवाय त्यांना रजेवर पाठवण्याचा अधिकार केंद्रीय दक्षता आयुक्त किंवा केंद्र सरकारला नाही, असा दावा आलोक वर्मा यांचे वकील फली एस. नरीमन यांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
निवड समितीच्या शिफारसीच्या आधारे CBI संचालकाची नियुक्ती केंद्र सरकार करते आणि शिफारस केल्यानंतर निवड समितीचे अधिकार संपुष्टात येतात. त्यामुळे CBI संचालक आलोक वर्मा यांना रजेवर पाठवण्याचा निर्णय निवड समितीच्या मंजुरीने घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली.
या प्रकरणी 5 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
4) 'प्रवासी बोट वाहतुकीत नियमांचे उल्लंघन'
प्रवासी बोट वाहतुकीत निमयांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी विधान परिषदेत मान्य केलं. याबाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघाताबाबत शिवसेना सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन सूचनेवरील चर्चेत चव्हाण बोलत होते.

फोटो स्रोत, Hindustan Times
स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या अपघाताची चौकशी सुरू आहे. याशिवाय नौकानयन सल्लागारांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली आहे.
दहा ते पंधरा दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असंही चव्हाण म्हणाले.
5) 'तो' कोण होता, मला माहिती नव्हती - नवज्योत सिद्धू
भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या कर्तारपूर साहीब गुरुद्वारात जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी कॉरिडॉरचं नुकतंच भूमिपूजन झालं. त्यावेळी पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आणि गोपाल सिंग चावला नावाच्या एका व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर वाद निर्माण झाला आहे.
त्यानंतर सिद्धू यांना जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं.
याबद्दल स्पष्टीकरण देताना गोपाल सिंग चावला हे खालिस्तानी फुटीरवादी संघटनेशी संबंधित होते, याची त्यांना कल्पना नव्हती, असं सिद्धू म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
पाकिस्तानस्थित गोपाल सिंग चावला यांचे याआधी पाकिस्तानचे सैन्य प्रमुख कमर जावेद बाजवा आणि 26/11 मुंबई हल्ल्याच्या म्होरक्या हाफीज सईद यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.
पंजाबला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या डेरा बाबा नानक शहरातून पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वारात जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी कॉरिडॉरचं भूमिपूजन झालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)






















